scientist

  १९ व्या शतकात एका मानसशास्त्रामध्ये किती विविध शाखा, उपशाखा निर्माण होत गेल्या, याचा रोचक धांडोळा आपण मागील काही लेखांमधून घेतला. एकीकडे जर्मनीमध्ये संरचनावादी व गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञ आपले काम करत होते, तर अमेरिकेमध्ये विल्यम जेम्ससारखी मंडळी मनाच्या कार्याला आणि क्षमतांना अधिक महत्त्व देत होती, त्याविषयीचे संशोधन करत होती. जवळजवळ त्याच सुमारास रशियामध्येही मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे केंद्र आकारास येत होते. एक अत्यंत महत्त्वाची आणि मानसशास्त्रावर दूरगामी परिणाम केलेली उपशाखा, महान रशियन शरीरशास्त्रज्ञ ‘इव्हान पावलो’ यांच्या प्रयोगांमधून आकार घेत होती आणि या शाखेचे नाव म्हणजे ‘वर्तनशास्त्र’.

  इव्हान पावलो, जे.बी.वॅटसन, एडवर्ड थॉर्न्डाइक व बी एफ स्किनर” हे काही प्रमुख वर्तनशास्त्रज्ञ होत. वर्तनशास्त्रज्ञांच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांना मानसशास्त्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण शास्त्रीय पद्धती व शास्त्रीय दृष्टिकोन प्रस्थापित करायचा होता. त्यामुळेच या सर्व शास्त्रज्ञांनी आपापल्या ठिकाणी निरनिराळे प्रयोग केले. हे खरे आहे की, त्यांचे जास्तीत जास्त प्रयोग हे प्राण्यांवर होते, पण वॅटसन, थॉर्न्डाइक व त्याच्या विद्यार्थ्यांनी माणसांवर, लहान मुलांवरही काही प्रयोग केले. थोडक्यात काय तर, शास्त्रामध्ये असलेली प्रयोगशीलता आणि प्रयोगावर आधारित असणारे संशोधन हा त्यांच्यामते मानसशास्त्राचाही इतर शास्त्राप्रमाणे गाभा असणे हे अत्यंत महत्त्वाचे होते.

  इव्हान पावलो (सन १८४९- १९३६)
  इव्हान पावलो हे एक अतिशय निर्भीड रशियन शास्त्रज्ञ तसेच डॉक्टरही होते. रशियातील तत्कालीन एकूण परिस्थितीवर त्यांनी फार निर्भीडपणे आपली मते वेळोवेळी व्यक्त केली होती आणि पुढे जाऊन कुठल्याही प्रलोभनांना किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी अतिशय निष्ठेने रशियामध्ये शास्त्र व शास्त्रीय दृष्टिकोन प्रस्थापित करण्यासाठी, तशा संस्था स्थापन करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांना संपूर्ण जगामध्ये मान्यता मिळाली. त्यांनी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनी पुढे वॅटसन खूप प्रभावित झाले आणि सुरुवातीला जरी अमेरिकेत पाव्हलो यांना फारशी मान्यता नव्हती तरी, वॅटसनचे वर्तनशास्त्र, अमेरिकेत प्रस्थापित झाल्यानंतर इव्हान पावलो, एडवर्ड थॉर्न्डाइक या सगळ्या मंडळींना मान्यता मिळाली, एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या प्रयोगांची वाहवा सुद्धा झाली.
  इव्हान पावलो हे मूळतः शरीर-शास्त्रज्ञ होते. अन्नपदार्थ बघून किंवा इतरही वेळेस कुत्र्याच्या तोंडातून जी लाळ गळत असते, जो पचनरस सतत सांडत असतो, त्यावर याचे प्रयोग सुरू होते आणि त्याला या पचनरसात व लाळेमध्ये संशोधन दृष्टीने अत्यंत रस वाटत होता. कुत्र्यावर हे प्रयोग करत असताना, एक दिवस सहजच पावलो यांच्या असे लक्षात आले की, रोज अमुक व्यक्ती एकवेळेस जेव्हा कुत्र्यासाठी जेवण घेऊन जात असे तेव्हा त्याच्या पावलांचा आवाज आल्या आल्याच जेवण बघायच्या आधीच, कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळण्यास सुरुवात होत असे. या निरीक्षणाचा धागा पकडून आता केवळ पाचकरस हा केंद्रबिंदू न धरता, त्याच्या पुढे जाऊन नेमके कुत्र्याच्या मनात व मेंदूत असे काय होते ? जेणेकरून जेवण न बघताही जेवणाविषयीचा त्याचा प्रतिसाद हा व्यक्तीच्या पावलांच्या आवाजाला दिला जातो, हे शोधून काढणे त्यांना अतिशय महत्त्वाचे वाटायला लागले. त्यामुळे त्यांनी चाचणी करण्यासाठी प्रयोगाची नीट आखणी केली. कुत्र्याला जेवण दिले आणि त्याचवेळेस घंटेचा विशिष्ट आवाज केला, अशा पंधरा-वीस चाचण्या झाल्यानंतर एक दिवस फक्त त्यांनी घंटेचा आवाज केला आणि अपेक्षेप्रमाणे कुत्र्याने घंटेच्या आवाजाला प्रतिसाद दिला. (कुत्र्याची तितकीच लाळ गळली.) हा खचितच कृत्रिम चेतकाला दिलेला प्रतिक्षिप्त प्रतिसाद होता. यावरून त्यांनी अभिजात अभिसंधानाची संकल्पना प्रथम मांडली.

