एका ‘खेळियाचा’ गौरव!

अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर म्हणजे मराठी रंगभूमीवरला अभिनयाचा संपन्न वारसाच! आजवर रंगभूमीवर त्यांनी केलेल्या विविधरंगी भूमिका या एका खेळियाचा सर्वागसुंदर आविष्कारच. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने आज सन्मानित करण्यात येतंय. हा पुरस्कार एका सृजनशील कलाकाराचा गौरव आहे.

  ‘पाश्चिमात्यांशी’ तुलना करता आपल्या नाट्यकलेच्या दर्जामध्ये फरक आहे, असं मला जराही वाटत नाही. आमच्या नाट्यसृष्टीतही तितकेच चांगले ताकदीचे कलाकार आहेत आणि दिलीप प्रभावळकर अप्रतिमच! दिलीप जर तिकडे असता तर त्यानं अक्षरश: रान पेटवलं असतं!’
  -पु. लं देशपांडे यांनी हे मत नोंदविलं आहे. जे खूपकाही सांगून जाणारं. मराठी रंगभूमीवरल्या कलाकारांची परकीय कलाकारांशी तुलना करतांना आपण त्यातही नंबर वन असल्याचे त्यांचे बोल अभ्यासपूर्ण असेच म्हणावे लागतील… आज दिलीपजींची आठवण येण्यामागे खास निमित्त आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘मृदगंध जीवन गौरव पुरस्कार’ यंदा अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला असून तो आज रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. लोककलेसाठी आपलं उभं आयुष्य वेचणाऱ्या एका शाहीराच्या नावाने हा पुरस्कार असल्याने तो सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठीत मानला जातोय.
  वयोमानाप्रमाणे आज हा रंगकर्मी रंगभूमीवर दिसत नसला तरीही त्याच्या गाजलेल्या नाटकांवर, त्यातील वैशिष्ठपूर्ण भूमिकांवर चर्चा होतांना दिसतेय. ‘एक अष्टपैलू अभिनेता’ म्हणजे कोण? तर अर्थात दिलीपजींचेच नाव पटकन पूढे येते. त्यांनी साकार केलेल्या काही भूमिकांवर एक नजर…
  त्यांनी पन्नास एक नाटकात भूमिका केल्यात. १९६८ आती विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित ‘रंगायन’ संस्थेचे ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाट्यातून त्यांनी व्यावसायिकवर पहिले पाऊल टाकले. आज या नाटकाला पंचावन्न वर्षे पूर्ण झाली. त्यापासून किमान दरवर्षी एक नाटक त्यांनी गाजविले. रत्नाकर मतकरी यांच्या ‘बालनाट्य’ संस्थेतून पूर्ण आकाराची बालनाट्ये त्यांनी केली. त्यात आजही रंगभूमीवर नवी टिम ‘अलबत्या गलबत्या’चे विक्रमी प्रयोग करतेय. १९७२ आणि १९८७ असे दोनदा हे नाटक त्यांनी केले. त्यातील चेटकीणीची भूमिका बालकांनी आणि पालकांनीही अक्षरशः डोक्यावर घेतली. दोन पिढ्यांनी हे नाटक आणि त्यातील ‘चेटकीण’ बघितली. अशी भूमिका यापूर्वी झाली नाही आणि पूढेही होण्याची शक्यता नाही. राक्षसराज झिंदाबाद; धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी; इंद्राचे आसन नारदाची शेंडी; सरदार फाकडोजी वाकडे; अदृश्य माणूस, अशा किमान डझनभर नाटक आणि एकांकिकेतून त्यांनी आपल्यातल्या अभिनेत्याचा पाया भक्कम केला.
  ‘वासूची सासू’ या नाटकातील सासू आजही डोळ्यापुढे उभी राहाते. १९८७-८८ चा सुमार असावा. ओमनाट्यगंधाची निर्मिती होती. आश्विनी भावे, अविनाश खर्शीकर, अतूल परचुरे, अरुण नलावडे, माया गुर्जर – ही मंडळी त्यात होती. दे धम्माल प्रयोग. जो फार्स शैलीतला. प्रदीप दळवी याची संहिता आणि कुमार सोहोनींचे दिग्दर्शन. त्यावेळी त्यांचा ‘चिमणराव’ गाजत होता. त्या इमेज मधून बाहेर पडण्यासाठी ही सुंदर सासू प्रगटली! वासू हा प्रेमवीर. आपली प्रेयसी घरी येणार तेव्हा ऑफीसला दांडी मारण्यासाठी ‘सासू मेली!’ अशी थाप मारतो आणि अंत्यदर्शनासाठी ऑफीस घरी येते. यावेळी सासूची भूमिका अण्णांना म्हणजे प्रभावळकरांना घ्यावी लागते. अशी दे धम्माल यात खच्चून भरलेली‌. तसा हा फार्स ‘सासू मेलीच पाहिजे’ या नावाने दोनदा रंगभूमीवर आलेला. राजा गोसावी आणि बबन प्रभू यांनी काही प्रयोग केले होते. पण ही नवी सासू अप्रतिमच रंगली. बराच वेळ सासू बनून गेटअपमध्ये वावर असल्याने चॅलेंज होते. बायकी गेटअप, आवाज, देहबोली सारंकाही ‘फार्स’ रंगविण्यास सहाय्याचे ठरले. ‘अण्णा’ जेव्हा वेशांतर करून ‘सासू’ म्हणून प्रगटायचे तेव्हा टाळ्या, शिट्ट्यांचा एकच प्रतिसाद मिळायचा. याची नोंद अनेकांनी केलीय. अशी सुंदर, विनोदी सासूबाई होणे नाही!
  स्वतः प्रभावळकर तयारीचे नाटककार, लेखकही आहेत. त्यांनी लिहून दिग्दर्शित केलेले ‘हसवाफसवी’ हा वेगळ्या वळणावरला प्रयोग थक्क करुन गेला. या नाटकाचा जन्म हा त्यावेळी गाजत असलेल्या ‘नाट्यदर्पण’ रजनीतून झालेला. सुधीर दामले यांच्या या ‘रजनीत’ एका सौंदर्यस्पर्धेत ‘दिप्ती प्रथमळकर-पटेल लुमुंडा’च्या मुखवट्यात ते प्रगटले. दरवर्षी अशी भन्नाट पात्रे ‘रजनी’त प्रगटली. त्यात कृष्णराव हे देखिल गवसले! एकापेक्षा एक वेगळ्या व्यक्तिरेखांना एका सूत्रात मांडून ही ‘हसवाफसवी’ तयार झाली. दिप्ती, कृष्णराव प्रिन्स पिन् पिन्, चिमणराव, बॉबी मॉड नाना पुंजे – यांनी ही ‘हसवणूक’ रंगतदार केली. खूद्द एकेठिकाणी प्रभावळकर म्हणतात- ‘यातील भूमिकांमुळे इतकी अस्वस्थता आणि समाधान मला या आधीच्या कुठल्याच भूमिकेनं दिलं नव्हतं. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्यातल्या नटसम्राटाचे भरभरून कौतूक केले होते. ‘एक उच्च दर्जाची निखळ करमणूक आणि अभिनयाचे प्रत्ययकारी दर्शन’ – असेही डॉक्टर म्हणाले होते!

