द्रमुकचं उफाळून आलेलं हिंदी प्रेम

दक्षिण भारतातील पक्षांचं प्रादेशिक भाषेचं प्रेम किती पराकोटीचं असतं आणि त्यांचा हिंदीद्वेषही किती टोकाचा असतो, हे वारंवार प्रत्ययाला आलं आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत अन्य नेत्यांनी हिंदी किंवा इंग्रजीत माध्यमांशी संवाद साधला असताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मल्याळीतून माध्यमांशी बातचित केली. आता त्याच द्रमुकनं हिंदी, मराठी, गुजराती तसंच उत्तर भारतातील अन्य भाषांतून जाहिराती द्यायला सुरुवात केली आहे. तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रविड मुनेत्र कळघमनं अलीकडंच त्यांच्या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर हिंदीमध्ये पोस्ट टाकून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. यामुळं हिंदी विरोधकांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच; पण हिंदीप्रेमीही याचा आनंद घेत आहेत आणि याला स्वागतार्ह पाऊल म्हणावं लागेल.

    हिंदीविरोधी आंदोलनामुळं द्रमुक चर्चेत आला होता. १९६५ पासून द्रविडी पक्षांचं राजकारण हिंदीद्वेषावर आधारित होतं. पराकोटीचा हिंदीद्वेष हा त्या पक्षांचा राजकारणाचा पाया होता. द्रविडी पक्षांचा भाषाभिमान टोकाचा होता. संसदेत किंवा अन्यत्रही तिथले लोक तमिळी किंवा मल्याळी भाषेतच व्यवहार करतात. अगदी बाहेरच्या राज्यांतून आलेल्यांना काय माहिती हवी असेल, तरी ते संवाद स्थानिक भाषेतच करतात. समोरच्याला ती भाषा समजो अथवा न समजो; परंतु त्यांना त्याचं काहीही देणंघेणं नसतं. पुरोगामी विचाराचे असल्याचा एकीकडं दावा करताना दुसरीकडं सनानत वृत्तीचा ते विरोध करीत होते. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी नुकतंच सनातन धर्माविरोधात कडवट भाषा वापरली होती. त्यावरून ‘इंडिया’ आघाडी अडचणीत आली होती. भाजपनं त्याचा देशभर गवगवा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून अजूनही लोकसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, असं ध्वनित केलं आहे.  या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपूर्वी उत्तर भारतातील हिंदी भाषक वृत्तपत्रांत द्रमुक सरकारच्या पानभर जाहिराती दिसल्यानं अनेकांचे डोळे विस्फारले नसते, तरच नवल. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा तसंच अन्य राज्यांतील सरकारांच्या जाहिराती अन्य भाषेतील वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असतात. आता द्रमुकच्या जाहिराती अन्य राज्यांतील माध्यमांत दिसल्या. त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘स्टॅलिन या भूमीवर राज्य करत आहेत, तोपर्यंतच महिलांना मासिक अनुदान मिळेल.’ सनातन धर्मावरील द्रमुकच्या टिप्पण्यांवरून झालेल्या व्यापक वादानंतर पक्षाचं हे पाऊल प्रतिमा सुधारण्यासाठी आहे का? पक्षाची भूमिका अचानक बदलण्याचं कारण काय? या प्रश्नांच्या उत्तरातून हे समजू शकेल. या ट्वीटची वेळ पाहता हे समजू शकतं, की स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं केवळ द्रमुकच नाही तर विरोधी पक्षांची नव्यानं स्थापन झालेली ‘इंडिया’ आघाडीही बॅकफूटवर आली आहे. त्यामुळं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे ट्वीट आवश्यक होतं. कारण स्टॅलिन यांना वाटलं, की त्यांचे वन-लाइनर विधान कठोर झालं आहे. अण्णादुराई यांच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय सामाजिक कल्याणकारी योजनेचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हे विधान केलं. स्टॅलिन यांचा वन लाइनर आणि तमिळमध्ये व्हिडीओ पोस्ट करण्याची द्रमुकला इतकी घाई का झाली? तमिळनाडूतील राजकीय निरीक्षकांचं असं मत आहे, की मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी यांनी उपस्थित केलेल्या सनातन धर्म वादावर सामान्य लोकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष कमी करण्यासाठी द्रमुकनं हिंदीमध्ये पोस्ट केलं आहे.

