makar sankranti

भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसात शेती आणि मळ्यांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. मकर संक्रांती अशा काळात येते, जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. मकर संक्रांतीचे खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते. मकरसंक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते.

  मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशीच येतो. या दिवशी सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचे कार्य जसे की, स्नान करणे (गंगा स्नान), भगवान सूर्याला नैवेद्य (देवतेला अर्पण केलेले अन्न) अर्पण करणे, दान किंवा  अर्पण करणे, श्राद्ध विधी करणे आणि उपवास करणे हे पुण्यकाळात करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरेकडे आपला प्रवास सुरू करतो. भाविक गंगा, गोदावरी, कृष्णा, यमुना नदीत पवित्र ठिकाणी स्नान करतात, मंत्र उच्चार करतात. साधारणपणे सूर्य सर्व राशींवर प्रभाव पाडतो. परंतु कर्क आणि मकर राशीत सूर्याचा प्रवेश धार्मिक दृष्ट्या अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले जाते. मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये पालट होण्यासाठी आरंभ होतो. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास साहाय्य होते.

  आपला भारत देश विविध संस्कृती आणि परंपरा यांनी नटलेला देश आहे. मकर संक्रांती हा सण पूर्ण देशात साजरा होतो. त्याची प्रत्येक प्रांतात कोणती नावे आहेत? तसेच शेजारच्या देशांतही या सणाची काय नावे आहेत? याविषयी पाहूया.

  उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी/ लोहरी या नावाने, हरयाणामध्ये सक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो. हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो. उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, शिशूर सेनक्राथ (काश्मीर), माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया). देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येतील. त्यासोबतच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू शकतात.

  हा भारतीय सण सौर कालगणनेशी निगडित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशीसुद्धा याचा संबंध आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसात शेती आणि मळ्यांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. मकर संक्रांतीचे खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते. मकरसंक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते (मकरसंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात.) यंदा रथसप्तमी शनिवार, २८ जानेवारी या दिवशी आहे. मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडाचे वाण देतात. या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. (हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो) ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडयात भरून हे वाण महिला वर्ग ज्यापध्दतीने एकमेकिंना देतात. त्याचप्रमाणे पंढरपुरच्या रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात.

  ‘तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला’ , असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते. औपचारिकता म्हणून हे वाक्य न बोलता त्याप्रमाणे कृतीसुद्धा करणे महत्त्वाचे असते. अन्यथा गोडबोला असे तोंडदेखले म्हणायचे आणि कडवटपणा कायम ठेवायचा. याला काहीच अर्थ नाही. मानवी नातेसंबंधातील कटूपणा दूर करण्यासाठी सणाचे साहाय्य होऊ शकते. हे नक्कीच अतुलनीय आहे. काही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून वाद होऊन ते विकोपाला जातात. पण दोन्ही बाजूंना माघार घेऊन पुन्हा संबंध पूर्ववत करण्यासाठीची संधी या बहुमूल्य सणाच्या निमित्ताने असते.

  तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करते. हा सण माणसांच्या   परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.

  कोणावर कठीण प्रसंग ओढवला तर त्यावर ‘संक्रांत आली असे म्हणत चेष्टा केली जाते.’ असे कृपया बोलू नये. संक्रांत  आणि त्या व्यक्तीवर ओढवलेला वाईट प्रसंग यांचा संबंध कसा असू शकतो? याला कुठलाच धार्मिक आधार नाही. केवळ शब्दच्छल केला जातो आणि त्यावर विनोद केले जातात. जे की अत्यंत चुकीचे तसेच आक्षेपार्ह आहे. संक्रांत या शब्दाचा विपर्यास करणे थांबले पाहिजे. आपल्या सणांच्या नावाचा योग्य प्रकारे उच्चार करणे आणि तो सण का साजरा करतो? हे जाणून घेतले पाहिजे. तसे केले तरच पुढच्या पिढीला योग्य काय ते कळेल. सण-उत्सव का साजरे केले जातात? त्यामागील कारणे सुस्पष्टपणे समजून घेतली तर अज्ञान दूर होईल. तेच दूर झाले तर त्याची जागा ज्ञानाने घेतल्याने ज्ञानाचा प्रसार होईल. देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने हा सण साजरा करण्यात येतो. म्हणूनच पुन्हा एकदा म्हणूया “तीळ गुळ घ्या  गोडगोड बोला”..!!
  – हभप. डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर