न वाचण्याचा घोटाळा!

या सगळयांकडे लक्ष न देता तेजोयमीने वाचायला सुरुवात केली . दोन तीन इंग्रजी शब्दांचे अर्थ तिला कळले नाहीत. तेव्हा तिने ते बाबांना विचारले. त्यातले दोन शब्दांचे अर्थ बाबांनी सांगितले. तिसऱ्याचा अर्थ त्यांनाही सांगता आला नाही. त्यांनी बाजूच्या काकांना विचारलं. त्यानांही तो सांगता आला नाही.

  तेजोमयी राहत असलेल्या गृहनिर्माण, सोसायटीच्या बैठकांना अधूनमधून ती बाबांसोबत जात असे. आजही ती उपस्थित होती. ही बैठक महत्वाची होती. कारण सध्याची इमारत पाडून नवी इमारत बांधण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात येणार होता. बैठक सुरु झाली. अध्यक्ष आणि सचिवांनी त्याचं म्हणणं मांडलं.

  नवी ईमारत बांधणं कसं आवश्यक असल्याचं त्यांनी समजावून सांगितलं. नवी ईमारत बांधणारा बिल्डरही या बैठकीला होता. त्याने नवी ईमारत कधी बांधून देणार याची माहिती दिली.

  बैठकीनंतर सर्वांना एक अर्ज देण्यात आला.तो इंग्रजीत होता.नवी ईमारत बांधण्याच्या कामाला परवानगी, असं त्यावर लिहिलं होतं.तो अर्ज भरुन देण्यास अध्यक्षांनी सांगितलं. त्याप्रमाणे बहुतेकांनी सह्याही करुन दिल्या. तेजोमयीचे बाबा सही करणार तोच

  ती बाबांना म्हणाली,

  अहो बाबा तुम्ही न वाचताच सही का करताहात?

  अगं, आतापर्यंत जे काही अध्यक्ष आणि सचिव काकांनी सांगितलय, तेच यात नमूद आहे, त्यामुळे वाचायची काही आवश्यकता वाटत नाही. बाबा म्हणाले.

  दोघांचा संवाद अध्यक्ष व इतरांच्या कानावर पडला. अध्यक्ष तेजोमयीस उद्देशून बाबांना म्हणाले,

  लेक हुषार दिसतेय तुमची.

  हुषार नव्हे अतिहुषार कुणीतरी हळूच बोललं. यावर दोघेतिघे फिदीफिदी हसले. तेजोमयीस ते काही आवडलं नाही. बाबांना ते रुचलं नाही. त्यांनी उभे राहून नापसंती व्यक्त केली.

  अशी प्रतिक्रिया देणं शोभत नसल्याचं अध्यक्षांनीसुध्दा सांगितलं.शिवाय ज्यांना अर्ज वाचायचा आहे, ते वाचू शकतात असही सांगितलं. एक दोन जण सोडले तर कुणीही अर्ज वाचण्यासाठी उत्सुकता दर्शवली नाही. अध्यक्ष- सचिवांनी जे केलय, ते बरोबरच असणार असचं बहुतेकांचं म्हणणं पडलं.

  मग, तुम्ही आता सही करुन देता की नंतर देता? अध्यक्षांनी तेजोमयीच्या बाबांना विचारलं.

  बाबा बोलण्याच्या आतच तेजोमयी म्हणाली,

  काका, अर्ध्यातासातच देतील बाबा.मीच वाचून काढते हा अर्ज.

  अगं, तुला काय त्यातलं कळणार? सचिवकाका म्हणाले. काही सदस्यांना तेजोमयीचा आगावूपणा वाटला. काहीजण उठून निघून गेले. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव उमटले. पण ते काही बोलले नाहीत.

