dharmveer mukkam post thane

या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. सगळीकडे याची बातमी झाली. एकूणच आजच्या मराठी चित्रपटाच्या चौफेर आणि यशस्वी घौडदौडीतील ही एक मोठी झेप म्हणता येईल. मराठी चित्रपटसृष्टी ‘चार्ज’ करण्यासाठी अशा गोष्टी हव्यातच(Anand Dighe Movie Dharmaveer Poster On Asias).

    प्रेक्षकांना अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट करण्याचा एक महत्त्वाचा फंडा म्हणजे होर्डींग्स. पाहताक्षणीच हा चित्रपट आपण पाहायला हवा, अशी तार मनात छेडली जायला हवी. काही वेळा तसे होत नाही हा भाग वेगळा तर कधी होर्डींग्स लक्षवेधक असते पण सिनेमा निराश करतो असेही होते. आपण अनुभव घ्यायला तयार असायला पाहिजे.

    एव्हाना ही बातमी तुमच्यापर्यंत पोहचली असेलच.. पण त्यापलीकडे जाऊन फोकस टाकायचा आहे, बातमी आहे, ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले ३० फुटी कट आऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेण्यात यशस्वी ठरले, त्यात भर पडली ती एका लक्षवेधी अशा विक्रमाची. अशी गोष्ट जी आजवर मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती. मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग लागले आहे.

    या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. सगळीकडे याची बातमी झाली. एकूणच आजच्या मराठी चित्रपटाच्या चौफेर आणि यशस्वी घौडदौडीतील ही एक मोठी झेप म्हणता येईल. मराठी चित्रपटसृष्टी ‘चार्ज’ करण्यासाठी अशा गोष्टी हव्यातच(Anand Dighe Movie Dharmaveer Poster On Asias).

    आज मराठी चित्रपटाचे निर्मितीचे बजेट वाढलयं ( प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाला महासिनेमा म्हटले जात आहे. ) मराठी चित्रपट गल्ला पेटीवर जबरा प्रतिसाद मिळवत आहे. अशातच आपल्या राज्य शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मार्केट विभागासाठी ‘तिचं शहर होणं’, ‘कारखानिसांची वारी’, ‘पोटरा’ या चित्रपटांची निवड झाली आणि मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

    मराठी चित्रपट विदेशात प्रदर्शित होत असताना आपले स्टार आवर्जून तेथे जाऊ लागले ( आखाती देशात ‘चंद्रमुखी’च्या प्रमोशनला अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे आवर्जून गेले. झक्कास कव्हरेज मिळवले. चित्रपटाचे प्रमोशन खूप महत्वाचे आहे हे आजच्या मराठी कलाकाराना वेगळे सांगायला नकोच. )
    अशा वातावरणात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या भव्य चित्रपटाच्या १२०×१२० च्या होर्डींग्सने मला जुन्या आठवणीत नेले.

    तसे पाहिले तर वृत्तपत्रातील जाहिरातीपासून उपग्रह वाहिनीवरील टीझर आणि ट्रेलरपर्यंत चहुबाजूने आज नवीन चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी होतेय. अगदी प्रमोशनच्या मुलाखतीचे अफाट पीक येताना दिसते. ‘दवंडी ते डिजिटल मिडिया’ असा चित्रपट प्रसिद्धीचा खूपच मोठा प्रवास आहे आणि त्यातील एक महत्वाचा फंडा होर्डींग्स!