  ‘पु.ल. देशपांडे लिखित आणि प्रा. वामन केंद्रे दिग्दर्शित ‘एक झुंज वाऱ्याची’ हे एका प्रकल्पातलं नाटक. मूळ रशियन नाटकाचे हे रुपांतर. ‘एनसीपीए’ची निर्मिती होती. १९८८चा सुमार होता. नाट्यगुरु डॉ‌. कृ. रा. सावंत यांच्यासोबत एक अभ्यासाचा भाग म्हणून हे नाटक बघण्याचा योग आला. नाटकावर आणि त्यातील ‘कॉमनमॅन’ उर्फ ‘माणूस’ या भूमिकेवर बराच विचार झाला. त्यातील एका माणसाची भूमिका म्हणून प्रभावळकर कायम मनात भरले. ‘अभिनयाचे बारकावे’ विसरता येणे शक्य नाही. जवळजवळ ३५वर्षे उलटली तरी हे नाटक पक्के स्मरणात आहे. आजही या नाटकाचे काही प्रयोग सूरु आहेत. नाट्यअभ्यासकांना तसेच कलाकारांनाही या नाटकातून बरच काही शिकण्यासारखं आहे. गंभीर विषयाचे नाटक असलं तरीही त्याची पकड जबरदस्तच. जी यातील ‘कॉमनमॅन’ने जणू सिद्ध केली. या नाटकावर प्रत्यक्ष पुल देशपांडे आणि वामन केंद्र यांच्याशी तेव्हा थेट संवाद साधण्याचीही संधी मिळाली होती. हे भाग्यच जसे!
  जयवंत दळवी यांचे ‘संध्याछाया’ हे नाटक. ‘सुयोग’ची निर्मिती आणि दिलीप कोल्हटकर याचे दिग्दर्शन. प्रभावळकर नाना आणि वंदना गुप्ते नानी. वयोवृद्ध दांपत्यांची कथा. या नानांनी रसिकांना रडविले. हेलावून सोडले. तो काळ काही वयोवृद्धांच्या भूमिका त्यांनी केल्या. वयोवृद्धांच्या हालचाली, उच्चार, देहबोली हे सारंकाही ‘नाना’ या भूमिकेत नेमकेपणानं भरल होतं. त्या भूमिकेशी नकळत रसिकांचं नातं हे जुळत गेलं.
  २०१० साली डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘वा गुरु!’ हे नाटक. जे त्यांच्या रंगभूमीवरले तसे शेवटचे नाटक ठरले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग हा युरोपियन मराठी संमेलनात ‘झुरिच’ येथे झाला. त्यातला एक म्हातारा शिक्षक त्यांनी  समर्थपणे उभा केला. त्यांच्यासोबत अतुल परचुरे, गिरीजा काटदरे, पौर्णिमा तळवलकर हे कलाकार होते. ‘सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी’ याची ‘युती’ असलेल्या ‘सुयोग’ने दिमाखात प्रयोग केले. सुयोगच्या २६ वर्षातलं हे ७५वे नाटक ठरले होते. नाटकात ‘गुरु’ असलेला आणि डोळ्यासमोर मरण असतांनाही विद्यार्थ्यांना कसंकाय आदर्श जगायचंही शिकवण देतो. याचा शुभारंभ परदेशी झाल्याने ग्रुपचा उत्साह वाढल्याचे आठवते. याचे मोजके प्रयोग झाले होते. ही ‘हटके’ नाट्यकृती होती.

