doctor babasaheb ambedkar

बाबासाहेबांना जाऊन आज ६४ वर्षे झालीत(mahaparinirvan din). ६ डिसेंबरला सर्व जगभरात बाबासाहेबांच्या(dr. babasaheb ambedkar) स्मृतीस या दिनी अभिवादन केले जाते.

आमदार अमोल मिटकरी
बाबासाहेबांना जाऊन आज ६४ वर्षे झालीत(mahaparinirvan din). ६ डिसेंबरला सर्व जगभरात बाबासाहेबांच्या(dr. babasaheb ambedkar) स्मृतीस या दिनी अभिवादन केले जाते. भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता त्यांना बरं वाटावं व भविष्यात त्या बरं वाटण्याचं रूपांतर मतांमध्ये परिवर्तीत व्हावं यासाठी राजकीय लालसेपोटी ‘महापरिनिर्वाण दिनी’ राजकीय मंडळी व त्यांचे चेले चपाटे अभिवादन करताना दिसतात.

या अभिवादनाचे स्वरूप होर्डिंग, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲपवरील संदेशातून आदरांजली देतानाचे असते. हल्ली बाबासाहेब व त्यांचा जयजयकार म्हणजे नेता बनण्याचा नवा ट्रेंड बनला आहे. विचारांपेक्षा विभुती पुजेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘आमचे बाबासाहेब व आमचे संविधान’ असे म्हणणाऱ्यांच्या अतिरेकामुळे मराठा, ओबीसी, आदिवासी व इतर जातींमधून बाबासाहेब दुरावल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे. तर दुसरीकडे, अनेकांनी विचारात नसला तरी आर्टीफिशीयल मूर्त्यांच्या माध्यमातून घर, इमारती, हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृह, बंगल्यात बुद्ध स्वीकारला, मात्र बाबासाहेबांना त्यांनी सोयीस्कर बाजूला सारले आहे, असे चित्र दिसते.

जातीअंताच्या लढ्याचे विचार व्यक्त करणारे व बेडगी पुरोगामीत्व स्वीकारून भाषणे ठोकणाऱ्यांच्या नजरेत बाबासाहेबांना कायम दुय्यमस्थान मिळाल्याचे जाणवते. त्यांनी निर्मिलेल्या भारतीय संविधानाची मूल्ये किती लोकांना समजली? हे न उलगडलेलं कोडे आहे. समानतेचा अधिकार प्रदान करणाऱ्या संविधानापेक्षा आम्हाला जातीव्यवस्था घट्ट करणाऱ्या पुराणपोथ्या व भाकडकथा अधिक महत्वाच्या आणि प्रिय वाटायला लागाव्यात इथेच या महामानवाचा पराभव आहे. परिणामत: अशातूनच धार्मिक अंतर बळावते आहे. सोशल डिस्टन्सिंग दिवसेंदिवस वाढत आहे.

त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास थोडी मागची पाने चाळावी लागतील. कोपर्डीच्या अमानुष व अमानवी घटनेनंतर महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातील तमाम दलित पुढाऱ्यांनीही या घटनेतील आरोपींना फसावर चढवण्याची मागणी केली होती. या प्रकरणात मराठा व दलित या दोन्ही समाजाने संयमाची भूमिका घेत पीडितेच्या कुटुंबियांची कर्तव्य भावनेतून भेट घेण्याचे प्रयत्न केले होते. काही मराठा नेते भेटलेली मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींना जाण्यापासून परावृत्त केले. स्वत: देवेंद्र फडणवीस गेले खरे, मात्र दलितांच्या नेत्यांनी कोपर्डीला जाऊच नये, अशी खबरदारी ह्यांनी घेतली. त्यातून अप्रत्यक्षपणे मराठा व आंबेडकवादी अशी दरी निर्माण झाली.

कोपर्डी प्रकरणानंतर त्याविरोधात मोर्चे निघाले. नंतर लाखोंचे मूकमोर्चे, ठोक मोर्चे, ठिय्या आंदोलने अशा एकापाठोपाठ एक मोर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्या माध्यमातूनच पुढे मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा मुद्दा पुढे आला. त्याद्वारे हळूच मराठा समाजाला बाबासाहेबांच्या विचारापासून दूर ठेवण्याचा डाव यशस्वी झाला. दोन समाजात दरी रूंदावली. अनेक प्रसारमाध्यमांनी तर त्यात आणखी तेल आतले आणि परिणामत: बाबासाहेब अलीकडच्या काळात मराठा व मराठेत्तर समाजापासून दुरावले. तसेच ते पुतळ्यांत, विहारांतील मूर्त्यांत, भजनात, भाषणे-व्याख्यानात, गीतात मर्यादीत राहिले.

जात, धर्म, भाषा, वंश, प्रदेश अशाप्रकारचे भेदभाव लोकशाही राज्यात असूच नयेत ही ज्यांची भूमिका होती, त्या बाबासाहेबांना आज खऱ्या अर्थाने समजून घ्यायला हवे. विषमतावादाला तीव्र विरोध व मानवी नितीमुल्यांचा पुरस्कार हे ज्यांच्या विचारांचे सूत्र आहे, ते सर्वांनी अभ्यासले पाहिजे.

