एका सोंगाड्याला सलाम!

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गप्पांच्या मैफली जमल्या आणि यावेळी विषय होता शाहीर दादा कोंडके यांचा! नाटकातल्या, दौऱ्यावरल्या, राजकारणातल्या, चित्रपटातल्या वैयाक्तिक जीवनातल्या घटनांमुळे मध्यरात्र उलटून गेली. गप्पा, आठवणी, किस्से, हे संपता संपत नव्हते. दादांच्या दादागिरीला सलाम!

  मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यातली मरगळ दूर करणारा ‘सोंगाड्या’ पडद्याआड गेला असला तरीही त्यांच्या आठवणी विसरता येणं शक्य नाही. शिवाजीपार्कच्या त्यांच्या घरात अनेकदा जाण्याचा, त्यांच्यासोबत गप्पांच्या मैफली रंगविण्याचा योग वारंवार यायचा. प्रत्येक भेटीत पोट दुखूपर्यंत त्यांची हसवणूक अनुभवली.‌ ‘शिवसैनिक’ म्हणूनही दादा कट्टर होते. ‘जय महाराष्ट्र! शिवसैनिक दादा कोंडके बोलतोय!’ असंही ते अभिमानाने फोनवरून बोलायचे.

  हिरोची इमेज नसतांनाही मराठी रंगभूमीवर त्यांनी ‘विच्छा’मुळे स्वतःचे एक पर्व साकार केले. दादांची प्रत्येक एंट्री म्हणजे उत्स्फूर्त असायची. राजकारण, समाजकारणातल्या मंडळींची ते खूबीने फिरकी – गिरकी घ्यायचे. प्रेक्षकवर्ग कोणता आहे, हे बघून ते ‘टोप्या’ उडवायचे. ‘विच्छा’चे दौरे यावर ते कायम भरभरून बोलायचे. विविध प्रांतातल्या राज्यातल्या प्रेक्षकांच्या आवडी-निवडीही त्यांना पुरेपूर ठाऊक होत्या. त्यांचा प्रत्येक दोरा हा तुफान गाजायचा. ‘हाऊसफुल्ल’ ठरायचा. त्यामुळे ठेकेदार मंडळी दादांमागे अक्षरश: गराडा घालायचे. एका भेटीत तर पश्चिम महाराष्ट्रातील एक नाटकाचा ठेकेदार दादांना भेटला. पश्चिम महाराष्ट्रात ‘विच्छा’चा दौरा लावा, म्हणून त्याने चक्क दादांपुढे लोटांगण घातले. ‘विच्छा’मुळे आर्थिक स्थैर्य लाभेल. कर्जमुक्ती मिळेल, असे त्याने सांगितले. दादांनी तात्काळ तारखा दिल्या. माणूसकी जिवंत ठेवली.

