acterss deepika padukone in oscar awards 2023 nrvb

कधी काळी ऑस्कर पुरस्काराबाबत आपल्याकडे फक्त एलिट क्लासमध्ये कुतूहल आणि कौतुक होते. बुध्दीवादी वर्ग त्यावर खूप खोलवर जाऊन चर्चा करे. आपल्या चित्रपटाच्या स्पर्धेत इतर देशातील कोणते चित्रपट आहेत याची बरीच तुलना होई. पण त्यांना पारंपरिक लोकप्रिय मराठी व हिंदी चित्रपट म्हणजे डाऊन मार्केट वाटे. त्या काळात ऑस्करबाबत विशेषतः विदेशी चित्रपट आणि आपल्याकडचा कलात्मक अथवा समांतर चित्रपटाच्या रसिकांना त्याची महती आणि माहिती होती.

आज रविवारी रात्री उशिरा म्हणजेच भारतीय वेळेनुसार उद्या पहाटे साडेपाच वाजता जगभरातील अनेक देशांतील चित्रपट रसिकांचे लक्ष लॉसएंजेलिस (कॅलिफोर्निया) येथील डॉल्बी थिएटरमध्ये सुरु असलेल्या ९५ व्या अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर सोहळ्यावर असेल.

याही वेळेस भारतीय चित्रपटसृष्टीला एखादा ऑस्कर पुरस्कार प्राप्त होईल की नाही हे दिसेलच; पण पुरस्कार सोहळ्याच्या स्टेजवर एरियाना डेबोससोबत दीपिका पादुकोण नक्कीच काही विजेत्यांना ऑस्करची प्रतिष्ठित ट्रॉफी देताना नक्कीच दिसेल आणि तीदेखील ‘मानाची गोष्ट’ असल्याने त्याचा आनंदही होईल. याच स्टेजवर ‘आर. आर. आर.’ चित्रपटातील नाटू नाटू हे या सुपर हिट गाण्यावर रामचरण व ज्युनियर एन. टी. आर. परफॉर्मन्स करतील.

जगभरात एक्स्पोजर मिळेल याचा आनंद आहेच म्हणा. पण ऑस्कर पुरस्कार? या गाण्याला नामांकन आहे. ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ हा माहितीपट आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या लघुपटाला नामांकन आहे. या प्रत्येकाला ऑस्कर प्राप्त व्हावा म्हणून शुभेच्छा… दीपिका पादुकोण आणि नाटू नाटू गाण्यामुळे आपण ‘ऑस्कर इव्हेन्टसमध्ये दिसू’ हेही महत्वाचे. प्रियांका चोप्राला अशी संधी मिळाली होती. या दोघींनी हॉलीवूडपटात ग्लॅमरस रुपात आपलं अस्तित्व दाखवल्याचे हे फळ.

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘छेलो शो’ या गुजराती भाषेतील चित्रपटाची निवड झाली. पण पहिल्याच फेरीत तो बाद झाला. ‘मी वसंतराव’ वगैरे चित्रपटांची थेट प्रवेशिका होती आणि आजच्या मार्केटिंगच्या युगात असे वातावरण तयार केले की जणू हे चित्रपट आता ऑस्करपासून फारच लांब नाहीत. ऑस्कर हा चलनी ब्रॅण्ड असल्याचा हा परिणाम.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ची याच स्पर्धेसाठी मागे निवड होताच मीडियात ती हेडलाईन ठरली, सोशल मीडियात तर झोया अख्तर आणि चित्रपटाचे विशेष कौतुक करणारे अगणित ट्वीट येत राहिले. ‘जल्लीकट्टू’ हा मल्याळम चित्रपट असल्याने दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात त्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. पण, ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड होणारा चित्रपट याच कॅटेगरीत अजून राहिलाय काय? तो ऑस्करच्या दरवाजापर्यंत तर जातोय, पण त्याला ऑस्करमध्ये विदेशी चित्रपट विभागात नामांकन का बरे मिळत नाही? ज्या देशात तब्बल २२ भाषेत वर्षभरात तब्बल बाराशे ते चौदाशे चित्रपट निर्माण होतात त्या देशात ऑस्कर पुरस्कार जाऊ दे, साधे एखाद्या चित्रपटाला नामांकन प्राप्त होत नाही?

फक्त आणि फक्त संख्याबळात भारतीय चित्रपटसृष्टी सरस? पण अधूनमधून ‘श्वास’ अथवा ‘छेल्लो शो’ अशा प्रादेशिक चित्रपटाची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने निवड करुन प्रादेशिक चित्रपटाला मुख्य प्रवाहात आणले. आपल्या चित्रपटाने ऑस्कर पटकावून भारतात फक्त संख्याबळाने चित्रपट निर्मिती वाढलीय असे नव्हे तर येथे क्लासिक चित्रपटही निर्माण होत असतात हे जगभरातील चित्रपट रसिकांना दाखवूनच द्यावे. भारतीय चित्रपट म्हणजे फक्त आणि फक्त गीत संगीत व नृत्य यांची रेलचेल असलेले पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपट नव्हे तर येथे आता जागतिक सिनेमाच्या स्तरावरचेही चित्रपट पडद्यावर येतात हेही अधोरेखित होईल. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक देशांतील विविध भाषांमधील चित्रपट इतर अनेक देशांत पाह्यला मिळताहेत अशा बदललेल्या वातावरणात तर एखाद्या भारतीय चित्रपटाला ऑस्करची बाहुली मिळायलाच हवी.

संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (२००३)ची ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून निवड झाली तेव्हा मराठी वृत्तपत्रांची ती हेडलाईन होती. अग्रलेख लिहिले गेले, विश्लेषण केले गेले. मराठी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात सकारात्मक उर्जा निर्माण झाली. मराठी चित्रपटाकडे पुन्हा प्रेक्षक वळला, इंग्रजी मीडियात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाऊ लागली, अमहाराष्ट्रीय प्रेक्षकही मराठी चित्रपट पाहू लागला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२०१०) आणि चैतन्य ताह्मणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ (२०१५) या मराठी चित्रपटांची अशीच निवड होताच खूप सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली.

अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ (२०१७) या हिंदी चित्रपटाची निवड होताच एका महाराष्ट्रीय दिग्दर्शकाच्या हिंदी चित्रपटाने अशी मोठी झेप घेतल्याने मराठी मन आनंदले. कधी काळी ऑस्कर पुरस्काराबाबत आपल्याकडे फक्त एलिट क्लासमध्ये कुतूहल आणि कौतुक होते. बुध्दीवादी वर्ग त्यावर खूप खोलवर जाऊन चर्चा करे. आपल्या चित्रपटाच्या स्पर्धेत इतर देशातील कोणते चित्रपट आहेत याची बरीच तुलना होई. पण त्यांना पारंपरिक लोकप्रिय मराठी व हिंदी चित्रपट म्हणजे डाऊन मार्केट वाटे. त्या काळात ऑस्करबाबत विशेषतः विदेशी चित्रपट आणि आपल्याकडचा कलात्मक अथवा समांतर चित्रपटाच्या रसिकांना त्याची महती आणि माहिती होती.

सामान्य माणसापासून ऑस्कर खूपच दूर म्हणजे फोटो फ्रेमबाहेर होते. आपल्याकडचा ‘चित्रपट गर्दीत एन्जॉय करणारा मास’ मात्र हा पुरस्कार आपला नाही अशाच मानसिकतेत होता. त्यांना या सगळ्याचे महत्व माहिती होतही नव्हते. याला पहिला छेद दिला आमिर खान निर्मित आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ (२००१) ने! आशुतोष गोवारीकरने पटकथेवर सखोल मेहनत घेऊन, ती पुन्हा पुन्हा लिहूनच या चित्रपटाचे तपशीलवार दिग्दर्शन केले आणि म्हणूनच समिक्षक आणि रसिकांची दाद मिळाली.

मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५८) आणि मीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बॉम्बे’ (१९८९) या चित्रपटांनाही असेच नामांकन मिळाले पण ऑस्कर पुरस्कार मात्र प्राप्त झाला नाही. ‘मदर इंडिया’ काही गुणांनी ऑस्करपासून दूर राहिला. तर रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ (१९८३) साठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी भानू अथ्थया यांना पुरस्कार प्राप्त झाला. पण तो व्यक्तिगत होता. डॅनी बोयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनियर’ (२००८) या चित्रपटाने एकूण आठ ऑस्कर पुरस्कार पटकावले, पण तो विदेशी निर्मिती संस्थेचा चित्रपट होता. तर फरक इतकाच की ‘लगान’चा काळ हा हिंदी चित्रपट कूस बदलत असल्याचा, समांतर आणि व्यावसायिक असा भेद कमी होत चालल्याच्या वळणावरचा होता.

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ असे मराठी तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पहेली’, संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ वगैरे हिंदी आणि कधी गुजराती चित्रपट ‘हिल्लोरी’ वगैरे प्रादेशिक चित्रपट आपण ऑस्करला पाठवला. पण या मुख्य प्रवाहातील चित्रपट अद्याप आपल्याला जगभरातील सर्वाधिक मानाचा ‘ऑस्कर पुरस्कार’ मात्र मिळवू देऊ शकले नाहीत. ऑस्कर आणि आपण हा आपला नेहमीचा चर्चेचा विषय.

ग्लोबल युगातील चित्रपट रसिक याबाबत विशेष जागरुक आहेत, तपशीलात जातात, जगभरातील चित्रपट संस्कृती जाणून घेताहेत. त्यांना ऑस्करच्या स्टेजवरुन पुरस्कार देण्यात येणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये दीपिका पादुकोण असल्याचे फार कौतुक नसावे. तिच्या या गोष्टीचे आकर्षण सोशल मीडियातील तिच्या फॅन्स व फॉलोअर्सना. तुम्ही कोणत्या वर्गवारीत आहात यावर आजच्या ऑस्कर सोहळ्याची वाट पहालच.

दिलीप ठाकूर

glam.thakurdilip@gmail.com