career in indian meritime nrvb

समुद्रीय क्षेत्राला २०३० पर्यंत अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी एक विस्तृत आराखडा भारत सरकारने तयार केला आहे. पुढील दशकात भारत या क्षेत्रातील महाशक्ती म्हणून विकसित व्हावी, हे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, या क्षेत्रात कॅप्टन, अभियंते, जहाज बांधणीकार, डिझायनर, बंदरे व्यवस्थापक, मालपुरवठा तज्ज्ञ अशा सारख्या असंख्य संधी महत्वाकांक्षी तरुणांना उपलब्ध होवू शकतात.

    भारताला ७५०० किलोमीटरचा समृध्द किनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर १२ मुख्य बंदरे आहेत आणि २५० हून अधिक इतर बंदरे आहेत. भारतातील जलवाहतुकीची साखळी अतिशय व्यापक अशी आहे. देशाच्या अर्थविकासात या घटकाचा मोठा वाटा आहे. देशातील ९५ टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. एकूण व्यापाऱ्याच्या ६५ टक्के व्यापार हा या मार्गाने होतो.

    सागरी व्यापार आणि वाहतुकीस निळ्या अर्थकारणाची उपमा दिली जाते. २०२० साली निती आयोगाने, या निळया अर्थकारणाला अधिक गती देण्यासाठी समुद्रीय संसाधानाचा अधिकाधिक वापर करण्याचे निर्धारित केले. निळया अर्थकारणास गती मिळाल्यावर विकासाचा पुढचा टप्पा गाठता येणे शक्य असल्याचे आयोगाने निदर्शनास आणले.

    त्याशिवाय नव्या प्रकारच्या रोजगार आणि स्वयंरोजगार संधीही निर्माण होऊ शकतात. या निळया अर्थकारणात खाजगी क्षेत्र आणि किनाऱ्यावर वास्तव्यास असणारे समुदाय यांचा सहभाग घेतला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, साहित्य आणि उपकरणे यांच्या सहाय्याने सागरीय व्यवस्थापन, किनारा आणि सागरीय क्षेत्राचा शास्वत वापर केला जाणार. त्याशिवाय सागरीय क्षेत्रातील संसाधानांच्या वापराची प्राथमिकताही निश्चित केली जाईल.

    आपल्या देशाच्या समुद्रीय घटकाने सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. जहाज बांधणीत भारताचा जगात २१ वा क्रमांक लागतो. याक्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्यात जगात ५ वा क्रमांक लागतो. समुद्रीय क्षेत्राला २०३० पर्यंत अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी एक विस्तृत आराखडा भारत सरकारने तयार केला आहे.

    पुढील दशकात भारत या क्षेत्रातील महाशक्ती म्हणून विकसित व्हावी, हे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, या क्षेत्रात कॅप्टन, अभियंते, जहाज बांधणीकार, डिझायनर, बंदरे व्यवस्थापक, मालपुरवठा तज्ज्ञ अशा सारख्या असंख्य संधी महत्वाकांक्षी तरुणांना उपलब्ध होवू शकतात.

    ज्या तरुणांकडे कठोर परीश्रम करण्याची तयारी असेल आणि सागरावरील साहस गाजवण्याची महत्वाकांक्षा असेल त्यांच्यासाठी हे क्षेत्र अमाप संधी उपलब्ध करुन देते. अशा संधीचे प्रवेश इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मिळू शकते.

    इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी

    इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी(आयएमयू)चे देशातील सहा ठिकाणी कॅम्पस आहेत. त्याशिवाय अनेक खाजगी संस्था या विद्यापीठाला संलग्न झाल्या आहेत. आयएमयू या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळेच संस्थेचे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट मिळाली आहे.

    या युनिव्हर्सिटीची स्थापना २००८ साली भारत सरकारने केली. पुढील सहा ठिकाणी कॅम्पसेस आहेत (१)आयएमयू नवी मुंबई (२)आयएमयू मुंबई पोर्ट (३)आयएमयू कोलकता (४)आयएमयू चेन्नई (५)आयएमयू विशाखापट्टणम (६)आयएमयू कोची. याशिवाय देशभरातील १७ संस्था या विद्यापीठास संलग्नित आहेत.

    या विद्यापीठाच्या वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट (आयएमयू-सीइटी) घेतली जाते. डायरक्टर जनरल शिपिंगमार्फत नियंत्रित करण्यात येत असलेल्या सर्व संस्थांना आयएमयू – सीइटीच्या गुणांच्या आधारावरच प्रवेश देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बीएस्सी-नॉटिकल सायन्स, बीई/ बीटेक-मरिन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे आवश्यक आहे.

