nirmiti sawant

कॉमेडीच्या क्षेत्रात केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही, तर 'कॉमेडी क्वीन'चेही दिवस आहेत, असं निर्मितीताईंनी आपल्या आजवरच्या भूमिकेतून सिद्ध केले आहे.

  मायबाप रसिकांना खळखळून हसविण्याचा वसा घेतलेले रंगकर्मी मराठी रंगभूमीला पिढ्यान्‌ पिढ्या मिळाले. ताणतणाव क्षणार्धात दूर करण्याची जबरदस्त ताकद त्यांच्यात होती. शाहीर दादा कोंडके, शंकर घाणेकर, शरद तळवळकर, दिलीप प्रभावळकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभू, प्रकाश इनामदार, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, भरत जाधव, विजय चव्हाण, विजय कदम, भाऊ कदम, संतोष पवार… यादी अपूर्ण राहील. पण हे सारे विनोदवीर. त्यात एक महाराणी आहे ती म्हणजे निर्मिती सावंत!

  त्यांची नुकतीच भेट घेण्याचाही योग जुळून आला आणि एका ‘कॉमेडी क्वीन’चा गेली पंचवीसएक वर्षाचा इतिहास उजळून निघाला. त्यांची जवळजवळ सर्वच नाटके बघण्याची आणि त्यावर परीक्षणे व मुलाखतींचा योग जुळून आल्याने एका विनोदी अभिनेत्रींची रंगकारकीर्द जणू जागी झाली.

  ‘जाऊ बाई जोरात’मधली निशा काशीकर –

  ‘काय पाहिलंस माझ्यात’ची उमा वेंगुर्लेकर –

  ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’मधली कुमारी गंगुबाई –

  ‘श्यामची मम्मी’तली यशोदा बोरकर –

  ‘डबल ट्रबल’मधली अंगात देव येणारी आई –

  ‘अहो राहू द्या ना घरी’तली आनंदी –

  ‘बंटी की बबली’ यातली सासुबाई –

  ….. इथपासून ते अगदी सध्या गाजत असलेल्या ‘व्हॅक्यूम क्लिनर’ यातली ‘रंजन-नयना’ या दुहेरी भूमिकेतली कॉमेडी! आणि प्रशांत दळवी यांच्या ‘संज्याछाया’ यातली काहीशी गंभीर पण मिश्कील बाज असलेली भूमिका. ही दोन नाटके सुरू आहेत.

  निर्मिती सावंत म्हणजे अभिनयाची हुकमी राणीच! विविधरंगी व वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेचं त्यांनी सोनं केलं मिळालेल्या संधीचे एक आव्हान म्हणून स्वीकारले. त्यामुळे गेली दोन पिढ्यांनी त्यांची ‘भायगिरी’ कबूल केली. राणीपदावर शिक्कामोर्तब केलं.

  तब्येतीतलं जाडेपण हे फक्त त्याचं भांडवल नाही तर अभिनयाचं उत्तम अंग आणि टाईमिंगची चांगली जाण त्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक भूमिका ही रसिकांनी डोक्यावर घेतली. त्यांचं नव रूप मान्य केलं…

  त्यांचं ‘जाऊ बाई जोरात’ हे नाट्य दोनदा रंगभूमीवर आलं. आधी मकरंद अनासपुरे – मंगेश देसाई हे दोघे ड्राइव्हर व कंडक्टर होते. पण एका अपघातामुळे प्रयोग थांबले. तुफान वेगात महाराष्ट्रभरात दौरे सुरू होते. मागणी वाढत होती. पण थांबणं भाग होतं. २०१० च्या डिसेंबरपासून पुन्हा प्रयोग सुरू झाले. या नव्या निर्मितीत संतोष पवार व समीर चौगुले हे नवे सोंगाडे ‘चालक-वाहक’ म्हणून अवतरले. नव्या प्रयोगात पुरु बेर्डे यांनी काही बदल केले ते निर्माते दिलीप जाधव यांनी मान्यही केले. पुरु बेर्डे यांची कल्पकता त्यात होती आणि १४ मंत्री पत्नींसह काशीकर मॅडम अवतरल्या.

