दोस्तांची दिवाळी…

दिवाळीमध्ये तेजोमयी कॉलनीतील तिच्या सर्व मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू द्यायची. त्यासाठी ती प्रत्येकाच्या घरी जात असे. सोबत अर्थातच अलेक्झांडर असायचा. त्याला तेजोमयीचं असं भेटवस्तू देणं भारी आवडायचं. मोठ्या कौतुकाने तिच्याकडे बघून तो शेपूट हलवायचा. यंदाच्या दिवाळीत दोन-तीन दिवसात तिने सर्व मित्रमैत्रीणींना भेट वस्तू दिल्या. या सदनिकेतून त्या सदनीकेकडे जात असताना, अलेक्झांडरला त्याचे मित्र भेटले. एकमेकांना बघून शेपूट हलवत नि जिभ लांब करुन प्रत्येकाने आनंद व्यक्त केला

  रश्मीच्या घरी तेजोमयी गेली तेव्हा, तिने दार उघडताच त्यांचा शेपूटवाला दोस्त पिटरने उड्या मारुन तिचे आणि अलेक्झांडरचं स्वागत केलं. तेजोमयीने रश्मीला भेटवस्तू दिली. ही भेटवस्तू ती बाजूला ठेवणार तोच पिटरने त्यावर झडप घातली. ते बघून अलेक्झांडरने त्याच्यावर उडी घेतली. पिटरचा असा हावरटपणा त्याला आवडला नाही. पिटरवर, अलेक्झांडरने उडी मारल्याने त्याचा तोल गेला. या गडबडीत ती भेट वस्तू खाली पडली. त्यात सुंदर फ्लॉवर पॉट असल्याचं तेजोमयी म्हणाली. बॉक्स खाली पडल्यावर फुटल्याचा आवाज आला. तो फ्लॉवर पॉट कदाचित फुटला असावा.

  अशी गडबड करणाऱ्या पिटरवर रश्मी चांगलीच रागावली. बाजूची स्केलपट्टी घेऊन तिने पिटरला एक रट्टा दिला. बिच्चारा कुईकुई करत मटकन खाली बसला. या प्रकाराने अलेक्झांडर भांबावून गेला. भेदरलेल्या नजरेने कधी तो रश्मीकडे बघायचा, तर कधी तेजोमयीकडे. रश्मी आपल्याही रट्टे देते की काय, अशी भीती त्याला वाटू लागली. तो तेजोमयीचा फ्रॉक पकडून तिला दरवाजाबाहेर ओढू लागला.
  ‘अरे मी, तुला काही करणार नाही’, असं रश्मी दोन-तिनदा त्याला म्हणाली. पण त्याचं काही समाधान झालं नसावं. तो सारखा तेजोमयीला बाहेर ओढत होता. इथून पटकन जायला हवं, अशी त्याची कृती होती. आता, इथे थांबण्यात काही अर्थ नाही हे तेजोयमीच्या लक्षात आलं. त्यामुळे ती अलेक्झांडरला घेऊन बाहेर पडली. दोघेही घरी आले. घरी, तेजोमयीने रश्मीकडे काय घडलं, ते आईबाबास सांगितलं.

  ‘तुझ्या लाडक्यानेही आगावूपणा केलाच की तिथे. काय गरज होती पिटरवर उडी मारण्याची?’ बाबा आईकडे बघत म्हणाले.
  ‘बाबा मला वाटतं, अलेक्झांडरला रागावणं बरोबर नाही. त्याचं काय चुकलं? मी दिलेली भेटवस्तू हिसकावू पाहणाऱ्या पिटरला त्याला थांबवयाचं होतं.’ तेजोमयीने अलेक्झांडरची बाजू घेतली.
  ‘उगाचच ठोंब्याला कशाला रागवायचं? चुकलं ते आपलचं ना.’ आईने अलेक्झांडरची बाजू घेतली.
  ‘काय चुकलं आपलं?’ तेजोमयी आणि बाबांनी एकाच वेळी विचारलं.
  ‘अहो, जसं आपण तेजोमयीच्या मित्र मैत्रिणींना भेटवस्तू देतो, तसंच अलेक्झांडरच्याही मित्रांना द्यायला नको का?’
  ‘आँ!’ बाबांनी आ फाकला.
  ‘म्हणजे गं काय आई?’ तेजोमयीनं विचारलं.
  ‘अगं, जशी तू रश्मीसाठी भेटवस्तू घेऊन गेलीस तशी पिटरसाठीही न्यायला नको का होतं. त्याला भेट मिळाली असती तर त्याने अशी गडबड केली नसती. बरोबर ना रे ठोंब्या?’ अलेक्झांडरला जवळ घेत आई म्हणाली. आई आपल्याला काहीतरी विचारतेय हे अलेक्झांडरच्या बरोबर लक्षात येतं. अशावेळी तो, ‘हो हो अगदी बरोबर’, अशा आशयाची मान हलवतो. जिभ लांब करतो.
  ‘बघा त्याला सुध्दा कळलय ते.’

  आता, नाही कळलं, हे बाबांना म्हणायची सोय नव्हती. ते तत्काळ तेजोमयीस घेऊन जवळच्या पेट मॉलमध्ये गेले नि तेजोमयीच्या ज्या मित्र-मैत्रिणींकडे डॉगी आहे, त्या सर्वांसाठी खेळणी घेतली. घरी आल्यावर आईने, ‘ही खेळणी तुझ्या मित्रांसाठी बरं का?’ असं अलेक्झांडरला सांगितलं. त्याला ते कळलं असावं. त्याने प्रेमाने आईचा गाल चाटला.
  दुसऱ्या दिवशी तेजोमीयने अलेक्झांडरच्या गळ्यात एक पिशवी अडकवून त्यात खेळणी टाकली. अलेक्झांडर स्वारी, फारच खूष झाली. सगळ्यात आधी तेजोमयी रश्मीच्या घरी गेली. रश्मीने दार उघडताच पिटर समोर आला. त्याचे लक्ष अलेक्झांडरच्या गळ्यातील पिशवीकडे जाताच तो चुळबूळ करु लागला.

  ‘अरे बाबा, तुझ्यासाठी अलेक्झूने आणलेली भेट वस्तू आहे, त्यात.’ असं त्याला समजावत तेजोमयी म्हणाली. तिने पिशवीतून एक खेळणी काढून ती पिटरला दिली. खेळणी बघून पिटर आनंदाने उड्या मारु लागला. हे बघून अलेक्झांडरही शेपूट हलवून आपला आनंद व्यक्त केला. अलेक्झांडरच्या प्रत्येक मित्राने खेळणी मिळाल्यावर असाच आनंद व्यक्त केला.
  यापुढे दरवर्षी अलेक्झांडर त्याच्या मित्रांना माझ्यासोबच दिवाळीत भेट वस्तू देणार हे तेजोमयीने घरी आल्यावर घोषित करुन टाकलं.

  – सुरेश वांदिले