being a part of the relationship we owe to the lives of many is the wealth of our lives nrvb

आपण अनेकांच्या आयुष्यासाठी ऋणानुबंधांचा भाग असणे ही आपल्या आयुष्याची संपत्ती असते आणि हे कळायला आयुष्याची पन्नास एक वर्षे तरी खर्ची पडून जातात. ऋणानुबंध असे दुहेरी गोफ असल्यासारखे वाटतात पण जर आयुष्याच्या साऱ्या परिघांवरील आपली भ्रमंती लक्षात घेतली तर ऋणानुबंध हे बहुपेडी असतात आणि अनेकजिनसी असतात हे आपल्याला सहजपणाने मान्य करावे लागते.

  काही काही वेळा कोणती माणसे कधी आपल्या आयुष्यात येतात आणि ती माणसे का येतात हे आपल्याला पटकन उमगत नाही. योगायोग या एका शब्दात आपण ते बसवून टाकतो किंवा पूर्वजन्माशी नाते जोडून मोकळे होतो. वास्तविक, एवढ्या अस्ताव्यस्त जगात नेमकी काही माणसे वाट्याला येतात आणि आपल्या जीवनातील सुख-दुःख, मान-अपमान, आनंद-यातना, सन्मान- अवहेलना, जय-पराजय, यश-अपयश, खेद-हर्ष, समाधान-असमाधान, आसू आणि हसू, प्रगती-अधोगती, श्रीमंती-गरीबी आणि जन्म-मृत्यू या साऱ्या साऱ्या गोष्टींशी त्यांचे नाते जुळून जाते.

  काही माणसे अगदी अल्पकाळासाठी आपल्या सोबत असतात तर काही माणसे दीर्घकाळासाठी आपले सहप्रवासी असतात. आपला माणसांशी परिचय होण्याचा क्षण आणि त्यांचा आपल्याशी विलगीकरणाचा क्षण ठरलेला असतो का? आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणसाशी आपले असलेले नातेबंध, संबंध यांचा थेट परिणाम हा सहवासाशी असतो काय? सहवास अल्पसा असतानाही काही नातेसंबंध दीर्घकाळ कसे काय टिकून राहतात? आणि मजबूत किंवा भक्कम संबंध असूनही काही नातेबंध का तुटून जातात किंवा का सुकून जातात? सहवास ही नेमकी काय गोष्ट आहे? ती फक्त सोबत असणे-सोबत रहाणे या निकषावर मोजायची काय? आणि मोजायचीच ठरवले तर नेमकी कशी मोजायची? काळ हा सहवास या शब्दाच्या पोटात दडलेला असतो आणि आपण एरव्ही बोलतानाही ते आपल्या पटकन ध्यानी येतेच असे नाही. तरीही आपण खूपदा सहवासाचा संदर्भ दाखवण्यासाठी काळ ही संज्ञा वापरतोच, हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे काळाच्या पटलावर सहवास मोजायचा आणि सहवास हा शेवटी ऋणानुबंध या अदृश्य तिजोरीमध्ये जमा करायचा असे काही असावे काय?

  ऋणानुबंध या शब्दाची एक विशेष बाजू आहे ती म्हणजे हा शब्द उच्चारला की आपल्याला स्वतःची एक काही तरी जमापुंजी आहे असे वाटू लागते. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या आणि जपलेल्या तसेच आपल्या आयुष्याला आधार दिलेल्या माणसांची काही नावे ओठावर येतात तर काही चेहरे अत्यंत वेगाने नजरेसमोरून तरळून जातात. आपण अनेकांच्या आयुष्यासाठी ऋणानुबंधांचा भाग असणे ही आयुष्याची संपत्ती असते आणि हे कळायला पन्नास एक वर्षे तरी खर्ची पडून जातात. ऋणानुबंध असे दुहेरी गोफ असल्यासारखे वाटतात पण जर आयुष्याच्या साऱ्या परिघांवरील आपली भ्रमंती लक्षात घेतली तर ऋणानुबंध हे बहुपेडी असतात आणि अनेकजिनसी असतात हे आपल्याला सहजपणाने मान्य करावे लागते.

  आपल्याला जीवनाच्या हर क्षणाच्या टप्प्या-टप्प्यावर दुःखाचे, वेदनांचे, यातनांचे आणि पराभवांचे अनुभव जसे येत असतात अगदी तसेच त्याच समांतर स्थितीत आपल्याला आनंदाचे, हर्षाचे, सन्मानाचे आणि यशाचे अनुभवदेखील सातत्याने येत असतात. हे दैनंदिन जीवनात सारे एकाच वेळी खूपदा घडत असते. या सर्व क्षणांच्या प्रवाहामध्ये आपल्याला अनंत माणसांची साथ लाभत असते.

