सहकार व शिक्षण क्षेत्रातील कृतीशील नेतृत्व : अॅड सुभाषराव (आण्णा) सोनवणे

शतकाची परंपरा गाठायला एका दशकाचा अवधी असतांना म्हणजे सन १९९० मध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्व. नानांच्या घरी येवून नानांपुढे आग्रह केला की, अॅड. सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांना आय काँग्रेसतर्फे येवला विधानसभेची उमेदवारी देतो, कामाला सुरवात करा; अशी सकारात्मक सूचना केली. परंतू नानांनी तो प्रस्ताव नाकारला. कदाचित त्यावेळी शंकरराव कोल्हे यांचे म्हणणे ऐकले असते तर आण्णांच्या रुपाने प्रथम आमदार पद भूषवण्याची संधी अंदरसूलला मिळाली असती.

  -राजेंद्र शेलार

  येवला तालुक्यातील अंदरसूल या गावात ११ मे १९४८ या दिवशी एका सधन कुटुंबात सुभाषराव सोनवणे यांचा जन्म झाला. आण्णा हे बालपणापासूनच हुशार, व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय अंदरसूल येथे पूर्ण केले. पुढील शिक्षण कला वाणिज्य महाविद्यालय येवला येथे कला शाखेचे पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एल.एल.बी. हि पदवी नाशिक येथे एल.बी.टी.कॉलेज मध्ये संपादित केली. या प्रकारे आण्णांनी आपल्या जिवनाला, संस्कारांना, कलाटणी देणारे आभाळा एवढ्या कीर्तीचे आई-वडील अण्णांचे बालपणापासून आदर्श होते. शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदनाना सोनवणे येवला तालुक्याचे सहकार, राजकारण, समाजकारण, व शिक्षण क्षेत्राचे सूत्रधार होते.

  घरात लहानपणापासून राजकीय वातावरण आण्णांना लाभले. स्व. नाना स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांची व त्यांच्या प्रश्नांची जाण होती. तसेच सुशिक्षित बेरोजगार, गोरगरिबांना, स्वतःचा व्यवसाय करता यावा, असे नानांना नेहमी वाटायचे; परंतु त्यांच्या पुढे आर्थिक अडचण असायची या बाबींचा सखोल अभ्यास करून नानांनी सन १९८४ मध्ये नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.

  शतकाची परंपरा गाठायला एका दशकाचा अवधी असतांना म्हणजे सन १९९० मध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्व. नानांच्या घरी येवून नानांपुढे आग्रह केला की, अॅड. सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांना आय काँग्रेसतर्फे येवला विधानसभेची उमेदवारी देतो, कामाला सुरवात करा; अशी सकारात्मक सूचना केली. परंतू नानांनी तो प्रस्ताव नाकारला. कदाचित त्यावेळी शंकरराव कोल्हे यांचे म्हणणे ऐकले असते तर आण्णांच्या रुपाने प्रथम आमदार पद भूषवण्याची संधी अंदरसूलला मिळाली असती.

  सन १९९६ साली अंदरसूल अर्बन को-ऑप बँकेची स्थापना केली. स्व.नानांनी २००७ मध्ये अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. अवघ्या १७ विद्यार्थ्यावर मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल या नावाने अंदरसूल गावात सुरु केले. नागरी सहकारी पतसंस्थेची, अंदरसूल अर्बन बँकेची, व अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यासाठी पडद्यामागचे सूत्रधार या नितीने नियोजनबध्द कार्य करणारे आण्णाच होते. अशा प्रकारे कर्तृत्व जनहीत व समाजसेवा हेच सर्वश्रेष्ठ असे मानणाऱ्या नानांचा स्वर्गवास दि. ४ जानेवारी २०१० रोजी झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कार्याची धुरा सांभाळून आण्णांनी शिक्षण व सहकार संस्थांच्या कार्यालयीन व्यवस्थापनाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर आण्णांनी सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंदरसूल, व अंदरसूल अर्बन को.ऑप-बँक लिमिटेड, अंदरसूल यांचे कार्यकारी संचालक तसेच अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ अंदरसूलच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारली. दि.११ ऑक्टो २०११ रोजी अंदरसूल अर्बन को.ऑप-बँक लिमिटेड, अंदरसूलच्या नूतन मुख्य कार्यालय इमारत उदघाटन पालकमंत्री छगनराव भुजबळ सार्वजनिक यांच्या हस्ते व मायावती पगारे, तत्कालीन जि.प. अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ झाला.

