तिरमल्यांची चिमणी.. ढवळे वस्तीतील माय माऊल्या

कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत हातावर पोट असणाऱ्या अनेक हाडामासाच्या माणसांच्या पोटाचा प्रश्न उभा राहिला. भुक माणसाला स्वस्थ बसू देत नाही म्हणून ती भागवली पाहिजे .  पालं, झोपड्या , बिऱ्हाडातील उपाशी झोपणारी माणसं आणि लेकरं,  देशातील  गरीब , सामान्य माणसं अडचणीत असताना आपण त्यांच्या मदतीसाठी गेलं पाहिजे ही भावना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून स्वतःच अडचणीत असतानाही शांतिवनने कम्युनिटी किचन सुरू करून या अन्नछत्र मोहिमेची सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी झोकून देऊन या मोहिमेत काम केले .  तब्बल ६० दिवस २००० लोकांना दोनवेळा म्हणजे ४००० जेवण पुरविणाऱ्या या मोहिमेला शांतिवनचे दाते आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या हत्तीच्या बळामुळेच ही मोहीम यशस्वी झाली. याचा सर्वांना खुप आनंद आहे. तशाच  हा आनंद द्विगुणीत करणाऱ्या काही घटना घडल्या आणि लहान दिसणारी किंवा गरीब असणारी काही माणसं ही किती श्रीमंत असतात याचाच प्रत्यय या घटनांतून आला .  

    ‘सुया घे …. बिबे घे … दाभान घे ग बये …!’ म्हणत दारोदार फिरून पोट भरणाऱ्या महिलांचा तिरमली समाज.  टाळेबंदीमुळे त्यांच्या रोजगाराची वाट लागलेली आणि पोटाचा प्रश्न निर्माण झालेला. आपल्या बिऱ्हाडावर पोटाला पीळ मारून उपाशी बसलेली ही माणसं पहिली आणि शांतिवन ने तिरमल्यांच्या तीन वस्त्यांवर अन्नछत्र सुरू केले. पोटाचा प्रश्न मिटल्याने आनंदी झालेली ही माणसं कमालीची शिस्त पाळणारी आणि सहकार्य करणारी.  खुप गोड बोलणारी. त्यांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत याच सवयी. नेहमी वस्तीवर जाण्यामुळे त्यातील एक  आठ नऊ वर्षाची  चिमणी नावाची मुलगी मला भेटली आणि तिच्याबरोबर माझी चांगली गट्टी जमली . दिसायला चुणचुणीत, बोलायला खडा.  नियोजनात धावपळ करणारी ही चिमणी स्वभावाने खुप गोड.  पण आई बापाच्या रोजच्या भटकंतीमुळे शाळाबाह्य.  मी तिच्याशी खुप गप्पा मारायचो.  तिला शिक्षणाविषयी आवड लागावी म्हणून शांतिवनमधल्या मुलींच्या गंमती जमती सांगायचो.  मध्येच तू चल शांतिवनला शिकायला म्हणून बोलायचो . त्यावर ती आईला विचारते म्हणायची. शांतिवनमध्ये शिक्षणासोबत खेळायची मजा असते हे कळल्यावर तिने शिक्षणासाठी शांतिवनमध्ये येण्याचा शब्द दिला.  दोन महिन्यात या चिमणीला शांतिवनची आणि शांतिवनमधील लेकरांची  खडानखडा ऐकीव माहिती झाली होती.   जेवण वाटण्याच्या वेळी घराघरात निमंत्रण देण्यापासून कुणी मागे राहिलंय का याकडे चिमणीचे बारीक लक्ष्य.   

    कम्युनिटी किचन ला दोन महिने होत आले होते आणि टाळेबंदीत शिथिलता आल्यामुळे आम्ही ६० दिवसाच्या सेवेनंतर हे किचन बंद करायचे ठरवलं .  शेवटच्या दोन दिवस अगोदर मी तिरमल्यांच्या पालावर जाऊन  सर्वांचे सेवेची संधी दिल्यामुळे आभार मानले आणि परवापासून अन्नछत्र बंद होईल याची माहिती दिली .   चिमणीलाही ‘तू शाळा सुरू झाल्यानंतर  शांतिवन ला ये ‘ असे सांगितले.  त्यावर ती आनंदाने हो म्हणाली . आणि थांबा मी आले असे म्हणत तिच्या पालात गेली.  तिथे तिच्या आईकडून एक पॉकेट घेऊन ती धावत माझ्याकडे आली.  मी ते पॉकेट हातात घेत यात काय आहे त्यावर ती म्हणाली  ‘ यात केसाला लावायच्या पिना आहेत ,  शांतिवन च्या मुलींसाठी घेऊन जा ..!’   मी म्हटले’ याचे किती पैसे  होतात सांग …. आणि आईला नेहून दे ‘ 

     त्यावर ती म्हणाली ‘आईकडूनच आणल्या आहेत ‘.  पैसे नको म्हणाली .  ‘ ‘माझ्याकडून या पिना तुमच्या शाळातील पोरींना  भेट द्या ‘ मी तिथे आले की आमची मैत्री होईल ..!  चिमणीची ही भावना ऐकून मी चकित झालो.  शाळेतील अजून एक अक्षरही न शिकलेलं हे लेकरू पालात राहूनही किती संस्कारित आहे …?  शिक्षणाचा रस्ताही माहीत नसणाऱ्या या बिऱ्हाडात दातृत्वाचे हे संस्कार त्या इवल्याशा हातात आले कुठून …? 