    गेल्या दोन महिन्यांपासून तामिळनाडू सरकार मोठ्या प्रमाणावर वाचल्या जाणाऱ्या हिंदी दैनिकांमध्ये हिंदी जाहिराती प्रसिद्ध करत आहे. शिवाय, द्रमुकनं फेसबुकसारख्या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मवर भरपूर हिंदी मजकूर पोस्ट करणं सुरू केलं आहे. द्रमुकचा हा उत्तर भारतीयांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षांपासून रोजगारानिमित्त तमिळनाडूत स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांचे नातेवाइक अजूनही उत्तर भारतात राहतात. त्यांना आपलंसं करण्यासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीसाठी मतांची बेगमी व्हावी,हा प्रयत्न द्रमुकचा प्रयत्न आहे. केंद्रात विरोधी ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आली, तर त्याला पुरेसं महत्त्व मिळेल? याचा अर्थ द्रमुक आपल्या हिंदीबाबतच्या भूमिकेशी तडजोड करेल का? योगायोगानं ही पोस्ट द्रमुकनं हिंदी दिवसानिमित्त अपलोड केली होती. हे उल्लेखनीय आहे, की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राजभाषा विभागाद्वारे १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. तामिळनाडूमधील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षानंदेखील द्रमुकच्या हिंदीतील पोस्टिंगचं स्वागत केलं आहे आणि म्हटलं आहे, की हृदयपरिवर्तन नेहमीच स्वागतार्ह आहे. उल्लेखनीय आहे, की २०१९ च्या हिंदीदिनाच्या दिवशी, गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘हिंदी ही देशातील सर्वात जास्त वाचली आणि समजली जाणारी भाषा आहे’ या विधानावर स्टॅलिन यांनी ‘हा भारत आहे, हिंदी नाही’ असा प्रतिवाद केला होता. स्टॅलिन यांचे वडील आणि द्रमुकचे संस्थापक करुणानिधी यांचा हिंदीला असलेला विरोध सर्वश्रुत होता. हिंदी भाषिक नसलेल्यांवर हिंदी लादल्याचा आरोप करत त्यांनी हिंदीला विरोध केला होता; पण आता द्रमुक हिंदीत पोस्ट करत असताना, तामिळनाडूचा विरोधी पक्ष भाजप आश्चर्यकारकपणे त्याचं स्वागत करत आहे, तो याकडं सकारात्मक बदल म्हणून पाहत आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नारायणन तिरुपती यांनी या हिंदी पोस्टवर म्हटलं, की अशा हृदयपरिवर्तनाचं नेहमीच स्वागत आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही सनातन धर्म वादावर एक निवेदन देऊन ‘यू-टर्न’ घेतला आहे. ते म्हणतात, की भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घोटाळ्यावरील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) च्या अहवालावरून भाजप जनतेचं लक्ष वळवत आहे. स्टॅलिन यांनी आपल्या प्रवक्त्याला चिरंतन वादात न पडता भाजपच्या अपयशावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. उदयनिधी यांनी असंही म्हटलं होतं, की ‘कॅग’च्या अहवालावर भाजप गप्प आहे. त्यात ७.५ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्याच दिवशी, एम. के. स्टॅलिन यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी त्यांच्या पक्षाच्या ३३ खासदारांच्या बैठकीला संबोधित करताना, कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चेदरम्यान भाजपच्या चिथावणीला बळी पडू नका, असा इशारा दिला. त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना भाजपच्या भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
    कोवई सथ्यानसारख्या अण्णाद्रमुक नेत्यांनी टिप्पणी केली, की द्रमुक आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्यातून बाहेर पडण्याचा हताश प्रयत्न करत आहे. त्यामुळं द्रमुकनं अचानक हिंदीत पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. अण्णाद्रमुकसह विरोधी पक्षांनी ओणमच्या दिवशी केरळवासीयांसाठी मल्याळममध्ये शुभेच्छा देणारा व्हिडीओ जारी केल्याबद्दल स्टॅलिनची खिल्ली उडवली आणि ते म्हणाले, की जर ते हिंदीमध्ये पोस्ट करू शकतात, तर गणेश चतुर्थी किंवा दिवाळी किंवा रामनवमीच्या शुभेच्छा उत्तर भारतीयांना का देऊ शकत नाहीत? याआधीही अण्णाद्रमुकचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी हिंदी भाषेबाबत तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) सरकारच्या दुटप्पीपणावर हल्ला चढवला होता.

    द्रमुकच्या हिंदी पोस्टवर ‘एक्स’ वापरकर्त्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी स्टॅलिनच्या व्हिडीओमध्ये हिंदी कॅप्शनच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, तर काहींनी उदयनिधीची जुनी छायाचित्रं शोधून काढली आहेत, ज्यामध्ये त्यांनी ‘हिंदी थेरियाथु पोडा (मला हिंदी येत नाही)’ असं घोषवाक्य असलेला टी-शर्ट घातलेला होता. द्रमुकच्या हिंदी पोस्टबद्दल लोकांची धारणा कशीही असली, तरी हे पक्षाच्या दृष्टिकोनात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. हिंदी भाषक प्रदेशातील लोक मोठ्या प्रमाणावर स्वागत करीत आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम १९६० च्या दशकात त्याच्या हिंदी विरोधी आंदोलनामुळं प्रसिद्धीझोतात आला होता. ‘एक्स’वर हिंदीमध्ये पोस्ट केल्यावर समर्थक आणि समीक्षक दोघांचंही लक्ष वेधून घेतलं. स्टॅलिन आणि यांचा पक्ष बंगाली, ओरियामधील प्रसाराला पाठिंबा देत राहतील का हे पाहणं बाकी आहे.

    – भागा वरखडे
    warkhade.bhaga@gmail.com