नाट्यजागर : आठवणींचं जाळीदार पिंपळपान!

बारा वर्षांपूर्वी मराठी नाट्यसृष्टी भारावून गेली. थक्क झाली. दर्जेदार गाजलेली पाच जुनी नाटके ही ‘हर्बेरियम’ या संकल्पनेतून सुनील बर्वे यांनी रंगभूमीवर आणली. पुनरुज्जीवित नाटकांचा एक ‘इव्हेंट’च त्यातून आकाराला आला. आठवणीतल्या जाळीदार पिंपळपानाची तपपूर्ती होत आहे त्याचा हा जागर.

  दहा जुलै २०१० हा दिवस. माटुंग्याचं यशवंत नाट्यगृह. दुपारी ४ वाजता ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड सजवून दिमाखात लागलेला. नाटकाचा प्रयोग क्रमांक एक नव्हता. तर वसंतराव कानेटकर यांचं एकेकाळी गाजलेलं ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. फक्त पंचवीस प्रयोगापुरतं रंगभूमीवर प्रगटलं आणि मायबाप रसिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केलं. तिकीट न मिळाल्याने रसिकांची जमलेली तुफान गर्दी नाराज होऊन हताशपणे परततांना बघायला मिळाली आणि या दुर्मिळ अशा घटनेचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं.

  केवळ ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटकच नव्हे तर बाळ कोल्हटकरांचे ‘लहानपण देगा देवा’, अनिल बर्वे यांचे ‘हमिदाबाईची कोठी’, शाहीर साबळे यांचे ‘आंधळं दळतंय’, बबन प्रभू यांचे ‘झोपी गेलेला जागा झाला’ अशा गाजलेल्या पाच नाटकांनी मराठी रंगभूमीवर एकेकाळी इतिहास रचणाऱ्या अविष्काराचे ‘हर्बेरियम’ साधलं. त्याचा कर्ता-करविता होता रंगकर्मी सुनील बर्वे!

  त्याच्या संकल्पनेतून ‘जुनं ते सोनं’ हा योग जुळून आला. दहा जुलै २०२२ या दिवशी या घटनेला चक्क बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण होत आहे. ज्याची दखल नाट्यवाटचालीतल्या सुवर्णक्षणात निश्चितच घेतली जाईल, यात शंकाच नाही.

  बारा वर्षांपूर्वी जेव्हा सुनीलने ‘हर्बेरियम’ हा शब्द वापरला तेव्हा त्याचा शोध घ्यावा लागला. कारण हा इंग्रजी शब्द तसा परिचित किंवा वापरातला नव्हता. ‘अभ्यासासाठी वाळलेल्या पानांचा केलेला संग्रह!’ असा शब्दार्थ मिळाला. आता पुढला प्रश्न मनात उभा राहिला तो म्हणजे ‘जुनं ते सोनं’ असलेल्या नाटकांचे पंचवीसच प्रयोग का? पन्नास किंवा शंभर का नाहीत? त्याचंही स्पष्टीकरण सुनीलने दिलं.

  ते वर्ष हे त्याच्या नाट्य कारकिर्दीतलं रौप्यमहोत्सवी वर्ष होतं आणि या निमित्ताने काहीतरी लक्षवेधी रंगभूमीवर करण्याचा इरादा पक्का होता. त्यातूनच ‘हर्बेरियम’ ही संकल्पना आकाराला आली. त्याची ‘सुबक’ ही संस्था आणि हा नवा उपक्रम म्हणजे साऱ्या नाट्यसृष्टीला एक सुखद असा चमत्कारच ठरला. ‘पाच नाटकांचे पंचवीस प्रयोग’ ही कल्पनाच या क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींना सुचली नाही पण या गुणी धडपड्या चॉकलेट हिरोने ती साकार करून दाखविली.

  संगीतकार अशोक पत्की, कुमार गंधर्व, शाहीर साबळे, कमलेश भडकमकर, नेपथ्यकार प्रसाद वालावलकर, प्रदीप मुळ्ये, प्रकाशयोजनाकार रवी करमरकर, शितल तळपदे, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य, रंगभूषा-वेशभूषाकार पौर्णिमा ओक, अभय मोहिते, संयोगिता भावे, महेश शेरला, महेंद्र झगडे या पडद्यामागल्या तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांनीही ही पाच नाटके सजविली. नव्याची नवलाई त्यात होती.

  या तपपूर्तीतलं पहिलं नाटक – सूर्याची पिल्ले! वसंत कानेटकरांची संहिता आणि प्रतिमा कुलकर्णी यांचं दिग्दर्शन होतं. वैभव मांगले, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, उदय सबनीस, उज्ज्वला जोग, अतिशा नाईक, क्षिती जोग यांनी त्यात भूमिका केल्या होत्या. १० जुलै ते ३ ऑक्टोबर २०१० या कालावधीत त्याचे पंचवीस प्रयोग झाले.

  ‘सूर्याची पिल्ले’ याचं कथानक म्हणजे एक दर्जेदार विडंबनाच! एका मोठ्या माणसाची मुलं ही आपल्याकडेच सारा वारसा आलेला आहे, अशा भ्रमात असतात. त्यावेळी छोटा मुलगा एक युक्तीकरून साऱ्यांचे डोळे उघडतो आणि एक कुटुंबाची नवीन व्यवस्था लावतो, या वनलाईनवर यातलं कथानक गुंफलेलं.

