आणखी एक गोंधळलेला रविवार!

  शिंदे आणि भाजपात गोंधळ सुरु होता. बारामतीची जागा अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढवतील असे आधीच ठरले जरी असले तरी त्याची घोषणा परवा करण्यात आली. बारामतीचा सस्पेन्स आणखी काही दिवस राहू दे, असे स्वतः दादाच सांगत होते. प्रत्यक्षात हा संभ्रम युक्त संशय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्याही मनात कायम आहे.

  महायुतीला विरोध करण्यासाठी समोरच्या बाजूला प्रामुख्याने महा विकास आघाडी उभी आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवेसना आणि शरदरावांचा राष्ट्रवादी हे तीन्ही पक्ष राज्यात २०१९ नंतर अडीच वर्षे सत्तेत राहिले. पण तरीही गेले चार महिने झगडूनही त्यांना जागा वाटपाची बोलणी धड पार पाडता आलेली नाहीत. त्यांच्यात काँग्रेस विरुद्ध ठाकरे, ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि शरदराव विरुद्ध काँग्रेस अशा लढाया सुरुच आहेत. ठाकरेंनी तसेच शरद पवार व काँग्रेसने काही जागांवरील उमेदवाराच्या घोषणा केल्या खऱ्या पण अद्यापी काही जागांवर वाद विवाद सुरुच आहेत.

  ऐन युद्धाची सुरुवात होत असताना महापराक्रमी, महावीर अर्जुन त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य खाली टाकून श्री कृष्णापुढे उभा राहिला आणि म्हणाला की, “हे जगन्नियंत्या, मला जिकडे तिकडे माझी भावंडे, काका मामा दिसत आहेत. मी कुणावर आणि कसा बाण मारू ? मला हे युद्धच करायचे नाही…!” तेंव्हा कृष्णाला या वीराला समजावण्यासाठी आख्खी गीता सांगावी लागली. आज गीता सांगणारा कुणी कृष्ण दिसत नाही खरा, पण अर्जुनासारखे हतवीर्य झालेले नेते मात्र सर्वत्र दिसत आहेत.

  राजकीय क्षेत्रात देशातील आणि राज्यातील सर्वात मोठे महाभरात सुरु झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची प्रक्रिया पार पडत आहे. असे असतानाही सर्वच पक्षांचे नेते कुरुक्षेत्रावरील त्या अर्जुनासारखे बावचळलेले दिसत आहेत.

  महाराष्ट्रातील मतदानाचा पहिला टप्पा हा १९ एप्रिल रोजी पार पडेल. या पहिल्या टप्प्यातील नागपूर, भंडारा, रामटेक, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा पाच जागांवरील अर्ज दाखल होऊन तिथे छाननीही पार पडली. रामटेक या महत्वाच्या मागासवर्गीय मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी बर्वे बाईंना दिली होती. पण त्यांचे जातीचे प्रमामपत्रच रद्द् झाल्याने त्यांचा अर्ज निकाली निघाला. तिथे काँग्रेसने त्यांच्या पतीचाही अर्ज डमी म्हणून भरून ठेवला होता. आता अन्य कोणतीही तांत्रिक अडचण न येता जर श्री बर्वेंना हाताचे चिन्ह मिळाले तर पक्षाची अब्रु वाचेल. अन्यथा पहिल्याच टप्पयात काँग्रसेचे चिन्ह एका मतदारसंघात नाही अशी नामुष्की ओढवेल.

  पुढच्या २९ एप्रिलाल मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठवाड्यातील व विदर्भातील ११ जागांवरील उमेदवार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. तिसरा टप्पा आहे ७ मेच्या मतदानाचा. त्यात बारामती, सोलापूर, सांगली सारख्या महत्वाच्या जागा येतात. तिथे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुढच्या चार पाच दिवसांनंतर सुरु होईल. अशा स्थितीत आजही कोणताही पक्ष छातीठोकपणाने असे काही सांगू शकत नाही की,“झाले! आमच्या पक्षाचे संपूर्ण जागा वाटप पूर्ण झाले अन् आता आम्ही सारे प्रचाराच्या कामाला लागलो आहोत!”

  राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष हे आघाड्या आणि युत्यांच्या गुंत्यात असे काही गुरफटलेले आहेत की कोणताच पक्ष हा स्वतंत्रपणाने निर्णय घेण्यासाठी सक्षम उरलेला नाही. भारतीय जनता पक्षाची राज्यात सर्वात मोठी ताकद आहे. आणि मित्रपक्षांच्या ताकदीला मर्यादा दिसत आहेत. तरीही मागच्या निवडणुकीत अखंड शिवसेनेबरोबर जितक्या जागा जिंकल्या होत्या, फक्त तितक्याच म्हणजे, २३ मतदारसंघातच, भजापाचे उमेदवार जाहीर होऊ शकले आहेत.

  त्यांचा मोठा मित्र आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना. त्यांच्याकडे मावळत्या लोकसभेतील १३ खासदार आहेत, पण त्यातील फक्त आठच खासदारांना शिंदे अद्याप उमेदवारी देऊ शकले आहेत. तिसरा भाजपाचा मित्र आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वातील गजराचे घड्याळ हे अधिकृत पक्षचिन्ह (अद्याप तरी) मिरवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण त्यांना फक्त शिरूर, बारामती आणि रायगड इथले तीनच उमेदवार जाहीर करता आले आहेत. त्यातील एक विद्ममान खासदार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे. दुसरे आहेत शिंदे सेनेतून आयात केलेले आढळराव पाटील. तिसरी बारामतीची जागा अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढवतील. पण प्रत्यक्षात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा कऱण्यासाठी मार्च अखेर उजाडावी लागली. बारामतीतील सस्पेन्स आणखी काही दिवस राहू दे, असे स्वतः दादाच सांगत होते. प्रत्यक्षात हा संभ्रम युक्त संशयपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्याही मनात कायम आहे.

  – अनिकेत जोशी