army

वायूदल (Indian Air Force), नौदल (Indian Navy) आणि थलसेनेमध्ये (Indian Army)  पदवीधर महिलांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्येही अशी संधी (Career) दिली जाते. या अंतर्गत पाच वेगवेगळया दलांमधील नियुक्तीसाठी सामायिक चाळणी परीक्षा घेतली जाते.

  सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

  सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ), सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्स (केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल-सीएसआयएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर फोर्स (इंडो-तिबेट सुरक्षा बल-आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल(एसएसबी) आणि सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स)-मध्ये दरवर्षी असिस्टंट कमांडंट या पदांची भरती, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट) एक्झामिनेशन या परीक्षेव्दारे केली जाते. यासाठी महिला उमेदवार अर्ज करु शकतात. वयोमर्यादा २० ते २५ वर्षे.

  अशी असते परीक्षा

  संघ लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत आणि वैद्यकीय चाळणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात.

  पेपर एक – हा सामान्य क्षमता अथवा बुध्दिमत्ता चाचणीचा असून त्यात २५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये भारतीय इतिहास (राष्ट्रवादाचा विकास/ स्वातंत्र्य संग्राम/ सामाजिक- राजकीय- आर्थिक घटक), भारतीय आणि जागतिक भुगोल (सामाजिक- राजकीय- आर्थिक घटक), भारतीय राजकीय व्यवस्था आणि अर्थकारण (भारताची घटना/ सामाजिक व्यवस्था/ लोक प्रशासन, भारताचा आर्थिक विकास/ प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न, मानवी अधिकार आणि त्याचे निर्देशांक), राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी (संस्कृती/ संगीत/ कला/ साहित्य/ क्रीडा/ सुशासन/ सामाजिक आणि विकासाचे घटक/ प्रश्न/ उद्योग/ व्यवसाय-व्यापार/ वैश्विकीकरण/ विविध राष्ट्रांचे परस्पर संबंध), सामान्य विज्ञान (दैनंदिन जीवनातील सामान्य विज्ञान प्रक्रिया आणि आकलन/ माहिती तंत्रज्ञान/ जैवतंत्रज्ञान/ पर्यावरणशास्त्र इत्यादी) आणि सामान्य मानसिक क्षमता चाचणी (विदा किंवा माहिती विश्लेषण – डेटा इंटरप्रिटेशन/ लॉजिकल रिजनिंग – तार्किक कार्यकारणभाव/ न्युमरिकल ॲबिलिटी-संख्यात्मक क्षमता) चे प्रश्न विचारले जातात. कालावधी दोन तास.

  पेपर दोन – हा सामान्य अध्ययन, निबंध आणि परिच्छेद आकलनाचा असून त्यात २०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ८० गुण निंबध आणि त्यावरील प्रश्न यासाठी असतात. यामध्ये साधारणत: भारताचा स्वातंत्र्य संग्राम, भुगोल, राजकीय व्यवस्था अर्थकारण, सुरक्षा आणि मानवी हक्क या विषयावर यावर आधारित राहू शकतात. विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाते. आकलन, सांराश लेखन, सामान्य व्याकरण आणि संवाद कौशल्यावरील प्रश्नांना १२० गुण असतात.
  कालावधी तीन तास.

  मुलाखतीचे गुण १५०. एनसीसीचे बी आणि सी प्रमाणपत्र असल्यास उत्तम. मुलाखतीच्या वेळेस त्याचा विचार केला जाऊ शकतो.

  परीक्षा केंद्र नागपूर आणि मुंबई. परीक्षेसाठी upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो.

  संपर्क- rectt.bsf.gov.in

  भारतीय नौदल

  (१) शैक्षणिक शाखा-अर्हता- ५० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी.पदवी अभ्यासक्रमात गणिताचा अभ्यास केलेला असावा किंवा ५० टक्के गुणांसह गणित विषयातील पदव्युत्तर पदवी.पदवी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा किंवा ६० टक्के गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील बीई/ बीटेक.वयोमर्यादा २१ ते २५ वर्षे.
  (२) एटीसी-एअर ट्रॅफिक कंट्रोल- वयोमर्यादा साडे एकोणवीस ते २५ वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बीई/ बीटेक. १२ वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
  (३) ऑर्ब्झव्हर- वयोमर्यादा-१९ ते २४ वर्षे. कोणत्याही शाखेतील बीई/ बीटेक. १२वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
  (४) लॉ(विधि)- वयोमर्यादा-२२ ते २७ वर्षे. विधि विषयातील पदवी आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट १९६१ नुसार ॲडव्होकेट्स म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र
  (५)लॉजिस्टिक्स- वयोमर्यादा साडे एकोणवीस ते २५ वर्षे. अर्हता- प्रथम श्रेणीसह कोणत्याही विषयातील बीई/ बीटेक किंवा प्रथम श्रेणीसही एमबीए किंवा प्रथम श्रेणीसह बीएस्सी/ बीकॉम/ बीएस्सी(आयटी) आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स/ लॉजिस्टिक्स/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरिअल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणीसह एमसीए/ एमएस्सी आयटी
  (६) वर्क (बांधकाम)- बीई/ बीटेक – सिव्हिल/ बी आर्किटेक्ट
  (७)कॅटरिंग- अर्हता-एमबीए (हॉटेल मॅनेजमेंट)/ एमएस्सी(हॉटेल मॅनेजमेंट) किंवा प्रथम श्रेणीसह बीएस्सी अथवा बीए आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
  (८) शिक्षण (एज्युकेशन)- वयोमर्यादा २१ ते २५ वर्षे.अर्हता- अर्हता-व्दितीय श्रेणीसह भौतिकशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. पदवी अभ्यासक्रमात गणिताचा अभ्यास केलेला असावा किंवा व्दितीय श्रेणीतील गुणांसह गणित विषयातील पदव्युत्तर पदवी. पदवी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. किंवा दुसऱ्या श्रेणितील रसायनशास्त्र किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी. रसायनशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. इंग्रजी विषयाची पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमदेवाराने किमान १२वीपर्यंत भौतिकशास्त्र अथवा गणिताचा अभ्यास केलेला असावा. किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रीकल/ कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयातील बीई/बीटेक. किंवा काम्प्युटर सायन्स अथवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयातील एमएस्सी. या उमेदवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र किंवा गणिताचा अभ्यास केलेला असावा. किंवा अर्थशास्त्र/इतिहास/राज्यशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी.
  (९)पायलट (मेरिटाईम रिकॉनॅसन्स Reconnaissance)- सामान्य सेवा- वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे. अर्हता – कोणत्याही शाखेतील बीई/बीटेक. १२वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
  (१०)पायलट- कर्मशिअल पायलट लायसन्स धारक- वयोमर्यादा १९ ते २५ वर्षे. डीजीसीए-डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविशनने प्रदान केलेला व सध्या उपयोगात असलेला परवाना.
  (११)नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट- वयोमर्यादा साडे १९ ते २५ वर्षे.अर्हता-इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ केमिकल/ मेटॅर्लजी/ एरोस्पेस इंजिनीअरिंग यापैकी कोणत्याही एका विषयातील बीई/ बीटेक
  (१२)नेव्हल आर्किटेक्चर- वयोमर्यादा- साडे १९ ते २५. अर्हता-मेकॅनिकल/सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मेटॅलर्जी/ नव्हॅ्ल आर्किटेक्चर या विषयांमध्ये ६० टक्के गुणासंह बीई/ बीटेक संपर्क-www.joinindianavy.gov,in

  -सुरेश वांदिले

  ekank@hotmail.com