‘शारदा अॅक्ट’चं जन्मदातं नाटक!

'शारदा' नाटक मराठी रंगभूमीच्या वाटचालीत विविधस्पर्शी म्हणावे लागेल. हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आले तेव्हा ते त्या 'टिम'पुरतं मर्यादित राहीलं नाही तर ते सर्वांचेच झाले. समाजजीवनात लग्नाच्या संमतीवयाच्या प्रश्नावर एकच घूसळण झाली आणि त्याचा शेवट 'शारदा अॅक्ट'च्या रुपाने झाल्याने नाटकाचाच विजय झाला! नाट्यकलेचा द्रष्टेपणा त्यातून सिद्ध झाला. 'शारदा' नाटक हे मनोरंजनासोबत पहिले अंतर्मुख करणारे समाजरक्षक नाट्य म्हणून प्रत्ययास आले !…

    संगीत ‘शारदा’चा प्रयोग मुक्काम नाशिक. १९ डिसेंबर १९०९ हा दिवस. रंगमंचाच्या समोर नक्षीदार सोफ्यावर नाशिकचा कलेक्टर जॅक्सन हा प्रेक्षक म्हणून बसणार होता. स्वागताची जय्यत तयारी. रंगमंचावर मशाली पेटलेल्या दिवाबत्ती झालेली. अंधार तुडवित ऐटीत एक गोरासाहेब आला. क्षणार्धात एक तरूण पुढे सरसावला. बंदुकीने पाहुण्यांवर निशाणा साधला. गोळी सुटली. गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात कलेक्टर जॅक्सनच कोसळला होता. तरूण क्रांतिकारक अनंत कान्हेरे तिथून पळ न काढता ठामपणे अभिमानाने उभाच राहीला! ‘भारतमाता झिंदाबाद ! जय हिंद!!’चा त्याचा नारा. पवित्र भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी पहिले सशस्त्र पडद्याबाहेरले नाट्यपूर्ण पाऊल ठरले. समाजातील क्रूर रुढी तोडण्यासाठी देवलांनी ‘शारदा’चे लेखन केले आणि त्याच नाट्य प्रयोगात पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्याचे पाऊल उचलले गेले! समाजातील अस्वस्थता आणि उद्रेक हा दोन्ही बाजूंनी ओसंडून वाहात होता. दोन्ही घटना सतर्क करून सामाजिक भान जागविणाऱ्या!
    गोविंद बल्लाळ देवल. किर्लोस्कर नाट्यघराण्याशी निष्ठावान. एक संवेदनशील नाटककार. सांगली जवळच्या हरिपूरातल्या पारावर गप्पांच्या ओघात एक खबर आली. पिंपळाचा पार म्हणजे त्यावेळचा व्हॉटसअपच ! ‘एका वयोवृद्ध श्रीमंताचे लग्न हे एका बालीकेशी होत आहे!’ अन् त्यांच्यातला नाटककार त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देईनात. याच सत्यकथेच्या आधारावर त्यांनी काल्पनिक कथा गुंफली. असा शारदाचा जन्म झाला !
    भुजंगनाथ नावाचा म्हातारा आणि कोवळी शारदा यांचा विवाह होतो. पुरुषाला तरूण- सुंदर- अल्पवयीन बायको हवी; पण दुसरीकडे मुलीला काही भावना, स्वातंत्र्य याचं काही नाही. आई- वडीलांनी चौदा वर्षाच्या शारदाचा ८० वर्षे वयाच्या नवरदेवाशी जबरदस्तीने लग्नाच्या बेड्यात अडकवले! ‘श्रीमंत नवरा’ येवढाच काय तो गुण प्रमाण पालकांनी मानले! मुलीचा होकार किंवा नकार हे जाणून घेतले नाही. स्त्री स्वातंत्र्यांची अशी गळचेपी लग्नाच्या मंडपात आणि पर्यार्याने तिच्या आयुष्यभर झाली…
    लंपट वयोवृद्ध नवरा भुजंगनाथ मुलीची विक्री करणारा बाप कांचनभट; लालची दलाली करणारा भद्रेश्वर दिक्षित, शारदाची मैत्रीण वल्लरी, सेवाभावी प्रवृत्तीचा कोंदड आणि १४ वर्षांची निष्पाप कोवळी कुमारीका शारदा! या वैशिष्ठपूर्ण पात्रांना कथानकात एकत्र आणले गेले त्याकाळी ही अनेक घराघरातली गोष्ट ठरली नाट्यलेखनात कुठेही कृत्रिमता नाही. शैलीत सहजता. कथानक हे जराही प्रचारकी न वाटता, तत्कालीन वास्तवतेच्या दाहक घटनांचे कथन करणारे. त्यामुळे हा विषय, आशय, मर्म हे रसिकांच्या पचनी पडले. आणि त्यातील दर्जेदार अर्थपूर्ण पदांमुळे भरच पडली…
