समुपदेशन : संधी नामी पण तयारी हवी

‘तू मोठेपणी कोण होणार?’ असं लहान मुलांना विचारलं की ‘डॉक्टर, इंजिनीअर, वैमानिक, क्रिकेटपटू, शास्त्रज्ञ, शिक्षक/शिक्षिका किंवा अभिनेता/अभिनेत्री होणार’ अशी ठरलेली उत्तरं मिळायची. पण ही उत्तरं आता ‘मी युट्युबर’ होणार’ यात बदलली आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत तर वय वर्ष ७ ते १८ या वयोगटातील बहुतेक मुलांनी ठरवूनच टाकलंय की त्यांना बाकी काही नाही तर फक्त आणि फक्त ‘युट्यूबर’च व्हायचंय. यासाठी पालकांचा सहभाग, योग्य मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनतीची तयारी करावी लागेल.

  युट्यूबवर व्हिडिओ बघण्यात ‘मास्टरकी’ मिळवलेल्या या मुलांना आपलंही युट्यूब चॅनेल असावं असं वाटणं साहजिक आहे. युट्यूबवरच्या व्हिडिओबद्दल प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहेच. पण मग त्यासाठी नक्की काय करावं लागतं हेही त्यांना माहित असायला हवं. विशेष म्हणजे इथे पालकांचा सहभाग अपेक्षित आहे.’त्याला/तिला त्यातलं सगळं कळतं’ असं सांगून पालकांनी या विषयाकडे दुर्लक्ष करू नये. कारण हा जरी मनोरंजनाचा भाग असला तरी गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. सोशल मीडियाची विविध माध्यमं मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने वापरत आहेत. बरीच लहान मुलं युट्यूबर बनली आहेत. पॉडकास्टसुद्धा मुलं चांगल्या प्रकारे वापरत आहेत. म्हणजे मुलांना तंत्रज्ञान अवगत आहे पण गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि पालकांच्या सहभागाची.

  सायबर तज्ज्ञ उन्मेष जोशी सांगतात, “मुलं जर १३ वर्षांखालील वयोगटातील असतील तर त्यांच्यासाठी ‘युट्यूब किड्स’ आहेच. पण जर मुलांना युट्यूबवर स्वतःचं काहीतरी अपलोड करायचं असेल परंतु त्यांचं वय तेरा वर्षांपेक्षा कमी असेल तर इथे पालकांचा सहभाग गरजेचा आहे. जर मुलांना खरचं स्वारस्य असेल तर पालकांनी मुलांच्या नावाने अकाऊंट सुरू करावं मात्र तपशील स्वतःचा द्यावा. मुलांमध्ये काही कला-गुण असतील किंवा त्यांना एखादी गोष्ट या समाज माध्यमांवर मांडावीशी वाटत असेल किंवा त्यांच्याकडे एखादा आर्टचा प्रकार असेल किंवा सादरीकरण प्रकारातील एखादी कला येत असेल, ते स्वतः शुटींग करू शकत असतील तर स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू शकतात. त्यासाठी एक चांगला ॲन्ड्रॉइड फोन, बँडविड्थ, कामात सातत्य आणि जबाबदारी घेण्याची तयारी या गोष्टी लागतात.”

  ‘आपलं युट्यूब चॅनल असावं’ असं वाटून ते सुरू करणं इथपर्यंतचा मार्ग सोपा आहे पण त्यात सातत्य राखणं, दरवेळी नवीन काहीतरी देणं हे अवघड आहे. युट्यूब चॅनल सुरू केल्यावर मुलांना लगेच खूप व्ह्यूज मिळतील असं नाही. त्यासाठी संयम हवा आणि कामात सातत्य हवं. मात्र १३-१४ वर्षांच्या मुलांमध्ये एवढी समज असेलंच असं नाही आणि म्हणूनच पालकांचा सक्रीय सहभाग हवा आहे. मुलं तेरा वर्षांच्या आतील असतील तर पालकांनी त्यांच्या चॅनलची जबाबदारी घ्यावी. आता, तेरा वर्षांवरची जी मुलं आहेत ती त्यांचं अकाऊंट स्वतंत्रपणे तयार करून व्हिडिओ अपलोड करतात. परंतु त्याला/तिला सगळं कळतंय असं समजून पालकांनी दुर्लक्ष करू नये. लक्ष असायला हवं कारण काही धोके मुलांच्या लक्षात येत नाहीत. म्हणून पालकांचा सहभाग आवश्यक आहे, असं सायबर तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत.