  हे तसे राजकीय अर्कनाट्य. मंत्र्यांच्या बायका या पिकनिकला निघतात या वनलाईनवरल्या या नाट्यात निर्मितीताईंनी धम्माल उडविली. प्रत्यक्ष मंत्रीणबाई व मंत्री असलेल्यांनी या नाट्याला हजेरी सहकुटुंब लावल्याचे स्मरते. हे भाग्यच!

  दरम्यान, ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेने घराघरात पक्क स्थान मिळवलं.  नाटकही रंगभूमीवर आलं. ‘गंगुबाई’ला भेटण्यासाठी प्रयोगापूर्वी आणि नंतरही गर्दी व्हायची. काहीदा तर पोलीस बंदोबस्तातही ‘गंगुबाई’ला प्रवास करावा लागला! ‘रजनी’नंतर सामाजिक प्रश्नांवर ‘रोखठोक’ उत्तर देणारी ‘गंगुबाई’ नंबर वन मालिका ठरली! नाटकही गाजले!!

  कॉमेडी नाटकाप्रमाणे गंभीर प्रकृतीच्या नाटकातही त्यांनी सफाईदारपणे भूमिका केल्या. ‘श्यामची मम्मी’ हे नाटक ‘श्यामची आई’ मराठी रसिक, वाचकांच्या हृदयात आहे. पण बदलत्या काळात ‘मम्मी’ आली. मुलाला परीक्षेत चांगले टक्के मिळावेत म्हणून ही मम्मी दिवस-रात्र एक करते. टिपिकल मध्यमवर्गीय घरातलं हे नाट्य. त्यातली ‘मम्मी’ शोभून दिसली. तिने यात अक्षरशः रसिकांना रडविले! आणखीन एका नाटकाची आठवण येते त्याची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही पण त्यातली या कॉमेडी क्वीनची भूमिका भन्नाटच होती. मोहन वाघ यांची निर्मिती असलेले ‘डबल ट्रबल’ हे नाट्य. यातली नायिका अर्थातच निर्मिती! तिच्या अंगात देवदेवता येतात. अगदी नवसाला पावणारा ‘लालबागचा राजा’पासून ते ‘दत्तगुरु’पर्यंत! पूर्ण नाटकभर देवांचा संचार! बुवाबाजीवर आधारित हे नाट्य. विविध आवाज व अभिनयाने या गुणी रंगकर्मीने रसिकांना भरपेट हसविले… अभिनयाची एक वेगळी जातकूळी त्यांनी दाखविली!

  विनोदाच्या या महाराणीने अनेक चित्रपट केले, मालिका केल्या. काही ‘कॉमेडी शो’चं सूत्रसंचलनही केले. ‘हप्ता बंद’ या एका हटके कार्यक्रमात त्या सूत्रसंचालन करायचा पण त्यात फार काळ त्या रमल्या नाहीत. नाटक ही त्यांची पहिली पसंतीच ठरलेली.

  असंच एक नाटक आठवतं. ‘अ….आईचा, ब….बाईचा!’ हे त्याचं शीर्षक. जे कुतूहल – उत्सुकता वाढविणारं. कल्पक नाटककार शेखर ढवळीकर यांची संहिता व दिग्दर्शन होतं. या नाटकावर ढवळीकर यांच्याशी सविस्तर चर्चा तेव्हा झाली होती. विषय तसा दमदार. पण व्यावसायिक नाटकांच्या बुकिंगवर पकड धरू शकला नाही. आजी, आई आणि मुलीच्या जीवनातल्या स्थित्यंतरावर बेतलेले कथानक होतं. महिलांना आवडीचा विषय पण बुकिंगवर नेमकं काय धावेल, हे भल्याभल्यांना सांगता येत नाही. हेच खरे. काहीतरी विचारपूर्वक ‘हटके’ विषय मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. हे खरे!

