स्मार्ट यंत्राची भीती

  बाबांनी घर स्वच्छ करणारं नवं स्मार्ट यंत्र आणलं. त्याला सूचना देता यायचं. जसं की, अरे, सकाळी सहा वाजता तू बैठकीची खोली स्वच्छ कर. मग हे यंत्र बरोबर सकाळी सहा वाजता स्वच्छतेला लागणार. पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज भासायची नाही.

  हे स्मार्ट यंत्र त्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे घरात फिरत राहायचं. त्याचं असं आपोआप फिरणं बघून अलेक्झांडर पहिल्याच दिवशी फार दचकला नि घाबरला. त्याने स्वत:ला आक्रसून घेतलं. आईचा पदर काही त्याने सोडला नाही. त्याचा चेहरा केविलवाणा झाला. आईच्या ते पटकन लक्षात आलं.

  आई, त्याला समजावत म्हणाली, ‘ठोंब्या, तू इतका शूर नि या यंत्राला घाबरतोस? ते काही करणार नाही. तुझ्यासारखच ते शहाणं आहे’. अलेक्झांडरने मान डोलावली. आईला वाटलं, गेली याची भीती.

  मात्र, तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी, स्मार्ट यंत्राचं घरभर फिरणं सुरु होताच अलेक्झांडर प्रचंड घाबरुन घरातून बाहेर धावला. या अवस्थेत त्याला पायऱ्या न दिसल्याने तो खाली घरंगळू लागला. तेजोमयीच्या ते लक्षात येताच ती ओरडली. आईबाबा धावत बाहेर आले. बाबा झपाझप खाली उतरले. पुढच्या पायरीवरुन खाली पडत असतानाच बाबांनी अलेक्झांडरला उचलून घेतलं. अलेक्झांडरचं सगळं अंग खरचटलं. जखमेतून रक्तही वाहू लागलं. आईने त्याला जवळ घेतलं. त्याला ती कुरवाळू लागली. अलेक्झांडर वेदनेने कुईकुई करु लागला.

  ‘बाबा, याला ताबडतोब दवाखान्यात न्यायला हवं,’ तेजोमयी म्हणाली.
  बाबांनी, शेजारच्या काकांना घराकडे लक्ष ठेवा म्हणून फोनवरुन सांगितलं. अलेक्झांडरला घेऊन ते तिघेही लिफ्टने खाली उतरले. बाबांनी गाडी काढली. सर्वजण थोड्याच अवधीत पशुवैद्यक दवाखान्यात पोहचले.

  बाबांचे मित्र तिथे डॉक्टर होते. अनेकदा ते तेजोमयीच्या घरी येत. त्यामुळे त्यांना अलेक्झांडरची चांगलीच ओळख होती. तोही त्यांच्या अंगावरचा होता. अलेक्झांडर खेळकर, धाडसी आणि गुणी असल्याचं त्यांना ठाऊक होतं. आज त्याला अशा स्थितीत बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी आधी काहीच विचारलं नाही. ताबडतोब अलेक्झांडरवर उपचार सुरु केले. त्याच्या जखमा स्वच्छ धुतल्या. त्यावर मलम लावला. पाण्यातून एक औषधही त्याला दिलं. अलेक्झांडर अजूनही घाबरलेलाच होता. डॉक्टरांनी त्याला जवळ घेतलं. ते त्याला थोपटू लागले. थोड्याचवेळात डॉक्टरांच्या कुशित अलेक्झांडर झोपी गेला.

  ‘काय हो, हे असं अचानक कसं काय घडलं?’ डॉक्टरांनी विचारलं. तेव्हा बाबांनी सगळं इथ्यंभूत सांगितलं.

  ‘अच्छा तर, अलेक्झूला नव्या यंत्राची भीती वाटते म्हणायची?’

  ‘भीती नाही, दहशत म्हणा डॉक्टर काका?’ तेजोमयी म्हणाली.

  ‘अरे बापरे! पण, कायहो, तुम्ही त्याला आधी समजावून सांगितलं नव्हतं का?’
  ‘म्हणजे?’ बाबांनी आश्चर्याने विचारलं.

  ‘काय समजावून सांगायला हवं होतं?’ आईनेही आश्चर्यानं विचारलं.

  ‘अहो वहिनी? हे असं यंत्र आणतोय, ते असं असेल, असा आवाज करेल, असं घरभर फिरेल, ते तुला काही करणार नाही, हे सांगायला हवं होतं ना तुम्ही.’
  ‘असंसुध्दा सांगायचं असतं का काका?’ तेजोमयीने विचारलं.

