
ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर आता त्याचा वारस आयमान अल् जवाहिरी यालाही ठार करण्यात अमेरिकेने यश मिळवले आहे. खरे तर आता अल कायदा ही संघटना बऱ्यापैकी निष्प्रभ झाली आहे व अमेरिकेतच काय पण अन्य कोणत्याही देशांत हल्ले करण्याची क्षमता या संघटनेत उरलेली नाही, त्यामुळे जवाहिरीची हत्या हे फक्त एक सुडाचे कृत्य म्हणावे लागेल. पण या घटनेला अन्यही काही पदर आहेत, ते लक्षात घेणे आवश्यक आहे.
अमेरिकेनं गेल्या वर्षीच अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेतलं. तालिबान्यांच्या ताब्यात तिथली सत्ता दिली. अमेरिकेचा एकही सैनिक सध्या अफगाणिस्तानमध्ये नाही, तरी अल जवाहिरीचा काबूलमधील निवासस्थानाचा पत्ता अचूक शोधून त्याचा शेवट करण्यात यशस्वी आले. मात्र, जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर दहशतवाद संपेल का, असा प्रश्न आहे.
अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर व तेथे तालिबानची सत्ता आल्यानंतर जवाहिरीने काबुलमध्ये आश्रय घेतला होता, ही गोष्ट तालिबान आणि अल् कायदाचे अजूनही सख्य आहे, ही गोष्ट स्पष्ट करते. पण जवाहिरीचे वास्तव्य काबुलमध्ये विशिष्ट इमारतीत आहे, ही माहिती अमेरिकेला अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीशिवाय कळणे शक्य नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
तसेच, जवाहिरीला ठार करण्यासाठी जो ड्रोन वापरण्यात आला तो पाकिस्तानातून उडालेला असणार हीही गोष्ट स्पष्ट दिसते. कारण ज्या गुप्ततेने आणि तत्परतेने ही कारवाई पार पाडण्यात आली त्यावरून हा ड्रोन फार दूर अंतरावरून आला असण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात ज्या तालिबान आणि पाकिस्तानच्या भरवशावर जवाहिरी निर्धास्तपणे काबूलमध्ये रहात होता, त्या तालिबान आणि पाकिस्ताननेच त्याचा विश्वासघात केला हे स्पष्ट आहे.
आता प्रश्न असा आहे की, तालिबान आणि पाकिस्तानने हा विश्वासघात केला हा. याची कारणे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत दडलेली आहेत, असे सकृतदर्शनी तरी दिसते. पाकिस्तानमधून इम्रानखान यांचे सरकार पदच्युत झाल्यानंतर तेथील लष्कर हे अमेरिकेशी पुन्हा चांगले संबंध स्थापण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानची आर्थिकस्थिती ही चीनच्या मदतीने सुधारणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांच्या नाड्या अमेरिकेच्या हातात आहेत.
पाकिस्तानचे चीनशी वाढते संबंध व तेथील दहशतवादी यंत्रणा यामुळे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक कोंडी केलेली आहे. फायनान्शिअल टास्क फोर्सने गेली अनेक वर्षे पाकला करड्या यादीत टाकले आहे. अनेकदा तो काळ्या यादीत जाताजाता वाचला आहे. ही टांगती तलवार नजिकच्या काळात दूर होण्याची शक्यता नाही. त्यातच पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जाची मागणी केली आहे. ही मागणी अजून मंजूर होत नाही.
मध्यंतरी यासंबंधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांनी अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेन्डी शेरमन यांच्याशी चर्चा केली होती. त्याचवेळी शेरमन यांनी जवाहिरी याच्या ठावठिकाण्याबाबत मदत केली तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
अफगाणिस्तानही सध्या आर्थिक अडचणीत आहे, शिवाय तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता अद्याप मिळालेली नाही. अमेरिकेची सहानुभूती असल्याशिवाय आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची शक्यता नाही, हे लक्षात आल्यामुळे तालिबान सरकारनेही जवाहिरीचा ठावठिकाणा अमेरिकेकडे उघड केला असावा असा अंदाज आहे.
अमेरिका, पाकिस्तान व तालिबान यांच्यात असा व्यवहार झाला असेल तर तो भारतासाठी चिंतेचा आहे. कारण हा व्यवहार एवढ्यापुरताच न राहता तो पुढे वाढणार असेल तर पाकिस्तानला भारतविरोधी कारवाया करण्यास प्रोत्साहन मिळेल. तालिबानही आपली सत्ता स्थिर करण्यासाठी अमेरिकेची मदत घेण्यास मागेपुढे पाहणार नाही.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला खरा धोका आहे तो आयसीसच्या खोरासान शाखेचा. ही शाखा तेथे दहशतवादी कारवाया करीत आहे. या शाखेने नुकताच अफगाणिस्तानातील गुरुद्वारावर हल्ला केला होता, तसेच काबुल विमानतळावरही हल्ला केला होता. अल कायदाचे दहशतवादी आता या खोरासान शाखेला जाऊन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अल जवाहिरी याला ठार करण्यासाठी हल्ल्याचे नियोजन गेल्या जूनपासून चालू होते. काबुलमध्ये जवाहिरी ज्या इमारतीत राहात होता, ती अफगाण सरकारातल्या एका तालिबानी नेत्याच्या मालकीची होती. त्यामुळे गेली दोन महिने या इमारतीचे निरीक्षण, अल जवाहिरीच्या दैनंदिन हालचालींचे निरीक्षण चालू होते.
जवाहिरी सकाळी एका विशिष्ट वेळेला घराच्या बाल्कनीत येतो, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याचवेळी त्याची हत्या करण्याचे निश्चित झाले. पण ही इमारत काबुलमध्ये भरवस्तीत असल्यामुळे तेथे स्फोटक हल्ला करणे शक्य नव्हते. तसा हल्ला केला तर आजूबाजूच्या इमारतीही नष्ट झाल्या असत्या व मोठ्या प्रमाणात निरपराध लोक मारले गेले असते. त्यामुळे या हल्ल्यात कोणतीही मालमत्ता हानी होऊ द्यायची नाही तसेच शक्यतो जवाहिरीखेरीज अन्य कुणीही ठार होणार नाही, याची काळजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. अशा उदिद्ष्टाने हल्ला करण्यासाठी अमेरिकेकडे एक खास अस्त्र आहे, त्याचे नाव हेलफायर मिसाइल असे आहे.
या क्षेपणास्त्रांत स्फोटकाचा वापर करण्यात येत नाही. त्याऐवजी त्याच्या शिरोभागात अत्यंत धारदार व वजनदार अशी सहा पाती बसवलेली असतात. जवाहिरीला याच क्षेपणास्त्राने ठार करण्यात आले. ठार झालेली व्यक्ती जवाहिरीच आहे, याची खात्री पाकिस्तान व तालिबानकडून अमेरिकेने नक्कीच करून घेतली असणार. त्यामुळेच खुद्द अध्यक्ष बायडेन यांनी जवाहिरी ठार झाल्याची घोषणा केली.
अर्थात जवाहिरी ठार झाला म्हणजे इस्लामी दहशतवाद संपला असे नाही. हा दहशतवाद वेगवेगळ्या रुपात आणि नवनव्या संघटनांच्या स्वरूपात पुढे चालू आहे. दहशतवादाला होणारा मनुष्यबळ पुरवठा थांबवायचा असेल तर इस्लामी देशांत मोठ्या सामाजिक सुधारणांना चालना देण्याची जबाबदारी जगाला उचलावी लागेल.
दिवाकर देशपांडे
diwakardeshpande@gmail.com