  लेखन व दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे असलेले ‘अहो! राहू द्या ना घरी!’ हे नाटक ही आजच्या तरुणाईशी संवाद साधणारं. इंटरनेट, फेसबुकमुळे जी काही धम्माल उडते, त्याचे चित्रण त्यात होते. ‘चॅट’ करणाऱ्या मध्यवर्ती मुलीच्या भूमिकेत त्या होत्या. अतुल तोडणकर त्यांच्यासोबत होता. विषयापासून सादरीकरणापर्यंत एक चांगले नाटक म्हणून लक्षवेधी ठरले. विषय फ्रेश होता आणि आहे!

  निर्मितीताईंना जाडेपणावरले विनोद अजिबात आवडत नाहीत. जर भूमिकेची मागणी असेल तरच विनोद असावेत. ते ओढून-ताणून असू नयेत, असं त्या सांगतात. त्याच्यात एक परिपक्व अभिनेत्री आहे, जिला नाटक पुरेपूर समजतं. याचे दर्शन त्यांच्याशी संवाद साधतांना आले आणि हो कुणाच्या कौतुकाने किंवा पुरस्काराने भुरळून जाण्याचा त्यांचा स्वभावही नाही.

  २०१९ या वर्षात आलेलं ‘व्हॅक्युम क्लिनर’. यात विनोदाचे दोन हुकमी एक्के एकत्र आलेले. एक अर्थातच अशोक सराफ आणि दुसरी निर्मिती सावंत! नाटकाचे नाव जरी ‘व्हॅक्युम’ असले तरी ‘टेन्शन’ गायब करणारी ही कॉमेडी आहे. हे दोघे विनोदवीर एका रंगमंचावर बघणं म्हणजे सुखद हास्ययोगच. रंजन-मनोरंजनाचा मस्त खेळ त्यातून आकाराला येतो. चिन्मय मांडलेकर याची संहिता व दिग्दर्शन. ‘अष्टविनायक’चे दिलीप जाधव यांची ही निर्मिती. नाट्य हे व्यावसायिकवर आजही गर्दी खेचत आहे. नयनाच्या भूमिकेतून पुरुषी अस्तित्व सुरेखच! भूमिकांची अदला-बदल धम्माल उडविते.

  प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्याछाया’ हे नाटक जे ‘संध्यानंद’ देतेय. यात त्यांची ‘छाया’ची आणि ‘संज्या’ची – वैभव मांगले यांची भूमिका आहे. वृद्धापकाळाचा बाबुलबुवा न करता सेवाभावी कार्याला झोकून देणाऱ्या या भूमिका. जयवंत दळवी यांच्या मूळ ‘संध्याछाया’ ही शोकांतिका नव्या समिकरणात सुखात्मिका करण्यात आलीय. कोरोनाच्या एका मध्यंतरानंतर हे नाट्य रसिकांचे लक्ष वेधत आहे. यातील ‘छाया’ची भूमिका ही तशी त्यांच्या विनोदी भूमिकांविरुद्ध जरी असली तरी त्यामागली मिश्किलता नजरेत भरते.

  ‘प्रत्येक भूमिका शंभर टक्के प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असतो. कुठेही तडजोड मला मान्य नाही. स्वीकारलेल्या भूमिकेवर अभ्यास करते. परिश्रम घेते. रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद हा पुरस्कारच आहे….’ निर्मिती ताईंचे हे मनोदय खूप काही सांगून जाणारे. म्हणूनच ‘विनोदाची महाराणी’ म्हणून त्यांची ओळख ही रसिक दरबारी बनली आहे! विनोदाच्या सम्राज्ञीला सलाम!

  -संजय डहाळे
  sanjaydahale@gmail.com