    यातील नाट्यगीते म्हणजे एक आदर्श पाठच ! सारी पदे ही सहजसुंदर शब्दांचा वापर. पुन्हा पून्हा गुणगुणावीत अशी त्यात किमया. नटी, कोंदड, इंदिरा कांचनभट, वल्लरी जान्हवी आणि शारदा यांच्या तोंडी गाणी आहेत. वल्लरीचं ‘म्हातारा इतुका अवघे पाऊणशे वयमान!’ हे गाजलेलं पद, जे आजही डोळ्यासमोर तो काळ उभा करते. नटी सूत्रधार प्रवेशात प्रारंभीच नटी अजूनी खुळा नाद पुरेसा कैसा होईना ?’ कोंदड म्हणतो, जो भेद विधीने स्त्री- पुरुषी केला, देहीच मात्र तो – संततिकार्याला!’ आणि ‘शारदा’ च्या तोंडीची दोन भावस्पर्शी पदे एक ‘तू टाक चिरूनी ही मान, – नको अपमान!’, ‘दुसरे मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली’ याच नाटकातले एक परवलीचे वाक्य – आहे ‘मोठा वाईट काळ आलाय, आम्हा बायकांना!’ ते त्याकाळी गाजलं होते. आजही थोड्या फार फरकाने त्याचा अनुभव हा येतोय. नटी यात प्रारंभीच म्हणते काय पुरूष चळले बाई! ताळ मुळी हा राहीला नाही । धर्मनीतीशास्त्रे पायी तुडविशी कसें हो ।।
    ‘शारदा’च्या प्रमुख भूमिकेत बालगंधर्व यांनी पहिले पाऊल मिरजेतल्या एका प्रयोगात टाकले. त्यानंतर किर्लोस्कर नाटक कंपनीचे ते हुकमी स्त्रीपार्ट ठरले. त्यापूर्वीची ‘शारदा’ कृष्णराव गोरे यांनी रामराम ठोकला. देखणंरुप, गोड गळा आणि अभिनयाची जाण यामुळे बालगंधर्व यांची ‘शारदा’ रसिकांच्या पक्की मनात रुजली ! चिंतोबा गुरव (भृजंगनाथ) आणि शालिनी देशपांडे (शारदा) यांनीही काही वर्षे हे नाटक केले. स्त्री नटीची त्यातली भूमिका हे वेगळेपण व आकर्षण ठरले !
    १८९१ चा संमती वयाचा कायदा आला. चळवळीचे जसं यश तसच ते ‘शारदा’ नाटकाचंही आहे. रायसाहेब सारडा यांनी कायद्याचा मसूदा तयार केला होता. जो देशभरासाठी लागू झाला. त्याला अन्यत्र ‘सारडा कायदा’ असें म्हटले जात होते पण महाराष्ट्राच्या जनमानसात ‘शारदा’ नाटक पक्के असल्याने त्याचा उल्लेख ‘शारदा कायदा’ असा झाला !
    शंभर वर्षापूर्वीची कर्मठ समाजरचना; महिलांचे परावलंबी जीवन, परंपरेशी तडजोडीची वृत्ती, पुरुषांपूढे सदैव शरणागती याचे प्रभावी चित्रण असल्याने ‘शारदा’ची दखल जगभरातल्या इतिहास अभ्यासक घेतात. मुंबई दूरदर्शन आणि राज्यशासनाने याची दखल नाटकांच्या दस्तावेजीकरणात घेतली आहे. त्यामुळे प्रयोगाची कायमस्वरुपी जपवणूक होत आहे.
    पुरुषप्रधान समाजरचनेत स्त्रीयांना मानाचे स्थान मिळावे. यासाठी मराठी नाटकांनी महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. रुढी, परंपरा, संकेत, अंधश्रद्धा याला विरोध करून त्यांच्या पुढल्या समस्येतून मार्ग काढला आहे. ‘शारदा’ नाटकाने पडद्यामागेही समाजजीवन जागे केले. आजची ‘शारदा’ वेगळ्या रुपात काही प्रश्नांच्या उत्तरीच्या अपेक्षेने उंबरठ्यावर उभी आहे…. देवलांची ‘शारदा’ ते विजय तेंडुलकरांची ‘कमला’ हा रंगप्रवास स्त्रीयांच्या अस्तित्वावर भाष्य करतोय… कोंडलेल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देतोय…
    – संजय डहाळे
    sanjaydahale33@gmail.com