उडता, पडता महाराष्ट्र

पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेलेला आणि नंतर मुंबई पोलिसांनी पकडलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या अटकेवरुन राज्यातील राजकारणात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. काहीही झाले की सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी आरोप करायचे आणि तुम्ही वासरु मारले म्हणून आम्ही गाय मारली, या न्यायाने सत्ताधाऱ्यांनी आपली कृती समर्थनीय ठरवताना विरोधकांना तुम्ही ‘धुतल्या तांदळाचे नाही’ याची जाणीव करुन द्यायची, यालाच सध्या राजकारण समजले जाऊ लागले आहे. त्यानुसार ललित पाटीलचेही झाले. नवा मुद्दा हाती लागल्यानंतर ललित पाटीलचा विषय मागे पडेल. पण या विषयाने खूप गंभीर विषयाकडे पाहण्याची गरज निर्माण केली. ड्रग्ज महाराष्ट्रात कुठवर शिरले आहेत, याकडे ललित प्रकरणाने लक्ष वेधले. ड्रग्ज आणि आजच्या तरुणाईचा शोध घेतला तर धक्कादायक वास्तव हाती येईल.

  ड्रग्जची एखादी खेप कुठेतरी पकडली जातेय. देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीच्या आजुबाजुच्या भागात, मुंबईत दिवसाआड ड्रग्ज पेडलर्स पकडले जात आहेत. कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले जाताहेत. इथवरच अमली पदार्थांचे जाळे पसरलेले नाही तर अनेक ठिकाणी केमिकल कारखान्यांच्या नावावर ड्रग्ज तयार करणारे कारखाने उभारले गेल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतरच कळते आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र, तरुणांचा महाराष्ट्र, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर असलेला महाराष्ट्र पंजाबच्या वाटेने जातो की काय, याची भीती वाटू लागली आहे. ड्रग्जची काळी छाया महाराष्ट्रावर पडली, हे नक्की. त्यातून तरुणांचे भवितव्य बरबाद करून सोडण्याचा प्रयत्न होतोय. ड्रग्ज विक्रेते आणि व्यसनाधीन असलेल्या तरुणांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा अनुभव आपण सगळ्यांनीच नॉर्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाईतून घेतला होता. शहारुख खानचा मुलगा पकडला जात नाही, तोपर्यंत बहुतांश कथित सेलिब्रेटींच्या उत्साह, आनंद आणि चकचकीत चेहऱ्यांमागचा खरा नशेडी, व्यसनी, विकृत चेहरा समोर आला होता.

  आजचे तरुण ज्यांना आदर्श मानतात, त्यांच्या जीवनातील काळी बाजू समोर आली. अनेकांना एनसीबीने कोठडीची यात्राही करवून आणली. पण जादूची कांडी फिरावी, तशी ड्रग्ज विरोधातील कारवाई एका रात्रीत बंद केली गेली. एनसीबीनेसुद्धा यू टर्न घेतला. व्यसनाधीन सेलिब्रेटी जणू काही झालेच नाही, या आविर्भावात पुन्हा प्रकाशझोतात परतले. ‘आपला बाप शहारुख खानसारखा असावा’, असा विचार चोरुन लपून एखाद्या कोपऱ्यात गांजा ओढणाऱ्या तरुणांच्या मनात डोकावून गेला असेल. सध्या सुरु असलेल्या ड्रग्जच नव्हे अनेक प्रकरणांमध्ये हाच मोठा धोका तयार झाला आहे. समाजात आपण शक्तीशाली आहोत, प्रभावी आहोत, सत्तेच्या जवळ आहोत किंवा श्रीमंत आहोत हे दाखविण्यासाठी कायदा गुंडाळून ठेवावा लागतो. विशेष म्हणजे कायदा गुंडाळून ठेवला आहे, हे सोशल मिडियावर दाखवावे लागते. आपले कोण काय वाकडे करणार या अटीट्युडमध्ये कायम फिरावे लागते. जसे ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेते, अभिनेत्री फिरतात, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारी अधिकारी किंवा नेते फिरतात, छापे पडल्यानंतरही मोठ-मोठे बिल्डर फिरतात. यांचाच आदर्श महाराष्ट्रातील नव्या पिढीसमोर ठेवला जातो आहे.