  अध्ययनामध्ये दोन निरनिराळ्या चेतकांवर एकच प्रतिसाद देणे किंवा जैविक व कृत्रिम या दोघांचे अनुकूलन होणे यावर आधारित अभिजात अभिसंधान ही कल्पना आहे. त्यानंतरही पॅव्लोवन अविरतपणे त्यांचे प्रयोग सुरू ठेवले. काही दिवसांनी पूर्णतः प्रयोग थांबविला. आणि नंतर बरेच दिवसांनी त्याच कुत्र्याबरोबर त्यांनी परत तोच प्रयोग केला व पुन्हा तोच चेतक किंवा स्टीम्युलस वापरला आणि कुत्र्यानेही मधे बराच कालावधी गेलेला असूनही तोच प्रतिसाद दिला. म्हणजेच कुत्रा बराच काळ लोटूनही विसरला नव्हता. यावर आधारित निष्कर्षामधून, अध्ययनामधील एक खूपच महत्त्वाचा सिद्धांत मांडला आणि तो म्हणजे (There is no unlearning but there is always different and better learning) या सिद्धांताचे मानवी वर्तन व्यवहारात खूप वेगवेगळे अर्थ आहेत आयाम आहेत. उदाहरणार्थ जेव्हा एखादे चुकीचे प्रतिसाद माणूस शिकतो किंवा चुकीची सवय लागते जसे की, ड्रग-अँब्युस, अल्कोहोल इत्यादी प्रयत्न करून जरी ती सवय मोडण्याचा प्रयत्न केला तरी, त्यांची मूळे कुठेतरी मनामध्ये खोल राहून गेलेली असतात आणि जेव्हा केव्हा जुन्या चेतकासारखी, उत्तेजनार्थ प्रतिसादासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा पुन्हा पटकन नव्याने त्या त्या चेतकाला तसाच प्रतिसाद दिला जातो. सोप्या शब्दात सांगायचे तर, दारूची सवय एकदा सुटली असली तरी, क्लीन असणे फारसे टिकत नाही. पुन्हा नव्याने पटकन ती सवय अंगीकारली जाते. ती सवय कायमची जाण्यासाठी काहीतरी संपूर्ण नव्याने शिकणे गरजेचे असते.

