प्रासंगिक : सुरुवात एका न संपणाऱ्या पॉजची…

विक्रम गोखले गेल्याची बातमी अखेर आली. त्यांची तब्येत ठिक नसल्याचं गेल्या आठ-दहा दिवसांपासून समजत होतंच. शिवाय, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येतही खालावली होती आणि आज ही बातमी आली. खरंतर गेल्या दोन दिवसांपासूनच एक विमनस्क अस्वस्थता आली होती. आपापली सगळी कामं आटोपताना एक अस्थैर्य जाणवू लागलं होतं. असं का झालं? खरंतर गोखले हे कमाल मोठे अभिनेते. त्यांच्या अभिनयाबद्दल आपण काय बोलावं? पण गोखले केवळ एक अभिनेते नव्हते. तर माणूस म्हणून त्यांनी समाजमनावर आपला अधिकार कोरला होता. त्यांची तब्येत खालावल्याचं कळल्यानंतर येणारी शांतता ही त्याचं द्योतक होती.

  साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नाटक होतं जावई माझा भला. नाटक सुरू व्हायला काहीच अवधी राहिला होता. आता तिसरी बेल होणार तेवढ्यात पडदा उघडला. स्टेजवर एकटे विक्रम गोखले उभे होते. आणि ते एकटे प्रेक्षकांशी बोलत होते. मुद्दा होता मोबाईलचा आणि मुलांचा. खरंतर प्रत्येक नाटकाआधी मोबाईलची सूचना होतेच. पण इथे एक अभिनय सम्राट स्वत: ही सूचना देत होता. ती देताना कलाकार म्हणून त्यांची होणारी अडचण सांगत होता. ऐन गंभीर संवादांमुळे थिएटरमध्ये होणारी मुलांची पळापळ कसं त्याचं गांभीर्य घालवून टाकते ते कळकळीनं पोचवत होता. गोखलेंचं सांगून झालं. पडदा पुन्हा पडला.

  तिसरी बेल झाली.. आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू होऊन २० मिनिटं झाली नसतील तोच पुन्हा फोन वाजला आणि गोखले आहे त्याच जागेवर थांबले. त्यांनी आपल्या भूमिकेचं बेअरिंग सोडलं. ते आपली जागा सोडून पुन्हा रंगमंचाच्या मधोमध आले. आणि काहीही न बोलता केवळ प्रेक्षकांकडे धारदार नजरेनं पाहात राहिले. काही क्षण. पूर्ण शांतता.. जवळपास ३० सेकंद गोखले मंचावर उभे होते आणि त्यानंतर पुन्हा आपल्या जागी जाऊन त्यांनी नाटक सुरु केलं. महत्वाची गोष्ट अशी की त्यानंतर एकदाही कुणाचा फोन वाजला नाही. आता या ३० मिनिटांमध्ये गोखले यांनी कुणाशीही एक शब्द न बोलता एकाचवेळी समोर उपस्थित प्रेक्षकांशी व्यक्तिगत संवाद साधला होता. तो त्यांना साधता येत असे म्हणून गोखले ग्रेट होते.

  अशीच गत अगदी अलिकडची. म्हणजे २०२० ची. लॉकडाऊनमध्ये सर्वांचेच हाल झाले. पण त्यातही वृ्द्ध कलाकारांची स्थिती आणखी बिकट होती. त्यावेळी गोखले यांनी आपली नाणे गावातली २ एकर जागा विविध कारणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यातली एक एकर जागा वृद्धकलावंतांसाठी होणाऱ्या वृद्धाश्रमासाठी आणि एक एकर जागा चित्रपट महामंडळाला देण्यात आली. यावेळी बोलताना विक्रम गोखले म्हणाले होते, ‘मी लहान असल्यापासून या क्षेत्राशी निगडित होतो. जूहू गल्ली, कूपर हॉस्पिटल इथे भली भली एकेकाळी नायक असलेली मंडळी नंतर हाता करवंटी घेऊन रस्त्यावर उभी असलेलीही मी पाहिली.

  त्यावेळेपासून मला वाटे की अशा लोकांचं काय करायचं? यांच्यासाठी काही करता येईल का? हा विचार डोक्यात असल्यामुळेच मला आता असं वाटलं की आपण आपल्या वाट्यातलं थोडं काढून दुसऱ्याला द्यावं.’ एखादी गोष्ट मनात आली की ती पूर्ण करण्यासाठीचं नियोजन अत्यंत शांतपणे गोखले करत होते. वृद्धांसाठी होणाऱ्या वृद्धाश्रमाचं सगळं नियोजन त्यांच्या डोक्यात होतं. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त बांधकाम कसं करता येईल याबद्दलही ते विचार करत होते. म्हणून हा माणूस मोठा होता. गोखले यांनी केलेलं काम.. त्यांची वठवलेल्या भूमिका.. त्यांना मिळालेले पुरस्कार याबद्दल आपण बोलणारे कोण?

  अभिनेता आणि माणूस म्हणून फार मोठं व्यक्तिमत्व होतं ते. अभिनयाचं विद्यापीठ असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. एकदा बोलता बोलता त्यांना त्यांच्या पॉप्युलर पॉजबद्दल विचारण्याचा योग आला होता. यावरचं त्यांचं उत्तर लाजवाब होतं. ते म्हणाले, एक लक्षात घे.. आपण खूप बोलतो. कारण आपल्याला आपण कसे बरोबर आहोत हे सतत सांगायचं असतं. वेगवेगळ्या कारणाने आपण ते दबाव समोरच्यावर टाकत असतो. पण यातून आवाज वाढतो. वादही वाढतात. पण बऱ्याचदा संवादांपेक्षा दोन वाक्यांमधली शांतता अधिक गहिरी असते आणि बोचरी. आशय काय आहे त्यावर अवलंबून असतं ते.

  माझ्या संवादांमधल्या त्या जागा मी हेरतो. मी म्हणजे, ती व्यक्तीरेखाच असतो.. आणि मग त्या व्यक्तिरेखेला पोषक ठरतील असे पॉज शोधून मी ते आचरणात आणतो.. आणि लोकांपर्यंत पोचतं ते. कारण त्या पॉज मध्ये ते श्वास असतात… श्वास कधी खोटं बोलत नाहीत. म्हणून कोणत्याही संवादांतल्या पॉजचं सांगणं कधी खोटं नसतं. त्यांचं म्हणणं खरंच होतं. म्हणूनच विक्रम गोखलेंचे पॉज जास्त लक्षात रहायचे आणि त्यांचं म्हणणंही. त्यांची विचारधारा काय होती.. त्यांच्या कमेंट्स काय होते या वेगळ्या गोष्टी आहेत. पण सर्वसामान्यांपर्यंत पोचणाऱ्या त्यांच्या भूमिका आणि त्यांचं समाजासाठी झालेलं काम हे या सगळ्या पलिकडचं होतं. खरं होतं… त्यांच्या पॉजसारखं.

  सौमित्र पोटे

  sampote@gmail.com