करिअर : प्रोबेशनरी ऑफिसरची मेगाभरती

सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच राष्ट्रियकृत बँकामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर हा अत्यंत महत्वाचा घटक समजला जातो. या पदावर नियुक्त तरुण-तरुणींना पुढील तीन- चार वर्षात बँकांच्या विविध कामांची महत्वाची जबाबदारी सोपवली जाते. या उमेदवारांना कालबध्द पदोन्नती मिळतेच पण त्यांनी अंतर्गत परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि कार्यक्षमता सिध्द केल्यास गतिने पदोन्नती दिली जाते. अनेक प्रोबेशनरी ऑफिसर हे बँकाच्या अतिवरिष्ट पदी पोहचले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून लागलेल्या श्रीमती अरुंधती रॉय या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षसुध्दा झाल्या.

    आपल्या देशात स्टेट बँक ऑफ इंडिया स्वत:साठी प्रोबेशनरी ऑफिसरची निवड परीक्षा घेते. तर सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँक पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेमार्फत सामान्य निवड प्रकिया (कॉमन रिक्र्युटमेंट प्रोसेस) राबवण्यात येते.

    २०२३-२४ या कालावधीसाठी ही प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेद्वारे बँकांमध्ये ६९३२ पेक्षा अधिक प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदाची मेगाभरती केली जाईल. अर्ज भरण्याचे पोर्टल २ ऑगस्ट २०२२ पासून सुरु झाले असून २२ ऑगस्ट २०२२ ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

    निवड प्रक्रिया

    या पदांच्या निवडीसाठी दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाईल. प्राथमिक आणि मुख्य परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत निवडले गेलेले उमेदवारच मुख्य परीक्षेसाठी बसू शकतात. मुख्य परीक्षेव्दारे उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. २०२३-२०२४ मध्ये बँकांच्या गरजेनुसार उमदेवारांना नियुक्ती दिली जाईल.

    एकूण ६९३२ जागा भरल्या जातील. यामध्ये अनुसूचित जाती संवर्ग- १०७१, अनुसूचित जमाती संवर्ग-५२०, नॉन क्रिमीलेअर ओबीसी संवर्ग- १८७६, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (ईकॉनॉमिकली वीकर सेक्शन)- ६६६, खुला संवर्ग- २७९९ अशी वर्गवारी आहे. (आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटामध्ये ज्या उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे,त्यांचा समावेश केल जातो.)

    या प्रक्रियेत सामील झालेल्या बँकांमार्फत उमदेवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्याचे समन्वयन प्रत्येक राज्यातील समन्वयक बँके (नोडल बँक) व्दारे केले जाते.

    या प्रक्रियेत सामील होणाऱ्या बँका- इंडियन बँक, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब ॲण्ड सिंद बँक, युको बँक

    परीक्षेचे टप्पे

    प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर २०२२ मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येईल. नोव्हेंबर महिन्यात या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येऊन याच महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाईल. फेब्रुवारी /मार्च २०२३ मध्ये मुलाखती घेतल्या जातील. एप्रिलमध्ये नियुक्त पत्र दिले जाऊ शकते.

    अर्हता

    (१) वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२२ रोजी किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९२ ला किंवा त्यापूर्वी आणि १ ऑगस्ट २००२ रोजी किंवा त्यानंतर झालेला नसावा.
    (२) शैक्षणिक अर्हता- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी.

    प्रशिक्षण सुविधा

    अनुसूचित जाती, जमाती संवर्ग, धार्मिक अल्पसंख्याक संवर्ग गटातील उमेदवारांसाठी आयबीपीएसमार्फत दरवर्षी या परीक्षेच्या तयारीसाठी पूर्व प्रशिक्षण सुविधा दिली जाते. हे प्रशिक्षण नोडल बँकांमार्फत देशातील विविध ठिकाणी सप्टेबर /ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित केले जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे या केंद्रांचा समावेश आहे. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तशी नोंद आपल्या अर्जात करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ मिळाला, याचा अर्थ निवड झाली, असे होत नसल्याचे आयबीपीएसने स्पष्ट केले आहे.

