एक डाव अशोकमामाचा!

एका 'बहुरूपी' अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देतांना पंच्याहत्तर वर्षाचा विलक्षण वेगवान प्रवास नजरेत भरतोय. जो नाटकांपासून ते चित्रपटांपर्यंत आणि मालिकांपासून ते जाहिरातींपर्यंत गच्च भरलाय. जणू चंदेरी - रुपेरी दुनियेतला हा एक डाव अशोकमामांचा! अशोक सराफ यांना नाट्यसृष्टीत 'अशोकमामा' म्हणून ओळखतात.

  मामाचा प्रेमळ स्वभाव त्यांच्या देहबोलीतून कायम नजरेत भरतो. रंगभूमीवरल्या टाईमिंगच्या अजब गणितावर कमालीची हुकमत असणारा हा बहुरूपी अभिनेता. हिरोचं रंगरूप नसतांनाही नाटकापासून ते सिनेमा, सिरियल, जाहिराती याच्या एकेक पायऱ्या त्यांनी कुशलतेने चढल्या.

  मराठीपुरता हा अभिनेता मर्यादित उरला नाही तर ग्लॅमरस हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी ‘विनोदवीर’ म्हणून कारकिर्द गाजविली. त्यांच्या चित्रपटांवर आजवर जेवढी चर्चा झाली त्या तुलनेत नाटकांवर झालेली नाही. नाटक ते चित्रपट ही वाट सन्मानाने त्यांनी पार केली. आपलं कुळ अन् मूळ हे नाटक असल्याचं मात्र ते कधीही विसरलेले नाहीत.

  अशोकमामांचं एकतरी नाटक कायम रंगभूमीवर सुरू असतं. त्यांचे चाहाते आवर्जून नाटकाचे स्वागत करतात. कुणाला त्यांच्यातल्या ‘पांडू हवालदार’च्या भ्रष्ट पोलिसाला भेटायचय तर कुणाला ‘रामराम गंगाराम’मधल्या म्हमद्या खाटीकला, तर कुणाला ‘बहुरूपी’तल्या ‘बहुरूपी’ला तर काहींना ‘एक डाव भुताचा’ यातल्या भूताला! एक ना दोन. चित्रपटांचे दर्दीही त्यामुळे नाट्यगृहाच्या दिशेने पोहचू लागले. हे विसरून चालणार नाही.
  अशोक सराफ! एक ग्लॅमरस नाव! त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा चाहात्यांना असणं स्वाभाविकच.

  वसंतराव आणि गोपीनाथ सावकार या दोन्ही मामांचा वारसा त्यांच्याकडे चालून आलेला. गेली पंच्याहत्तर वर्षे इनॲक्शन असणारा हा विनोदवीर. ज्येष्ठ पत्रकार मीना कर्णिक यांनी अशोकमामांच्या आठवणी या बोलक्या करून त्या शब्दबद्ध केल्या. ‘मी बहुरूपी’ या पुस्तकातून. ‘ग्रंथाली’ने हे पुस्तक सुबक – सुंदर रंग – रूपासह वाचकांपुढे आणलं आणि एक रंगइतिहास जागा झाला. हे तसे बंदिस्त चौकटीबद्ध आत्मचरित्र नाही पण आठवणींचा संग्रह आहे. जो अशोकमामांसोबत वाचकांची मस्त भटकंती करतो… रुपेरी – चंदेरी सफर घडवितो.

  ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त हे म्हणतात – ‘व्यक्तिगत आयुष्यात सगळ्यांप्रमाणेच अशोकलाही ठेच लागली असेल. बरेबुरे अनुभवही आले असतील पण हे सगळं स्वीकारून एक कलावंत म्हणून जगत राहणं महत्त्वाचं असतं. एक कलावंत आणि माणूस म्हणून अशोक जागृत आहे. हे माझ्या दृष्टीने अशोकचं सर्वात मोठं यश आहे.