‘दलितांचं कैवारी’, ‘दलितांचे उद्धारकर्ते’, ‘दलितांचे प्रेरणास्थान’, ‘दलितांचे मसिहा’, ‘दलितांचे बाब’ ही त्यांची ओळख नाही. ओबीसीच्या हक्कासाठी कायेदमंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आता दलितेतरांनी समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.

बाबासाहेब व मराठा समाज
१९०७ साली मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या कौतुकासाठी आयोजित सत्कार सभेत त्यांना कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी उर्फ दादांनी स्वलिखित ‘भगवान बुद्धांचे चरित्र’ भेट म्हणून दिले. या क्षणापासून शाक्यकुळोत्पन्न सिद्धार्थ गौतम बुद्धांशी त्यांचे नाते जुळले. बुद्ध हे कृषक आहेत. ते वर्तमानात जगणारे आहेत. ते मानवी मुल्य जपणारे आहेत. म्हणून हा बुद्ध बाबासाहेबांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

केळुस्करगुरूजी जातीवंत मराठा. मात्र ते कृतीतही मराठाच होते. १९११ साली याच गुरूजींनी महाराज सयाजीराव गायकवाडांच्या आणि बाबासाहेबांच्या भेटीचा योग आणला. यातूनच मराठा नरेश सयाजीराव महाराजांनी दरमहा २५ रूपयांची शिष्यवृत्तीची तरतूद भीमरावांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी केली. नंतरच्या काळात महाराजांनी अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी दोन वर्षांसाठी वार्षिक २३० पौंडाची शिष्यवृत्ती मंजूर केली.

यानंतर छत्रपती शाहु महाराजांशी प्रत्यक्ष भेटीचा योग कोल्हापूरचे दत्तोबा पवार व दत्तोबा दळवी यांच्यामार्फत जुळून आला. अस्पृश्यांत जनजागृती करण्यासाठी शाहू महाराजांनी १९२० साली अडीच हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य केले अन् त्यातून ‘मुकनायका’चा उदय झाला. त्याचवर्षी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली शाहू महाराजांच्या पुढाकारातून ऐतिहासिक ‘माणगाव’ परिषद घडून आली. जिथे शाहू महाराजांनी ‘तुम्हाला तुमचा पुढारी मिळाला असून हेा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही’, असे जाहीर करत अस्पृश्यांना त्यांच्या मुक्तीसाठी ‘नेता’ निर्देशित केला.

छत्रपती शाहू महाराजांचे मुंबई परळ येथे जावून बाबासाहेबांना भेटणे, कोल्हापुरी जरीपटका घालून सोनतळी कॅम्पवर त्यांचा हार्दिक सत्कार करणे. त्यांच्या वैचरिक आंदोलनाला पाठबळ देणे. आर्थिक आधार देणे, त्यांच्या सामाजिक आंदोलनात भक्कमपणे पाठिशी उभे राहणे, त्यांचा पत्रव्यवहार इत्यादी घटना मराठा समाज आणि बाबासाहेबांचे नाते घट्ट करतात.

बाबासाहेबांचा पहिला पुतळा आणि तोही ते हयात असताना कोल्हापुरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल यांनी १९५० साली त्यांचा पहिला पुतळा उभारला. बागल हे मराठाच होते.

बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे बाबासाहेबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते, हे तर सर्वश्रृत आहे.  काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह असो वा सत्यशोधक केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आणि बागडे यांच्या देशाचे दुष्मन या गाजलेल्या खटल्यातून तिघांना निर्दोष सोडवून प्रतिगामी चळवळीच्या ठिकऱ्या उडवल्याची घटना असो, या साऱ्या घटनांमध्ये मराठा समाजाचे मोलाचे सहाकार्य बाबासाहेबांना लाभले. महाड सत्यागृहपूर्वी बाबासाहेब तीन दिवस रायगडावर मुक्कामी होते. त्यावेळी छत्रपती शिवरायांना त्यांनी अभिवादन करून ‘मनुस्मृती’ महाडला जाळून टाकली होती. बदलापूर व इतर अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्याच्या नोंदी आहेत.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वरादि संतांचे अभंगांचे दाखले मुकनायक, बहिष्कृत भारत या बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांमधील संपादकीय लेखांमध्ये अंतर्भुत असायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व मराठा समाजाचे विशेषत: पेशवाई बोकाळली असतानाच्या काळात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ओबीसी आरक्षण वा हिंदू कोडबिल हे मराठा-कुणबी समाजातील घटकांच्या व स्त्रियांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला ऐतिहासिक निर्णय होता. बाबासाहेबांचे हे ऋण कोण विसरू शकेल? आज त्या प्रज्ञासूर्याचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व मराठा समाजाच्या ऋणानुबंधाच्या आठवणी मनात जागल्याशिवाय राहात नाहीत.

मात्र आज या महामानवाच्या स्मृती जपतानाच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया! ही त्यांना खरी आदरांजली ठरेल!

हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे
तुमच्यामुळेच बाबा, मी श्वास घेत आहे
आलेच पिक नाही येथे समानतेचे
त्रासून लोकशाही गळफास घेत आहे.

–  लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.