  ‘हो बाळ, असंसुध्दा सांगायचं असतं. मुक्या प्राण्यांनाही आपल्यासारख्या वेगवेगळया भावना असतात. त्यांच्यापुढे येणाऱ्या नवख्या गोष्टींची त्यांना खूप भीती वाटू शकते. ही नवी गोष्ट आपल्यासाठी हानीकारक असल्याचही त्यांना वाटू शकतं. अलेक्झांडरला तसं वाटलं असावं. त्याला तुम्ही आधीच नीट समजावून सांगितलं असतं तर, त्याची अशी स्थिती झाली नसती.’

  ‘त्याला आम्ही गृहीतच धरुन चालतो. चुकलच आमचं.’ आई रडवलेल्या स्वरात म्हणाली.

  ‘आता काय करायचं? डॉक्टर’, बाबांनी विचारलं.

  ‘त्याची भीती जाण्यासाठी अलेक्झांडरला आता त्या स्मार्ट यंत्राच्या दुकानात घेऊन जा. तिथे त्याला तशी अनेक यंत्र दाखवा. यंत्र दाखवता दाखवता त्याला सगळं समजावून सांगा. भीती बाळगायची नाही हे पुन्हापुन्हा सांगा. त्याने होकारार्थी मान हलवली नि शेपूट हलवली की मग त्याला विचारा, आपल्या घरी आणायचं का हे यंत्र?तो नक्कीच होकारार्थी मान हलवेल. मग आणा ते यंत्र घरी.’

  अलेक्झांडरला घेऊन आईबाबा आणि तेजोमयी घरी आले. पुढील काही दिवस स्मार्ट यंत्र बंदच ठेवण्यात आलं. लवकरच अलेक्झांडर नेहमीसारखा खेळू बागडू लागला.

  दरम्यान बाबांनी स्मार्ट यंत्र, ज्या दुकानातून विकत आणलं ते तिथे नेऊन ठेवलं. दुकानदारास त्यांनी सगळं काही समजावून सांगितलं.

  सात-आठ दिवसांनी आईबाबा आणि तेजोमयी अलेक्झांडरला घेऊन स्मार्ट यंत्राच्या दुकानात गेले. बाबांनी त्याला तिथे अनेक यंत्र दाखवले. एका ठिकाणी ठेवलेलं घरचं स्मार्ट यंत्र हातात घेतलं. अलेक्झांडरसमोर ते उघडलं. त्याचा पंजा त्याच्यावर ठेवला. हलकेच त्याचा स्पर्श अलेक्‍झांडरच्या त्वचेला केला. तेजोमयीने अलेक्झांडरची शेपूट यंत्राला लावली. या सगळ्यांची अलेक्झांडरला गंमत वाटली. त्याने दोन पायावर उभे राहून आपला आनंद व्यक्त केला. मग बाबांनी त्याच्यासमोर फतकल मारली नि स्मार्ट यंत्र त्याच्यासमोर ठेवून त्याला ते समजावू लागले. एखाद्या ग्राहकास विक्रेता जसे समजावून सांगतो ना अगदी तसं! अलेक्झांडरही मन लावून ऐकू लागला. ‘समजलं की मला. छान! वा वा!’ अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मानही डोलावू लागला. दुकानातली सगळी मंडळी आश्चर्यानं चौघांकडे बघू लागली.

  सगळं सांगून झाल्यावर बाबांनी अलेक्झांडरच्या डोळयात बघत विचारलं, ‘मग आणायचं का हे स्मार्ट यंत्र आपल्या घरी?’
  ‘ठोंब्या चालेलना रे, तुला? तू भीणार नाहीस ना?’ आईने त्याला कुरवाळत विचारलं. अलेक्झांडरने तेजोमयीकडे बघितलं. ती हसली. अलेक्झांडरने पुन्हा आनंदाने उडी मारली. त्याचा होकार मिळाल्याचं ते चिन्ह होतं.

  आता ते स्मार्ट यंत्र पुन्हा घरी आलय. त्याची घरघर सुरु झाली की अलेक्झांडरला आता भीती वाटत नाही. उलट त्याला आनंदच होतो. एखादे दिवशी सांगितलेल्या वेळात स्मार्ट यंत्राने घरघर केली नाही तर तो आता या यंत्रावर भुंकायलासुध्‍दा कमी करत नाही.

  – सुरेश वांदिले