inspiration to children

    अठरा वर्षांची क्रिस्टीना म्हणते: “माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहन दिलं, असं फारच कमी वेळा घडलं आहे. ते नेहमी माझ्या चुकाच शोधत असतात. मी समजूतदारपणे वागत नाही असं ते मला म्हणतात आणि मी किती जाड आहे याची ते मला सतत आठवण करून देतात. हे सगळं ऐकून मला वाईट वाटतं. त्यांचे शब्द माझ्या मनाला खूप लागतात आणि मी रडतेसुद्धा. त्यामुळे मी त्यांच्यासोबत बोलण्याचं टाळते. माझी काहीच किंमत नाही असं मला वाटतं.” खरंच, जीवनात प्रोत्साहन मिळणं किती गरजेच आहे, नाही का? आपल्या सर्वांनाच प्रोत्साहनाची गरज आहे. आणि खासकरून आईवडिलांनी आपल्या मुलांना नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिमथी इवान्स नावाचे एक शिक्षक असं म्हणतात: “ज्या प्रकारे रोपट्याला पाण्याची, त्याच प्रकारे मुलांनाही प्रोत्साहनाची गरज आहे.” ते पुढे असं म्हणतात: “प्रोत्साहनामुळे मुलांना याची जाणीव होते की इतर जण आपली किंमत आणि कदर करत आहेत.” आपण “शेवटल्या काळी” जगत असल्यामुळे, लोक स्वार्थी आणि “ममताहीन” झाले आहेत. काही असेही आहेत ज्यांना लहानपणी त्यांच्या आईवडिलांकडून प्रोत्साहन मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनाही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणं फार कठीण जातं. मोठ्यांनाही प्रोत्साहनाची गरज आहे. पण, पाहायला गेलं तर असं खूप क्वचितच घडतं. उदाहरणार्थ, अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, कामाच्या ठिकाणी ते जी मेहनत घेतात त्याबद्दल कधीही त्यांची प्रशंसा केली जात नाही.

    मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. एकमेकांशी प्रेमाची नाती सांभाळत जगत असतो. या संबंधांमध्ये जशी प्रेमाची, आपुलकीची आवश्यकता आहे तशीच एकमेकांना प्रोत्साहन देण्याची ही गरज आहे. जगातील सगळ्यात मोठी भेटवस्तू म्हणजे प्रोत्साहन देणं. जेव्हा आपण एखाद्या निराश झालेल्या व्यक्तीला प्रोत्साहन देत असतो, तेव्हा ती व्यक्ति निराशेच्या दरीतून आपल्या प्रोत्साहनाचा हात पकडून वर येत असते. आपलं प्रोत्साहन त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी काही प्रमाणात बळ देण्याचं काम करतं. जसे एखादे रोपटे पाण्याशिवाय मरगळून जाते पण पाणी मिळाल्यावर ताजे टवटवीत होते, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ति उदास, हताश झालेली असेल तिला जर आपण प्रोत्साहनाचे काही शब्द बोलले तरी त्यांच्यामध्ये नवचेतना आणण्यास मदत होते. जे असंभव वाटत होते ते आता शक्य वाटू लागते. एखादी इमारत बनवताना ही सीमेंट, दगड, माती, लाकूड यांचा वापर केला जातो. आपण बघितले असेल की लाकडाचे खांब आधारासाठी वापरले जातात. काही वेळानंतर त्यांचा आधार काढून टाकला जातो. तसेच प्रोत्साहन देणे म्हणजेच आधार देणे होय. तात्पुरती केलेली ही मदत व्यक्तिच्या भविष्याची इमारत उभारण्यास एक सहयोग असतो. हा सहयोग तात्पुरता असला तरी मोलाचा ठरतो. म्हणून आयुष्यात कधीही कोणाला प्रोत्साहन देण्याबाबत कंजूषी करु नका. कारण प्रोत्साहनच स्मृतीत कायम राहतं आणि मग प्रोत्साहन देणारी व्यक्ति कायमची हृदयात कोरली जाते.

    प्रशंसा करताना प्रामाणिक रहा. कारण आज उगाच प्रशंसा करणाऱ्या लोकांची कमी नाही. म्हणून खास काही गोष्टींचा उल्लेख करा कारण असा उल्लेख केला तर समोरच्या व्यक्तीला आपण खरंच त्याच्या चांगल्या कामाची दाद देतोय हे लक्षात येते. त्याची निराश, उदास मनःस्थिति ठीक करण्यास मदत होते. कठीण प्रसंगी किंवा अशक्य वाटत असताना ज्या व्यक्तीमुळे ते शक्य झाले त्या व्यक्तीला आपण आपल्या जीवनात एक मनाचे स्थान देतो. जेव्हा जेव्हा आपल्या यशाची चर्चा होते तेव्हा तेव्हा आपण त्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद देतो. म्हणजेच प्रोत्साहन देणे म्हणजे अनेक आशीर्वाद जमा करणे होय.

    आपलं आपल्या कुटुंबीयांवरील प्रेमदेखील व्यक्त करणं आवश्यक असतं. काही व्यक्तींना प्रेम बोलून दाखवल्यानं समजतं. म्हणजेच या व्यक्तींना भावना प्रेमळ शब्दातून व्यक्त केलेल्या आवडतात, तेव्हा अशा व्यक्तींशी आपलं प्रेम शब्दातून व्यक्त करावं. यामुळे नाती दृढ होतात. काही जण प्रेम करतात पण व्यक्त करण्यात कंजूषी करतात त्यामुळे नाती दुरावली जातात. म्हणून जे मनात आहे ते शब्दात उतरवा. असं पण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो त्यांच्यापासून भावना लपवण्यात काही अर्थ नाही. नात्यांमध्ये प्रेमाची देवाण घेवाण करणं हे सुद्धा नात्याला पुढे नेण्यास प्रोत्साहनच म्हणायला हवे. तेव्हा समोरच्याला पाऊल पुढे टाकण्यास बळ मिळते. प्रोत्साहन हे संजीवनी बुटीसारखे आहे, कमजोर मनाला मजबूत करण्याचे काम करते. म्हणून प्रोत्साहनाची बुटी सर्वांना द्या.

    – नीता बेन