idc

  १२ वीनंतर उत्तम करिअरच्या संधी देणाऱ्या शैक्षणिक संस्थातील प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु होतो. सगळ्यात आधी ठरलेल्या वेळात्रकानुसार आयआयटी मुंबईच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर- स्कूल ऑफ ‍डिझाइनच्या, बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा केली जाते. या घोषणेनुसार २०२४ च्या शैक्षणिक वर्षासाठी बी.डिझाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. २१ जानेवारी २०२४ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. २३ जानेवारी २०२४ रोजी उत्तरे घोषित केली जातील. या उत्तरांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास २५ जानेवारीपर्यंत नोंदवता येतील. ८ मार्च २०२४ रोजी अंतिम निकाल घोषित केला जाईल.

  ही परीक्षा, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजे यूसीड (UCEED) यानावाने ओळखली जाते. या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर- स्कूल ऑफ डिझाइन मुंबई, सोबतच आयआयटी गौहाटी (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) आयआयटी दिल्ली(डिपार्टमेंट ऑफ डिझाइन), आयआयटी हैदराबाद(डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) आणि आयआयटीडीएम (इंडियन इं‍‍स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन (अभिकल्प) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. (याशिवाय देशातील काही महत्वाच्या खाजगी संस्थांही आता या परीक्षेतील गुण प्राथमिक चाळणीसाठी ग्राह्य धरतात.)

  स्वप्नपूर्तीची संधी
  आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा असे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे असते. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिनही शाखेत यंदा १२ वीत असणाऱ्या किंवा गेल्या वर्षी १२वी झालेल्या विद्यार्थ्यांची आयआयटी शिकण्याची संधी ‘यूसीड’ या परीक्षेद्वारे मिळू शकते. कारण या तिनही शाखेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते. १२ वी परीक्षेत किमान गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक.

  प्रवेश प्रकिया
  परीक्षा केंद्रे- महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि मुंबई या केद्रांचा समावेश आहे.

  अशी असते परीक्षा-
  या परीक्षेमध्ये तीन तास कालावधीचा आणि ३०० गुणांचा पेपर असतो. यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी, असे दोन भाग असतात. “पार्ट ए” चा कालावधी दोन तासांचा आणि “पार्ट बी” चा कालावधी एक तासाचा असतो. पेपरची भाषा इंग्रजी असून ही परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड आहे.

  ‘पार्ट ए’मध्ये पुढील तीन भाग (सेक्शन ए, बी आणि सी) असतात. (सेक्शन ए) – न्युमरिकल म्हणजेच संख्यात्मक प्रश्न. यात प्रश्नाचे उत्तर एखादी संख्या असते. या प्रश्नांसाठी कोणतेही पर्यायी उत्तरे दर्शवली जात नाहीत. संगणक पडद्यावरील व्हर्च्युअल (आभासी) कीबोर्डाचा (कळफलक) उपयोग करुन अचुक उत्तराची संख्या नोंदवावी लागते. (सेक्शन बी) – मल्टिपल सिलेक्ट म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. याभागात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. यापैकी एक किंवा अधिक अचुक उत्तर राहू शकते. (सेक्शन सी) – मल्टिपल चॉईस पश्न. याभागातही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. मात्र यामध्ये एकच अचुक उत्तर असते.

  “पार्ट बी”मध्ये प्रत्येकी ५० गुणांचे स्केचिंग आणि डिझाइन ॲप्टिट्यूडवर प्रत्येकी एक प्रश्न विचारला जातो.

