congress

गेल्या काही वर्षांत काँग्रेस वैचारिकदृष्ट्या गोंधळलेली आहे. दलित, मुस्लिमांचं लांगुलचालन केल्यामुळं हिंदू काँग्रेसपासून दुरावल्याचं ए. के. अँटनी समितीनं म्हटल्यानंतर काँग्रेसनं सौम्य हिंदुत्त्व स्वीकारलं आहे. त्यामुळं आता तर धर्मनिरपेक्ष मतंही आता काँग्रेसपासून दूर जात आहे. भाजपनं कडवं हिंदुत्व स्वीकारलं असून, काँग्रेसला आपल्या मागं यायला भाग पाडलं आहे.

  गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी मंदिरात जायला लागले. काश्मिरी पंडित असल्याचं ते सांगायला लागले. लोकसभांच्या दोन निवडणुकांतील पराभवानंतर ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्या समितीनं दिलेल्या अहवालात काँग्रेसनं अल्पसंख्याकांचा अनुनय केल्यामु‍ळं पराभव पदरी आला, असं म्हटलं होतं. या एकमेव कारणाचा आधार घेऊन काँग्रेसनं सौम्य हिंदुत्त्व स्वीकारलं. वास्तविक काँग्रेसच्या पराभवाला अन्य अनेक कारणं कारणीभूत होती; परंतु संघटनात्मक कमजोरी, संघटनेत आलेलं शैथिल्य, नकारात्मक मतदान, कार्यकर्त्यांचा गाफिलपणा, लोकांना गृहीत धरण्याची वृत्ती, कथित गैरव्यहाराला पाठिंबा, महागाई यामु‍ळं काँग्रेसचा पराभव झाला. या कारणांकडं काँग्रेसनं दुर्लक्ष केलं आणि फक्त सौम्य हिंदुत्त्वाला काँग्रेस कवटा‍ळून बसली.

  आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यात मध्य प्रदेशाकडं सर्वाधिक लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आपला व्हावा आणि लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा एक फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत त्यांच्या कपाळावर संपूर्ण कवटीवर चंदनाची पेस्ट लावलेली आहे. त्यांचं हिंदुत्वाबाबत नुकतंच एक विधान समोर आलं होतं. त्यामुळं मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप उघडउघड हिंदुत्त्वाचा पुरस्कार करतो. मध्य प्रदेशात काही धार्मिक स्थळं अशी आहेत, त्यांचा विधानसभांच्या पाच-पंचवीस जागांवर प्रभाव आहे. कोणतंही सरकार असलं, तरी ते या बाबा-बुवांना दुखवू शकत नाही. छिंदवाडा येथील बागेश्वर धामच्या धीरेंद्रशास्त्री वादग्रस्त असले, तरी त्यांच्या अनुयायांचा प्रभाव लक्षात घेऊन कुणीही राजकारणी त्यांना दुखवीत नाही. कमलनाथ यांनीही वारंवार धीरेंद्रशास्त्रींच्या दरबारात हजेरी लावली. कमलनाथ म्हणाले होते, की ते हनुमानाचे भक्त आहेत आणि त्यांना हिंदू असल्याचा अभिमान आहे. भारतातील ८२ टक्के लोक हिंदू आहेत, त्यामुळे ते हिंदू राष्ट्र आहे. नंतर मात्र कमलनाथ यांनी हे विधान वैयक्तिक असल्याचं म्हटलं असलं, तरी विरोधी पक्षांची नवी आघाडी ‘इंडिया’ मात्र त्यावर समाधानी नाही. मध्य प्रदेशातील निवडणूक जिंकण्यासाठी कमलनाथ हळूहळू कट्टर हिंदुत्वाचा चेहरा बनू पाहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दलित, आदिवासी, मुस्लिम अशा पारंपरिक मतपेढ्या हातातून जात असतानाही काँग्रेस सौम्य हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भाजपचा पाठिराखा असलेला हिंदू मतदार काँग्रेसकडं कसा येईल, हे काँग्रेसजणांना न उलगडलेलं कोडं आहे. सौम्य हिंदुत्त्वामुळं उलट धर्मनिरपेक्ष मतं काँग्रेसच्या हातून सुटत चालल्याचं त्याच्या लक्षात येत नाही.

  काँग्रेस हिंदुत्वाचं कार्ड खेळण्याचा धोका का पत्करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  मध्य प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ मुस्लिम नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अझीझ कुरेशी म्हणतात, की काँग्रेस नेते मतं मागण्यासाठी हिंदुत्वाची माळ घालत आहेत. अशा नेत्यांनी मूठभर पाण्यात बुडून मरावे. काँग्रेससह सर्व पक्षांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे की, मुस्लिम तुमचे गुलाम नाहीत, की ते जे बोलतील ते पाळले जाईल. त्यांच्या या विधानांवर टीका होत आहे. कट्टर हिंदुत्वाच्या प्रतिमेचा कमलनाथांना फायदा होणार की नुकसान, याबाबत मध्य प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष साजिद अली म्हणाले, की माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अशी वादग्रस्त विधानं करणं टाळलं पाहिजे. सॉफ्ट हिंदुत्वाच्या जोरावर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकू, असं त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष राजकारण करण्यासाठी आणि भाजप हिंदुत्वाचं राजकारण करण्यासाठी ओळखले जातात. अशा स्थितीत धर्माच्या आधारे ध्रुवीकरणाच्या राजकारणाला काँग्रेसमध्ये स्थान आहे, असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले.

  गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ ज्या प्रकारची वक्तव्यं करीत आहेत किंवा ज्या प्रकारचा फोटो व्हायरल झाला आहे, त्यामुळं जनता त्यांच्यापेक्षा दिग्विजय सिंह यांना जास्त प्रश्न विचारू लागतील. दिग्विजय सिंह यांनी गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे; पण दिग्विजय सिंहही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि कमलनाथ यांच्या अशा विधानांवर त्यांचं समर्थन करण्याची शक्यता नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून काँग्रेसची कामगिरी सातत्यानं खालावत चालली आहे. गेल्या नऊ वर्षात सुमारे ४० विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं पराभवाची चव चाखली आहे. त्यामुळंच या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आपली रणनीती बदलण्यात गुंतली आहे. बदलत्या राजकारणात काँग्रेस कधी सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेवर जाते, तर कधी संविधान आणि धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर.

  भारतीय जनता पक्षाप्रमाणं हिंदुत्वाचं राजकारण करून पुढं जाण्याचा प्रयत्न करणारे कमलनाथ हे काँग्रेसमधील पहिले नेते नाहीत. अँटनी यांच्या अहवालानंतर २०१७ मध्ये गुजरातच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेनं पुढं सरकली; पण त्याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन काँग्रेस निवडणुकीत पुढं गेली, तर त्यांना आपल्याच जुन्या विधानांच्या विरोधात जावं लागेल. केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केलं, त्या वेळी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांचं सरकार सत्तेवर आल्यास ३७० पुन्हा लागू करू, अशी विधानं केली होती. याशिवाय भारतीय जनता पक्षाला देशात समान नागरी संहिता लागू करायची आहे, भारतीय जनता पक्षानं तिहेरी तलाक रद्द केला. त्या वेळीही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या या निर्णयाला विरोध केला होता. सध्या देशाचं राजकारण हिंदुत्वाभोवती फिरतं आहे. सत्ताधारी पक्षापासून ते विरोधकांपर्यंत जवळपास सर्वच पक्ष हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढं जाताना दिसत आहेत. फरक एवढाच आहे, की काही जण कट्टर हिंदुत्वाचं अनुसरण करीत आहेत, तर काही सॉफ्ट हिंदुत्वाचं.

  भाजप राजस्थानपासून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत हिंदुत्वाबाबत वेगवेगळी रणनीती अवलंबत आहे. कमलनाथ यांच्या मंचावरील कथाकथन, बजरंग सेनेची उपस्थिती आणि जय श्री रामच्या घोषणा, तर भूपेश बघेल यांची रामगमनाच्या वाटेवरची वाढती पावलं हे दाखवतात, की २०२४ च्या राजकीय लढाईत उतरणारी काँग्रेस पूर्वीच्या काँग्रेसपेक्षा वेगळी असेल. अशा परिस्थितीत ‘सॉफ्ट विरुद्ध कट्टर हिंदुत्व’ या राजकारणात फरक काय, असा प्रश्न पडतो. हिंदू हा पर्शियन शब्द आहे. तो सिंधूपासून आला आहे. इराणी लोकांनी सिंधू नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या लोकांना ‘हिंदू’ हे नाव दिलं. सिंधू नदीच्या आसपास आणि पलीकडं भारतीय उपखंडात राहणारे लोक हिंदू मानले जातात. हिंदुत्व हा शब्द हिंदूंच्या नीतीमूल्यांशी, हिंदू असण्याच्या गुणांशी, हिंदू धर्माच्या भावनेशी जोडलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकातही राजकीय विचारसरणी म्हणून स्पष्ट केलं आहे. तथापि, काही लोक असा युक्तिवाद करतात, की हिंदू धर्म ही एक जीवनशैली आहे, जी सर्वसमावेशक आणि वसुधैव कुटुंबकमवर आधारित आहे.

  एकीकडं सावरकरांवर सातत्यानं टीका करायची आणि दुसरीकडं सौम्य हिंदुत्त्वाचा मार्ग मतांसाठी निवडायचा, यातून काँग्रेसचं वैचारिक गोंधळलेपण अधोरेखित होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हणतो की, भारतात राहणारे सर्व हिंदू आहेत. त्यात ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, बौद्ध आणि शीख यांचा समावेश होतो. सावरकरांच्या दृष्टिकोनातून जे लोक धर्म मानत नाहीत, ते हिंदू नाहीत. हिंदू भारताला आपली पितृभूमी आणि पवित्र भूमी मानतात. याचा अर्थ असा की, जी व्यक्ती सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या भारताच्या भूमीला आपली जन्मभूमी आणि पवित्र भूमी मानते, ती हिंदू आहे. सावरकरांचा हा सिद्धांत मुस्लिम आणि ख्रिश्चनांना हिंदू धर्माच्या कक्षेतून वगळतो. कारण ते हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाहीत. भाजप केवळ हिंदू धर्माशी संबंधित चिन्हांवर चालत नाही, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे उभा आहे. राममंदिराच्या मुद्द्यापासून ते मथुरा आणि काशीपर्यंत भाजपनं केवळ भाषणात त्याचा उल्लेख केला नाही, तर जाहीरनाम्यातही त्याचा समावेश केला आहे. इतर पक्षांपेक्षा स्वतःला वेगळं करण्यासाठी हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आक्रमक होणं ही भाजपची रणनीती आहे. त्या वेळी इतर सर्व पक्ष मुस्लिम मतांसाठी धर्मनिरपेक्ष राजकारण करत होते. अशा परिस्थितीत भाजपनं हिंदुत्वाचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला. आता काँग्रेस आणि भाजपत वैचारिकदृष्ट्या फरक राहणार नसला, तर मतदाराचा वैचारिक गोंधळ होऊ शकतो आणि त्यातही काँग्रेसचं जास्त नुकसान होऊ शकतं.

  – भागा वरखडे