  या सगळयांकडे लक्ष न देता तेजोयमीने वाचायला सुरुवात केली . दोन तीन इंग्रजी शब्दांचे अर्थ तिला कळले नाहीत. तेव्हा तिने ते बाबांना विचारले. त्यातले दोन शब्दांचे अर्थ बाबांनी सांगितले. तिसऱ्याचा अर्थ त्यांनाही सांगता आला नाही. त्यांनी बाजूच्या काकांना विचारलं. त्यानांही तो सांगता आला नाही. असं करत करत सचिव आणि अध्यक्षांपर्यंत हा शब्द गेला. दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. त्यांनी नकारार्थी मान हलवली.

  या शब्दाचा अर्थच माहीत नसताना आता वाक्याचा अर्थ कसा लावायचा काका? तेजोमयीनं विचारलं.

  या प्रश्नावर अध्यक्ष आणि सचिव काका निरुत्तर झाले. आता काय करायचं? कुणीतरी गुगलवर शोधायचा प्रयत्न केला पण त्याने शोधलेला अर्थ,हा अनर्थ करणारा निघाला. तेजोमयी पळत पळत घरी गेली. घरातील एक शब्दकोश घेऊन लगेच आली.

  शब्दाचा अर्थ बघितला. त्या अर्थानिशी तिने वाक्याचा अर्थ लावला. त्यातून असं अभिप्रेत होत होतं की, ज्या क्षणाला बिल्डर आणि सोसायटी, सदस्यांना घर खाली करायला सांगतील, त्याक्षणाला घर खाली करावं लागेल.

  बरोबर ना काका? तेजोमयीने सचिवकाकांना विचारलं.

  त्यांना हो- नाही असं काहीच सांगता आलं नाही. तेजोमयीनं पुन्हा अर्ज वाचायला सुरुवात केली. अर्ज वाचून झाल्यावर ती म्हणाली, घर सोडण्यास सांगितल्यावर लगेच सोडायचं, हे या अर्ज नमूद असलं तरी आम्ही कुठे जायचं? कसं जायचं? असं काहीही लिहिलेलं नाही. तिने बाबांना सांगितलं. बाबांनी अध्यक्ष आणि सचिवांना विचारलं.

  त्यांनीही तो अर्ज पूर्ण वाचला नव्हता, त्यामुळे ते याबाबत अनभिज्ञ होते. बिल्डरच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन ते या सहमती अर्जावर सह्या घेत होते.

  अशाने कसं चालेल? कुलकर्णी काका म्हणाले. सर्व गोष्टी स्पष्ट नमूद असतील तरच सहमती पत्रावर सही देणं उचित ठरेल ना.
  नाहीतर आम्ही सही केली, आता बिल्डर कसाही मनमानी करायला मोकळा. परांजपे काका म्हणाले.

  नाही नाही, असं काही होणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर . बिल्डर ओशाळून म्हणाला.

  तुमच्यावर विश्वास आहेच की. मग तुम्ही असं आम्ही अडचणित येऊ अशा प्रकारचं वाक्य कां टाकलं या अर्जात? सचिव

  काकांनी विचारलं.

  हा मुद्द्यावर उपस्थित सर्वांचं एकमत झालं. हा अर्ज बाद करण्याचं बैठकित ठरलं. अध्यक्षांनी तेजोमयीचं कौतुक केलं.या कौतुकाने तेजोमयीस बरं वाटलं. ती अध्यक्षांना म्हणाली,अहो काका, या बिल्डरकाकांना यापुढे सगळी माहिती मराठीत सुध्दा द्यायला सांगा. म्हणजे इंग्रजीत काय लिहिलय ते आपल्याला पडताळून पाहता येईल. आपली फसवणूकही होणार नाही.अध्यक्षांसोबत सर्वांनाच तेजोमयीचा हा मुद्दा पटला. बिल्डरनेही यास होकार दिला. तेजोमयीच्या कौतुकाने बाबांची छाती फुलून गेली.

  सुरेश वांदिले

  ekank@hotmail.com