तीर्थक्षेत्रांविषयी माहिती देणारे पुस्तक

तीर्थक्षेत्राला भेटी देण्याची प्रयोजने असंख्य असतील पण सर्वात महत्त्वाचे पर्यटकाला त्यातून मिळणारे मानसिक समाधान व आनंद. हा आनंद पुढे वाढत जाऊन तुमचा नवीन तीर्थक्षेत्राच्या भेटीचा उत्साह वाढवतो. वास्तविक तीर्थक्षेत्रांच्या भेटीत प्रदेश, निसर्ग, शिल्प, स्थापत्यकला, विविध देवतांची वेगवेगळ्या शैलीची व संस्कृतीची मंदिरे, तेथील चालीरिती, आचार-विचार, भाषा आणि याबरोबरीने राष्ट्रीय एकात्मता हाही मुख्य हेतू असतो.

  ‘तीर्थाटन’ हे तीर्थक्षेत्रांविषयी माहिती देणारे मुक्ता कणेकर यांचे पुस्तक. प्रत्येक धर्मानुसार त्या त्या प्रांतातील विशिष्ट स्थाने ही पवित्र मानली गेली आहेत. ही पवित्र स्थाने म्हणजे तीर्थक्षेत्रे. या तीर्थक्षेत्रांच्या मागे काही कथा, आख्यायिका असतात. तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्याला त्या माहीत असतातच असे नाही. तीर्थक्षेत्री जाणारा माणूस मात्र त्याच्यातील धार्मिक श्रद्धेमुळे त्या ठिकाणी येतो. त्याच्यातील धार्मिक श्रद्धेमुळे देव-देवता त्या त्या क्षेत्री चैतन्यरूपात अस्तित्वात आहे याचा आनंद त्याला मिळत असतो.
  तीर्थक्षेत्राला भेटी देण्याची प्रयोजने असंख्य असतील पण सर्वात महत्त्वाचे पर्यटकाला त्यातून मिळणारे मानसिक समाधान व आनंद. हा आनंद पुढे वाढत जाऊन तुमचा नवीन तीर्थक्षेत्राच्या भेटीचा उत्साह वाढवतो. वास्तविक तीर्थक्षेत्रांच्या भेटीत प्रदेश, निसर्ग, शिल्प, स्थापत्यकला, विविध देवतांची वेगवेगळ्या शैलीची व संस्कृतीची मंदिरे, तेथील चालीरिती, आचार-विचार, भाषा आणि याबरोबरीने राष्ट्रीय एकात्मता हाही मुख्य हेतू असतो.
  लेखिका मुक्ता कणेकर यांनी सदर पुस्तकात भारतातील ६७ तीर्थेक्षेत्रांची माहिती दिली आहे. ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. तीर्थक्षेत्राचे पर्यटन करत असताना त्या क्षेत्रांतील तीर्थाची तोंडओळख या पुस्तकातील माहितीची आधारे करून घेतली तर ते तीर्थाटन जास्त अर्थपूर्ण ठरते. असे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते.
  उदाहरणार्थ, जम्मू प्रदेशात असलेले वैष्णवीदेवी हे देवीच्या शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ आहे. हे देवस्थान उंच जागी आहे. त्यामुळे तेथे पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचीही सोय आहे. घनदाट अरण्य, लांबच लांब गृहा पार करून देवीचे दर्शन घडते. ही माहिती वैष्णवीदेवीला गेलेला प्रत्येक जण रंगवून सांगतो. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा देवतांच्या दर्शनाने आपले जीवन कृतकृत्य झाले याचा तीर्थकाराला आनंद होतो. मात्र वैष्णवीदेवीला भेट देणाऱ्या अनेकांना तिच्यासंदर्भातील आख्यायिका माहीतच नसते. ती अशी की, त्रेतायुगात रत्नाकर सागर नावाचा एक विष्णूभक्त होऊन गेला. अपत्यप्राप्तीसाठी त्याने देवीची आराधना केली. त्याला मुलगी झाही. तिचे नाव त्याने वैष्णवी ठेवले. पुढे तपश्चर्या करताना तिला प्रभू रामचंद्र भेटले. ते सीतेचा शोध घेत होते. वैष्णवीने त्यांना तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी तिला मी एकपत्नी व्रताचे आचरण करीत आहे. पण कल्की अवताराता मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तू एका गृहेत तपश्चर्या कर. रामाला रावणावर विजय मिळावा म्हणून तिने नऊ दिवस नऊ रात्री उपास केले व प्रार्थना केली. प्रभू रामचंद्रांनी प्रसन्न होऊन तिला अमरत्वाचा वर दिला.  