  इंटरबँक स्पर्धेपासून सुरू झालेला हा प्रवास व्यावसायिकवर पोहचला. पुढे सिनेमाने ‘स्टार’ बनविले. मराठी सोबतच हिंदीतही चौफेर सफर झाली. दूरदर्शनवरली मुसाफिरीही पार केली… आणि नाटक हे तर बालपणापासूनच घरातलं वेडच! या ‘बहुरूपी’च्या एकूणच प्रवासावर एखादा महाग्रंथ प्रत्येक दालनावर निश्चित होईल, येवढा हा प्रदीर्घ प्रवास आहे. एके ठिकाणी अशोक मामा म्हणाले, – ‘४ जून १९४७ चा माझा मुंबईतला जन्म. इंग्रज जणू काही थांबलेच होते माझा जन्म होण्याची वाट पाहात. मी आलो आणि घाईघाईने आपल्याला स्वातंत्र्य देऊन ते निघून गेले!’

  वसंतराव कानेटकर लिखित आणि डॉ. श्रीराम लागू दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक. कलावैभवतर्फे वाजतगाजत व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं. ६ फेब्रुवारी १९७२ हा दिवस. शुभारंभी प्रयोगाचा ठरला. समाजसुधारक धोंडे केशव कर्वे यांच्या जीवनावर बेतलेले हे नाट्य. ययाती आणि देवयानी, देवदास, रंगात रंगला श्रीरंग, मंदारमाला, वरचा कानून, एक होता शिंपी, विद्याहरण, मृच्छकटिक, मदनाची मंजिरी, मानापमान, सौभद्र, संशयकल्लोळ, नकटीच्या लग्नाला, वल्लभपूरची दंतकथा – यातील बहुतेक संगीत नाटके. त्यातही काही पुन्हा रंगभूमीवर आलेली. या नाटकानंतर एक सहाय्यक अभिनेता म्हणून अशोक सराफ यांचा ‘तातोबा’ दमदारपणे उभा राहीला!

  निर्माते उदय धूरत यांच्या माऊली प्रॉडक्शनतर्फे ‘हमिदाबाईची कोठी’ हे नाटक रंगभूमीवर आले. ज्यातल कोठीवरलं थेट वातावरण साऱ्या नाट्यसृष्टीला हादरून सोडणारे ठरले. अनिल बर्वे यांची संहिता आणि विजया मेहता यांचे दिग्दर्शन तसेच प्रमुख भूमिका. भास्कर चंदावरकर यांचे संगीत आणि द. ग. गोडसे यांचे नेपथ्य अशी जुळवाजूळवी झालेली. १९७६ चा सुमार. हमीदाबाईच्या रंगभूमीवरल्या या कोठीत ‘लुक्का’ नावाचा दारूची भट्टी लावणारा, एक खूनी अशोकजींनी बारकाव्यासह पेश केला.

  तवायफ संस्कृतीचे भन्नाट दर्शन आणि त्यातील एकेक मुखवटे वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले. नाना पाटेकर यांचा सत्तार, नीना जोशी हिची शब्बो, भारती आचरेकर हिची सईदा, विजया मेहता यांची हमीदाबाई. विसरता येणं शक्य नाही. पांडू हवालदार आणि रामराम गंगाराम – हे दोन्ही दादा कोंडके यांचे चित्रपट सुपरहिट झालेले. त्यातल्या ‘म्हमद्या’ची भूमिका गाजलेली.

  अशोकजी त्यावेळी या ‘टिम’मध्ये एकमेव ‘स्टार’ होते. त्यांच्या रंगभूमीवरल्या वाटचालीत हे नाटक मैलाचे निशाण ठरले. पण त्यानंतर चित्रपटांमुळे कोल्हापूर हे त्यांचे ‘माहेर’च बनले आणि सुमारे एक तप म्हणजे बारावर्षे हा गुणी कलाकार कॅमेरापुढे रोज उभा राहीला. त्यातून एकापेक्षा एक सुरेख चित्रपट मराठी सिनेसृष्टीला मिळाले! असो. तो एक स्वतंत्र विषय ठरेल कारण दोनशे मराठी चित्रपट आणि पन्नासएक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.

