कोर्टावरून कोर्टामध्ये बोरीस बेकरची भरकटलेली कारकीर्द

एकेकाळचा टेनिस (Tennis) जगाचा राजकुमार, ६ ग्रँड स्लॅम (Grand Slam) आणि अन्य असंख्य चॅम्पियनशिप नावावर असलेला जर्मन खेळाडू बोरीस बेकर (Boris Becker) आज जेलमध्ये (Prison) आहे. आतापर्यंत अनेकदा वादात अडकलेल्या बेकरवर ही वेळ का आली? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चुकत गेलेले निर्णय, अतिआत्मविश्वास, स्वतःमध्येच मग्न असण्याची सेलिब्रेटी (Celebrity) खोड हे यामागचं कारण आहे की आणखी काही?

  साधारणतः ८०-९०च्या दशकात भारतात टीव्हीचा चांगला फैलाव झाला. साधारणतः २-३ घरांमागे एक टीव्ही असायला लागला. अर्थात तेव्हा दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. दूरदर्शनने विम्बल्डनची सेमीफायनल आणि फायनल दाखवायला सुरूवात केली होती. त्यामुळे एका अर्थी त्या काळात भारतीयांना खऱ्या अर्थाने टेनिसची ओळख झाली. त्यावेळी दोन जर्मन टेनिसपटू भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय होते. एक म्हणजे टेनिस ब्युटी स्टेफी ग्राफ आणि दुसरा बोरीस बेकर. टेनिसमधले फार काही न कळणाऱ्यांना पण बेकरचा गेम आवडायचा. अत्यंत आक्रमक सर्व्हिस, नजाकतभरा वॉली शॉट हे बघायला मस्त वाटायचे. हाच टेनिसचा राजकुमार वॉकर घेऊन आपल्या वकिलांसह लंडनच्या कोर्टात आला, तेव्हा त्याच्या लाखो चाहत्यांच्या पोटात नक्की गलबलले असेल. त्याच्यावर ही वेळ आलीये ती दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर मालमत्ता दडवल्यामुळे…

  दिवाळखोरी ते तुरुंगवास

  बोरीस बेकरने २१ जून २०१७ रोजी दिवाळखोरी जाहीर केली. एका खासगी बँकेचे १४ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मुदतीत न फेडू शकल्याने त्याला हे पाऊल उचलावे लागले. त्यानंतर २ वर्ष लंडनच्या कोर्टामध्ये त्याच्या दिवाळखोरीचा खटला सुरू होता. तोपर्यंत बेकर खरोखर किती मोठ्या आर्थिक संकटात अडकलाय, याची त्याच्या चाहत्यांना फारशी कल्पना नव्हती. पण हे केवळ हिमनगाचे टोक होते हे २०१९च्या मे महिन्यात समोर आले. बेकरने जिंकलेली चषके आणि पदके लिलावात काढण्याची नोटीस कर्जदारांनी त्याच्या तोंडावर मारली. त्याच वर्षी जूनमध्ये बेकरला आपल्या संग्रहातील तब्बल ८२ दुर्मिळ वस्तूंचा लिलाव करावा लागल्याची चर्चा आहे. यात गोल्डन कॅमेरा ॲवॉर्ड आणि १९८९ च्या अमेरिकन ओपनची ट्रॉफीही होती म्हणे… त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याच्या बँक्रप्सी रिस्ट्रिक्शन्सला २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तोपर्यंत त्याला कर्जमुक्त होता आलेही असते, पण त्याने केलेली बनवाबनवी त्याच्या अंगाशी आली.

  मालमत्ता लपवल्याचा ठपका

  त्याने जेव्हा दिवाळखोरी जाहीर केली आणि कर्ज फेडू शकत नाही, असे कर्जदारांना सांगितले, तेव्हा त्याने आपल्या सर्व मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक होते. त्यांचा लिलाव करून आपले काही कर्ज फेडून घेण्याचा अधिकार कायद्याने कर्जदारांना होता. मात्र बेकरने इथे बनवाबनवी केली आणि ते उघड झाले. २१ मार्च २०२२ रोजी त्याने आपल्या काही मालमत्ता दडवल्या तसेच काही ट्रॉफीज लिलावासाठी दिल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. लंडनच्या साऊथवॉर्क क्राऊन कोर्टात त्याच्यावर खटला सुरू झाला. यामध्ये ४ कलमांखाली बेकरला दोषी ठरवण्यात आले आहे. एका टेक फर्ममधील साधारणतः ७ लाख पाऊंडांचे शेअर्स, जर्मनीतील मूळ गावी मालमत्तेत असलेला वाटा, मियामीमधील एक घर आणि महत्त्वाचे म्हणजे २ विम्बल्डन चषकांसह त्याची काही अत्यंत मौल्यवान टेनिस पदके त्याने जाहीर केली नसल्याचे सिद्ध झाले. कोर्टाने त्याला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. अत्यंत उज्वल अशी कारकीर्द आणि त्यानंतरही कोच म्हणून किंवा कॉमेंटेटर सेटल झालेल्या बेकरवर ही वेळ यावी, याचे त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे आणि दुःखही…

