जैवतंत्रज्ञानाचे महत्व

जैवतंत्रज्ञान ही बहुशाखीय ज्ञानशाखा आहे. यामध्ये जैविक पेशी, रेणू आणि प्राणी यांचा उपयोग बहुविध वाणिज्यिक उपायांसाठी केला जातो. पर्यावरणीय संशोधनाच्या क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाची कामगिरी लक्षणीय स्वरुपाची आहे. पर्यावरणीय समस्यांच्या निराकरणासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरु शकेल असे अभ्यासकांचे सांगणे आहे. वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी पर्यावरणीय जैवतंत्र क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असून या विषयाशी निगडीत पुढील काही विशेष (स्पेशलाइज्ड) शाखा विकसित झाल्या आहेत.

    (१) कृषी जैवतंत्रज्ञान – कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञानाचा वापर हा पर्यावरणीय बदलाची कारणे आणि त्याच्या परिणामांचा शोध, या घटकाशी संबंधित असून त्याव्दारे काही सामाजिक समस्यांचे निराकरण केले जात आहे. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, जागतिक अन्न सुरक्षेततेत वाढ, कृषीची पर्यावरणावरील परिणामकारता कमी करणे आदींचा समावेश आहे. कृषी जैवतंत्रज्ञान हे यामुळे महत्वाचे क्षेत्र म्हणून विकसित होत हरीत वायूच उत्सर्जन कमी करण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचा वापर करुन विविध उत्पादनांची निर्मिती करता येणे शक्य आहे. शाश्वत जैविक इंधनाच्या निर्मितीसाठी काही वनस्पती/पिके यांचा वापर करणे, अधिक कालावधीसाठी टिकू शकतील अशा फळे आणि भाजिपाल्याची निर्मिती करुन अन्नाची नासाडी वाचवणे, वृक्ष आणि सूक्ष्म जीवांच्या साहाय्याने पर्यावरणातील अतिरिक्त कर्बवायू शोषून घेण्यासाठी पर्यायी उपायांचा वापर करणे, शक्य होऊ शकेल.

    या तंत्रज्ञानाचा वापर करुन बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणारे, उच्च तापमान, दुष्काळ, नवे रोग आणि आजार, पर्यावरणीय तणाव अशा समस्यांवर मात करणारे प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजातींचा विकास करणे शक्य होईल. नैसर्गिक संसाधनांची किमान हानी होईल अशा पध्दतीच्या जैविक संशोधनास अमेरिकेने प्राधान्य दिले आहे. कृषी-जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने भूमी आणि जल या संसाधानाचा किमान वापर करुन अधिक उत्पादन करणे शक्य होऊ शकेल. अन्न पोषण मूल्यात सुधारणा होऊन जीवनाचा दर्जाही वाढेल.

    (२) जैवकतेलशुध्दीकरण (बायोरिफायनेरी)- या संयंत्रांव्दारे पुनर्वापरीय जैविक संसाधानांचे रुपांतर जैवइंधन, रसायने आणि पदार्थांमध्ये करता येणे शक्य आहे. पर्यावरणाच्या अशुध्दतेत अधिकाधिक भर घालणाऱ्या जीवाश्म इंधनावरचे देशाचे अवलंबित्व, या संयंत्राव्दारे कमी करणे शक्य होऊ शकेल. भारतात अशी जैविक तेलशुध्दीकरण संयंत्रे अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. कर्बवायूचे उत्सर्जन कमी करु शकण्यास सहाय्यभूत ठरतील अशा सुविधा अधिकाधिक वाढाव्यात यासाठी केंद्र शासन प्राधान्याने मदत करत असते.

    (३) नूतनीकरणीय उर्जा (रिन्यूएबल एनर्जी) – जैवइंधन आणि जैववायूसारख्या उत्पादनांव्दारे नूतनीकरणीय उर्जेच्या विकासाला चालना मिळू शकते. जिवाश्म इंधनास पर्यायी इंधन म्हणून जैविक इंधनाचा वापर करता येणे शक्य झाले आहे. यामुळे काबर्न उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यात साहाय्य होऊ शकते. सेंद्रिय कचऱ्यापासून जैविक वायूची निर्मिती शक्य असून त्याचाही उपयोग नूतनीकरणीय उर्जा म्हणून केला जातो.

    (४) कर्बवायुला हस्तगत करुन त्याची साठवूण करणे – पर्यावरणाला दूषित करण्यामध्ये कर्बवायूचे उत्सर्जन हा महत्वाचा घटक ठरला आहे. पर्यावरणात जाण्यापूर्वीच कर्बवायूस हस्तगत करणाऱ्या आणि त्याची साठवणूक करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर शक्य असून त्यामुळे कर्बवायूचे उत्सर्जन कमी करता येणे शक्य होईल. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास साहाय्य होऊ शकेल.