  ससून रुग्णालयातून ललित पाटील पळून जातो. त्यानंतर तो या रुग्णालयात कसा राजेशाही राहत होता, याचे फोटो प्रसिद्ध होतात. या रुग्णालयाचे अधिकारी आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊच शकत नाही. पण यंत्रणेतील ही कीड दूर करण्याची मागणी करण्याऐवजी ललित पाटील कोणाच्या जवळचा यावरुन राजकारण रंगते. आरोप – प्रत्यारोप होतात. त्याचवेळी सगळ्यांच्याच जवळचा असणारा पुण्याचा भोसले बिल्डर मुंबईतील सरकारी रुग्णालयात गेल्या दहा महिन्यांपासून पाहुणचार घेतोय, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्यांना एका गाडीची व्यवस्था, खोलीत दोन- दोन एसी अशी सगळीच बडदास्त त्याच्यासाठी ठेवली जाते. हा दुतोंडीपणा आहे. रेल्वे फलाटांवर किंवा रुळांच्या बाजुला घाणेरड्या वस्तीत एका अत्यंत मळकट कापडावर व्हाईटनर टाकून, त्याचा वास घेणाऱ्यांची जशी किळस समाजाला येते, तशी ती पंचतारांकित हॉटेलांमध्ये, पबमध्ये बसून हजारो रुपयांचे एमडी ओढणाऱ्यांबद्दल येत नाही. म्हणूनच मग उच्चभ्रू नशेबाजांच्या आयुष्यात थ्रील वाटू लागतं. तसं आयुष्य जगता यावं, अशी सुप्त इच्छा मनात निर्माण होते आणि मग त्यांच्या अंधानुकरणाचा मार्ग ड्रग्जच्या अंधाऱ्या गुहेत घेऊन जातो. केवळ बॉलिवूड सेलिब्रेटीच नव्हे तर व्यावसायिक, बिल्डर्स, उद्योजक यांच्या घरापर्यंत ड्रग्ज पोहचले आहे. अनेक राजकीय नेते आणि त्यांची दुसरी पिढीसुद्धा यात अजिबात मागे नाही. फक्त व्हाईटनर ओढणाऱ्यांप्रमाणे समाज या व्यसनी राजकारणी, उद्योजक, व्यावसायिकांचा, त्यांच्या मुलांचा तिरस्कार करत नाही. समाजाच्या या दुहेरी, दुतोंडी मानसिकतेमुळेसुद्धा बेबंद तरुणाईला ड्रग्जचा हा विळखा खुणावत असतो.

  सहज मिळणारा पैसा, नशेतून मिळणारा क्षणिक आनंद आणि सहज उपलब्धता यातून ड्रग्जचा फैलाव झाला आहे. अनेक पब्जमध्ये तरुण- तरुणींना हेरुन त्यांना ड्रग्जचे व्यसन लावण्याचा प्रयत्न होतो. सिगरेट, बिअर आणि दारु यापुढचे थ्रील अनुभवायचे म्हणूनसुद्धा तरुण या अंध:काराकडे खेचले जातात. पंचतारांकित पब्जच्या बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास पुढच्या पिढीला नशेत धडपडताना, ड्रायव्हरच्या खांद्यावरुन कारमध्ये बसताना, रस्त्याच्या कडेला पडताना पाहून मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. कोट्यवधींचे ड्रग्ज पकडले जातात, तरीही केवळ मुंबईतच नव्हे तर इतरही लहान शहरांमध्ये ते सहज उपलब्ध होतात. पकडलेल्या ड्रग्जचे काय होते, आतापर्यंत हे ड्रग्ज कसे नष्ट करण्यात आले या अशा काही प्रश्नांना पोलीस कारवाईनंतर उत्तरच मिळत नाही. ड्रग्जच्या माध्यमातून भावी पिढी संपवून टाकण्याचे षडयंत्र असल्याचा कितीही कंठशोष पांढरपेशा, मध्यमवर्गीयांनी केला तरीही अनेक श्रीमंतांच्या घरात दोन्ही पिढ्यांमध्ये जम बसविलेल्या या अमली पदार्थांना हद्दपार कोणी आणि कसे करणार?

  ललित पाटीलच्या प्रकरणामुळे ‘उडता महाराष्ट्र’ हा हृदयाचा थरकाप उडवणारा शब्दप्रयोग झाला. पण ड्रग्ज माफिया ललित पाटीलच नव्हे तर भ्रष्ट उद्योजक, करबुडवे बिल्डर यांना कुठल्यातरी राजकीय स्वार्थापोटी सांभाळणारा महाराष्ट दररोज पडतोय. अशा प्रकरणांमुळे राज्याच्या प्रतिमा आणि प्रतिभेची पडझाड होतेय. सुसंस्कृतपणाच्या एका वेगळ्या उंचीवरुन घसरण होतेय. मोठेपणाचे मापदंड बदलू लागले आहेत. प्रचंड काळ्या पैशातून दर सहा महिन्याला विदेशी गाडी घेऊन फिरणे, ड्रग्ज घेताना पकडले गेल्यानंतरही लगेच सुटका होणे, करबुडवेगिरी करुन पक्षनिधी कबूल केल्याबरोबर छापे टाकायला आलेले अधिकारी निघून जाणे याला मोठेपणा संबोधले जाऊ लागले आहे. उडत्या महाराष्ट्रात वावरणाऱ्या नवतरुणाईला याचेच अप्रूप वाटते. वाईटाला वाईट म्हणण्याची धमक समाजात नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र केवळ उडत नाहीये, तर तो पडतोय – आपल्याच नजरेत. वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपल्या मूळांकडे पुन्हा वळण्याची गरज आहे.

  – विशाल राजे