world cup

भारतासाठी, प्रतिस्पर्धी संघांप्रमाणेच स्वत:च्या चाहत्यांचे अपेक्षांचे दडपण हे मोठे आव्हान आहे. त्या आव्हानाची धार अधिक तेज तर्रार करण्याचे काम भारताची प्रसिद्धी माध्यमे करणार आहेत. संघातील खेळाडूंचे स्वत:चे, स्वत:वरील अपेक्षांचे स्वत:वरच दडपण असेल. २०११च्या संघांतील खेळाडू हे दडपण घेण्याइतपत सक्षम होते. २०२३चा भारतीय संघ तेवढा सक्षम आहे का?

    विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची कल्पना कंटाळवाण्या होत चाललेल्या कसोटी क्रिकेटच्या कालखंडात रुजली. मर्यादित षटकांच्या क्रिकेट युगात ती चांगलीच फोफावली. ही कल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या इंग्लंडला विश्वचषक जिंकायला तब्बल ४४ वर्षे आणि बारा वर्ल्डकप स्पर्धांपर्यंत वाट पहावी लागली. त्याचवेळी एक वदंता सतत ऐकू यायची. यजमान काही विश्वचषक जिंकत नाहीत. १९९६ची त्रिदेशीय यजमानांची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली खरी; परंतु ती पाकिस्तानात लाहोरला अंतिम सामना खेळून खऱ्या अर्थाने, यजमान जिंकत नाहीत या कल्पनेला छेद गेला तो २०११ च्या भारतातील विश्वचषक स्पर्धेपासूनच. भारत हा देश खऱ्या अर्थाने यजमान विजेता ठरला. पुढील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. इंग्लंडने २०१९ मध्ये आपल्याच देशातील विश्वचषक विजेतेपद पटकावून अनेक इतिहास रचले. आता पाळी आहे यजमान भारताची विश्वचषक जिंकण्याची.

    विश्वचषक यजमान जिंकत नव्हते, त्यापाठी खरोखरच काही आकलनशक्ती बाहेरच्या गोष्टी होत्या का? का तो एक निव्वळ योगायोग होता? का योगायोगाने यजमानपदाच्या स्पर्धेच्यावेळी यजमान देशांचे संघ दुबळे होते, दुखापतग्रस्त होते? पराभवाची अनेक कारणे आहेत. विजयाचीही तशीच विविध कारणे आहे.

    मुळातच विश्वचषक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोणत्याही संघाला विजेतेपद पटकाविणे भूषणावह असते. त्यासाठी प्रत्येक खेळाडू जीवाचे रान करीत असतो. यजमान असतील तर त्यांच्या बाजूने त्यांचे प्रेक्षक असतात. सर्व मैदाने त्यांच्या परिचयाची असतात. खेळपट्‌ट्यांवर सर्वच यजमान खेळाडू खेळलेले असतात. भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असतो. हवामानाचा अंदाज असतो. मात्र या सर्वांबरोबरच घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचे दडपण असते. काही संघाविरुद्ध हरायला यजमानांना आवडत नाही. जसे पाकिस्तान आणि भारतीय संघांना एकमेकांविरुद्ध सामना हरायला आवडत नाही. कारण निकालानंतरच्या आपापल्या देशवासियांच्या अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रीयांचा सामना करणे मोठे आव्हान असते. कारण देशवासिय आपल्या संघाचा एखाद्या विशिष्ठ संघांविरुद्धचा पराभव पचवू शकत नाहीत.

    अशीच प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांविरुद्धच्या लढतीची असते. दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्ध पराभव सहज पचविता येत नाहीत. कधी कधी राजकिय वाद संबध यासाठी कारणीभूत असतात. या सर्व वाटचालीतून विश्वचषक गेली ४४ वर्षे अविरत वाटचाल करीत आला आहे.

    २०११ पासून यजमान विश्वचषक जिंकताहेत. भारतीय संघासाठी ही कल्पनाच स्फूर्तीदायक आहे. १९८३ चा विश्वचषक कपिलदेवच्या संघांने जिंकला तेव्हा भारतवासियांची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे ते दडपणही कपिलदेवच्या संघांवर नव्हते. मात्र, त्यानंतरच्या आणि प्रामुख्याने १९८७ व १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघांकडून विजेतेपदाची अपेक्षा केली जात होती. दोन्ही वेळा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे २०११च्या विश्वचषकात संघावर अपेक्षांचे दडपण भारतीय संघांवर फारसे नव्हते. मात्र, भारतीय संघ जसजसा स्पर्धेत पुढे पुढे वाटचाल करीत होता, तेव्हा प्रत्येक भारतीय विजेतेपदाचे स्वप्न पहायला लागला होता.

