वादांच्या विळख्यात फिल्मवाले…

जगभरात आपल्या भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट नेणारे, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या कलाकृतीची दखल घेण्यास यशस्वी ठरलेले असे बरेच आहेत. दुर्दैवाने त्यांना आजच्या एकूणच मीडियात म्हणावी तशी स्पेस व महत्त्व मिळत नाही. आजच्या डिजिटल युगात सबक्रायबर्स, लाईक्स, कॉमेन्टस खूपच महत्वाची गोष्ट झाली असून ते प्रामुख्याने अफेअर्स, कॉन्ट्रोव्हर्सीज, बॉलीवूड बॉयकॉट ट्रेण्ड यातून मिळतेय.

    प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘लावारीस’ (१९८०) प्रदर्शित झाल्यानंतरची एक आठवण. अमिताभ बच्चनच्या जबरदस्त क्रेझमुळे फर्स्ट शोपासूनच पब्लिकची हाऊसफुल्ल गर्दी. पहिला आठवडा पूर्ण होतोय तोच वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रात या चित्रपटातील ‘मेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है’ या गाण्यावरुन काही वाचक प्रेक्षकांचा नाराजीचा सूर उमटला.

    विशेषत: अमिताभने ज्या पध्दतीने स्त्रियांची रुपे धारण करुन नृत्य साकारले त्यावर भारी टीका होती. त्यांना ते वाह्यात, आक्षेपार्ह, अश्लील वाटले. तुलनेत राखीने साकारलेले हेच गाणे टीकेचा विषय ठरले नव्हते. काही दिवसांतच अमिताभच्या मेरे आंगने मे… गाण्यावरील नृत्यावर खरमरीत लेख, स्पेशल स्टोरीज, कव्हर स्टोरीज वाचायला मिळू लागल्या. या सगळ्याचा चित्रपटाच्या हाऊसफुल्ल गर्दीवर, या गाण्यावर, या चित्रपटाची तबकडी आणि ध्वनीफित विक्रीवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. मुंबईत मेन थिएटर अलंकारमध्ये पिक्चरने तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. तात्पर्य, उलटसुलट वादाच्या भोवऱ्यात ‘लावारीस’ सापडला नाही.

    आज काय दिसतेय? मनोरंजन क्षेत्राच्या वाटेला कशावरुन कसा, का आणि किती वाद येईल हे सांगता येईनासे झाले आहे. मनोरंजन क्षेत्र आणि वाद हे नाते तसे बरेच जुने आहे, आता त्याचा रंगढंग, आकार, स्वरुप, प्रभाव बदललाय आणि भविष्यात तो किती अक्राळविक्राळ रुप धारण करेल हे सांगता येत नाही. ‘बॉलीवूड बॉयकॉट’ हे त्याचे महाअस्र झाले आहे. सोशल मीडियातून त्याचा वेग वाढतोय आणि मनोरंजन क्षेत्र हतबल झाल्याचे दिसतेय.

    आमिर खानच्या ‘लालसिंग चढ्ढा’वर अतिशय टोकदार असा बॉलीवूड बॉयकॉटचा जबरदस्त प्रहार झाला. त्यात हा चित्रपट पूर्णपणे कोलमडून पडला. गंमत म्हणजे, या चित्रपटाच्या विरोधातील तीव्रता पाहून आमिर खान समर्थक चिडीचूप झाले. मग ते चित्रपटसृष्टीतील असो अथवा मीडियातील असो.. अशा परिस्थितीत कोणीही आपला बचाव करु शकत नाहीत या जाणिवेतून आमिर खान काही शिकला असेल असे समजूयात.

    शाहरुख खानचा ‘पठाण’ आता ‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिका पादुकोनच्या भगवी बिकीनी आणि या दोघांची काही वाह्यात प्रणय दृश्य यामुळे वादात सापडला. त्या वादातून हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा सूर उमटलाय. मराठीतील ‘हर हर महादेव’ वगैरे ऐतिहासिक चित्रपटातील काही संदर्भ चुकीचे आहेत यावर इतिहासप्रेमींचा तीव्र आक्षेप आहे.