  माझ्या पाहण्यात अशी अनेक मुलं आहेत ज्यांची युट्यूब चॅनेल्स आहेत. १३ ते १८ वयोगटातील मुलींनी नेल आर्ट पासून ते वेगवेगळ्या कुकरी शोजपर्यंत अनेक विषयांवर स्वतःची चॅनेल्स सुरु केली आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वेगवेगळ्या खेळांबद्दल मुलांची चॅनेल्स आहेत, बुद्धिबळ खेळाची चॅनेल्स आहेत. ऑनलाईन गेमिंगची चॅनेल्स तर मुलं सुरू करतातच पण तसं करण्यापेक्षा इतरांना आपण काही चांगली माहिती देऊ शकतो का, हे पाहावं किंवा आपल्या कला लोकांसमोर मांडाव्याशा वाटत असतील तर युट्यूबचा वापर करायला हरकत नाही, असं उन्मेष जोशी म्हणाले.

  आपल्या व्हिडिओमुळे कुणी दुखावलं जाणार नाही ना, कुणाचा अपमान होत नाहीये ना या सगळ्याचा विचार मुलांनी करायला हवा किंबहुना पालकांनी या गोष्टीची जाणीव त्यांना करून द्यावी. तुम्ही जे चॅनेल आपण सुरू करणार असाल, त्या चॅनेलच्या माध्यमातून नक्की काय मांडणार आहात, तो कंटेंट मुलांसाठीचा आहे की नाही, (हा प्रश्न यूट्यूबकडून विचारला जातो) या सगळ्या गोष्टींची माहिती डिस्क्रीप्शनमध्ये देणं आवश्यक आहे. बरेचदा एखाद्या प्रसिद्ध युट्युबरला मिळणारे व्ह्यूज, त्याच्या फॉलोअर्सची संख्या, त्याची प्रसिद्धी पाहून मुलं हुरळून जातात आणि आपणही हेच करायचं असं ठरवून टाकतात. पण त्यापूर्वी पालकांची संमती, त्यांचा सहभाग व योग्य नियोजन करावं लागेल. इतर विषयांप्रमाणे यातही सातत्य, मेहनत आणि सादरीकरण महत्त्वाचं आहे, हे आपण पाहिलंच! आपल्याला व्ह्यूज किती मिळतील, त्यातून आर्थिक कमाई होईल का, हा बराच पुढचा मुद्दा आहे. मात्र सुरुवातीला आपण कशाप्रकारे आपलं म्हणणं किंवा कला मांडू शकतो हे ठरवावं लागेल. त्यावर फोकस करणं, त्याबाबत मार्गदर्शन घ्यावं लागेल. युट्यूबकडूनही प्रशिक्षणाचे वेगवेगळे पर्याय सुचवले जातात. ज्यायोगे आपल्याला जे काही जगाच्या समोर मांडायचं आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो.

  पालकांचा सहभाग आणि संमती ही केवळ चॅनेल सुरू करण्यापुरती नव्हे तर पुढेही लागेल. कारण या माध्यमावर सगळंच आलबेल असतं असं नाही. इथे प्रायव्हसी सेटिंग व्यवस्थितपणे सेट करावं लागेल. तुमच्या व्हिडिओवर कुणी काही कमेंट केली किंवा कुणी ट्रोल करायचा किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर अशावेळी घाबरून न जाता पालकांबरोबर बोला. त्यामुळेच पालकांचा सहभाग हा कायम लागणार आहे कारण मुलांनी त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनेल जरी सुरू करण्यापर्यंत मजल मारली तरी बाहेरच्या जगात वावरण्याच्या दृष्टीने त्यांचं वय अजून लहान आहे. मुलांनीही ‘पालकांना काय कळतयं त्यात?’ असा विचार न करता त्यांची मदत घ्यावी. मुळात या विषयाची, त्यातील चांगल्या-वाईट बाजू, त्यातील खाचाखोचा याची सगळी माहिती आधीजमा करावी लागेल. आक्षेपार्ह कंटेंट वगळणे, युट्यूबकडे त्याची तक्रार नोंदवणं या प्रक्रिया माहित करून घ्याव्या लागतील. लहान वयात हे कौशल्य विकसित झाल्याने याचा फायदा पुढील आयुष्यातही होतो, हे अनेकांनी दाखवून दिलं आहे. मात्र त्यासाठी खूप मोठी पूर्वतयारी करावी लागेल.

  युट्यूबवर मुलांनी मुलांसाठी खूप चांगला शैक्षणिक कंटेंट निर्माण केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. मोठ्या वर्गातील मुलांना, खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी देण्यासाठी या माध्यमांचा शाळांनी वापर केल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. हे प्लॅटफॉर्म्स संधी देणारे आहेत फक्त आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो का, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे…अर्थात पालकांच्या संमतीने.

  मनीषा नित्सुरे-जोशी

  manisha.nitsure@gmail.com