करिअर : ‘पंचकर्म’ तंत्रकौशल्य आणि संधी

शरीरातील अनावश्यक कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राद्वारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. पंचकर्म हे आयुर्वेदातील एक महत्वाची उपचार पध्दती समजली जाते.

    सध्याच्या काळात धावपळीमध्ये विविध ताणतणाव आणि जीवनशैलीशी निगडित शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म तंत्राकडे बघितलं जातं. ही बाब लक्षात आल्यानं देश-विदेशात पंचकर्म प्रक्रिया करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचा ओढा वाढत चालल्याचे दिसून येतं.

    त्यामुळे पुढील काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे (हेल्थ रिसॉर्ट), वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.

    हे पंचकर्म पाच पध्दतीचे असल्याने त्याला पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे पध्दती किंवा प्रकिया असं संबोधलं जातं. शरीरास वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ नये म्हणून या उपचार पध्दतीत, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींचा समावेश केला जातो.

    पंचकर्माद्वारे शरीरातील अनावश्यक कचरा, निर्माण झालेले विषारी घटक आणि द्रव्ये बाहेर काढण्यात येत असल्याने शरीरातील अनेक अवयव पुन्हा कार्यक्षमतेनं कार्य करु लागतात. पंचकर्म करणाऱ्या तज्ज्ञ आणि सहाय्यकांची मागणीही वाढत आहे.

    भारतात आणि परदेशतातही पंचकर्म सहाय्यकांची अतिशय कमतरता असल्याचं निदर्शनास आलं आहे. हे सहाय्यक पंचकर्म तज्ज्ञांना विविध उपचार आणि क्रियांसाठी मदत करतात. ही बाब लक्षात घेऊन सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स या स्वायत्त संस्थेने पंचकर्म टेक्निशियनचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

    ही संस्था केंद्रीय आयुर्वेद, योग, नेचरोपथी, युनानी, सिध्द आणि होमिओपथी (आयुष) अंतर्गत कार्यरत आहे. पंचकर्म सहाय्यकांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंचकर्म सहाय्यक प्रमाणपत्र प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण पंचकर्मातील चार सेवा पुरवणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा पध्दतीने तयार करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशकांचा उपयोग करण्यात आला आहे.

    हे प्रशिक्षण राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा कौशल्य परिषदेशी संलग्नित आहे. या पूर्णकालीन प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. या प्रशिक्षणाचं माध्यम इंग्रजी आणि हिंदी आहे. या प्रशिक्षणास २७ ऑक्टोबर २०२२ पासून प्रारंभ होत आहे.

    अर्हता- या प्रशिक्षणास कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास प्रवेश मिळू शकतो. संबंधित उमेदवाराचं वय किमान १८ वर्षे असावं.

    निवड प्रक्रिया

    या प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, बारावित मिळालेल्या गुणांवर आधारित संवर्ग निहाय (अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी इत्यादी) उमेदवारांची यादी तयार केली जाते.
    हे प्रशिक्षण, सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट- नवी दिल्ली (१० जागा), नॅशनल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर पंचकर्म- चेरुथिरुती (३० जागा), सेंट्रल आयुर्वेद रिसर्च सेंटर- गोहाटी (१० जागा), रिजनल आयुर्वेद रिसर्च सेंटर-जम्मू (१५ जागा) या केंद्रांवर चालवलं जातं. यातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.

    या प्रशिक्षणाचं शुल्क ३० हजार रुपये असून ते प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात देता येतं. हे प्रशिक्षण संस्थेचे नियमित अध्यापक, पंचकर्म, कायाचिकित्सा आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि या क्षेत्रातील नामांकित खाजगी तज्ज्ञांकडून दिलं जातं. शेवटच्या तीन महिन्यात देशातील इतर पंचकर्म केंद्रामध्ये पंचकर्माच्या प्रात्यक्षिकाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

    हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पंचकर्म तंत्रज्ञ, पंचक्रम सहाय्यक, मसाजर म्हणून रोजगाराच्या अनेक संधी देश-विदेशातील आयुर्वेदिक संस्था, रुग्णालयात मिळू शकतात.

    या प्रशिक्षासाठीचा अर्ज http://ccras.nic.in/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतो. संपर्क- जवाहरलाल नेहरु भारतीय चिकित्सा एवम होमिओपॅथी अनुसंधान भवन, नंबर-६१-६५, इन्स्टिट्यूशनल एरिया, अपोजिट डी ब्लॉक, जनकपुरी, नवी दिल्ली-११००५८, दूरध्वनी- ०११-२८५२५८६२

    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद

    या संस्थेमार्फतही एक वर्षं कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म, चालविला जातो. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो.

    कौशल्य निर्मितीचे इतर अभ्यासक्रम

    (१) सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद, अर्हता– कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण. कालावधी- १० दिवस. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमामध्ये शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातील तंत्राचा वापर करण्याचे ज्ञान प्रदान केले जाते. उदा- सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक जीवनशैली, आहार आणि पोषण मूल्यांचे ज्ञान, विविध मुख लेप (फेस पॅक) निर्मितीचे तंत्र, मुखअभ्यंग (फेस मसाज) आणि मुखलेपनम (फेस लेप), आयुर्वेद पध्दतीने दंत-डोळे-ओठांची काळजी, हस्तपाद प्रसाधनम (आयुर्वेदिक मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर), केशआयुर्वेदाची संकल्पना- केसांचे प्रकार, वाढ आणि आरोग्यदायी केसांसाठी आहार, केशप्रकाशलनविधी– आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करुन केस धुण्याचे तंत्र, केसगळती थांबवण्याचे आयुर्वेदिक तंत्र आणि व्यवस्थापन, आयुर्वेदिक हेअर स्पा, आयुर्वेदिक हेअर डाय, हेअर पॅक, शिरोलेपम, शिरोअभ्यंगम, इत्यादी. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदीमध्ये शिकवला जातो.

    (२) सर्टिफिकेट कोर्स ऑन स्टँडर्डायझेशन ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लँट मटेरिअल- आयुर्वेद औषधींसाठी उपयोगात येणाऱ्या औषधीजन्य वनस्पती आणि त्याच्या गुणवत्ता नियंत्रणाचे या अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जाते. औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींच्या शोधाचे तंत्र आणि त्यासाठीची आयुधे, जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशा निर्देशानुसार आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे विशेषीकरण/ मानकीकरणाच्या (स्टँडर्डायझेशन) कार्यपध्दती, गुणवत्तेची हमी, प्रयोगशाळेतील अहवाल नियंत्रण, विश्लोषणात्मक आकडेमोड, मानकीकरणासाठीचे परीक्षण इत्यादी. आयुर्वेद औषधी निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा अभ्याक्रम उपयुक्त ठरु शकतो. कालावधी- एक महिना. अर्हता- बी.एस्सी, बी.फार्म, डी.फार्म, बीएएमएस.

    संपर्क – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरवार सिंग गेट, अमर रोड जयपूर -३०२००२, दूरध्वनी – ०१४१- २६३५८१६, संकेतस्थळ-nia.in, ईमेल- nic.innia_rj@nic.in

    सुरेश वांदिले

    ekank@hotmail.com