    शाहरुखचा मुलगा आर्यन याच्याकडे क्रूझवरील पार्टीत सापडलेले नशिले पदार्थ हे मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटीजच्या मुलांच्या माॅडर्न लाईफ स्टाईलबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरले. या वादांची यादी आणखीन वाढवता येईलही. आता ते संपणार नाहीत. आणि कसे जन्माला येतील हे सांगता येत नाही. अशी आणि इतकी अवघड परिस्थिती निर्माण होत चाललीय. आश्चर्य वाटले ते रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) बद्दल इतक्या वर्षांनंतर आक्षेपार्ह काही वाटले. आपल्या देशात ‘शोले’ न पाहणारा चित्रपट रसिक सापडणे अवघड. तो चित्रपट आपल्या देशाची ‘लोककथा’ झाला आहे.

    या घडामोडीतून मनोरंजन क्षेत्राबाबत नकारात्मकता वाढीला लागलीय. हे एक कला क्षेत्र असून येथे अनेक लहान मोठ्या कला आणि विज्ञान यांचा एकत्रित परिणाम म्हणजे, चित्रपट, मालिका व वेबसिरिज आहे ही जाणीव धुसर होत गेली आणि हे क्षेत्र म्हणजे अवाढव्य पैसा, वाह्यातपणा, गैरवर्तणूक, बेशिस्त यांचा सुकाळ अशीच प्रतिमा गडद होत चाललीय. त्यामुळेच एकदा वाद उदभवतो तेव्हा त्यावर कमालीच्या तिखट प्रतिक्रिया उमटतात.

    एखाद्या सेलिब्रिटीजच्या कलाकृतीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना तो एकटाच म्हणजे तो चित्रपट नव्हे हे विसरले जाते. त्या कलाकृतीवर अनेकांनी अनेक प्रकारे काम केलेले असते. त्यावर अन्य कलाकार, तंत्रज्ञ व कामगार अवलंबून असतात हे कोणी लक्षातच घेत नाहीत. दुर्दैवाने आपल्या देशात चित्रपट माध्यम व व्यवसायाला एकशेदहा वर्षे होत आली तरी त्याची प्रतिमा प्रामुख्याने छंदीफंदी, टाईमपास, टपोरी, सहजपणे करोडोची उलाढाल होणारे क्षेत्र, पार्टीबाज, विवाहबाह्य संबंधाचा सुकाळ अशीच राहिलीय. अशा गोष्टी म्हणजे संपूर्ण मनोरंजन उद्योग नव्हे.

    आपल्या व्यक्तिरेखेवर अभ्यास करणाऱ्यांपासून सामाजिक हित सांभाळणारे असे अनेक जण येथे आहेत. जगभरात आपल्या भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट नेणारे, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या कलाकृतीची दखल घेण्यास यशस्वी ठरलेले असे बरेच आहेत. दुर्दैवाने त्यांना आजच्या एकूणच मीडियात म्हणावी तशी स्पेस व महत्व मिळत नाही. आजच्या डिजिटल युगात सबक्रायबर्स, लाईक्स, कॉमेन्टस खूपच महत्वाची गोष्ट झाली असून ते प्रामुख्याने अफेअर्स, कॉन्ट्रोव्हर्सीज, बॉलीवूड बॉयकॉट ट्रेण्ड यातून मिळतेय. एखाद्या अभिनेत्रीचा अभिनय अथवा नृत्य कला यावर फोकस टाकण्यापेक्षा तिचा घटस्फोट जास्त चघळला जातोय. एक घटस्फोट होणे म्हणजे अनेक प्रकारच्या मानसिक भावनिक वेदना होतात याकडे कोणाचे लक्ष जात नाही.

    सोशल मीडियाची असेच काही गरमागरम, खमंग असेच काही हवेय आणि दुसरीकडे या मनोरंजन क्षेत्राचा उठसूठ व्देष करणाऱ्यांना टीकेसाठी सतत काही हवंय. यातून सुटका कशी करायची या विवंचनेत असतानाच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील पुष्पा, आर आर आर, कांतारा असे चित्रपट हिंदीत डब होऊन यशस्वी वाटचाल करतात आणि त्यात ‘अवतार द वे ऑफ लाईफ’ या भव्य दिमाखदार हॉलीवूडपटाची भर पडतेय.

    या आव्हानात्मक परिस्थितीतून हिंदी चित्रपटसृष्टीला सुखाचा मार्ग तो कधी नि कसा सापडणार? एखादा ‘चमत्कार’ यातून वाचवू शकेल.

    दिलीप ठाकूर

    glam.thakurdilip@gmail.com