  सन २००७ मध्ये स्थापन झालेल्या मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज ११३० विद्यार्थी शिक्षण घेत हाेते. त्यानंतर अंदरसूल येथील विद्यार्थ्यांना इ. १० वीनंतर इ. ११ वी व इ. १२ वीच्या पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागत असे. तसेच प्रवासामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार ताण ओळखून आण्णांनी एक पाऊल पुढे टाकत सन २०१४ मध्ये मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स या कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली.

  आण्णा सन २०१३ ते सन २०२१ या आठ वर्षाच्या कार्यकाळात नाशिकस्थित महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर विराजमान असतांनी संस्थेची नूतन शालेय इमारतीसाठी २५ लाख रु देणगी आण्णांनी दिली. त्या नूतन शालेय इमारतीचे उदघाटन व सहकार महर्षी गोविंदराव(नाना) सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल नामकरण समारंभ दि. २८ नोव्हें २०१५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते झाले. सुहास फरांदे यांच्या उपस्थिती संपन्न झाला. सन २०१८ गुरुवर्य निंबा मुका जाधव सायन्स ज्युनियर कॉलेज, गुरुवर्य मोतीराम सोंडाजी शिंदे कॉमर्स ज्युनियर कॉलेज या शैक्षणिक विभागांचा विस्तार करून अार्थिक देणग्या व विकास कामाचा निधी सुभाष आण्णांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात मिळवला. हे प्राधान्याने नमूद करावे लागेल. तसेच भौतिक व शैक्षणिक सुविधा, संपूर्ण इमारत रंगकाम, शालेय परिसर सुशोभिकरण आदी सुविधा उत्तम रित्या उपलब्ध करून देण्यासाठी आण्णांचे मोठे योगदान लाभले.

  आण्णा अध्यात्मिक असल्याने राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी मौनगीरीजी महाराज यांचे परमशिष्य म्हणून ओळखले जात. संत जनार्दन स्वामी समाधी स्थळ कोपरगाव बेट, शनी मंदिर नस्थनपूर, त्रंबकेश्र्वर येथील ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथे नेहमीच जाणे येणे असे अंदरसूल येथील संत जनार्दन स्वामी तपोभूमी विकासासाठी नेहमीच योगदान देत असत. तसेच दुर्गामाता मंदिर वैजापूर रोड, नवीन मंदिर उभारणीत व मंदिर परिसर विकासासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. अंदरसूल येथील राममंदिर उभारणीत, भक्तनिवास बांधकामासाठी, मंदिर परिसर व तीर्थक्षेत्र विकासासाठी सन २०१४ मध्ये समीर भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करून मंदिर उभारणीत व भक्तनिवास बांधकामासाठी, मंदिर परिसर व तीर्थक्षेत्र विकासासाठी आण्णांचे मोलाचे योगदान लाभले.

  शांत, धिरोदत्त, संयमी, सुस्वभाव, शिस्तप्रियता, समाजोपयोगी व नम्रता हे गुण अॅड. सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांच्या आचरणात कायम येत असत. कोणी कितीही आवेशात कुठलीही भूमिका मांडली तरी त्यास शांतपणे उत्तर देवून संस्थेच्या तथा समाजाच्या उन्नती साठी सहनशील भावना आण्णा यांनी त्यांच्या हयातीत जोपासली हे त्यांच्या कार्याचे गुणवैशिष्टे होय.

  “तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं,
  ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं,
  आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण,
  तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे.”