
तेजोमयीच्या घरी, भोपाळला राहणारे तिचे काका, काकू आणि त्यांचा मुलगा पप्पू परवाच आले. बऱ्याच दिवसांनी ते आल्यानं त्यांचं आगतस्वागत एकदम जंगी पध्दतीने आईबाबांनी केलं. घरी आलेली मंडळी खास असल्याचं अलेक्झांडरच्या लगेच लक्षात आलं. हे पाहुणे घरी येण्याआधीही आईने त्याला बरच काही त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे काका-काकूंनी दारात पाऊल ठेवताच, अलेक्झांडर स्वारी त्यांच्यावर भुंकणार तोच, आईने, “अरे ठोंब्या, हेच ते काका-काकू”, असं त्याला त्यांच्यासमोर सांगितलं. अलेक्झांडरने तत्काळ आपला पवित्रा बदलून उग्र होऊ घातलेला आपला चेहरा एकदम प्रेमळ केला. काका-काकू आल्याचा आनंद कसा व्यक्त करायचा? असा त्याला त्यावेळी पडलेला प्रश्न त्याने आधी सोफ्यावर आणि लगेच खाली उडी मारुन व्यक्त केला.
याला इतकं कळतं काका-काकूंना एकाच वेळी आश्चर्य व्यक्त केलं.
यू आर ग्रेट, असं म्हणून पप्पूनं त्याच्या शेपटीला भीत भीत हात लावला. अलेक्झांडरने त्याला अंग घासलं. काही क्षणात पप्पूची भीती पळाली. पप्पूने मग त्याच्या कानाला स्पर्श केला. पाठीवर हात फिरवला. जीभ बाहेर काढून हॅ हॅ हॅ करत अलेक्झांडरने, तू आवडलास गड्या, असं सांगून टाकलं.
तर, पप्पू असेल दहाएक वर्षाचा. चांगलाच गोलमटोल. खाण्यात पटाईत. म्हणजे त्याला सारखं हे हवं ते हवं असायचं. त्याच्या या खादाडखाऊपणाचं त्याच्या आईबाबांना फार कौतुक. कारण ते त्याला अजिबातच अडवत नसत की टोकत नसत.
हा इतका कसा खातो गं? स्वयंपाकखोलित खालच्या स्वरात तेजोमयीने आईला विचारलं. आईने तिला गप्प बसवलं. त्याचवेळी तिथे घुटमळत असणाऱ्या अलेक्झांडरने, आईकडे बघितलं. त्याच्याही डोळ्यात तेजोमयीचा प्रश्न होता.
ठोंब्या, असं कुणाच्या खाण्यावर जाऊ नये रे, असं म्हणून आईन त्याला गप्प बस म्हंटलं.गप्पाटप्पा, दंगा मस्तीत छान दिवस चालले होते. एके दिवशी बाबांनी जवळच्या प्रसिध्द हॉटेलमधून प्रत्येकाला दोन असे एकूण आठ वडा पाव आणले.
ते गरमागरम वडा पाव बघून पप्पूने आनंदाने उडीच मारली. कुणाची वाट न बघता त्याने खायला सुरुवात केली. बघता बघता त्याने चार वडापाव गट्टम केले. हे बघून तेजोमयी, तिचे बाबा, तिथेच बसलेला अलेक्झांडर थक्कच झाले. तिघांनींही एकमेकांकडून बघून डोळ्यातल्या डोळ्यात इशारा केला.त्याचवेळी तेजोमयीच्या काकूंनी अलेक्झांडरसाठी आणलेला खास डॉगी खाऊ त्याला दिला. त्यातला त्याने अर्धा खाल्ला नि अर्धा ठेऊन दिला.
अरे खा की, छान आहे. अजून खूप आहे आपल्याकडे काकू, अलेक्झांडरला म्हणाली. पण अलेक्झांडरने नकाराची मान हलवली. दोन-तीनदा काकूंनी हेच पालूपद लावलं. पण अलेक्झांडर अजिबात बधला नाही.
फारच हट्टी दिसतो बाँ तुमचा कुत्रा… असं काकू वैतागून म्हणाल्या.कुत्रा शब्द कानावर पडताच अलेक्झांडरने रागाने काकूंकडे बघितलं. कुत्रा नाही हो, अलेक्झांडर म्हणा. काकूंना नाराजीने आई म्हणाली.
तेच ते… तेच ते नाही… अलेक्झांडर… आता तेजोमयी म्हणाली. बरं बरं, अलेक्झांडर फार हट्टी आहे बाँ. किती प्रेमानं मी त्याला खा म्हणत होते. अहो काकू, त्याने प्रेमाने खाल्लं की.
त्याला हवं तितक बरोबर खाल्लं. एखादी गोष्ट खूप चांगली आहे म्हणून ती खात सुटा, असं तो करत नाही. आमची शिकवणच आहे त्याला. आई म्हणाली
आँ, काकूंनी ऑ फाकला. हो काकू, बकाबका खाल्याने तेवढ्यापुरतं छान वाटतं, मग आपल्याच पोटाला त्रास होतो. हळूहळू लठ्ठोबा होऊ लागतो, हे अलेक्झांडरला कळलय. तेजोमयी म्हणाली. आपलं कौतुक चाललय हे अलेक्झांडरला कळत होतं. त्यामुळे स्वारी खुष होऊन स्वत:भोवती गिरकी घेऊन आनंद व्यक्त करत होती. असं करत असताना तो पप्पूच्या समोर जाऊन उभा राहिला. पप्पू पाचव्या वडापावावर तुटून पडण्याचा तयारीत होता. अलेक्झांडर त्याच्यासमो उभा ठाकून मान वर करुन करुन काकूंकडे बघत होता…अलेक्झांडरला काहीतरी म्हणायचं हे काकूंच्या लक्षात आल्याने त्यांनी आईला विचारलं, वहिनी हा काय सांगू बघतोय हो… जाऊ द्याहो पप्पूच्या आई.. अलेक्झांडरवर डोळे वटारत आई म्हणाली.. अगं आई, त्याला कां रागावतेस? म्हणजे तुलाही कळलं त्याला काय म्हणायचं ते? काकूंनी विचारलं. अहो काकू, तो असं म्हणतोय की मला जे कळलय ते पप्पूला कां बरं कळत नाही?
ऑ! हाँ! अलेक्झांडरला काय म्हणायच हे काकूंना कळलं. पण तेजोमयी जे सांगत होती ते पप्पूने या कानाने ऐकलं नि त्या कानाने सोडून दिलं. पाचवाही वडा पाव त्याने गट्टम केला.
तेजोमयीच्या आईने कपाळावर हात मारुन घेतला. पप्पूच्या आईच्या चेहरा गोरामोरा झाला. हे प्रकरण बरच हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्याने अलेक्झांडरने तिथून काढता पाय घेतला.
– सुरेश वांदिले
ekank@hotmail.com