
बालनाट्य दालनाचा मराठी रंगभूमीवर समृद्ध असा इतिहास आहे. देशभरातली वैशिष्टपूर्ण अशी याची ओळख बनलीय. गेली पस्तीस वर्षे ‘चिल्ड्रेन्स थिएटर्स' ही संस्था एका कालखंडाची साक्षीदार ठरलीय. बदलत्या काळात नाट्याला बालमानसशास्त्रात एक उपचार पद्धत म्हणूनही महत्व आलय. एका वाटेवरला हा विलक्षण रंगप्रवास आज रसिकांना खूणावतो आहे.
मराठी माणसांची कोणतीही संस्था म्हटली की ती चालविणं महाकठीण असं दिव्यच असतं! अगदी शैक्षणिक संस्थेपासून ते राजकीय पक्षांपर्यंत वादविवाद, गद्दारी, फाटाफूट, चढाओढ, कोर्टकचेऱ्या यांची हजारो उदाहरणे देता येतील. त्यातही कळस म्हणजे नाट्यसंस्था! नाट्यसंस्थेच्या मुहूर्ताचा नारळ फुटला की संस्था फूटीचाही नारळ फूटतो, असं म्हणतात. याचा पुरेपूर अनुभव नाटकवाले आजवर घेत आहेत. असो. तर यालाही अपवाद आहेच. एका ध्येयाने झपाटून रंगधर्मी राजू तूलालवार हे ‘चिल्ड्रेन्स थिएटर्स’ ही बालनाट्यसंस्था चालवित आहेत. ऐन दिवाळीत त्याला चक्क ३५ वर्षे पूर्ण झालीत. सातत्याने नाट्यनिर्मिती करून बालरसिकांपुढे आविष्कार सादर करणारी आज ही एकमेव संस्था ठरली आहे. मुंबई- ठाणे परिसरातील बाप-मुलांच्या दोन्ही पिढ्या या मांडवाखालून गेल्यात.
सुधाताई करमरकर आणि रत्नाकर मतकरी हे दोघे रंगकर्मी हे बालनाट्य मराठी रंगभूमीवर मजबूतीने आकारणारे दिपस्तंभ होते. तो १९५९ ते १९८० चा सुमार. एकापेक्षा एक, विविधतेने नटलेले; अनेक विषय – आशय असणारी बालनाट्ये त्यांनी रंगभूमीवर आणली आणि व्यावसायिक रंगभूमीवर नवे परिपूर्ण दालन खुले केले. मधुमंजिरी, जादूचा वेल, अलबत्या- गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस, इंद्राचे आसन, त्यानंतर पु.लं. देशपांडे यांचे वयम् मोठम् खोटम्,; नवे गोकूळ; आविष्कारचे दुर्गा झाली गौरी तसेच सई परांजपे, श्याम फडके, यांच्याही संहिता गाजल्या. ज्या बालनाट्यांनी या प्रवाहाला दिशा दिली. त्याच वाटेवर आज बालनाट्याचा रंगप्रवाह सुरु आहे. त्यात राजू तुलालवार अग्रभागी आहेत.
पस्तीस वर्षापूर्वी ठाण्यात एका बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १४ नोव्हेंबर १९८८ हा दिवस. निमित्त होते बालदिनाचे. बालदिन आणि दिवाळी दोन्ही उत्सव एकाच दिवशी आलेले. त्यात राजू तुलालवार या तरुणाने दणक्यात ‘चिल्ड्रन्स थिएटर’ या संस्थेची घोषणा केली आणि इतिहास घडला. आज मागे मागे वळून बघताना सारं काही स्वप्नवत जरी वाटले तरी त्यासाठी शेकडो जणांनी साथसोबत केलीय. एखाद्या संस्थेच्या जीवनातले पस्तीस वर्षे म्हणजे मोठा कालखंड. संस्था ‘वयात आलीय’ यापेक्षा ‘प्रौढत्वाकडे’ पोहचली आहे असच म्हणावं लागेल. हा प्रवास जवळून बघायला आणि त्यावर लेखणी चालविण्याची संधी मिळाल्याने त्यातील विविधता ही नजरेत भरलीय. त्या निर्मितीमागली आव्हाने, अडचणी ही काही कमी नाहीत. पण त्यावर स्वार होऊन बालनाटकांची ही घोडदौड आजही जोमात सुरु आहे.