  अभ्यासक्रम
  ढोबळमानाने पुढील घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
  दृष्यात्मक संकल्पना समजण्याची क्षमता- यामध्ये चित्र, आकृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात. टूडी आकार किंवा थ्रीडी वस्तुंमधील बदल, सुधारणा किंवा परस्परसंबंध याविषयी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचपणी अशा प्रश्नांद्वारे केली जाते. दैनंदिन जीवनातील यांत्रिकी आणि शास्त्रीय संकल्पना यांचे ज्ञान

  निरीक्षण आणि अभिकल्प संवेदनशीलता- सामान्य वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यामध्ये दडलेल्या गुणांचा शोध घेणे, त्याविषयी विश्लेषाणात्मक विचारमंथन व निरीक्षण कौशल्य आणि संवदेनशीलतेची क्षमता. काही विशिष्ट बाबींकडे विशेष लक्ष पुरवून त्यांचे विश्लेषण, कारणमीमांसा, वर्गीकरण आणि भविष्यवाणी करण्याची क्षमता, दृष्यात्मक गुणधर्म आणि कलात्मक परिणाम यामधील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता.

  पर्यावरण आणि सामाजिक जाणिव- हवामान, लोकसंख्या, पाणी, प्रदूषण, वनस्पती , नैसर्गिक संसाधने यासारख्या पर्यावरणीय घटकांबाबत सर्वसाधारण समज किंवा आकलन. या सर्व घटकांचे वस्तू, प्रतिमा आणि पायाभूत सुविधा यांच्या अभिकल्पावर होणारे परिणाम, अभिकल्पासंदर्भात सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांबाबत जाणिवजागृती, अभिकल्पित कलाकृतींचा इतिहास, पर्यावरणदृष्ट्या टिकावू आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले अभिकल्प. कला, साहित्य आणि शिल्पकलेचा इतिहास.

  विश्लेषणात्मक आणि तार्किक कारणमीमांसा – दिलेल्या गुणात्मक आणि संख्यात्मक माहितीचे विश्लेषण आणि तार्किक विश्लेषणाची क्षमता, दिलेल्या माहितीतील अभिकल्प नमूने ओळखण्याचे कौशल्य. मत प्रदर्शित करणे, वादविवाद करणे किंवा सुयोग्य निकषांच्या बाजूने उपाययोजना करण्याचे कौशल्य, दडवलेल्या बाबी वा कल्पनांचा शोध घेण्याची क्षमता, त्यासंदर्भातील निष्कर्षसाठीचे पुरावे किंवा युक्तिवाद शोधण्याची क्षमता. छोट्या उताऱ्यातील माहितीचा उपयोग करुन दिलेल्या उत्तरांमधून सर्वाधिक अचूक उत्तर शोधण्याची तार्किक क्षमता. माहिती विश्लेषण .

  भाषा आणि सर्जनशीलता – इंग्रजी भाषेचा उपयोग व आकलनाच्या अनुषंगाने भाषा आणि सर्जनशीलक्षमता, वाचन कौशल्य, इंग्रजी व्याक्रणाचे ज्ञान, वेगळया व नाविण्यपूर्ण सर्जनशील पर्यायांचा शोध घेण्याची व विचार करण्याची क्षमता,

  अभिकल्प विचारप्रणाली आणि समस्या निर्धारण- दृष्यात्मक साम्य, रुपके, चिन्हे आणि प्रतिके यांचा उपयोग करण्याची क्षमता, व्यामिश्रता समजून घेण्याची क्षमता, समस्यांची ओळख, पर्यायांचा शोध, पर्यायांचे विश्लेषण आणि उपयांची निवड.

  यूसीड परीक्षा ही अभिकल्प कलचाचणी आहे. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा अभिकल्प अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कल, क्षमता, कौशल्य आणि कमकुवत बाजू समजून घेण्यासाठी प्रश्नांची संरचना केली जाते. चित्रकलेतील कौशल्य असल्यास उत्तम पण नसले तरी तो या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तितकासा महत्वाचा पैलू गणला जात नाही.

  संपर्क- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – बॉम्बे, मुंबई-४०००७६,
  दूरध्वनी- ०२२-२५७६ ४०६३,
  संकेतस्थळ-www.uceed.iitb.ac,
  ईमेल- uceed@iitb.ac.in

  – सुरेश वांदिले