सामाजिक सलोखा, राखाल बंधूहो, तेव्हाच राष्ट्र बहरतंय

'मावळत्या'ला निरोप अन् 'उगवत्या'च्या स्वागताला संवेदनशील चित्रकाराचं समाजमनाला आवाहन

  शेती विकून पोराला शिकवलं पण नोकरी लागत नाही म्हणून आईबाप अस्वस्थ… नोकरी नाही म्हणून छोकरी मिळत नाही म्हणून पोरं अस्वस्थ… त्यात या शांतताप्रिय, सहिष्णू देशात जातीय दंगलींच्या एकामागून एक वाढत जाणाऱ्या घटना… अशा घटनांत होरपळणारी माणुसकी… महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना, २०२३ या मावळत्या वर्षामधील अशा घटनांनी देशातला सुजाण नागरिक अस्वस्थ आहे. त्यांची हीच अस्वस्थता संवेदनशील कवी मनाच्या चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून रेखाटली आहे. ‘जगायचं कसं?’ असा प्रश्न करीत ‘सामाजीक सलोखा, राखाल बंधूहो, तेव्हाच राष्ट्र बहरतय’ असं मौलिक आवाहन या चित्रकारानं आपल्या शुभेच्छा पत्रातून समाजाला केलं आहे.

  बाबा पवार असं या चित्रकारांचं नाव आहे. ते कवी आहेत. विंग ता. कराड येथील रहिवासी व सेवानिवृत्त कलाशिक्षक आहेत. १९८२ पासून पेंटिंग्ज तयार करतात. त्यांचे अनेक पेंटिंग्ज जगभरात पोहोचली आहेत. गत १५ वर्षापासून सुरू केलेल्या मावळत्या वर्षाला निरोप आणि उगवत्याचं स्वागत करण्याच्या शुभेच्छा पत्ररूपी उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक, एशिया बुक, इंडिया बुक अशा वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये झाली आहे.

  यंदाही २०२३ या मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि २०२४ या उगवत्या वर्षाचे स्वागत करताना चित्रकार बाबा पवार यांचा कुंचला जनतेला समर्पित काव्य-चित्ररूपी शुभेच्छा पत्रात बोलता झाला आहे. ‘जगायचं कसं’ असं या कवितेचे शीर्षक आहे. कवितेतला आशय शेजारच्या चित्रात रेखाटला आहे. संवेदनशील मनाच्या बाबा पवार यांना गतवर्षात ज्या ज्या ठळक घटनांनी अस्वस्थ केलं, त्याच घटना त्यांनी शब्दात आणि चित्रात मांडल्या आहेत.

  ते म्हणतात, “दिवसा ढवळ्या, अस्सं काही, रोज नवं घडतय, जगायच कसं, टेन्शन याचं रोज रोज वाढतंय, माना … कोणी मानू नका पण… हे सारं खरं हाय. दिवस उद्याचा कसा उजाडेल, भरवसा याचा कोणालाच न्हाय. विचारानं या डोकं माझं, रात्रंदिन ठणकतय जगायच कसं टेन्शन याचं, रोज रोज वाढतंय” पवार यांच्या या काव्यशब्द ओळी अस्वस्थ समाजमनाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

  “रोजगारां विना, युवा तडफतोय, गाजर दाखवून, नेता दडपतोय” हे भयानक वास्तव आजच्या अनेक समस्यांचे मूळ आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळेच, “डोळे लावून बसलेत मायबाप, कधी अच्छे दिन येतील? सुखाचे चार घास देतील, अन् माझ्या पोरांची लग्नं होतील. विचारात या जगणं बापाचं, आतल्या आत करपतय” ही उपवर मुलांच्या आईबापाची व्यथा पवारांनी तंतोतंत मांडली आहे.

  एकता, एकात्मता, बंधुता, सामाजिक सलोखा , असे शब्द आपण अनेकदा वाचत-ऐकत आलो. आपल्या इतिहासातून , छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आपण खरंच काही शिकलो आहे का ? असा प्रश्न पवार यांना पडला आहे. तो रास्त आहे. त्याच्या पुष्टीसाठी ते म्हणतात पूर्वी हर हर महादेव हा एकच नारा घुमायचा, पण आता ‘हिरवा-पिवळा, भगवा-निळा..” जसे झेंडा तसा नारा. त्यावेळी, “घटका जिकिरीची असे तरीही, म्होरक्या आमचा नेक होता.

  बेईमान काही म्होरक्यांमुळे आज, कशावरूनही बिनसतय. स्वार्थासाठी भेद मांडला, जातीमधला तेढ वाढला. धर्म द्वेषाच्या बांधून भिंती, प्रेम-सलोखा, त्यात गाढला. श्रेष्ठत्वाच्या मानगुटीवर, धर्म आरूढ झाला… अन् माणुसकीची धिंड काढत, संस्कार नागडा केला, सहिष्णू, कणखर, बलाढ्य देशात, मणिपूर घडतंय…. ” अशी गतवर्षातल्या जातीय दंगली, मणिपूरसारख्या घटना, महिला अत्याचारांच्या घटनांची नोंद चित्रकार पवार यांनी घेतलीय.

  त्यामुळेच पुढे त्यांनी “स्वातंत्र्य-समता, न्याय- बंधूता, शिकवण आपली विसरलात का? बंधू भावाच्या पायरीवरुनी, बिथरुनी असे घसरलात का? असा थेट प्रश्न करत “सामाजीक सलोखा, राखाल बंधूहो, तेंव्हाच राष्ट्र बहरतय” असा मौलिक संदेश आपल्या शुभेच्छारुपी पत्रात दिला आहे. पवार यांनी रेखाटलेल्या या वास्तवाचं समाजातल्या पायथ्यापासून कळसापर्यंत चिंतन आणि मनन व्हायला हवं, तसं झालं तर त्यांचा प्रयत्न काही अंशी तरी सफल ठरेल!

  वर्षातून एकच कविता सुचते, तीच शब्दात उतरते…

  माझ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छारुपी पत्रांची नोंद महाराष्ट्र बुक, एशिया बुक, इंडिया बुक अशा रेकॉर्ड बुकमध्ये झाली आहे. मात्र उगवत्या वर्षाचे स्वागत करताना गतवर्षाच्या आठवणींची नोंद घेऊन समाजाला जागवणं हा माझा उद्देश त्यामध्ये राहिला आहे. २०२३ ला निरोप अन् २०२४ चं स्वागत करताना आताही तोच प्रयत्न, तोच उद्देश आहे. चित्रकार असलो तरी वर्षातून एकदा डिसेंबर मध्ये कविता सुचते आणि तीच शब्दात उतरते. आताही चित्र शब्दरूपी प्रबोधनाच्या पातळीवरचा माझा हा प्रयत्न, समाजातून हद्दपार होऊ पाहत असलेला सामाजिक सलोखा, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता पुनर्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक छोटासा भाग ठरावा, अशी अपेक्षा बाबा पवार यांनी व्यक्त केली.

  • हैबत आडके, कराड.