  त्यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ने एकेकाळी दौऱ्यावर एकच धम्माल उडविली होती. पण नागपुरात जेव्हा पाहिला दौरा ठरला तेव्हाची गोष्ट. ‘विच्छा’त कोतवाल हल्याची भूमिका राम नगरकर करायचे. दौऱ्यासाठी सारी तयारी झाली पण अचानक राम नगरकर यांनी दौऱ्यावर येण्यासाठी नकार दिला. मुलाचं कुठलतरी ऑपरेशन आहे, अस ते म्हणाले. ‘विच्छा’ची टिम नागपूरला ‘ट्रेन’नं निघाली. दुसऱ्या कलाकाराकडून दादांनी हल्याची प्रवासातच तालीम करवून घेतली. दादांची ‘टिम’ पूर्ण तशी तयारीची. संपत निकम यांनी रामनगरकर यांची रिप्लेसमेंट केली. प्रयोग तुफान रंगला. या पाठोपाठच पुढले प्रयोग आणि दौरा होता. रात्री उशिरा नागपूरात भटकंती करीत असतांना लिला गांधींच्या ‘लवंगी मिरची’च्या प्रयोगाची जाहीरात होती. त्यात राम नगरकर यांचे नाव! ही गोष्ट दादांना कळली. त्यांना धक्काच बसला. ‘ऑपरेशनचं काय झाले?’ दादांनी नंतर नगरकरांना विचारलं. अखेर त्यांना खर सांगाव लागलं. ‘लीला गांधी पिक्चरमध्ये भूमिका देणार म्हणून ‘लवंगी मिरची’चा दौरा करतोय’ असं ते माफी मागून म्हणाले. त्याकाळी लीला गांधी ‘फिल्मस्टार’ होत्या. दादांनी त्यानंतर आपल्या या लाडक्या मित्राला कधीही जवळ केलं नाही. ‘मी चित्रपट काढला तर तुला कधीही घेणार नाही!’ असही नागपूर दौऱ्यावर दादांनी घोषितच केलं. पुढे बरेचदा राम नगरकरांनी दादांना शब्द मागे घेण्याची विनवणी केली. पण दादा अखेरपर्यंत शब्दावर पक्के राहीले. नागपूरचा पाहिला ‘विच्छा’चा दौरा हा राम नगरकर यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला. कारण एक जवळचा मित्र आपल्या खोटेपणामुळे दूरावला आणि विक्रमी चित्रपट निर्मितीत मिळणारी संधीही त्यांनी गमावली. दादांनी ‘विच्छा’च्या ‘टिम’ला पुढे चित्रपटात जिथे संधी मिळेल तिथे स्थान दिले; पण अपवाद ठरले राम नगरकर! कारण नागपूर दौरा !!
  पश्चिम महाराष्ट्रात शाहीर दादा कोंडके यांनी आपला एक हक्काचा चाहतावर्ग ‘विच्छा’मुळे उभा केला. काहीदा तर दौरे आखतांना एकाच गावात सलग दोन प्रयोगही होत होते. ‘रिपिट ऑडीयन्स’मुळे हाऊसफुल्ल प्रयोग व्हायचा. ऑडीशन आणि प्रतिसादामुळे चार तासापर्यंत ‘विच्छा’ रंगायची. दादांनी दौऱ्यावर आपल्या कल्पकतेमुळे आणि खास करून कॉमेंटस घेण्याच्या हुकमी कलेमुळे रसिकवर्ग निर्माण केला. यशवंतराव चव्हाण यांच्या कराडला ‘विच्छा’चा दौरा पोहचला आणि यशवंतरावांवर कॉमेंट्स घेऊ नका म्हणणारे गुंड थिएटरवर पोहचले. त्यांच्या मागोमागच ‘कॉमेंटस घ्या’ म्हणणारेही पोहचले. तणावाचे वातावरण झाले. कुणी बंदुका घेऊन तर कुणी काठ्या-लाठ्या घेऊन प्रयोगाच्या जागी पोहचले. आता दादा काय करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. जर दादांनी यशवंतरावांवर काही मिश्कीली केली तर पुढला दौरा संकटात सापडला असता. हाऊसफुल्ल गर्दीने नाट्यगृह बहरले होते. अखेर दादांनी यशवंतरावांवरली हुकमी कॉमेंट घेतली. त्याला रसिकांनीही हशा व टाळ्यांनी दाद दिली पण समोरच विंगेत बंदुकधारी होते. ते रसिकांच्या टाळ्यांमुळे तिथून निघून गेले. पण तरीही नाट्यगृहाबाहेर तणाव कायम होता. कधी काय होईल, याचा भरवसा नव्हता. पडदा पडताच रंगमंचावरून सारे गाडीत बसले आणि सुसाट वेगात गाड्या थेट कराड बाहेर पडल्या. कोल्हापूरात भोजन साऱ्यांनी घेतले. मुक्कामही कराड बाहेरच केला.

  आता दादा कुठलं हुकमी ऑडीशन घ्यायचे?

  कारभारणी दादांना विचारते की ‘मुंबईत वाडिया हॉस्पिटल आहे. तिथे चला न मला घेऊन जा. मंजे मलाही पोर होईल. रोज तिथं शंभर पोरं म्हणे जन्माला येतात! माझाही नंबर लागेल!’ त्यावर दादा म्हणायचे – ‘अगं होणाऱ्यांनाच मुल होतात. नाहीतर यशवंतरावांना काय वाडियाचा पत्ता ठावूक नाही?’ हा प्रसंग अलका पाठारे आणि दादा – हे रंगवून सादर करायचे. वैयक्तिक व वादग्रस्त असणारे हे ऑडिशन असले तरी ते दौऱ्यावर सातमजली हशा वसूल करायचे.
  दौऱ्यावर अनंत अडचणींवर मात करून नाटकवाले हे नाट्यगृहापर्यंत कसेबसे पोहचतात. पण काहीदा उशिर होणं, हे न टाळता येणारं. आजकाल मोबाईल, हायवे, विमानसेवा, खासगी वाहाने यामुळे संपर्क साधणं सहज शक्य होतं. पण पूर्वी एसटीडी आणि खराब रस्ते यामुळे अडचणींचा सामना करावा लागायचा. नागपूर दौरा होता. दादा कोंडके यांचा ‘विच्छा’चा प्रयोग. रात्री ९चा प्रयोग आणि दादांची टिम चक्क १०.३० वाजता पोहचली. ट्रेन लेट म्हणून हा विलंब. संध्याकाळी आठ वाजेपासूनच धनवटे थिएटर गजबजून गेलेले. दस्तूरखुद्द थिएटरचे मालकही गर्दी पुढे काय उत्तर द्यायचं, या चिंतेत. जर दादा आले नाहीत तर दगडफेक होईल, दंगा पेटेल या भयाने पोलिसांशी बोलणही सुरु झालेलं. अखेर चिडलेल्या नागपूरकरांना दादांनी आपल्या हुकमी आणि हजरजवाबी शैलीनं जिंकले आणि उशिरापर्यंत प्रयोग रंगला.

