महानगरी वास्तवाचे भान शोधणारा संदर्भ ग्रंथ

गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या अशा चर्चासत्रांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करीत असते. त्यांच्या सहकार्याने चर्चासत्रे पार पडतात, पण बऱ्याचदा होते काय की या चर्चासत्रांमध्ये सादर झालेले शोधनिबंध पुस्तक रूपाने प्रकाशित होत नाहीत. संशोधकांना संदर्भ म्हणून हे निबंध दस्तावेजाच्या रूपाने प्रकाशित झाले तर उपयोगी पडतात.

    बी. ए. ला मराठी साहित्य हा विषय घेऊन अध्ययन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विषयांपेक्षा वैचारिक देवाण-घेवाण करण्याची मोठी संधी असते. त्या त्या महाविद्यालयांच्या मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या साहित्य विषयक जाणिवेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी व्याख्याने-चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येत असते. विविध महाविद्यालयांतील मराठी विषयाच्या प्राध्यापक अभ्यासकांना या चर्चासत्रात बोलावून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्या अभ्यासकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. साहित्यात विशेष रूची असणारे विद्यार्थी यात सहभागी होऊन स्वतःच्या वाङ्मय विषयक भूमिकेचा निश्चितच फायदा करून घेतात.

    गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या अशा चर्चासत्रांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करीत असते. त्यांच्या सहकार्याने चर्चासत्रे पार पडतात, पण बऱ्याचदा होते काय की या चर्चासत्रांमध्ये सादर झालेले शोधनिबंध पुस्तक रूपाने प्रकाशित होत नाहीत. संशोधकांना संदर्भ म्हणून हे निबंध दस्तावेजाच्या रूपाने प्रकाशित झाले तर उपयोगी पडतात. ‘महानगरीय वास्तव भारतीय कादंबऱ्यांसंदर्भात’ हा ग्रंथ म्हणजे अशाच एका राष्ट्रीय चर्चासत्राचा दस्तावेज आहे.

    माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या मराठी विभागाने ‘महानगरीय वास्तव आणि भारतीय कादंबरी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रातील शोधनिबंधाचे संपादन तेथील मराठी विभाग प्रमुख डॉ. सूर्यकांत आजगांवकर यांनी केले आहे. सतीश भावसार यांचे लक्षवेधक मुखपृष्ठ लाभलेल्या या ग्रंथात मराठी विषयांच्या संशोधक अभ्यासकांचे २४ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. २३४ पानांच्या या ग्रंथाचे संपादकांनी दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात ‘महानगरीय साहित्य संकल्पना विचार’ या बीज भाषणासह मराठी कादंबरीकारांच्या महानगरीय कादंबऱ्यांचा चिकित्सक अंगाने वेध घेणारे १९ शोधनिबंध आहेत. दुसऱ्या भागात अन्य भाषातील कादंबऱ्यांचा चिकित्सक वेध घेणारे शोधनिबंध समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘महानगरीय वास्तव’ या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस यांचे बीज भाषण.

    ‘महानगरीय वास्तव’ या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. पुष्पलता राजापुरे तापस यांचे बीज भाषण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून महानगरीय साहित्याचा संकल्पनेचा वेध घेताना नगर, शहर, महानगर या संज्ञा त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहेत. महानगरीय समुदाय हा बिगर शेती व्यवसायांमध्ये संधी उपलब्ध असल्याने स्थलांतरित झालेला समूह व स्थानिक रहिवासी मिळून बनलेला असतो. त्यामुळे यात आर्थिक भिन्नतेबरोबर सांस्कृतिक सामाजिक व भाषिक वैविध्य असते. महानगरातील नागरिक हे परस्पर परिचित व अपरिचित असतात; परंतु ग्रामीण भागापेक्षा महानगरात त्यांची ओळख त्यांच्या व्यवसायाधिष्टीत कर्तृत्वावरून ठरत असते, इत्यादी भेद अत्यंत सहजपणे तापसबाईंनी उलगडून दाखवले आहेत.

    साहित्याच्या विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची सर्वांगीण ओळख करून देण्यासाठी ज्याप्रमाणे दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी, लोकसाहित्य इत्यादी प्रवाहांमध्ये साहित्यकृती त्या त्या नामाभिदानाखाली अभ्यासक्रमात नेमल्या जातात, त्याप्रमाणे विद्यापीठांमधील मराठी विषयाच्या अभ्यास मंडळांनी तांत्रिक सोयीसाठी महानगरी साहित्य हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली. त्या साहित्यकृतीचा निर्देश महानगरी साहित्य’ अशी ढोबळ व्याख्यादेखील त्यांनी केली आहे. महानगरी साहित्य संकल्पनेचा हा विचार पटवून देताना डॉ. पुष्पलता राजापुरे तापस यांनी मराठी कादंबरी, कथा, कविता, नाटक इत्यादी प्रकारातील अनेक उदाहरणे दिली आहेत.

    ह. ना. आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीपासून त्यांनी सुरुवात केली आहे. विजय तापस यांचा ‘महानगरी संवेदनेचा लेखक; भाऊ उपाध्ये’, ‘अरुण साधूंच्या निवडक कादंबऱ्या आणि महानगरीय वास्तव’, डॉ. तानाजी गुरव, ‘ह मो मराठे यांच्या निवडक कादंबऱ्या, प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर; ‘स्त्री लिखित मराठी कादंबरी आणि महानगरीय संदर्भविश्व’ डॉ. शितल पावसकर, इत्यादी अभ्यासकांचे शोधनिबंध संशोधकांना नक्कीच वेगळी दृष्टी देणारे आहेत. या व्यतिरिक्त डॉ. शोभा मुखर्जी यांचा महानगरी कोलकाता, महानगरी जीवन वास्तव आणि कन्नड कादंबरी प्राध्यापक डॉ. शोभा नाईक यांचे शोधनिबंध त्या त्या भाषेतील महानगरी साहित्याचे भान सांगणारे आहेत शेवटी एकूणच काय डॉ. सूर्यकांत आजगावकर यांनी चर्चासत्रात वाचलेले शोधनिबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करून मराठी साहित्याचे विद्यार्थी, अभ्यासक संशोधक यांना वेगवेगळ्या महानगरातील वास्तव तिथल्या जीवन जाणिवा तिथल्या संवेदना यांचे भान देण्याचा प्रयत्न केला आहे त्या दृष्टीने हा ग्रंथ संग्राह्य आहे.

    प्रा. रघुनाथ शेटकर

    raghunathshetkar0@gmail.com

    महानगरी वास्तव भारतीय कादंबऱ्या संदर्भात
    संपादक डॉ. सूर्यकांत आजगावकर, प्रकाश प्राचार्य
    प्रकाशक : डॉक्टर किरण माणगावकर. प्राचार्य गुरुनानक खालसा महाविद्यालय माटुंगा आणि ललित पब्लिकेशन
    मुंबई मुखपृष्ठ : सतीश भावसार
    मूल्य : तीनशे रुपये