    (५) बायोडिग्रेडेबल मटेरिअल्स – बायोप्लास्टिकसारख्या वस्तू पुनर्वापरीय संसाधानापासून उत्पादित करता येतात. या वस्तूंचे विघटन नैसर्गिक प्रक्रियेद्वारे करता येते. यामुळे पेट्रोलियम आधारित पारंपरिक प्लास्टिकला हा अधिक शाश्वत पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पारंपरिक पध्दतीच्या प्लास्टिकच्या विघटनासाठी शेकडो वर्षे लागतात. बायोडिग्रेडेबल वस्तू/पदार्थांना देशात अधिकाधिक प्राधान्य दिले जात आहे. यामुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात घट होऊ शकते.

    (६) घन कचरा व्यवस्थापन – पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर करुन घन कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य आहे. बायोरिॲक्टर्सचा वापर करुन सेंद्रिय कचऱ्याचे रुपांतर कंम्पोस्ट खत/ जैववायूमध्ये करता येणे शक्य झाले आहे. कर्ब वायूला हस्तगत करुन त्याची साठवणूक करणे, जैविक तेल शुध्दीकरण संयंत्रे, कृषी जैवतंत्रज्ञान, निकृष्ट जैवसाहित्य, नूतनीकरणीय उर्जा, घनकचरा व्यवस्थापन, अशा सारख्या उपायांव्दारे कर्ब वायूचे/आम्लाचे उत्सर्जन घटवता येणे शक्य आहे.

    भारत सरकारने जैविक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असून जैवतंत्रज्ञान क्षेत्रात अनेक प्रकारचे स्टार्टअप आणि स्वयंरोजगार करणे शक्य होऊ शकते. यासाठी स्टार्टअप इंडियासारख्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ज्या तरुण उद्योजकांना या क्षेत्रात उद्योग स्थापन करण्याचे स्वप्न आहे, त्यांच्या पूर्तीसाठी केंद्र शासनामार्फत संसाधाने पुरवली जातात.

    गुजरात बायोटेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी

    आपल्या देशातील जैवतंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देणारी महत्वाची संस्था आहे. या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात – एम.एस्सी इन (१) मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, (२) एनव्हिरॉन्मेंटल बायोटेक्नॉलॉजी, (३) इंडस्ट्रिअल बायोटेक्नॉलॉजी, (४) प्लँट बायोटेक्नॉलॉजी, (५) ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. प्रत्येक बॅचमधील प्रत्येक २५ विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथे प्रशिक्षित केले जाते. याचा खर्च संस्थेमार्फत केला जातो.

    संपर्क – गुजरात बायोटेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, गुजरात इंटरनॅशनल फायनांस टेक सिटी, गांधीनगर-३८२३५५, संकेतस्थळ – www.gbu.edu.in, ईमेल-admission@gbu.edu.in

    जैवतंत्रज्ञान स्टार्टअप

    बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस या संस्थेची स्थापना भारत सरकारने केली आहे. या संस्थेमार्फत जैवतंत्र विषयातील उद्योग, स्टार्टअप आणि नवीन संकल्पनांना, बिग (बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रँट) योजनेंतर्गत उत्तेजन दिलं जातं. या संस्थेने आतापावेतो आठशेहून अधिक नव संकल्पनांना अर्थसाहाय्य केलं आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणे (मेडिकल डिव्हायसेस), जैवविज्ञान (लाइफसायंस), आरोग्यसुविधा (हेल्थकेअर), स्वच्छउर्जा (क्लिन एनर्जी), औद्योगिक जैवतंत्रज्ञान (ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी), घनकचरा व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट), व्हॅक्सिन (लस), निदानतंत्र (डायग्नोसिटक्स), ड्रग्ज(औषधे), सॅनिटेशन (स्वच्छता), औषध सूत्रे आणि वितरण प्रक्रिया (ड्रग फार्म्युलेशन ॲण्ड डिलिव्हरी सिस्टिम्स), कृषी, मशिन लर्निंग, पाण्यावरील शेती, जैविकखते, जैविकप्रकिया, मत्स्यपालन, पशुवैद्यकी शास्त्र, पोषण आहार, कुक्कुटपालन, रेशीमपालन जैवसेवा, जैवविश्लेषन, जैवइंधन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, जैवतंत्र उपकरणातील स्वयंचलन, बिग डेटा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सारख्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पनांना अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

    ज्या नव्या संकल्पांमध्ये उद्योगाची बीज दडल्याचं स्पष्टपणे लक्षात येतं त्यांना ५० लाख रुपयांचं अर्थसाहाय्य केलं जातं. हा खर्च या सहाय्याच्या १८ महिन्यांच्या कालावधीत करावा लागतो. या कालावधीत संस्थेच्या मार्फत संबंधित नवसंकल्पनाकारास मोठी संपर्क साखळी उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये या क्षेत्रातील उद्योजक, प्रेरक (मेंटॉर), विशेष प्रशिक्षक, विशेष कार्यशाळा यांचा समावेश आहे. या योजनेमधून साहाय्य मिळण्यासाठी संबंधित उमेदवार कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर असावा. संशोधक, वैज्ञानिक यांनासुध्दा अर्ज करता येतो. अर्ज ऑनलाइनच करावा लागतो.त्यासाठीचे संकेतस्थळ-www.birac.in. या योजनेविषयी विस्तृत माहिती www.birac.nic.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.

    सुरेश वांदिले

    ekank@hotmail.com