  बीड शहरातील विविध भागात मजूर पुरविणारी बीडमधील ढवळे वस्ती.  या वस्तीवरही शांतिवनचे अन्नछत्र सुरू होते.  मोहीम संपल्यानंतर एक दिवस तेथील महिलांचा फोन आला की काका तुम्ही या आम्ही एक छोटा कार्यक्रम ठेवला आहे. ‘ अरे आता कार्यक्रम करता येत नाही कसला कार्यक्रम करता . यावर त्या म्हणाल्या मोठा नाही उगी छोटा . मी आणि काही सहकारी आम्ही तिथे गेलो.  तर या महिला एकत्र जमा झाल्या होत्या. आता त्यांची रोजंदारीची कामे सुरू झाली होती . मिळालेल्या पहिल्या मजुरीतील  प्रत्येकीने काही रक्कम जमा केली होती. आणि त्या रकमेतून शालेय साहित्याचे दोन मोठे बॉक्स विकत आणून ठेवले होते.  ऐन पावसाळ्याची सुरुवात असल्याने काही झाडेही त्यांनी आणून ठेवली होती.  त्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवलं. एक गुलाबाचं फुल देऊन आमचं स्वागत केलं.  शांतिवन च्या मोहिमेचे आभार मानले . “आमची कामं हळूहळू सुरू झाली आहेत .  आणि त्यातून मिळालेल्या पहिल्या रोजगारातून प्रत्येकाने काही रक्कम आम्ही  एकत्र जमा केली. आणि त्यातून शांतिवन मधील अनाथ मुलांसाठी हे शैक्षणिक साहित्य आणि काही रोपं आम्ही देत आहोत त्याचा स्वीकार करा .  साहित्य मुलांना द्या आणि आमची आठवण म्हणून ही रोपं शांतिवन मध्ये लावा आशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ”  मोडक्या तोडक्या भाषेतील त्यांचे मनोगत ऐकत असताना अक्षरशः माझे डोळे ओले झाले . परिस्थितीने गरीब असणारी ही माणसं मनाने किती श्रीमंत आहेत याची जाणीव झाली. आपलं कष्ट वाया गेले नाही . आपण योग्य ठिकाणी काम केले आहे असे मनाला वाटू लागले.  आम्ही तिथून निघून शांतिवन मध्ये येईपर्यंत माझ्या डोक्यात एकच विचार होता ‘ माणसांची श्रीमंती पैसा , संपत्तीवर ठरवण्याचे परिमाण आले कुठून..!’    ही माणसं परिस्थितीने गरीब असतील पण त्यांच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना जगातील कुठल्याही श्रीमंताशी होऊ शकत नाही . शांतिवन मध्ये आल्याबरोबर त्यांनी दिलेली रोपटे मी माझ्या हाताने लावून घेतली आणि शांतिवनातील एका कोपऱ्यात त्यांची आठवण कायम केली .

   ढवळे वस्तीवरील या माय माऊल्या असतील किंवा तिरमल्यांची चिमणी …   पालात झोपड्यात राहणारी ही माणसं मनाने फक्त श्रीमंतच नाहीत तर  किती ग्रेट आहेत.  केवळ परिस्थितीने  त्यांना  गरीब बनवलंय . आपण केलेल्या श्रीमंतीच्या व्याख्या चुकीच्या आहेत म्हणून ते गरीब आहेत.  शिक्षण माणसाला संस्कारित करते असे आपण म्हणतो . पण शिक्षणातील शि सुध्दा माहीत नाही अशा माणसात दातृत्वाचा हा संस्कार आला कुठून …? 

  शांतिवनच्या या मदत मोहिमेने अनेक विचार करायला लावणारी दृश्य पाहिली.  अनेक  कल्पना आणि शब्द खोटे ठरवले.  अनेक अनुभव दिले.  या सर्व अनुभव आणि परिस्थितीवर एक पुस्तक होईल …  पण मी म्हणेल या मोहिमेने “मी आम्ही कुणासाठी मदत करीत आहे , आहोत ही भावना गाळून पाडली….’ आणि निखळ आनंद दिला … ज्यांच्यासाठी  आपण काही  केले तर त्याबदल्यात त्यांनी तितकाच मोठा आनंद दिला….  केवळ एकेरी नाही तर आनंद देण्याची ही दुहेरी मोहीम होती ….  म्हणजे काय तर…

      ” सारे काही तुला देऊन सुध्दा

             माझी ओंजळ भरलेली. 

       बघतो तर काय तु तुझी ओंजळ 

         माझ्या ओंजळीत धरलेली.”

   हे असेच होते सारे काही …..  कोण देतो आणि कोण घेतो हा वादच संपवून टाकणारे ….!

                                                                                                                                               –  दीपक नागरगोजे , शांतिवन , बीड