    संस्थेतील अभ्यासक्रम

    बी.टेक इन मरीन इंजिनीअरिंग. हा निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम चेन्नई, कोलकता आणि मुंबई बंदर कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- १२ वीमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात सरासरीने ६० टक्के गुण आवश्यक. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजित ५० टक्के गुण आवश्यक. फक्त अविवाहित उमेदवारच अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. वयोमर्यादा (अ) मुले- २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग – ३० वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी – २८ वर्षे. (ब) मुली – २७ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ३२ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-३० वर्षे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे सर्व उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
    या अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि मरिन इंजिनीअरिंगचे सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान प्रदान केले जाते. याद्वारे व्यापारी जहाजाच्या यंत्रसामुग्रीची हाताळणी, देखभाल आणि दुरुस्ती करणे सुलभ जाते. जहाजाची यंत्रसामग्री, इंजिन यांची देखभाल दुरुस्ती करणे, जहाजाचे सुरळित कार्यान्वयन करणे, अशासारखी कामे मरिन इंजिनीअरला करावी लागतात.

    करिअर संधी

    हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवाराचे करिअर, मर्चंट किंवा व्यापारी जहाजावर ज्युनिअर इंजिनीअर म्हणून सुरु होते. या जहाजावर विशिष्ट कालावधी घालवल्यानंतर आणि डायरोक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग, यांच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर हा अभियंता, जहाजाचा मुख्य अभियंता बनण्यासाठी पात्र ठरतो.

    प्रशिक्षणार्थी अभियंत्याला प्रारंभी ३५ ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान वेतन मिळते. त्यानंतर सहा महिन्याचा प्रत्यक्ष जहाजावरील अनुभव आणि जहाजावरील अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला चौथा किंवा तिसरा अभियंता म्हणून काम करावे लागते. यावेळी त्याला दरमहा दीड लाख ते दोन लाख रुपयांचे वेतन मिळू शकते. यानंतर १२ महिन्यांचे प्रत्यक्ष जहाजावरील कार्य आणि काही अभ्यासक्रम व अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर दुसरा अभियंता म्हणून पदोन्नती मिळू शकते.

    यावेळी त्याला दरमहा चार ते पाच लाख रुपयांचे वेतन मिळते. यानंतर १८ महिन्यांचे प्रत्यक्ष जहाजावरील कार्य आणि काही अभ्यासक्रम व अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती मिळू शकते. यावेळी त्याला दरमहा सहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांपेक्षा अधिक वेतन मिळते.

    काय शिकाल?

    या अभ्यासक्रमात ढोबळमानाने पुढील विषय घटकांचा समावेश असतो- (१) ऑफिसर लाइक क्वालिटिज, (२) ॲप्लाइड मेकॅनिक्स, (३)ॲप्लाइड थर्मोडायनॅमिक्स, (४) वर्कशॉप टेक्नॉलॉजी, (५) ॲप्लाइड इलेक्ट्रिसिटी ॲण्ड इलेक्ट्रिकल मेझरमेंट्स, (६) इंजिनीअरिंग मेकॅनिक्स, (७) मॅथेमॅटिक्स, (८) कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, (९)इलेक्ट्रॉनिक्स, (१०) मटेरिअल्स सायन्स, (११) इलेक्ट्रिकल मशिन्स, (१२) जिओमेट्रिकल ॲण्ड इंजिनिअरिंग ड्राईंग, (१३) ॲप्लाइड थर्मोडायनॅमिक्स, (१४) थिअरी ऑफ मशिन, (१५) स्ट्रेन्ग्थ ऑफ मटेरिअल्स, (१६) इलेक्ट्रिकल मशिन्स, (१७) मशिन ॲण्ड मरिन ड्राईंग, (१८) शिप कन्स्ट्रक्शन, (१९) फ्ल्युइड मेकॅनिक्स, (२०) मरिन ऑक्झिलरी मशिन, (२१) मरिन इंटरनल कम्बशन इंजिन, (२२) एलिमेंट्री डिझाइन, (२३) शिप स्टॅबिलिटी, (२४) मरिन ऑक्झिलरी मशिन, (२५) मरिन बॉयलर ॲण्ड स्टिम, (२६) मरिन मशिन ॲण्ड सिस्टिम डिझाइन, (२७) मरिन इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, (२८) शिप फायर प्रिव्हेंशन, (२९) कमर्शिअल जिओग्रॅफी, (३०) मरिन कंट्रोल इंजिनीअरिंग ॲण्ड ऑटोमेशन, (३१) सिमॅनशीप, (३२) मेंंटेनन्स, रिपेअर ऑफ मशिनरीज, (३३) टँकर ऑपरेशन्स, (३४) इंजिन रुम रिसोर्स मॅनेजमेंट ॲण्ड लिडरशीप. (पूर्वार्ध)

    सुरेश वांदिले

    ekank@hotmail.cpom