    परीक्षा पध्दती

    (अ) प्राथमिक परीक्षा- हा शंभर गुणांचा पेपर असून त्यात पुढील तीन विभाग असतात.

    (१) इंग्रजी भाषा – ३० प्रश्न, ३० गुण आणि कालावधी २० मिनिटे
    (२) संख्यात्मतक कलचाचणी (क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड)- ३५ प्रश्न, ३५ गुण आणि कालावधी २० मिनिटे. हे प्रश्न इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतील.
    (३) तार्किक क्षमता कल चाचणी (रिझनिंग ॲबिलिटी) ३५ प्रश्न, ३५ गुण आणि कालावधी २० मिनिटे. हे प्रश्न इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतील. या तिनही सेक्शन (विभाग)मध्ये किमान गुण प्राप्त करणे आवश्यक ठरते. हे किमान गुण आयबीपीएसमार्फत ठरवले जातात.

    (ब) मुख्य परीक्षा- यामध्ये २०० गुणांचे एकूण १५५ प्रश्न विचारले जातात.

    (१) तार्किक क्षमता कल चाचणी आणि संगणकीय कल चाचणी (रिझनिंग ॲण्ड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड टेस्ट) ४५ प्रश्न, ६० गुण आणि कालावधी-६० मिनिटे/ हे प्रश्न इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतील.
    (२) इंग्रजी भाषा- ३५ प्रश्न, ४० गुण आणि कालावधी-४० मिनिटे
    (३) विदा विश्लेषण आणि अनुमान (डेटा ॲनॅलिसीस ॲण्ड इंटरप्रिटेशन) ३५ प्रश्न, ६० गुण आणि कालावधी-४५ मिनिटे/ हे प्रश्न इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतील.
    (४) सामान्य अर्थशास्त्र आणि बँकिंग व्यवस्थेबाबतची जाणीव (जनरल इकॉनॉमी ॲण्ड बँकिंग अवेअरनेस) -४० प्रश्न, ४० गुण आणि कालावधी-३५ मिनिटे. हे प्रश्न इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतील.

    हा पेपर झाला की लगेच २५ गुणांचा वर्णनात्मक पेपर सोडवावा लागतो. यामध्ये पत्रलेखन आणि निबंधाचा समावेश असेल. यासाठी ३० मिनिटांचा कालावधी दिला जातो. हा पेपर स्वयंचलित पेपर तपासणी यंत्राव्दारे तपासला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय पारदर्शकपणे मूल्यांकन होईल, असे आयबीपीएसने स्पष्ट केले आहे.
    मुख्य परीक्षेतील प्रत्येक सेक्शनमध्ये उमेदवारांना किमान गुण प्राप्त करावे लागतील.तरच उमेदवारांची मुखालतीच्या प्रकियेसाठी निवड होऊ शकते.

    मुख्य परीक्षेतील प्रत्येक सेक्शनमधे किमान गुण आणि एकूण गुणांपैकी किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांपैकी सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांना (एकूण भरावयाच्या जागांच्या साधारण पाच ते सहा पट) मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी १०० गुण ठेवण्यात येतात. अंतिम निवड करताना लेखी परीक्षेला ८० टक्के वेटेज आणि मुलाखतीला २० टक्के वेटेज दिले जाते. लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये किमान गुण मिळवून, मेरिट लिस्ट (गुणवत्ता यादी) मध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवारांनाच नियुक्ती पत्र मिळू शकते.

    परीक्षा केंद्रे

    (१) प्राथमिक परीक्षा- अहमदनगर/ अकोला/ आंबेजोगाई/ अमरावती/ औरंगाबाद/ चंद्रपूर/ धुळे/ जळगाव/ कोल्हापूर/ लातूर/ मुंबई-ठाणे-नवी मुंबई/ नागपूर/ नांदेड/ पालघर/ रायगड/ सांगली/ सातारा/ नासिक/ पुणे/ रत्नागिरी/ सोलापूर
    (२) मुख्य परीक्षा- औरंगाबाद, /मुंबई-ठाणे-नवी मुंबई/ नागपूर/ पुणे
    संपर्क संकेतस्थळ-www.ibps.inआणि http://cgrs.ibps.in/

    सुरेश वांदिले

    ekank@hotmail.com