‘दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी आणि त्यासोबतच मुलांच्या काही सुट्टीच्या दिवशी बालनाट्याची पर्वणी ही हमखास आहे. त्यात कधीही खंड नाही. साऱ्या तारखा या कल्पकतेने जुळून आणल्या जातात. त्यात एका प्रकारची व्यावसायिक शिस्त आहे. आणि बालरसिकांच्या वेळेचा तसच सहनशक्तीचाही पूरेपर विचार असतो. हे सारंकाही अनुभवाच्या जोरावर जूळून आणलं जातंय. बालनाट्याची निर्मिती म्हटलं की मुलं हवीत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन हवे. त्यासाठी नाट्यकार्यशाळेचे आयोजन नियमितपणे करण्यात येतं. बालनाट्य शाळा, नाटकांची गम्मत शाळा, आणि विकएण्ड फन स्कूल – हे उपक्रमही राबविण्यात येतात. विकएण्डला नाटकाची शाळा ही आगळी-वेगळी संकल्पना प्रथमच आकाराला आलीय. त्याला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसोंदिवस मिळतोय. रंगभूमीवरल्या सर्वच घटकांचा विचार करून कलाकारांसाठी खास नाट्यखेळ, व्यायाम, संवाद याचा समावेश यात केलाय. आणि ‘फक्त नाटकांसाठी कलाकार उभं करणं’ – हा मर्यादित हेतू यामागे नाही तर एक ‘आदर्श नागरीक’ म्हणून आत्मविश्वासानं उभं राहाण्याचा त्यामागे प्रयोग व प्रयत्न दिसतोय. जो लाख मोलाचा ठरतोय.
गेल्या पस्तीस वर्षाचा मागोवा घेताय तर ‘चिल्ड्रन्स थिएटर’ने शंभरावर बाल नाटुकल्यांची निर्मिती केलीत. सोबत दहा-बारा पूर्ण वेळेची दोन अंकी नाटके रंगभूमीवर सादर केलीत. फक्त मुंबई- ठाणे नव्हे तर महाराष्ट्रभरात या नाटकांचे दौरे झालेत. नाशिक आणि पुणे यात तर खास बालरसिकांचा चाहातावर्ग उभा केलाय. आजवर एकूण चारहजारांवर प्रयोग, सहा एक हजारांवर बालकलाकार या मांडवाखातून गेलेत. नाटकासोबतच बालचित्रपटांची निर्मितीही संस्थेच्या पुढाकाराने झालीय. नऊ चित्रपटांचे प्रदर्शनही झालय. बालचित्रपट महोत्सवांचेही आयोजन करण्यात आलय. विक्रमाकडून महाविक्रमाकडे जाणारी ही आकडेवारी अक्षरशः थक्क करून सोडते. जी भल्याभल्यांना बालनाट्य दुनियेत शक्य झाली नाही.
टेडी माकड भुतोबा, ठेंगू चेटकीण, ७ देशांचे ७ जादुगार, देवांची रंगपेटी, मिकी माऊस और छोटा भिम, रोबो आणि राक्षस, फुग्यातला राक्षस, जोकर आणि जादूगार, टेडी आणि डोरो मॉन, – या बालनाटीका यंदाच्या मौसमात गाजत आहेत. एका तिकीटात तिन-चार बालनाटीकांचा धम्माल महोत्सव होतांना दिसतोय. बालरसिक ही नाटुकली मस्त एन्जॉय करतांना नाचतात, प्रतिक्रीया देतात, मध्यंतरात कलाकारांनाही भेटतात. आवडत्या कलाकाराला कॅटबरी, चॉकलेटची देवाणघेवाणही होतांना दिसतेय. व्हॉट्सअप, चॅनलच्या नजरबंदीतून दोन घटका बालगोपाळांना अशा निर्मितीतून मोकळाश्वास घेता येतोय. हे ही नसे थोडुके!
‘चिल्ड्रेन्स थिएटर निर्मित, बालमंच प्रकाशित, राजू तूलालवार सादर करीत आहे -‘ या मथळ्याखाली जाहीरात प्रसिद्ध झाली की बुकींगवर एकच गर्दी उसळते. हे गेली पस्तीस वर्षे सुरू आहे.
गेल्या पस्तीसवर्षाच्या वाटचालीचं श्रेय आपण कुणाला द्याल? हा प्रश्न राजूसरांना विचारला. त्यावर त्यांनी याचे श्रेय हे गुरुस्थानी असणाऱ्या सुधाताई करमरकर आणि सुरेश अंधारीकर यांना दिले. गेल्या वीस-पंचविस वर्षात सारंकाही बदललं. विज्ञान-तंत्रज्ञानाने नवनवीन संकल्पना जीवनात आल्यात. खाणं पिणं, चालीरिती, पोशाख, सभ्यता, संवाद – साऱ्यांवर परिणाम झालाय. यात नाटक आपलं वेगवेळपण टिकवून आहे. नाट्य हे बालमनाचा आणि पर्यायाने समाजजीवनाचा आरसा आहे. याची पूरेपूर जाणीव व दखल ही घेऊन ‘रंजन-मनोरंजन आणि अंजन-सतर्कता’ याचे भान राखले जातेय. त्यात राजू तुलालवार यांचे प्रयत्न हे एका वळणावरले आहेत. बालमनाची जडणघडण याचा गंभीर विचार त्यामागे आहे! या रंगप्रवासाचे यंदाचे नाबाद पस्तीस वर्षे. त्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!
– संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com