    मराठी चित्रपटाच्या होर्डींग्सची यशस्वी परंपरा आहे. मुंबईत पूर्वी मराठी चित्रपटाची साधारणपणे मोजकी तीन चार होर्डींग्स लागत आणि ती पुरेशी असत. तेवढ्याने काम फत्ते होई. याचे कारण म्हणजे त्या काळात मराठी चित्रपटाची आपली हुकमी थिएटर असत. तेथेच मराठी चित्रपटाला विशेष प्राधान्य आणखीन मग हिंदी चित्रपट असा बाणा होता. आमच्या गिरगावातील मॅजेस्टिक ( ते १९७२ साली पाडण्यात आले. ते आता फक्त आणि फक्त वयाची साठी ओलांडलेल्याना लक्षात आहे. पण त्या आठवणी सुखद आहेत.),

    सेन्ट्रल थिएटर, राॅक्सी सिनेमा, लालबागचे भारतमाता, दादरचे कोहिनूर ( आताचे नक्षत्र), आणि प्लाझा ही हुकमी थिएटर होती. अधूनमधून धोबीतलावच्या मेट्रो थिएटरमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होणे म्हणजे मोठी बातमी असे. अधूनमधून पार्ल्याचे शान, गोरेगावचे टोपीवाला, चेंबूरचे शरद अथवा विजय येथे मराठी चित्रपट प्रदर्शित होई.

    आता एवढ्याच ठिकाणी मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने अधिक होर्डींग्सची गरजही नव्हती. त्यात पुन्हा होर्डींग्स म्हणजे पब्लिसिटीवरचा वाढता खर्च आला, फार पूर्वी ती रंगवून घ्यावी लागत आणि महिन्याच्या भाड्यानुसार ती लावली जात. मुंबईत चर्नी रोडवर (म्हणजे सेन्ट्रल थिएटरवरुन रेल्वे स्टेशनकडे येताना), ताडदेवच्या काॅर्नरला ( गंगा जमुना या चित्रपटगृहाजवळ) आणि दादरच्या टिळक पुलावर ( म्हणजे प्लाझाला प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाला फायदा), कधी ऑपेरा हाऊस थिएटरसमोर ( घोळात घोळ, मामला पोरीचा यांची होर्डींग्स तेथे लागली होती.) अशी ती होर्डींग्स लागत. येथे वर्दळ खूप म्हणजे होर्डींग्सवर नजरा खूप हे सोपे गणित होते.

    पुणे शहरात एकूण आठ होर्डींग्स लागत. पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजी नगर एस.टी. स्टॅन्ड, स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड, मंडई परिसर, डेक्कन जिमखाना, कोथरुड, शनिवार वाडा, पर्वती ही प्रमुख स्थळे होती. मुंबई आणि पुणे शहरातील ही सगळी स्थळे गजबजलेला विभाग. त्यामुळे साहजिकच गर्दीची नजर या होर्डींग्सवर हमखास पडणार. त्या काळात बरेचसे मराठी चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरात प्रदर्शित होत आणि मग टप्प्याटप्प्याने अन्य शहरात, तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात प्रदर्शित होत. हिंदी चित्रपटाची तुलनेने अधिक होर्डींग्स लागत. पण मुंबई आणि पुणे वगळता इतरत्र कुठेही मराठी चित्रपटाची होर्डींग्स लागत नसत.

    रस्त्यावरची पोस्टर आणि थिएटरवरचे डेकोरेशन ही तेथे हुकमी नाणी असत. मुंबईत सांगायचे तर दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा परिसर, ऑपेरा हाऊस थिएटरसमोर ते हाजी अली, वांद्रे, चेंबूर वगैरे वगैरे सगळीकडे ती लागत. हिंदी चित्रपटाच्या पब्लिसिटीचे बजेटच भारी असे. त्यांचे सगळेच भारी म्हणा. पण चित्रपती व्ही शांताराम यांच्या ‘दो ऑखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘झनक झनक पायल बाजे’ वगैरे चित्रपटांच्या होर्डींग्सची त्या काळात भरपूर चर्चा रंगली.

    मराठी चित्रपटाच्या बाबतीत सांगायचे तर, व्ही. शांताराम निर्मित आणि दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट ‘पिंजरा’च्या होर्डींग्सवर रसिकांची हमखास नजर पडे. व्ही शांताराम स्वतः आपल्या चित्रपटाची होर्डींग्स कशी आकर्षक असतील, प्रेक्षकांवर प्रभाव पाडतील याबाबत विशेष जागरुक असत. प्रसिद्धी खात्याकडे सगळे सोपवले आणि आपण गप्प बसलो असे ते वागत नसत. त्यांच्या कामात शिस्त असे. तर दादा कोंडके निर्मित पहिला चित्रपट ‘सोंगाड्या’पासूनची होर्डींग्स लक्षवेधक होती. ‘पांडू हवालदार’पासून दादा कोंडके यांनी चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल टाकले आणि त्यांच्या चित्रपटाची होर्डींग्स चित्रपटाबाबत आकर्षण वाढवत. दादा कोंडके यांचा आपला हुकमी प्रेक्षकवर्ग होता आणि तो अशा होर्डींग्सवर हमखास नजर टाकणारच.

    सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जमंत’, ‘एकापेक्षा एक’ , महेश कोठारे निर्मित आणि दिग्दर्शित ‘धूम धडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’ वगैरे, किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’, पुरुषोत्तम बेर्डे निर्मित आणि दिग्दर्शित ‘हमाल! दे धमाल’, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ या चित्रपटांची होर्डींग्स त्या काळात विशेष लक्षवेधक ठरली.

    ही होर्डींग्स किती आकाराची असत? तर १०×१०, १०×२०, २०×२० आणि जास्तीत जास्त २०×४० अशी असत आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नक्की झाली की ती लागत. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांची होर्डींग्स मात्र सहा महिने अगोदरच लागत. ती इतकी तर असतच पण याहीपेक्षा मोठीही असत.

    मराठी चित्रपटाच्या म्हणून ओळखल्या जात असलेल्या अशा प्लाझा, भारतमाता इत्यादी चित्रपटगृहांवरची होर्डींग्स हादेखील एक महत्वाचा फंडा. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना मॅजेस्टिक थिएटरवरची ‘मुंबईचा जावई’, ‘दाम करी काम’, ‘अशीच एक रात्र होती’, ‘सोंगाड्या’, ‘सख्या सजना’ यांच्या होर्डींग्सनी थिएटर डेकोरेशनमध्ये रंग भरला होता हे आठवत आहे. प्रेक्षकांना अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट करण्याचा एक महत्त्वाचा फंडा म्हणजे होर्डींग्स. पाहताक्षणीच हा चित्रपट आपण पाहायला हवा, अशी तार मनात छेडली जायला हवी. काही वेळा तसे होत नाही हा भाग वेगळा तर कधी होर्डींग्स लक्षवेधक असते पण सिनेमा निराश करतो असेही होते. सिनेमाच्या बाबतीत काहीही घडू शकते असे एकदा का अधोरेखित झाले की मग सगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायला आपण तयार असायला हवं.

    याबाबतीत एक जुना संदर्भ द्यायचा तर, ‘सैरंध्री’ या चित्रपटाचे बाबूराव पेंटर यांनी तयार केलेले मोठे पोस्टर इतके कलात्मक आणि देखणं होते की, ते धोबीतलाव येथे लावले असताना केवळ ते पाहण्यासाठी त्या काळात गर्दी होत असे. याच चित्रपटापासून मराठीत मोठी पोस्टर सार्वजनिक स्थळी लावण्याची प्रथा सुरु झाली आणि त्याचेच मग होर्डींग्स हे पुढचं पाऊल पडले…

    आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला चित्रपटाची होर्डींग्स खूपच महत्वाचा फंडा होता हे कदाचित पटणार नाही, पण पूर्वी बाहेरच्या जगात पाहण्याची प्रथा होती तेव्हा ही होर्डींग्स महत्वाची भूमिका वठवत. आज मोबाईलमध्ये डोकावण्याचे युग आहे. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी नजर ती कधी पडणार? तरीही ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे होर्डींग्स लक्षवेधक ठरलयं आणि बातमीचा विषय ठरले हे विशेष उल्लेखनीय आहे.

    — दिलीप ठाकूर

    glam.thakurdilip@gmail.com