  ‘पुढे तर याच धनवटे नाट्यगृहात सातत्याने पाच वर्षे ‘विच्छा’चे प्रयोग प्रत्येक रंगपंचमीला झाले. गुलालाची उधळण आणि रंगांचा खेळ यामुळे सारेजण रंगून जायचे. संध्याकाळी सुरू झाले. प्रयोग पहाटेपर्यंत चालायचा. दादा रंगपंचमीच्या शुभेच्छा द्यायचे; हसायचे आणि हसवायचेही. एकदा धूळवडीच्या आदल्या दिवशी प्रभाकर पणशीकर यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’चा प्रयोग होता. सुदैवाने ‘विच्छा’ची टिम एक दिवस अगोदरच नागपुरात दाखल झाली. हे मग काय, रसिकांच्या आग्रहाखातर ‘अश्रूंची झाली फुले’चा प्रयोग रद्द करून त्याजागी ‘विच्छा’चा ‘डिमांड शो’ झाला. एका प्रयोगात नागपुरात पोहचलेल्या ‘टिम’ला दोन प्रयोग करावे लागले. रंग आणि दादा कोंडके हे जणू नागपूरकरांच्या कुंडलीत समिकरणच बनल होतं.

  शाहीर दादा कोंडके यांची ‘विच्छा माझी पूरी करा’ हे लोकनाट्य खऱ्या अर्थाने दौऱ्यावर बहरले. उभा महाराष्ट्र दादांनी पिंजून काढला. ३१ मार्च १९७५ ला हैद्राबाद येथे ‘विच्छा’चा शेवटचा प्रयोग झाला. तोही दौऱ्यावरला शेवटचा ठरला. त्यानंतर दादा कोंडके ही पाच अक्षरे मराठी सिनेसृष्टीत प्रचंड व्यावसायिक यश मिळवून गेली. १९७१ साली सोंगाड्या आला आणि दौरे करणं शक्य अशक्य बनलं. चंदेरी ग्लॅमरस दुनियेत दादा पोहचले. एका भेटीत दादा म्हणाले, ‘विच्छा’च्या दौऱ्यांमुळे दहावर्षे महाराष्ट्रातले प्रेक्षक मला जवळून ओळखण्याची संधी मिळाली. उभा-आडव्या महाराष्ट्राची नस मी पूरती जाणली. ‘विच्छा’ने प्रेक्षकांना हसविण्याचा वसा दिलाय तो मरेपर्यंत चालविणारच आणि तो त्यांनी समर्थपणे चालविलाही. ‘दादांचे दौरे’ म्हणजे एखा‌द्या विनोदी महाग्रंथाचाच विषय ठरेल. २१ डिसेंबर १९६५ ते ३१ मार्च १९७५ या दहा वर्षात दौऱ्यावर ‘सुपरहिट’ ठरलेले ‘विच्छा’ हे एकमेव लोकनाट्य होतं. गरज लागेल तेव्हा पैसा मिळवून देणारं एटीएम कार्ड होतं.

  दौऱ्यावर असताना काहीदा आठवडा, दोन आठवडे साऱ्यांना एकत्र राहावे लागायचे. त्यातून प्रत्येकाच्या सवयी, आवडी-निवडी, छंद-उपछंद, व्यसनं-वागणं, हे सारंकाही दिसायचं. दादा कोंडके यांच्या दौऱ्यावर दोन नियम कडक होते आणि ते नियम त्यांनी स्वतःपासून सुरु केले. नियम क्रमांक एक – प्रयोगापूर्वी किंवा नंतर दारु प्यायची नाही; तसेच पैसे लावून पत्तेही खेळायचे नाहीत. नियम क्रमांक दोन- ज्या प्रयोगात चुक होईल त्यावेळी कलाकाराचं त्या रात्रीचं जेवण बंद! येवढे कडक नियम क्वचितच कुणी आखले असतील आणि ते कटाक्षाने पाळलेही असतील. कारण हल्लीच्या दौऱ्याकडे ‘पिकनिक’ म्हणून बघितले जाते; तसेच दारु पिणं ही ‘फॅशन’ समजली जाते. दादांच्या या कडक नियमांमुळे त्याचे सहकलाकार बरेचदा दुखावलेही गेले. पण दादा हे दादा होते. दौऱ्यावरले हाऊसफुल्लचे हुकमी एक्के होते!

  – संजय डहाळे
  sanjaydahale33@gmail.com