जगतप्रकाशांची जबाबदारी!

जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपला आणखी एक मोठी झेप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत घ्यायची आहे. सध्या भाजपच्या खासदारांची लोकसभेतील संख्या आहे ३०३. खासदारांची ही संख्या दणदणितच आहे. पण ती आणखी वाढावी आणि या आधीचे लोकसभा जिंकण्याचे कै. इंदिरा गांधीचे व कै. राजीव गांधींचे विजयाच्या संख्येचे विक्रम मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर थेट तिसऱ्या वेळेच्या विक्रमी लोकसभा सदस्यांचा विजय नोंदवला जावा यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. “चारशे पार लोकसभा सदस्य” ही प्रचंड मोठी महत्वाकांक्षा उराशी बाळगून भाजप नेते कामाला लागले आहेत.

    जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी प्रतिमा मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगतप्रकाश नड्डा यांच्यावर आणखी एक-दीड वर्षे जबाबदारी राहणार आहे. खरेतर भाजपमध्ये कोणाला नेत्याला दुसऱ्यांदा अध्यक्षपद देताना बरेच विचारमंथन केले जाते. नड्डा यांनाही आत्ता पूर्ण तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलेले नाही, तर पुढच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत म्हणजेच, जून २०२४ पर्यंतच्या काळासाठी त्यांना अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आले आहे.

    भाजपच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सरत्या सप्ताहात दोन दिवस दिल्लीत पार पडली. त्याचे फलित हे नड्डांच्या मुदतवाढीबरोबरच येणाऱ्या वर्षभरातील सर्व नऊ राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका जिंकण्याचा संकल्प करण्यात झाली. खरेतर असे होणे दुरापास्तच नव्हे तर अत्यंत अवघडही आहे. हे शक्य नाही हे सांगायला कोणाही ज्यतिषाचीही गरज पडू नये. पण तरीही कार्यकर्त्यांपुढे हे मोठे ध्येय्य पक्षाने ठेवले आहे.

    यातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांतील निवडणुका या भाजपसाठी आव्हानात्मक आहेत. या तीन्ही ठिकाणी त्यांची लढाई थेट काँग्रेस बरोबरच आहे. तिसरा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी तिथे उतरणार, यातही शंका नाही. चौथे महत्वाचे राज्य आहे कर्नाटक. इथे काँग्रेस बरोबरच जनता दल युनायटेड या पक्षाचीही ताकद आहे.

    कर्नाटक आणि मध्यप्रदेशात काँग्रेसची सरकारे उलथवून भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे तिथे काँग्रेस पक्ष जिद्दीने व ताकदीने लढणार आहे. विशेषतः कर्नाटकातील जातीय गणितेही कदाचित भाजपच्या विरोधात आहेत. तिथले काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे जोरात आहेत. राहुल गांधींची पदयात्रा कर्नाटकात मोठ्या प्रमाणात फिरल्याने वातावरण बदलल्याचा काँग्रेसचा दावा आहे. परवा राहुल यांनी दिल्लीत जाहीर केले की कर्नाटकात निर्विवादपणाने काँग्रेसचे सरकार येईल आणि भाजपचा पत्ता साफ होईल.

    राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा जनतेनेच सांभाळलेली आहे. त्यामुळे यंदा तिथे भाजपची सत्ता यायला हरकत नाही. पण भाजपात राज्याच्या नेतृत्वाबाबत एकवाक्यता नाही. वसुंधरा राजेंना नेतृत्व द्यायचे की नाही, या बाबतीत पक्षश्रेष्ठींत मतभेद दिसतात.

    जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपला आणखी एक मोठी झेप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत घ्यायची आहे. सध्या भाजपच्या खासदारांची लोकसभेतील संख्या आहे ३०३. खासदारांची ही संख्या दणदणितच आहे. पण ती आणखी वाढावी आणि या आधीचे लोकसभा जिंकण्याचे कै. इंदिरा गांधीचे आणि कै. राजीव गांधींचे विजयाच्या संख्येचे विक्रम मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर थेट तिसऱ्या वेळेच्या विक्रमी लोकसभा सदस्यांचा विजय नोंदवला जावा यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. “चारशे पार लोकसभा सदस्य” ही प्रचंड मोठी महत्वाकांक्षा उराशी बाळगून भाजप नेते कामाला लागले आहेत. याची स्पष्ट घोषणा अद्यापी कणी केलेली नाही. पण त्या दिशेचे संकेत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आले, हेही महत्वाचे आहे.

    जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला तेव्हापासून गेले काही महिने राजधानी दिल्लीत नड्डांनंतर कोण याची चर्चा सुरु झालेली होती आणि त्यासाठी ज्या विविध नावांचे पतंग उडवले गेले त्यात एक नाव महाराष्ट्रातीलही होते.

    देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच राज्यात फार मोठी क्रांती घडवली आणि एकनाथ शिंदेंसह सत्ता हस्तगत केली. त्यानंतर त्यांना लगेच दिल्लीत नेण्याचे कोणतेही कारण सध्या भाजपकडे खरेतर नाही. पण काही लोकांना फडणवीस मुंबईपेक्षा दिल्लीत असलेलेच बरे असे वाटतच असेल. त्या विरोधकांनी फडणवीसांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार, त्यांना दिल्लीत मंत्री केले जाणार अशा वावड्या पुष्कळ उडवल्या. पण तसे होणार नव्हतेच, याचा पूर्ण अंदाज राजकीय निरीक्षकांना होता. पण या निमित्ताने एक स्पष्ट झाले की दिल्लीसाठी विचार व्हावा इतके मोठे नेतृत्व फडणवीसांनी प्रस्थापित केले आहे… ! पण त्यासाठी अर्थाताच आणखी काही वर्षे जावी लागणार आहेत.

    २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जे. पी. नड्डांकडे पुन्हा संघटनात्मक जबाबदारी येणार याचे संकेत खुद्द नड्डांनीच कार्यकारिणीच्या बैठकीआधी बोलताना दिले होते. त्यांनी सोमवारी एक भाषण केले होते. त्यात ते भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, मी नेहमी तुम्हाला सूचना देतो, माहिती घेतो हे कधी तुम्हाला आवडतही नसावं पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे. त्यापुढेही मी सूचना देत राहणार आहे, असेही ते म्हणाले. तेव्हाच येणाऱ्या जबाबदारीचे सूचना झाले होते. भाजपच्या कार्यकारणीमध्ये राजनाथ सिंह यांनी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जावा हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळ्यांनी अनुमोदन दिले. जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्यानंतर सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे ते अर्थातच येणाऱ्या लोकसभा निवडणूका. जे. पी. नड्डा भाजपाचं ४००+ जागांचं लक्ष्य पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचे ठरेल.

    १९८६ पासून जे. पी. नड्डा हे राजकारणात सक्रिय झाले. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती. जे. पी. नड्डा हे अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. कमीत कमी प्रकाशझोतात राहून जास्तीत जास्त काम करणं हे जे. पी. नड्डा यांचं कौशल्य आहे. १९८६ ते १९८९ या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. त्यानंतर भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९९८ आणि २००७ या दोन्ही वर्षातही त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली.

    या सगळ्या प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या काळात जगत प्रकाश नड्डा यांचा प्रवेश भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर अमित शहांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या काळात पक्षाचे सरचिटणीस म्हणून शहा यांचे विश्वासू सहकारी राहिले.

    जानेवारी २०२० मध्ये जगत प्रकाश नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. शहांच्याच तालमीत तयार झालेले नड्डा पक्षाध्यक्ष होणे हे ओघानेच आले होते. त्यांच्या कार्यकाळात कोरोना संकटाशी देश झुंजत होता तेव्हा सेवा हेच संघटन असे घोषवाक्य घेऊन नड्डांनी सर्व कार्यकर्त्यांना कोरोना मदत कार्यात झोकून घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या तीन वर्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या काळात देशभरात १२० विधानसभांच्या पोटनिवडणुका पार पडल्या त्यातील ७४ ठिकाणी भाजपने विजय मिळवला. त्यांच्याच कार्यकाळात भाजपने प्रथमच गोव्यात स्वबळावर सत्ता घेतली, गुजरातमध्ये विक्रमी यश मिळाले आणि महाराष्ट्रातही पुन्हा एकदा भाजप सत्तारूढ झाला.

    नड्डांच्या मुदतवाढीची घोषणा करताना अमित शहा म्हणाले की भाजपात दर तीन वर्षांनी तालुका, जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत निवडणुका होतच असतात. पण कोरोनाकाळात त्यात खंड पडला. नऊ राज्यांच्या येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रीय अध्यक्षांची मुदत वाढवण्याचे राष्ट्रीय कार्यकारिणीने ठरवले. गेल्या काही महिन्यातच भाजपने अशा एक लाख तीस हजार बुथपर्यंत पक्षाचा विस्तार केला की जिथे भाजपची ताकद कमी पडत होती. नड्डांच्या नेतृत्वात पक्षाने मजबूतीकरण केले हे महत्वाचे ठरले आहे.

    अनिकेत जोशी

    aniketsjoshi@hotmail.com