  एका प्रदीर्घ मध्यंतरानंतर अनधिकृत, बोल राधा बोल, मनोमिलन, हसत – खेळत, सारखं छातीत दुखतय, प्रेमा तुझा रंग कसा? लगीन घाई आणि व्हॅक्युम क्लीनर – ही नाटके रंगभूमीवर आली. वयाची ७५ वर्षे पूर्ण केली तरी त्यांची ऊर्जा १८ वर्षाच्या तरुणाची दिसते. पक्का मुंबईकर असलेला हा मामा वयाच्या १८ व्या वर्षापासून ते आज पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत रंगभूमीला दैवत मानतोय.

  काही गाजलेल्या नाटकातल्या काही भूमिका आपल्याला मिळाल्या असत्या तर त्या वेगळ्याप्रकारे निश्चित केल्या असत्या, ही खंत. त्यांना आजही चुटपूट लावून जाते. त्यात ‘नटसम्राट’मधला गणपतराव बेलवलकर, ‘तो मी नव्हेच’मधला लखोबा लोखंडे आणि ‘सखाराम बाईंडर’ नाटकातला सखाराम! ‘व्हॅक्युम क्लीनर’ हे नाटक. जे शुभारंभी प्रयोगात ज्यांनी बघितले ते आज दोनशे प्रयोगानंतर अनेक गाळलेल्या जागा भरून नव्या प्रकारे दिसते. ‘नाटक हे पहिले प्रेम!’ असणारा हा बहुरूपी! जो मुखवट्यामागे विनम्र, मिश्किल, शांत, कुटुंबवत्सल!!!

  एक योगायोग. अशोकमामांचं ‘व्हॅक्युम क्लीनर’ हे चिन्मय मांडलेकर याचं नाटक. ‘अष्टविनायक’ची निर्मिती. निर्मिती सावंत आणि मामा यांच्या अभिनयाची तूफान टोलेबाजी. सोबत ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेले नाट्य. एकेदिवशी सकाळी ‘व्हॅक्युम क्लीनर’ तर दुपारी ‘स्वरा’चा प्रयोग. हे गुणी दांपत्य आजही रंगभूमीवर सक्रिय आहे. दोघांचं ‘प्रेमवीर दांपत्य’ म्हणून ट्युनिंग मस्त आहे.

  आज तेहतीस वर्षे झाली. यांच्या लग्नाला. त्यात मैत्रीपूर्ण नवरा – बायकोच्या नात्याशी शंभरटक्के बांधिलकी दिसून येते. ‘माझं निवेदिताशी लग्न ही माझ्या आयुष्यातली भाग्याची गोष्ट’, असंही मामा म्हणतो. यातच सारंकाही आलं.

  ग्लॅमरस असलेल्या सिनेनाट्य क्षेत्राकडे येणाऱ्या तरुण पिढीशी संवाद साधतांना ते म्हणतात,

  -‘नायकासारखा चेहरा नसणाऱ्या माझ्यासारख्या अभिनेत्याला नाटक, सिनेमा आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांमधून इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या, हा म्हटलं तर चमत्कारच. पण का म्हणायचं? कारण केवळ नशिबाच्या हवाल्यावर मला इथवर मजल गाठता आलेली नाही. जे काम केलं ते अतिशय गंभीरपणे, प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं. त्यात कधीही चालढकल, हयगय केली नाही. कोणतही काम, मग ते छोटं असो की मोठं. नायकाचं असो की खलनायकाचं, विनोदी असो वा गंभीर. मी ते माझ्या पूर्ण क्षमतेनंच केलं. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली!’

  ‘मी बहुरूपी’ या पुस्तकामुळे आठवणींना उजाळा मिळाला.

  अशोकमामा यु आर ग्रेट!

  संजय डहाळे

  sanjaydahale33@gmail.com