  प्रिन्स ऑफ टेनिस

  अवघ्या १७ वर्षांच्या एका जर्मन पोरानं १९८५ साली विम्बल्डनमध्ये केविन कुरनचा ३-१ सेटने पराभव केला तेव्हा टेनिसच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयाला आला. फास्ट आणि अचूक सर्व्हिसमुळे त्याला अनेक टोपणनावे मिळासी. बूम बूम, देर बॉम्बर, बॅरोन फॉन स्लॅम अशी नावे त्याच्या चाहत्यांनी दिली. त्याआधी १९७४ पासूनच जर्मनीसह जगभरात त्याने अनेक टेनिस पदके पटकावली होती. ८५च्या विम्बल्डननंतर त्याने ६ ग्रँडस्लॅम जिंकल्या. ३ विम्बल्डन, २ ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक अमेरिकन ओपन चॅम्पियनशिप त्याच्या नावावर आहेत. विम्बल्डनच्या ७ फायनल्समध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्याने १४ देशांमध्ये सिंगल्स टायटल्स जिंकली आहेत. २००३ साली ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये त्याचा समावेश झाला. अर्थातच त्यावेळी बोरीस बेकर हा प्रिन्स ऑफ टेनिस होता आणि एखाद्या राजकुमाराला साजेसेच त्याचे उत्पन्न आणि राहणीमान होते. टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याने आपली कारकीर्द उंचावत ठेवली होती.

  कॉमेंट्री आणि कोचिंग

  मुळातच फास्ट गेम असलेल्या बेकरला क्ले कोर्टसारख्या स्लो सर्फेसवर फारसे यश मिळाले नाही. त्याची ही कसर भरून काढली त्याच्या शिष्याने… नोवाक जोकोविचने. बेकर २०१३ ते २०१६ या काळात जोकोविचचा मुख्य प्रशिक्षक होता. याच काळात जोकोविचने क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपनसह अनेक ग्रँडस्लॅम आणि अन्य स्पर्धा जिंकल्या. पुढे १९९९ साली निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने क्रीडा उद्योजक, समालोचन आणि प्रशिक्षक म्हणून चांगले काम केले आहे. बेकर २००० सालापासून व्होल्क इंडस्ट्रीज या टेनिस रॅकेट आणि साहित्य बनवणाऱ्या कंपनीचा मालक होता. २००२ पासून (जोकोविचचा प्रशिक्षक कालावधी सोडून) तो विम्बल्डनमध्ये कॉमेंटेटर म्हणून बीबीसीच्या पे रोलवर होता. एकूण सगळे चांगले चालले असताना काही चुकलेले निर्णय आणि सवयी यामुळे त्याच्यावर दिवाळखोरीची पाळी आली.

  लफडी, घटस्फोट आणि लाईफस्टाईल

  बेकरची १९८८ ते १९९२ या काळात त्याची २ प्रेम प्रकरणे झाली. त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या बार्बरा फेल्टूस हिच्यासोबत (ती ८ महिन्यांची गरोदर असताना) १७ डिसेंबर १९९३ रोजी त्याचा विवाह झाला. जानेवारी १९९४मध्ये नोहा गॅब्रिएल या बेकरच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला. सप्टेंबर ९९मध्ये एलियास बाल्थाझार हा दुसरा मुलगा या जोडप्याला झाला. २००० साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि बेकरच्या संपत्तीमधला मोठा वाटा पोटगी म्हणून आणि मुलांच्या संगोपनासाठी त्याला द्यावा लागला. उत्पन्न सुरू असले तरी बेकरला हा भार मोठा होता. शिवाय त्यांची उंची लाईफस्टाईल, महागड्या वस्तू वापरण्याची हौस यावर त्याने अमाप पैसा वाया घालवला. त्यामुळे शेवटी कर्जदारांपासून तोंड लपवण्याची आणि अखेरीस दिवाळखोरी जाहीर करण्याची पाळी त्याच्यावर आली. बेकरचा अतिआक्रमक स्वभावही त्याला नडल्याचे बोलले जाते.

  मुळातच कोणत्याही मैदानी खेळाडूचे करिअर छोटे असते. लहान वयात आणि अल्पकाळात मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा डोक्यात जाऊ देऊ नये आणि करिअरनंतरच्या मार्गांचे, लाईफस्टाईलचे प्लॅनिंग केले पाहिजे याचे उदाहरण बेकरने घालून दिले आहे. टेनिसच्या कोर्टात सुरू झालेली एका तरुणाची दैदिप्यमान कारकीर्द आता लंडनच्या एका कोर्टात शिक्षा ठोठावण्याच्या वळणापर्यंत येऊन पोहोचली आहे.

  ज्यांचा टेनिसशी फारसा परियच नाही, अशा भारतीयांनाही सियारामच्या जाहिरातीमध्ये सानिया मिर्झासह झळकलेला बोरीस बेकर नक्की आठवत असेल. आता लंडनच्या जेलमध्ये अडीच वर्ष काढल्यानंतर अधिक खंगलेला, खचलेला बेकर बाहेर येतो की दोन सेट हारल्यानंतर नव्या दमाने कोर्टात उतरून पुढल्या तिन्ही सेटसह मॅच खिशात घालणारा बेकर आपल्याला दिसतो, याचे उत्तर काळच देईल. पण बेकरचे हे उदाहरण अनेक खेळाडूंना सावध करणारे निश्चित आहे.

  sportswriterap@gmail.com