  उदय नारकर याचं आप्पा आणि बाप्पा; पुलंची बटाट्याची चाळ; सई परांजपेंचे नांदा सौख्यभरे; रत्नाकर मतकरीचे जावई माझा भला; मधुकर तोरडमल याचे कलम ३०२, विजय तेंडुलकरांचे एक हट्टी मुलगी; मतकरींचं घर तिघांचं हवं, दळवींचे नातीगोती, सुरेश खरे यांचे पप्पा सांगा कुणाचे? तेंडुलकरांचे विठ्ठला, बबन प्रभू यांचे पळा पळा कोण पुढे पळे तो ! मुकुंद टाकसाळेंचे कशात काय फाटक्यात पाय! मतकरींचे आरण्यक…. यादी अपूर्ण राहील. एकसें बढकर एक भूमिका या श्रेष्ठ कलाकारांनी रंगविल्या आहेत. मराठी रंगभूमी त्यातून अभिनयसंपन्न केली. प्रभावळकरांनी साकार केलेल्या भूमिकांवर ‘प्रबंध’ होऊ शकेल येवढी त्यात विविधता भरली आहे.
  पुलं म्हणतात तेच खरें! मराठी रंगभूमीवर प्रभावळकर यांनी अक्षरशः अभिनयाचे सर्वांगसुंदर रान पेटविले आहे!! जीवनगौरव पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन!!

  – संजय डहाळे
  sanjaydahale33@gmail.com