मात्र ही कथा वैष्णवीदेवीला दर्शनाला जाणाऱ्या किती जणांना माहीत आहे? याचा या पुस्तकात उलगडा होतो.
  एखादा असूर तपश्चर्या करून अमरत्वाचा वर मिळवतो. वर मिळाल्यानंतर उन्मत्त होऊन तो सर्वांना त्रासून सोडतो. मग त्याचा नाश करण्यासाठी एखाद्या अवताराची निर्मिती होते. अशा प्रकारच्या बहुतेक पुराणकथा आपणास वाचावयास मिळतात. यादृष्टीने ‘कन्याकुमारी’ची कथा आख्यायिका मोठी रंजक आहे व ती वाचत असताना पौराणिक काळात देवादिकांनाही असुरांनी नाकीनऊ आणले याची माहिती मिळते.
  बऱ्यादा यात्रा करताना यात्रेकरूच्या मनात अनेक हेतू असतात. उदाहणार्थ, दु:ख, संकटे, इच्छापूर्ती, पापक्षालन पुण्य वगैरे. परंतु, हे पुस्तक वाचत असताना देव, देवांचे अवतार, त्यांचे वास्तव्य व चमत्कार यांमुळेच ही स्थाने पावन झाली आहेत हे कळते. आपल्या तीर्थाटनाला थोडी पुराणातील आख्यायिकांच्या माहितीची जोड दिली तर या गोष्टींकडे अधिक डोळसपणे आपण पाहू शकतो.
  सदर पुस्तकात हिंदूंच्या महत्त्वांच्या तीर्थक्षेत्रांची नेमकी माहिती देण्याचा प्रयत्न लेखिकेचा आहे. त्रि-स्थळी यात्रा, चार-धामांची यात्रा, मोक्षादायिनी सप्तपुऱ्या, बारा ज्योतिर्लिंगे, शक्तिपीठे, गणपतिक्षेत्रे, वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे, नाथ संप्रदायाची तीर्थक्षेत्रे, दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे, सुभ्रमण्यक्षेत्रे आदी घटकांतील तीर्थक्षेत्रांची आख्यायिका, पुराणकथा इत्यादींची माहिती पुस्तकात आहे. वर सांगितलेल्या घटकांतील सर्वच तीर्थक्षेत्रांची संपूर्णत: माहिती पुस्तकात नसली तरी, प्रत्येक घटकांतील काही क्षेत्रांचा परिचय लेखिकेने करून दिलेला आहे.
  प्रत्येक तीर्थक्षेत्राचा परिचय करून देताना सुरुवातील त्या क्षेत्राचे महत्त्व काही ओळींतच ठळकपणे त्यांनी मांडले आहे. ‘तीर्थाटन’ हे जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ‘प्रहार’ या दैनिकातील तीर्थक्षेत्रांच्या स्तंभलेखनामधील लेखांचे संकलन आहे. साहजिकच त्यामुळे प्रत्येक परिचयात्मक लेखाला शब्दांची मर्यादा आहे हे वाचताना जाणवते.
  ‘भारतात भिन्न भिन्न पंथ असताना व परस्परांशी शत्रुत्व करणाऱ्या राजांची राज्ये असतानाही भारतीय समाजात सांस्कृतिक एकात्मकता टिकली याचे कारण तीर्थक्षेत्रे.’ हे म्हणणे ‘तीर्थाटन’ वाचल्यानंतर पटते.

  –  प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
  raghunathshetkar0@gmail.com

  तीर्थाटन
  मुक्ता कणेकर
  मुखपृष्ठ  :  संतोष धोंगडे
  प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
  पृष्ठ : २१६, मूल्य : रुपये ३००/-