इंडोनेशियन वाऱ्यांची बदलती दिशा

१९४९ मध्ये डच लोकांशी लढून इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवलं. पहिले अध्यक्ष सुकार्णो यांनी 'इस्लाम'ला राष्ट्रीय धर्म न करता अधिक सर्वसमावेशक भूमिका घेतली. त्यावेळेस ताकदवान लष्कर, कम्युनिस्ट पक्ष आणि इस्लामवादी पक्ष या तिघांमध्ये त्यांनी योग्य तो ताळमेळ साधला होता. १९६५ मध्ये देशात अराजक माजायला सुरुवात झाली आणि याचा फायदा घेत लष्करी अधिकारी सुहार्तो यांनी सत्ता ताब्यात घेतली. त्यांनी सगळीकडे लष्करी अंमल बसविला. कम्युनिस्टंना राष्ट्रद्रोही ठरवण्यात आलं होतं.

  इंडोनेशियाच्या संसदेने सर्व संमतीने नवीन कायदा पास केला. या कायद्यानुसार इंडोनेशियाच्या नागरिकांना अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यावर टीका करण्याचा हक्क काढून घेण्यात आला आहे. सरकारमधील इतर मंत्री किंवा सरकारी संस्थांविषयी बोललं तरी शिक्षा होऊ शकते. या कायद्यान्वये विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास शिक्षा करण्याची तरतूद केली आहे. एकटे रहाणारे, लग्न न झालेले, घटस्फोटित, ज्यांच्या पती अगर पत्नीचा मृत्यू झाला आहे असे, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहाणारे, समलिंगी अशा विविध प्रकारच्या लोकांची प्रचंड गळचेपी या कायद्यामुळे होऊ शकते. संतती निरोधक साधनांचा वापर, त्यांचा प्रचार, गर्भपात याबाबतच्या कायद्यांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक संकोच करणारे आहेत. ब्लासफेमी म्हणजे ईश्वर निंदा हा तिथे गुन्हा मानला जातो. या कायद्याच्या कचाटीत बहुदा अल्पसंख्य समाजातील लोकांना अडकवलं जातं. जाकार्ता शहराच्या ख्रिश्चन मेयरला या कायद्याखाली अलीकडेच तुरुंगवास भोगावा लागला. मेयरचा निषेध करणारे प्रचंड मोठे मोर्चे निघाले होते. नवीन कायद्याने ब्लास्फेमीसाठी अधिक कडक शिक्षांची तरतूद केली आहे. मार्क्सवाद किंवा लेनिनवाद यांचा प्रचार केल्यास चार वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मार्क्सवाद निरीश्वरवादी असल्याने त्यावर बंदी घातली गेली असावी. थोडक्यात सांगायचं तर इस्लाम धर्ममतास रुचेल असे बदल कायद्यांमध्ये केले जात आहेत. नैतिक, अनैतिक ठरवण्याचा अधिकार लोकांकडून काढून घेऊन तो आता सरकारनं आपल्याकडे घेण्याचं ठरवलं आहे.

  सहिष्णू इंडोनेशिया
  इंडोनेशिया सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश. देशाची लोकसंख्या सत्तावीस कोटी, यातील ८८ टक्के लोक धर्माने मुसलमान. भारताचे आणि या देशाचे फार पुरातन काळापासून जवळचे संबंध. शेकडो वर्षांपूर्वीच भारतातून इथे हिंदू आणि बौद्ध धर्म पोहोचले. समुद्रामार्गे भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले. हिंदू, बौद्ध संस्कृतीच्या खुणा आजही इथे अनेक ठिकाणी दिसतात. अनेकदा लोकांची नावे संस्कृत भाषेच्या जवळची आणि हिंदू देवदेवतांच्या नावाशी संबंधित असतात. इंडोनेशियाच्या चलनी नोटांवर गणपती या हिंदू देवतेचं चित्र आहे तर त्यांच्या सरकारी विमान कंपनीचे नाव आहे गरुडा एअरवेज…! आज इंडोनेशियातील हिंदूंची लोकसंख्या दोन टक्केही नाही. देश मुस्लिम बहुसंख्येचा असला तरी बराचसा सहिष्णू आहे. गेल्या काही वर्षातील घडामोडी मात्र काही वेगळे सुचवत आहेत.

  १९४९ मध्ये डच लोकांशी लढून इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवलं. पहिले अध्यक्ष सुकार्णो यांनी ‘इस्लाम’ला राष्ट्रीय धर्म न करता अधिक सर्वसमावेशक भूमिका घेतली. त्यावेळेस ताकदवान लष्कर, कम्युनिस्ट पक्ष आणि इस्लामवादी पक्ष या तिघांमध्ये त्यांनी योग्य तो ताळमेळ साधला होता. १९६५ मध्ये देशात अराजक माजायला सुरुवात झाली आणि याचा फायदा घेत लष्करी अधिकारी सुहार्तो यांनी सत्ता ताब्यात घेतली. त्यांनी सगळीकडे लष्करी अंमल बसविला. कम्युनिस्टंना राष्ट्रद्रोही ठरवण्यात आलं होतं. सुहार्तो यांच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड नरसंहार झाला. दहा लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले असे म्हणतात. सुहार्तो यांना बिनविरोध सत्ता चालवायची होती. त्यामुळे त्यांनी इस्लामवाद्यांनाही फार पुढे येऊ दिलं नाही.

