maratha-reservation

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत...वगैरे..,वगैरे..! शाळेत असताना प्रत्येक विषयाच्या पुस्तकात पहिल्या पानावर (कव्हर सोडून) ही 'प्रतिज्ञा' असायची! पण, त्यावेळी फक्त भारत माझा देश आहे एवढच बहुदा कळायचं आणि पुढील वाक्ये पाठ असायची पण, त्यांचा अर्थ (विध्यार्थ्यांना) मात्र उमगत नसायचा किंबहुना कळायचा नाही.

  भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत…वगैरे..,वगैरे..! शाळेत असताना प्रत्येक विषयाच्या पुस्तकात पहिल्या पानावर (कव्हर सोडून) ही ‘प्रतिज्ञा’ असायची! पण, त्यावेळी फक्त भारत माझा देश आहे एवढच बहुदा कळायचं आणि पुढील वाक्ये पाठ असायची पण, त्यांचा अर्थ (विद्यार्थ्यांचा) मात्र उमगत नसायचा किंबहुना कळायचा नाही. प्रार्थना पाठ असलीच पाहिजे असा दंडक विद्यार्थी दशेत असतोच पण, त्या प्रार्थनेचा अर्थ, त्यातील मतितार्थ आणि ती प्रार्थना पुस्तकात का असायची? याचा उलगडा त्याकाळी होत नसे, किंबहुना आजही होत नसावा. पण, आजच्या युवा पिढीला याचा उलगडा झालाच पाहिजे.

  आपला भारत देश आता महासत्ता होण्याच्या (अनेकदा ऐकायला मिळते म्हणून) मार्गावर आहे. जगाच्या पाठीवर आपला देश महासत्ता होईलही पण, तो आतून जातिभेदाच्या बुरशीने पोखरलेला राहू नये याची काळजी वजा खबरदारी कोण घेणार? आपण सर्व भारतीय आहोत, जातीभेद मिटला पाहिजे, कोणीही उच्च- नीच नाही सर्वजण सारखेच आहेत, ही वाक्ये आपण नेतेमंडळींच्या भाषणात नेहमीच ऐकत आलो आहोत आणि पुढेही ऐकत राहू. हे असे असले तरी, देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या भारतीयांच्या मनातील जातीभेद मात्र काही केल्या जात नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.

  ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची उभारणी केली, या महाराष्ट्राला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली, त्याच महाराष्ट्रात जातीभेदाचे पिक सध्या जोमाने वाढताना दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण या देशातील समाज खऱ्या अर्थाने कधीच स्वतंत्रपणे आणि स्वावलंबीपणाने जगला आहे काय? हाच खरा प्रश्न आहे. स्वातंत्र्यानंतर दिन- दलित, दुबळ्या लोकांना स्वता:च्या पायावर उभे राहता यावे, शिक्षित होवून त्यांना आर्थिक सक्षम होता यावे, यासाठी समाजातील काही घटकांना ‘आरक्षण’ देण्यात आले.

  या जातीय आरक्षणामुळे समाजातील काही ठराविक घटकांची उन्नती व्हावी, हा उद्देश खरंच सफल झाला आहे का? यावर फार मोठे विचारमंथन होऊ शकेल! ज्या देशाकडे महासत्ता होण्याची धमक आहे, ताकद आहे, तोच देश ‘आरक्षण’ या बहुचर्चित मुद्द्यात गुरफटून तर जात नाही ना, अशी भीती आता निर्माण झाली आहे. दिन, दुबळा, वंचित समाज प्रगतीच्या प्रवाहात यावा यासाठी आरक्षण दिले गेले पण, आरक्षण किती काळ असावे, याची कालमर्यादा निश्चित झाली नाही. त्याचे उलट सुलट परिणाम, आणि प्रतिक्रिया आजवर वेळोवेळी उमटत आल्या आहेत. त्यातून आज तर महाराष्ट्रासारख्या प्रगतशील आणि बलाढ्य राज्यात आरक्षणामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या प्रगत भारतात ‘मी एक भारतीय आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत’ याचा विसर भारतीयांना पडला आहे की काय? असे आता वाटू लागले आहे.

  आज महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी भांडत आहे. त्याच पद्धतीने धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. उद्या मुस्लीम समाज, ब्राम्हण समाज यांच्यासह इतर समाजही आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरतील? पण आरक्षणाच्या ‘कुबड्या’ कशासाठी? हा आजच्या प्रगत युवा पिढीचा प्रश्न असून याचे उत्तर कोण देणार आहे? जो बुद्धीने प्रखर आहे. हुशार आहे तो पुढे जाईल, शरीराने, मनाने सुदृढ आहे तो पोलीस दल, सैन्य दलात भरती होईल, नोकरीला लागेल. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असू द्या! साधी सरळ गोष्ट आहे पण, हे मान्य कोण करणार? आज आरक्षणाच्या ‘कुबड्या’मुळे आपला देश पिछाडीवर पडत आहे, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. आपण सगळे भारतीय आहोत.

  जातीभेद न मानता आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, अशी भाषणबाजी करणारे आरक्षणाचा पुरस्कार का करतात? आपल्या देशातील जातीयता नष्ट करायची असेल, देश एकसंध ठेवायचा असेल, देशातील बंधुत्व टिकवायचे, वाढवायचे असेल तर आरक्षणाच्या ‘कुबड्या’ फेकून दिल्या पाहिजेत. देश वाचवायचा असेल, देश महासत्ता बनवायचा असेल तर, सर्वजण समान आहेत, कोणी उच्च- नीच नाही, आपण सर्वजण एकाच आईची (भारत मातेची) लेकरे आहोत, याचे भान प्रत्येकामध्ये जागृत झाले पाहिजे. तर आणि तरच..,भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..,ही प्रार्थना खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल आणि या प्रार्थनेचा अर्थ सर्वांना कळेल !

  • अमरसिंह मोकाशी, सातारा.