  अत्यंत दुःखद प्रसंगामध्येसुद्धा आपल्याला समजून घेणारी आणि अगदी विश्वासाने आपल्या पाठीशी राहणारी माणसे खूप वेळा आपल्या घट्ट परिचयाची असतातच असे नाही. आयुष्यातील ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. एकमेकांच्या सांगण्यावरून एकमेकांचे संदर्भ मिळत किंवा घेत माणसांचा हा ऋणानुबंधी प्रवास सुरु असतो, सुरू राहतो.

  ऋणानुबंधाची ही जाणीव असणे म्हणजे कृतज्ञता असावी काय? असे ऋणानुबंध नाकारून माणसांना जगता येते का? आणि त्या तशा जगण्याची नेमकी काय किंमत रहाते? ऋणानुबंध नाकारत जगणारी माणसेही काही ना काही ऋणानुबंध जपत किंवा सोयीने वापरत पुढे जात राहतात हे लक्षात आले की ऋणानुबंध या शब्दाची व्याप्ती फक्त कर्माधीन नाही तर ती दैवाधीन आहे की काय असे वाटू लागते.

  ऋणानुबंध हे कर्माधीन आणि दैवाधीन असे दोन्हीही असतात असे मानले तर खूपदा यांतील गंमत कळून येते आणि हातातून सुटून गेलेल्या काही नातेबंधांची लागणारी हुरहूर इतका त्रास देत नाही. रोजच्या रोटीसाठी या आयुष्यात खूप प्रवास करावा लागला. अर्थात तो रुटीनसारखा. या प्रवासात खूप मैत्र लाभले.

  काही अगदी प्रवासापुरते टिकले तर काही घट्ट आणि दीर्घकाळ राहिले. आपला आणि संबंधित माणसाचा स्वभाव ही ऋणानुबंधाच्या मुळाशी असलेली मुख्य गोष्ट असतेच. या स्वभावाचा संबंध नेमका कशाकशाशी असतो? स्वभावाच्या साऱ्या छटा, कंगोरे आणि भाव यांच्या अनुभवातून माणसे एकमेकांशी संबंध प्रस्थपित करत असतात तेव्हा घडणाऱ्या अनंत घटना या खूप महत्वाच्या ठरत असतात.

  यातील अनंत घटना या आपल्या अपरोक्ष घडत असतात. कोणी तरी आपल्यासाठी सदहेतूने काम करत असतो तर कोणी तरी आपल्याबद्दल वाईट हेतूने कार्य करत असतो. या दोन्हीही बाबी घडत असतात तेव्हा त्या आपल्या गावीही नसतात. काही वर्षांपूर्वी मी अचानक एक नोकरी तत्त्वात बसत नाही म्हणून सोडून दिली आणि नवीन नोकरी शोधू लागलो… एका ठिकाणी माझी लेखी परीक्षा झाली आणि मुलाखतीसाठी तीन दिवसानंतरची वेळ देण्यात आली. मी मुलाखतीला गेलो आणि त्यातील एका व्यक्तीला बघून मी खूपच निराश झालो.

  अर्थात मुलाखत उत्तम झाली आणि लेखी परीक्षेत मी प्रथम होतोच. त्यामुळे ती नोकरी मिळण्याची खात्री वाटू शकली असती; पण त्या व्यक्तीमुळे मी स्वतःला त्या नोकरीच्या स्पर्धेतून वजा करून घेतले व साधारण मानवी स्वभावानुसार अन्य ठिकाणी प्रयत्न करू लागलो. साधारण बारा-तेरा दिवसांनी घरी एक टपाल आले होते व आईने ते उघडून बघितले होते. मी साधारण सायंकाळी पाचच्या सुमारास घरी प्रवेश करताच आई आनंदाने म्हणाली अभिनंदन…. तिने ते टपाल हाती ठेवले…

  मी नोकरीवर रुजू होण्याकरिता दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसला गेलो.. आणि सायंकाळी तेथील मुलाखतीमध्ये सहभागी असणाऱ्या एका वरिष्ठशी भेटलो आणि त्यांना थेट माझ्या मनातील काही विचारायचे असे ठरवले होते तोच त्यांनी विचारले अरे तू श्री. पाटील यांना ओळखत होतास काय… मी हो म्हणालो आणि माझा चेहरा भांबावला होता… आणि ते वरिष्ठ म्हणाले ते पाटीलसाहेब तुझ्याबद्दल भरभरून बोलले आणि त्यांनी तुला आम्ही अकाउंट सेक्शनमध्ये घ्यावे असे सुचवले आहे. त्यानुसार आम्ही तुला उद्यापासून अकाउंट सेक्शनला घेत आहोत… बाकी तुझा आजचा दिवस कसा गेला?…

  त्या श्री. पाटील सरांशी माझी खूप महिन्यांनी भेट झाली आणि मी त्यांना वाकून नमस्कार करू लागलो…. खांद्याला धरून उठवत म्हणाले तुला कधीच मी विसरणार नाही… आमचा कडवट संघर्ष होऊनही त्यांनी मला जपले… माझ्या प्रगतीत वाटा उचलला. असे काही ऋणानुबंध असतात.

  अनुपम बेहरे

  sphatik@gmail.com