  वाढता इस्लामिक कट्टरतावाद
  १९९८ मध्ये आग्नेय आशियात आर्थिक संकट उभं राहिलं. त्या गदारोळात तेहत्तीस वर्षांनी सुहार्तो यांना सत्ता सोडावी लागली. इंडोनेशियात लोकशाहीचं आगमन झालं. पण इथे चोर पावलांनी इस्लामी कट्टरवाद यापूर्वीच पोहोचला होता. ऐंशीच्या दशकात सोवियत रशियाविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानात जे मुजाहिदिन जमले होते, त्यात इंडोनेशिया मधून गेलेल्या लोकांचाही समावेश होता. रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर हे लोक परत आले आणि इंडोनेशियात जेमाह इस्लामियाह (जेआय) या कट्टर दहशतवादी संघटनेची स्थापना झाली. सुहार्तो यांच्या गच्छंतीनंतर तयार झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा या संघटनेने घेतला. सुहार्तो यांच्यामुळे मलेशियात रहावं लागत असलेला संघटनेचा प्रमुख अबूबकर बशीर इंडोनेशियात परतला. त्याचे ओसामा बिन लादेन आणि अलकायदा संघटनेशी जवळचे संबंध.

  सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेतील ट्विन टॉवरवर अल कायदाने दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर वर्षभराने बाली इथल्या पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. ‘बाली बॉम्बिंग’ म्हणून हि घटना प्रसिद्ध आहे. दोनशे दोन लोक ठार झाले. त्यातले बरेचसे ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिकेहुन पर्यटक म्हणून आलेले. पुढे २००३, ०४, ०५, ०९ साली देशाच्या महत्त्वाच्या शहरांमधून बॉम्बस्फोट होतच राहिले. बहुतेक वेळा तेथील अल्पसंख्य समाजाला, त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं जात होतं. इंडोनेशियाला दहशतवादाचा हा प्रकार नवीन होता. दहशतवादविरोधी पथके स्थापन करण्यात आली. अलकायदाचा जागतिक स्तरावरील जोर जसा कमी झाला तशी इंडोनेशियातील कट्टर संघटनांची ताकदही कमी झाली होती. २०१४ मध्ये इराक सीरिया पट्ट्यात इस्लामिक स्टेट (आयएस) या नव्या दहशतवादी संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला होता. या संघटनेतर्फे लढण्यासाठी अनेक जण इंडोनेशियातून सीरियाला गेलेले. ही संघटना फेसबुक, युट्युब अशा समाज माध्यमांचा प्रभावी वापर करते. त्यामुळे जगभरातील अनेक मुस्लिम महिला देखील दहशतवाद्यांकडे ओढल्या गेल्या आहेत.
  इंडोनेशियातील काही दहशतवादी हल्ले अशा महिलांनी घडवून आणलेत. महिला अथवा लहान मुलांकरवी घडवले जाणारे हल्ले रोखणं हे सुरक्षा यंत्रणांसाठी फार अवघड होऊन बसतं. आयएसच्या उदयानंतर इंडोनेशियातील दहशतवादी कारवाया परत वाढल्या. इंडोनेशियन समाज जरी या दहशतवादी कृत्यांचा निषेध करीत असला तरी समाजाचा कट्टर धार्मिकतेकडे कल वाढू लागलेला आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा, त्यामध्ये जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. अशा शाळांमधून लहानपणापासूनच कट्टरतावाद शिकवला जातो. निवडणुकांमधून, सार्वजनिक सभांमधून होणाऱ्या भाषणांमधून मुस्लिम धर्माच्या बाजूने आक्रमक भाषणे होऊ लागली आहेत. जवळपास नव्वद टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात मुसलमानांना कसलं भय वाटत कुणास ठाऊक. असो. बुरखा घालून फिरणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढले आहे. इंडोनेशियाच्या काही भागात शरीया कायद्यानुसार कारभार चालतो. लोक इस्लामनुसार वागतात की नाही यावर लक्ष ठेवणाऱ्या दमदाटी, दादागिरी करणाऱ्या अनेक अनधिकृत टोळ्या इथे निर्माण झाल्या आहेत. समाजातील सहिष्णुता झपाट्याने कमी होत आहे. नव्यानं आलेला कायदा बिनविरोध संमत झाला ही अधिक चिंतेची बाब. फक्त बाली मधून या कायद्याला विरोध होतोय कारण त्यामुळे पर्यटनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते. पर्यटकांनाही हे कायदे बंधनकारक असणार आहेत.

  इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो इस्लाम आणि लोकशाही हे इंडोनेशियाचे आधारस्तंभ आहेत असं जाहीर भाषणांमधून सांगताना दिसतात. पण त्यातील लोकशाहीचा स्तंभ डगमगू लागला आहे आणि इस्लामच्या स्तंभाभोवती कट्टरतेचा विळखा अधिक मजबूत होत आहे असे संकेत नव्या कायद्याच्या रूपाने मिळू लागलेत.

  सचिन करमरकर

  purvachebaba@gmail.com