  दुसरं नाटक होतं – ‘लहानपण देगा देवा’ बाळ कोल्हटकर यांचे गाजलेलं नाटक. मंगेश कदम यांना याचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. अर्थात त्यांनी त्याचे सोनं केलं. एक नाट्यपर्व जागं झालं. जयंत सावरकर, मंगेश कदम, स्पृहा जोशी, सचिन सुरेश, शिल्पा तुळसकर आणि शरद पोंक्षे ही ‘टिम’ अवतरली! सत्तरीच्या दशकातलं जरी हे नाटक असलं तरी त्यातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा आणि बोलके संवादही आकर्षणे होती. शरद पोंक्षे यांनी केलेली अनंत उत्पात याची भूमिका गाजली.

  जयंत सावरकर या ज्येष्ठ अभिनेत्यांची काळजी सारेजण घेताना पडद्यामागे दिसत होते. स्वतः सुनील आणि त्याची पत्नी यांनी या उपक्रमात ‘निर्माते’ म्हणून भूमिका न स्वीकारता कुटुंबसदस्य म्हणून विनम्रतेने वर्तन केले. जो जिव्हाळा लाखमोलाचा.
  ‘हमिदाबाईची कोठी’ हे या संकल्पनेतलं तिसरं नाटक. अनिल बर्वे यांचे लेखन आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन दिले.

  नीना कुलकर्णी, संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, स्मिता तांबे, मंगेश सातपुते, विकास पाटील, शशांक केवल हे रंगकर्मी यात होते. २६ फेब्रुवारी २०११ ते २९ मे २०११ पर्यंत यांचे २५ प्रयोग झाले. १० जून १९७८ या दिवशी माऊली प्रॉडक्शनने याचा शुभारंभी प्रयोग केला होता. ज्याचे दिग्दर्शन विजया मेहता यांचे होते. स्वतः त्यांनी हमिदाबाईची मध्यवर्ती भूमिकाही केलेली. नाना पाटेकर यांचा सत्तार, नीना जोशी यांची शब्बो, अशोक सराफ यांचा लुक्का, भारती आचरेकरांची सईदा या भूमिका अक्षरशः जिवंत वाटल्या.

  महाराष्ट्र शाहीर साबळे यांचे ‘आंधळ दळतंय’ मराठी रसिकांना विसरणे शक्य नाही. १३ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर २०११ या दरम्यान याचे प्रयोग झाले. शाहिरांचा नातू केदार शिंदे याची ‘शाहिरा’ची भूमिका आणि दिग्दर्शन होते. प्रिया बेर्डे, डॉ. निलेश साबळे, संजय इंगळे यासह बारा जणांची टिम रंगभूमीवर सज्ज झाली. १३ ऑगस्ट १९६६ या दिवशी या मुक्तनाट्याचा शुभारंभ झाला आणि नेमका ४५ वर्षानंतर १३ ऑगस्ट २०११ या दिवशी या संकल्पनेत प्रयोग झाला. हाही योगायोगच!

  फार्ससम्राट बबन प्रभू लिखित ‘झोपी गेलेला जागा झाला’. ही पाचवी नाट्यकृती या मालिकेत निवडली गेली आणि सुनील बर्वे आणि भरत जाधव यात प्रगटले! विजय केंकरे यांचं दिग्दर्शन याचा पंचविसावा प्रयोग झाला तेव्हा २६ जानेवारी २०१२ हे वर्ष उजाडलं होतं. इंडियन नॅशनल थिएटरने १९५९ साली सर्वप्रथम या फार्स रंगभूमीवर आणला. वैशिष्टपूर्ण असलेला तसा हा मराठीतला शैलीदार पहिला फार्स! दिग्दर्शन आत्माराम भेंडे यांचे. दिनू आणि विनू म्हणजे बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे या दोघांनी एकच धम्माल केली होती.

  ‘हर्बेरियम’ संकल्पनेत विजू खोटे, सतीश पुळेकर, संपदा कुलकर्णी, संतोष पवार, भार्गवी चिरमुले ही मंडळी भरत जाधव-सुनील बर्वे यांच्यासोबत होती. भरतने या प्रयोगासाठी रत्नागिरीतील शूटिंग संपवून स्वतःच्या गाडीने अनेकदा मुंबईतले नाट्यगृह गाठले होते. सतीश पुळेकरनेही दरवर्षीची त्याची अक्कलकोटची ‘वारी’ रद्द केली. संतोष पवारनेही त्याची अनेक कामे या नाटकासाठी सोडली होती.

  ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकाच्या बोरिवलीतल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात प्रयोग होता. त्यावेळी बुकींगसाठी पहाटे पाचपासूनच चक्क रांगा लागल्या होत्या. तिकीटांची ‘ब्लॅक’ने विक्री झाली… याला काय म्हणावे?

  पाचही प्रयोग बुकींगमध्ये हाऊसफुल्ल! पत्रकार, समीक्षक यांनाही काहीदा विंगेतून नाटक बघावे लागले. ‘फ्रीपास’ पूर्णपणे बंद असूनही ‘व्हीआयपी’ वाढतच होते… याला काय म्हणावे?

  नाटक, सिनेमा, मालिकेतले बिझी कलाकार हे पंचवीस प्रयोगापुरते एका नाटकासाठी महाराष्ट्रात आणि विदेशातही एकत्र जुळवून आणतांना कधीही ‘अशक्य’ किंवा ‘प्रयोग रद्द’ झाला नाही… याला काय म्हणावे?

  याच आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे मराठी माणूस दर्जेदार नाट्यकृतींचे मनापासून स्वागत करतो. ‘नाटक’ या कलेवर त्याचे प्रेम आहे. त्यात जुनं ते सोनं हेच खरंय!

  सुनील बर्वे यांना एक प्रश्न बारा वर्षांपूर्वी विचारला होता तो म्हणजे – ‘हर्बेरियम’चे दुसरे पर्व कधी? त्यांनी याचे उत्तर अजूनही दिले नाही! त्या प्रतिक्षेत रसिकराजा आजही आहे.

  संजय डहाळे

  sanjaydahale33@gmail.com