चिल्का सरोवर

ओडिशातले जगप्रसिद्ध चिल्का सरोवर...! भारतातले सर्वात मोठे व जगातल्या दुसर्‍या क्रमांकाचे विशाल समुद्री सरोवर. नजर जाईल तेथपर्यंत पाणीच पाणी. दुसरा किनारा दिसतच नाही. नाशपत्तीच्या आकाराचे हे एक अप्रवाही विशाल सरोवर आहे. ७० किलोमीटर लांबीचे व ३० किलोमीटर रुंदीचे हे नयनरम्य सागराचे लहान रूपच ..!

  खूप लहानपणापासून ‘चिल्का’ हे नाव कानावरुन गेले होते व काही वाचलेले पण होते. तेव्हापासून कसे असेल हे सरोवर? कसा असेल त्या पाण्याचा रंग ? त्याच्या किनार्‍यावर कधी तरी बसता येईल का? अशा अनेक प्रश्नांची मालिका सहजच मनामध्ये अनेक वर्षांपासून रेंगाळत होती. कधी नव्हे ते अचानक या चिल्का सरोवरावर पाय पडले अन एक लहानपणापासूनचे जोपासलेले स्वप्न पूर्ण झाले.

  या सागराचीही एक अनोखी मजाच असते. सागरापर्यंत पोहोचविणार्‍या सडकेची एक वेगळीच शान असते. त्यात एक नैसर्गिक गर्भ श्रीमंती असते. या श्रीमंतीत माणसांनी बांधलेल्या कुठल्याही इमारती नसतात. बगीचे नसतात. आधुनिकतेची कुठलीही नशा नसते. असतो तो फक्त त्या प्रदेशाचा अभिमान व लौकिक. हा अभिमान सहजच लक्षात येतो. कुठे तरी पर्यटकाची वाट बघत सडकेवर बसलेला एखादा नारळवाला. फळवाला तर कुठेतरी एखादी लहानशी चहाची टपरी. येथे क्षणभर थांबणे व याचा आस्वाद घेणे हीच खरी श्रीमंती आहे असे वाटायला लागते व मन प्रफुल्लित होते. त्यात ड्रायव्हरने दिलेल्या नवनवीन माहितीची क्षणोक्षणी भर पडत जाते आणि माहितीचे दरवाजे सताड उघडे झालेले दिसतात. ओरिसाची राजधानी भुवनेश्वरपासून असाच माहितीचा खजिना आपल्याला दिसायला लागतो तो ११० किलोमीटरवर असलेल्या सुरेख व जगप्रसिद्ध चिल्का सरोवरापर्यंत…!

  पहाटे साडेपाचच्या सुरम्य थंडगार वातावरणात निघाल्यास व काही ठिकाणी थांबा घेत, निसर्गाचा आस्वाद घेत दहा वाजेपर्यंत चिल्का सरोवराजवळच्या कोळयांच्या वस्तीत पोहोचता येते. येथे जाण्याकरिता एकूण तीन पॉईंट्स आहेत. अर्थात आम्ही मुख्य पॉइंटने गावातून गेलो. ही समुद्र किनारपट्टीच असल्यामुळे स्वच्छता जास्त असावयास हवी असे जाणवले. बोटीचे फेरीवालेसुद्धा पर्यटकांवर तुटून पडल्याचे दिसतात. त्यांच्या पोटापाण्याचा हा व्यवसाय असल्याने त्याकडे थोडे दुर्लक्ष केलेलेच बरे. पण एकदा पैसे भरून लाईफ जॅकेट मिळाल्यावर आपण नावाड्याच्या ताब्यात जातो अन मग सुरू होते ती दुपारी दीडपासून तीन-साडेतीन तासांची अनोख्या चिल्का सरोवरावरची अनोखी समुद्र दर्शनीय सफर आणि नावाड्यासोबत रंगलेल्या गप्पांची पाण्यावर तरंगणारी मैफीलच. एका नावेतली अनोखी सफर.!

  कधी काळी बंगालच्या खाडीच्या-उपसागराचा समुद्राचा भाग असलेले हे खार्‍या पाण्याचे चिल्का सरोवर आज या समुद्रापासून काहीसे विलग झालेले आहे आणि मधल्या पट्ट्यात अनेक बेटांची निर्मिती झालेली दिसते. हे एक विशाल, खोल पाण्याचे भार्गवी, दया, मक्र इत्यादी अशा ३५ समुद्री प्रवाहांचे प्रचंड मोठे तळ असून विदेशी पक्षांचे साम्राज्य बघायला मिळते. अनेक देशी कावळे सुद्धा बघायला मिळतात. याचा मुख्य प्रवाह बंगालच्या खाडीकडेच जातो. येथे पक्षांचे मोठे आरक्षित क्षेत्र आहे. काही काळानंतर हे सारे पक्षी आपल्या समुद्री प्रवासाचे सोबती असतात आणि बोटींवर घिरट्या घालायला लागतात. जणू काही पक्ष्यांचा एक मंडपच आपल्या डोक्यांवर व बोटींवर तयार होतो. मक्याच्या लाह्या व बिस्किटांच्या तुकड्यांचा हे सर्व पक्षी पाठलाग करतात. त्यांचे बोटीजवळ येऊन चिवचिवणे, फडफडणे म्हणजे पर्यटकांची या पक्षांसोबत मैत्रीचं नवीन दालनच तयार होते. हे एक मनमोहक,विलोभनीय व विलक्षण दृश्य सतत अनुभवायला मिळते. पंधरा ते वीस हजार किलोमीटरवरुन प्रवास करून आलेले १६० प्रकारच्या पक्षांचे हे निवासस्थान आहे. जवळपास ३२ टक्के क्षेत्र येथे जलपक्षांनी व्यापलेले आहे. रशिया, मंगोलीया, लडाख, मध्य आशिया येथून आलेल्या नवीन प्रजातीचे पक्षी येथे बघायला मिळतात. ४५ टक्के पक्षी हे सभोवतालच्या जमिनीवर असतात; तर २३ टक्के समुद्री बगळे येथे आहेत. काही शिकारी पक्षीसुद्धा आहेत.

