quilt

गोधडी (Quilt) सहसा विरत किंवा फाटत नाही लवकर. पण अगदी चुकून फाटली तर त्यातील चांगल्या तुकड्यांचा पुन्हा उपयोग करावा अशी इच्छा ही काटकसरीच्या उत्तम उदाहरणापैकी एक असते.

  गोधडी ! या शब्दातच वात्सल्य – प्रेम दडलेले आहे. गोधडी आणि आज्जी हे अतूट नाते आहे. आपल्या आयुष्यात गोधडीशी निगडीत आठवणी नाहीत, असे सहसा असत नाही. आजीने गोधडी अंगावर घालून हळुवार थोपटत सांगितलेल्या गोष्टींचा परिणाम किंवा दिवसभरातील आपलीच एखादी आजीने हळुवार पकडलेली चूक ती आपल्याला सांगताना आपल्यावर पडलेला प्रभाव हे सारे आपल्या मनाच्या कप्प्यात सदैव असतेच. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे सारे आपल्याला स्मरतेच. आपल्या लहानपणच्या आठवणीत गोधडी आणि त्यात गुरफटून घेऊन अंगाचे मुटकुळे करण्यातील आनंद आपण तेव्हा मिळवलेला असतो. नंतरच्या आयुष्यात तो कितीही म्हटले तरी तसा मिळत नाही. गोधडी ही आपल्याला या जगात आपण आल्यानंतर काही दिवसांत आपल्या देहाला लपेटून टाकत असते. दूपटे हे गोधडीचे नाजूक, अधिक मऊ आणि छोटेखानी रूप आहे. दुपट्यातून आपण गोधडीमध्ये कधी येतो ते आपल्याला कधी कळत नाही आणि कधी ठामपणे आठवत नाही. गोधडी अगदी त्या अर्भकावस्थेतून बाल्यावस्थेत आपण येत असताना आपल्याला एक घट्ट संरक्षण देत असते आणि त्यावेळी ते आपल्याला ना नाहीत असते, ना पुढे आयुष्यात त्यातले काही फारसे आठवत असते. आपल्या प्रत्येकाच्या मनात गोधडीच्या ज्या काही स्मरणखुणा असतात. त्यात गोधडीचे ते रंग, गोधडीची ती लांबी – रुंदी आणि तिची जाडी… हे सारे रुतून बसलेले असते.

  सर्वसाधारणपणे गोधडीच्या या स्मरणखुणांमध्ये आज्जी हे गोड नाते असतेच! आज्जी या शब्दाच्या एका पदराच्या काठाला गोधडीच्या पदराची गाठ बांधलेलीच असते, असे मला वाटते. कारण गोधडी म्हटले की आज्जी आठवतेच आणि आज्जी मनात आली की गोधडीसहित येते. हे का होते? हे असे का होते? ज्यांना आजी पाहायला मिळाली नाही त्यांची या सुखाची कमतरता कशी काय भरून निघाली असेल? या न मिळालेल्या सुखाची इतर अशा न मिळालेल्या सुखांप्रमाणे आपल्याला काही किंमत आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मोजायला लागते का? एक मात्र खरे की, गोधडी ज्यांना अशी अनुभवास नसते त्यांनाही दुसऱ्यांच्या गोधडी कथा किंवा गोधडी गप्पा ऐकायला त्यात आवडते. गोधडी या शब्दात हीच जादू आहे. गोधडीच्या गोष्टीमध्ये एक महत्वाचा शब्द हमखास येतो तो म्हणजे ऊब ! गोधडीच्या साऱ्या अस्तित्वात ही ऊब महत्वाची ठरत असते.