    कपिलदेवच्या संघाने दिलेला विश्वचषक विजेतेपदाचा आनंद तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा भारतीयांना मिळवून देण्यात धोनीचा भारतीय संघ यशस्वी ठरला. त्या गोष्टीला देखील आता एक तप उलटून गेले आहे. सलग चौथे यजमान विजेते होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय.

    कपिलदेवच्या संघातील अनुभवी खेळाडू आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंचा अधिक भरणा होता. धोनीच्या संघात सचिन तेंडुलकरपासून सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग आणि दस्तुरखुद्द कप्तान महेंद्रसिंग धोनी अशी कसलेल्या फलंदाजांची फळी होती. जी फळी संपूर्ण स्पर्धेत अभेद्य होती. झहीर खान, श्रीशांत, मुनाफ पटेल, हरभजनसिंग, युवराजसिंग अशी गोलंदाजीचा समतोल साधणारी गोलंदाजांची फलटण होती. त्या सर्वांचा अचूक व योग्य त्या तऱ्हेने वापर करणारा कप्तान धोनी होता. संघातील प्रत्येक खेळाडूंची परिस्थितीचे दडपण रिचविण्याची क्षमता होती. त्यामुळे विजेतेपदापर्यंतचा प्रवास सहज व सोपा वाटला.

    तब्बल दशकानंतर परिस्थितीत खूपच बदल झाला आहे. सर्वच परदेशी संघाचे प्रमुख खेळाडू भारतीय खेळपट्‌ट्यांवर खेळण्यासाठी सरावले आहेत. आयसीसीने ॲन्डी ॲटकिन्सन हा अनुभवी खेळपट्‌टी तज्ज्ञ यावेळी नेमला आहे. त्यांनी सर्व केंद्रांना सूचित केले आहे; की खेळपट्‌ट्यांचा दर्जा कसा असावा, याबाबतचे आयसीसीचे आदेश पाळण्यात यावेत.

    यजमान भारतासाठी ही गोष्ट आव्हानात्मक असेल. कारण भारताचे काही गोलंदाज अनुकूल खेळपट्‌ट्यांवरच अधिक प्रभावी ठरतात. कुलदीप यादवला गवसलेला सूर भारतीय फिरकीचा दबदबा राखेल. त्याला साथ किती मिळेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

    दुसरीकडे भारतीय फलंदाजीही फॉर्मात यायला लागली आहे, ही आशादायी बाब आहे. कप्तान रोहित शर्माला गवसलेला फलंदाजीचा सूर, नवोदित शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्या तळपत असलेल्या बॅटी भारताला पुन्हा एकदा आशेची किरणे दाखवित आहेत. अष्टपैलू हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा यांच्याकडून धावांची स्फोटकता अपेक्षित आहे. ऑफ स्पिनर अश्विनच्या समावेशामुळे ऑफ स्पिन गोलंदाजीबरोबरच फलंदाजीची खोली संघासाठी निश्चितच लाभदायक ठरणारी आहे. मात्र, अक्षर पटेल जायबंदी असल्यामुळेच अश्विनचा समावेश केला गेला ही गोष्ट खटकणारी आहे. उशिरा का होईना निवड समितीला सुचलेले हे शहाणपण आहे. भारतीय संघांतील शेवटचे ३ फलंदाज धावसंख्येत फारसे योगदान देत नाही हे दुखणे अजूनही कायम आहे. त्यामुळे पाटा खेळपट्ट्यांवर मोठी धावसंख्या उभारताना किंवा त्या धावसंख्येचा पाठलाग करताना ही गोष्ट निर्णायक ठरू शकेलही.

    भारतासाठी, प्रतिस्पर्धी संघांप्रमाणेच स्वत:च्या चाहत्यांचे अपेक्षांचे दडपण हे मोठे आव्हान आहे. त्या आव्हानाची धार अधिक तेज तर्रार करण्याचे काम भारताची प्रसिद्धी माध्यमे करणार आहेत. संघातील खेळाडूंचे स्वत:चे, स्वत:वरील अपेक्षांचे स्वत:वरच दडपण असेल. २०११च्या संघांतील खेळाडू हे दडपण घेण्याइतपत सक्षम होते. २०२३चा भारतीय संघ तेवढा सक्षम आहे का?

    नऊ सामन्यांपैकी सात सामने आव्हानात्मक असतील. कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही, हे बांगलादेशने अलिकडेच एशिया कप स्पर्धेत दाखवून दिले होतेच. एखाद्या सामन्यातील ‘अपसेट’ भारताची विजयाची ‘रेसिपी’ बिघडवू शकतो. म्हणून यजमान असूनही २०२३चा विश्वचषकाचा पेपर भारतासाठी सोपा निश्चितच नाही.
    – विनायक दळवी