  वर्तनशास्त्रामधील दुसरा महत्त्वाचा विचारवंत व मानसशास्त्रज्ञ म्हणजे एडवर्ड थॉर्न्डाइक. मानसशास्त्रामध्ये एकीकडे मनाच्या क्षमता, मनाचे कार्य, मनाची मूलभूत द्रव्ये किंवा अपूर्णतेत पूर्णत्व शोधण्याचा मनाचा कल, अशा अनेक विचारधारांवर आधारित वेगवेगळ्या शाखा उपशाखा निर्माण होत होत्या. डॉक्टर सिग्मंड फ्राईड तर सुशुप्त मनाचा वेध घेण्यात गुंतले होते. पण एकीकडे मात्र काही संशोधक मानवी वर्तन म्हणजेच मानवी मन म्हणजेच मेंद. प्राण्यांवरच्या प्रयोगांमधून हे मानवी वर्तन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. ते प्राण्यांवर प्रयोग करण्यात मश्गूल होते. असाच एक महत्त्वाचा प्रयोगशील वर्तनशास्त्रज्ञ म्हणजे एडवर्ड थॉर्न्डाइक. थॉर्न्डाइक यांनी मांजरांवर खूप सारे प्रयोग केले. त्याचा एक गाजलेला प्रयोग म्हणजे पिंजऱ्यातले मांजर, त्याला दिले जाणारे मासे व तरफ असा होता. मांजराला पिंजऱ्याच्या बाहेरील मासे दिसत असत. मासा मिळवण्यासाठी पिंजऱ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असे आणि या प्रयत्नांमध्ये केव्हातरी मांजराचा पाय एका तरफेवर पडत असे. असे झाल्यावर पिंजऱ्याचे दार उघडून ते मांजर लगेच बाहेर येऊ शकत असे. परंतु अशा रीतीने बाहेर आलेल्या मांजरावर तो प्रयोग करून पुन्हा आत टाकत असे. असे अनेकदा झाल्यावर हळूहळू मांजराला तरफ व पिंजऱ्याचे उघडणारे दार, यातील सहसंबंध लक्षात येऊन, ते मांजर याबाबतीत अधिकाधिक चपळ व सफाईदार होत जात असे, इतके की पिंजऱ्यात ठेवल्या ठेवल्या मांजर सरळ तरफेकडे जाऊन, तरफ दाबून पिंजरा उघडत असे. अशा प्रकारचे असंख्य प्रयोग थॉर्न्डाइकने मांजरांवर केले. उंदीर व कोंबड्यांवरही त्यांनी प्रयोग केले. त्यांनी उंदरांसाठी बनवलेले चक्रव्यूह, मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये खूप गाजले. या सर्व प्रयोगांवर आधारित थॉर्न्डाइक यांनी, काही साधे पण अध्ययनाविषयक महत्त्वाचे मूलभूत निष्कर्ष काढले. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे “लॉ ऑफ इफेक्ट”. थॉर्न्डाइकच्या “लॉ ऑफ इफेक्ट” या निष्कर्षानुसार एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली म्हणजे त्या गोष्टीसाठी असणारी चेतना आणि त्यावरील प्रतिसाद यांच्यातील सहसंबंध जास्त पक्के होत जातात आणि त्यामुळे ते टिकतात आणि त्याचवेळेस एखादी गोष्ट वारंवार करणे थांबवल्यास हे संबंध क्षीण होत जातात.

  अशा प्रकारे मानसशास्त्रामध्ये प्राण्यांवर प्रयोग करण्याचा पायंडा वर्तनशास्त्राने घालून दिला किंवा तो अधिक दृढ केला, असे आपण म्हणतो. अनेक बाबतीत मनुष्य हा प्राणीच असतो व प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमधून येणारे निष्कर्ष हे मनुष्यालाही लागू पडतात. या गृहीतकावर आधारित वर्तनशास्त्राने प्राण्यांवर केले. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मागे आपण पाहिल्याप्रमाणे रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञाने मांडलेला Mind Body dualism अथवा मन आणि शरीर यांच्या पूर्ण फारकतीचा सिद्धांत व तरीही त्यांच्यात असणारा संबंध, हा सिद्धांत वर्तनशास्त्राने पूर्ण गैर लागू घोषित केला. वर्तनशास्त्रज्ञ इतक्या टोकाला जाऊन पोहोचले की, मन नावाची कुठलीही गोष्टच नाही असे ते मानत होते. आपली मानसिक अवस्था, आपल्या संवेदना जाणिवा भावभावना या पूर्णतः शरीराच्या अथवा मेंदू व मज्जासंस्थेच्या कार्यावर अवलंबून असतात असा सिद्धांत वर्तनशास्त्राद्वारे मूळ धरू लागला होता. चेतना आणि प्रतिसाद “एस-आर” ह्या सर्किटद्वारे संपूर्ण प्राणी व मानवी वर्तन मांडता येते, स्पष्ट करता येते, असे वर्तनवाद ठासून मांडत होता. “इव्हान पावलो व एडवर्ड थॉर्न्डाइक” यांनी वर्तनशास्त्र या उपशाखेचा भक्कम पाया रचला, असे आपण निश्चितच म्हणू शकतो. वर्तनशास्त्र जसेच्या तसे, जरी आज उपयोगात आणले जात नसले तरी, त्यातील अनेक इन्साइट्स या उपचारपद्धतीमध्ये वापरल्या जातात. तसेच उत्क्रांतीशास्त्र व संज्ञानात्म मानसशास्त्र या दोन अभ्यास प्रणालींमध्ये अथवा परिप्रेक्षांमध्ये वर्तनशास्त्राने सांगितलेल्या, अनेक तत्त्वांचा आपल्याला प्रत्यय येतो. मानसोपचार करताना अनेकदा टोकन इकॉनोमी किंवा शेप शेपिंग बिहेवियर यासारखी तंत्रे वर्तनशास्त्रज्ञ वापरताना दिसतात.

  वर्तनशास्त्राचा जनक असण्याचे श्रेय मात्र जे बी वॉटसन ह्या अमेरिकन शास्त्रज्ञाकडे जाते. त्यांच्याविषयी पुढील लेखात…

  – डॉ. सुचित्रा नाईक