  गोधडी म्हणजे वात्सल्य, गोधडी म्हणजे प्रेम, गोधडी म्हणजे ममत्व, गोधडी म्हणजे घातलेल्या टाक्यांचा स्पर्श, गोधडी म्हणजे हळुवार स्वर आणि हळुवार थोपटणे, गोधडी म्हणजे गोष्टी, गोधडी म्हणजे मायेचा स्पर्श, गोधडी म्हणजे ते देहाचे मुटकुळे करून झोपणे, गोधडी म्हणजे हक्काची ऊब, गोधडी म्हणजे लडिवाळपणा, गोधडी म्हणजे मनाशी मनाने मनापासून बोलायचे उबदार पांघरूण, गोधडी म्हणजे अनंत चिंध्यांचे एकत्र येणे, गोधडी म्हणजे अनंत रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांचे संमेलन, गोधडी म्हणजे उभ्या-नि-आडव्या धाग्यांचे जोडकाम, गोधडी म्हणजे साऱ्या रंगांचे आस्तित्व तरीही त्यात त्यांचा असलेला स्वतंत्रपणा, गोधडी म्हणजे मऊ आणि खरखरीतपणा यांचे अनोखे मिश्रण, गोधडी म्हणजे बालपणाचे हजारो क्षण, गोधडी म्हणजे भावंडांशी निरागसपणे केलेली मस्ती, गोधडी म्हणजे हसू आणि आसू, गोधडी म्हणजे डोक्यावर पूर्ण ओढून घेऊन खुसुखुसू हसत राहणे, गोधडी म्हणजे डोक्यावर पूर्ण ओढून घेऊन मुसुमुसू रडत राहणे, गोधडी म्हणजे धपाट्यापासून आपले इवले – इवले होऊ शकणारे संरक्षण, गोधडी म्हणजे आपले एका वयापर्यंत हक्काचे पांघरूण, गोधडी म्हणजे फक्त आपल्या अनेक आठवणींना जपणारा ऊबदार पदर, गोधडी म्हणजे आपल्या मौनाचे शब्दभांडार, गोधडी म्हणजे आपल्या शब्दांचे हळुवार मौन, गोधडी म्हणजे जीवघेणे ठरलेले अपमान आणि जाणूनबुजून केलेल्या अवहेलना यांची एक घडी मनाने केलेली आणि मनात ठेवलेली, गोधडी म्हणजे सुखांचे अंगण आणि समाधानाचे वृंदावन जणू जपलेले आपल्या मनाच्या पांघरूणी कप्प्यात…गोधडी म्हणजे पूर्वजांची छोटी खूण आणि वंशजांसाठी अभिमानाची खात्री, गोधडी म्हणजे जगण्याच्या व्यवहारातील चंदनसावली, गोधडी म्हणजे आपल्या माणसांची हळुवार आठवण, गोधडी म्हणजे आपल्याला छळलेल्या क्षणांचे धागेदार स्मरण, गोधडी म्हणजे एक विलक्षण गारवा, गोधडी म्हणजे ऐन हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात मलईदार ऊब आणि ऐन उन्हाळ्यात घाम टिपणाऱ्या टीपकागदाची थोरली बहीण जणू, गोधडी म्हणजे फक्त एक पांघरूण बाकी काहीही नाही, गोधडी म्हणजे सारे काही ….!!

  गोधडीचा चौकोनी टोकदार काठ आणि काठदार टोक यांचा स्पर्श आजही मला स्मरतो आणि खात्री वाटते प्रत्येकाला तो स्मरत असणार. आम्हा भावंडांच्या गोधड्या आम्हाला ओळखता येत असे हे तर खरेच आणि दुसऱ्या कोणीही आपली गोधडी घेतलेली अजिबात आवडत नसे. त्यावरून खूपदा भांडाभांडी व्हायची अगदी गुद्दागुद्दीसुद्धा. गंमत अशी काही खोडकर भावंडांना आपल्या गोधडीपेक्षा दुसऱ्या भावा – बहिणीची गोधडी अधिक चांगली वाटत असे. अर्थात तरीही त्यांना त्यांची त्यांची गोधडीदेखील कधी कधी हवी असे. माझ्या रत्नागिरीच्या मावशीकडे माझे खूपदा जाणे असे आणि ती मला नेहमी गोधडी देई पांघरायला. पुढच्या वेळी दुसरी एखादी असे… पण मला ती गोधडी देत असे… तिच्याकडे खूप गोधड्या असत असे मला तेव्हा वाटत असे…. ! नंतर कळले खूप वर्षांनी तिच्या आजीने दिलेल्या दोन गोधड्या तिने सासरी नेल्या होत्या व त्या खूप सांभाळल्या होत्या… मला त्यातली एक गोधडी ती देत असे… आपल्या सासरी गोधडी घेऊन जाणारी मावशी मला आजही श्रीमंत वाटते.

  गोधडी सहसा विरत किंवा फाटत नाही लवकर. पण अगदी चुकून फाटली तर त्यातील चांगल्या तुकड्यांचा पुन्हा उपयोग करावा अशी इच्छा ही काटकसरीच्या उत्तम उदाहरणापैकी एक असते.

  आज या दिवसांत गावी गेलो की कोणी गोधडी विणायला बसले की मन आनंदी होते… आज सारे धागे कमकुवत होत असताना, एकेक धागाच काय माणसाची एका अर्थाने विचित्र चिंधी झालेली असून तीदेखील विलग होत असताना कोणीतरी धागे घालू पाहते आहे, कपड्यांच्या तुकड्यांना तरी कोणी एक करू पाहते आहे, अनेक रंगांचे मिश्रणी तुकड्यातून आयुष्याच्या कोलाजला नवे रूप देऊ पाहते आहे हीच गोष्ट मनाला चैतन्य देते. गोधडी विणणारे हात साऱ्या तुटलेल्या नात्यांनादेखील शिवतील असे वाटत राहते. गोधडीची ऊब हरेक नात्याला मिळावी, समाजाला मिळावी आणि या देशाला आजही खऱ्याखुऱ्या वात्सल्याची गरज आहे ती मिळावी असे वाटू लागते. गोधडीची ऊब निरंतर असते. प्रत्येकाच्या मनात ती तशीच साऱ्या आयुष्याच्या व्यवहारात पाझरत रहावी असे वाटत रहाते.

  – अनुपम बेहेरे

  sphatik69@gmail.com