  हे सारे बघताना नावेचा नावाडी हा अत्यंत कसलेला हवा. नावाड्याची बोट फारशी मोठी नसते व फोटो व्हिडीओकरिता जास्त हालचाल पर्यटकांनी केल्यास बोट हेलकावे मारायला लागते. म्हणून नावाड्याने केलेल्या सुचनांचे तंतोतंत व काळजी पूर्वक पालन करणे आवश्यक ठरते. या ठिकाणी पहिला टप्पा दुसर्‍या एका लहानशा किनार्‍यावर थांबतो. येथे काही मच्छीमार हे बंदिस्त खेकडे, शिंपल्यातले बंदिस्त मोती, लहान टोपलीतले रंगीबेरंगी लहान मासे इ. वस्तु किरकोळ विक्रीकरिता बसलेले असतात. १३२ गावातल्या १५ लाख पेक्षा जास्त मासेमारी कुटुंबाचे पालनपोषण हे चिल्का सरोवर करते हे ऐकून आश्चर्य व आनंद वाटला. यानंतर असंख्य बोटीच्या झुंडी डॉल्फिन माशांच्या क्षेत्रांकडे कूच करायला लागतात. त्यावेळेस संधीप्रकाशातले ते सूर्यास्ताच्या वेळेचे असंख्य तरंगणार्‍या होड्यांचे विहंगम दृश्य डोळ्यात आणि ऋदयात कायमचे कोरले जाते. हे डॉल्फिन माशांचे बांबूने आरक्षित केलेले क्षेत्र आहे.

  असंख्य डॉल्फिन मासे येथे पाण्याच्या वर येऊन अधूनमधून उड्या मारायला लागतात. हे दृश्य बघण्याकरिता सारेच पर्यटक आसुसलेले असतात. हा डॉल्फिन पॉइंट आहे व प्रचंड आकारांचे असंख्य डॉल्फिन मासे सहज बघायला मिळणे हे येथील प्रमुख आकर्षण आहे. हा डॉल्फिन समूह बघण्याकरिता या आरक्षित क्षेत्राला सर्व होड्या घेराव घालतात व त्यांच्या सर्व हालचाली व्हिडीओमध्ये शूट करतात. सूर्यास्ताच्या सोनेरी तांबड्या प्रकाशातले ते होड्यांच्या घेरावाचे दृश्य म्हणजे जणू काही पाण्यावरचा विलोभनीय लँडस्केपच. २० मिनिटांचा थंडगार समुद्री वार्‍यातला हा अनुभव घेणे म्हणजे आयुष्यातला सुवर्णक्षणच..!

  या सरोवराच्या अवतीभवती अप्रतिम हिरवीगर्द झाडी असून अनेक लहान लहान गावे किनार्‍यावर वसलेली आहेत. याला लागूनच नलबाणा, परिकुड, फुलवाडी, बैराहपुरा, नुआपारा आणि तंपारा अशी प्रमुख सहा बेटे असून ही सर्व बेटे ‘मलुड’ या प्रमुख बेटाचा भाग असल्याची माहिती मिळाली. ही सर्व बेटे म्हणजे जगन्नाथपुरीचा भाग आहे. या बेटांवरच्या झोपड्या नारळाच्या झाडात लपलेल्या आहेत. ते सुद्धा सर्व एकाच रांगेत व शिस्तीत. या सरोवरामध्ये अनेक मासेमार्‍यांच्या बांबूच्या खुणा दिसतात. ते त्यांचे क्षेत्रफळ असते. दूर कुठे तरी गाई, म्हशी किनार्‍यावर पोहताना दिसतात. या लहानशा जल सफरीमध्ये येथला इतिहास, भूविज्ञान, जलविज्ञान, यात असणारे जीवजंतु, स्थानिक भूगोल, पक्षी जलचर प्राणी व पर्यावरणाचे अनोखे दर्शन झाले. हे सर्व दृश्य आपल्याला परतीच्या पण वेगळ्या दिशेच्या जलमार्गाच्या नावेच्या प्रवासात बघायला मिळते. सायंकाळच्या संधिप्रकाशात कधी एकदा आपण किनार्‍यावर पोहोचतो असे होऊन जाते. कारण पाण्याचा स्तर सायंकाळी वाढायला लागतो. परतीची दिशा बदललीकी काय अशी भीती वाटायला लागते. बोट हळूहळू हेलकावे मारायला लागते. येथे मात्र जिवाची घाबरगुंडी उडते. कारण किनारा अजून दूर असतो. अंधार पडायची वेळ झालेली असते. जीव घाबराघुबरा होतो. मात्र हा कसलेला नावाडी निश्चिंत असतो. हसत असतो..

  आमचा राग अनावर होतो. पण आम्ही काहीच रागावू व बोलू शकत नाही. कारण आमचा जीव नावाड्याच्या ताब्यात असतो. कसेही करून आम्हाला लवकर किनार्‍यावर पोहोचायचे होते. तो कसलेला नावाडी मात्र आमची मजा घेत घेत अत्यंत सुरक्षितपणे किनार्‍यावर पोहोचवतो. ही चिल्का सरोवराची अनोखी, अद्भुत, जिवावर बेतणारी रोमांचक सफर पूर्ण होते आणि भुवनेश्वरकडे आमची गाडी वेगाने धावायला लागते.

  – श्रीकांत पवनीकर