Former Prime Minister of Japan Shinzo Abe murder case nrvb

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांची हत्या होऊन दहा दिवस होऊन गेले, तरी जग अजूनही त्यांच्या हत्येच्या दुखातून सावरलेलं नाही. एका शांतताप्रिय देशाचा पंतप्रधान जगातील एका महासत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी जागतिक पातळीवरची संघटना उभी करतो, जगात वेगवेगळे मित्र जोडतो, शांतताप्रिय मार्गाचा अवलंब करतानाही ज्याला जसं समजलं, त्या भाषेत समजावण्याची कृती करतो, हेच महत्वाचं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी त्यांचं चांगलं मैत्र जुळलं होतं. त्या माध्यमातून भारतातील पायाभूत प्रकल्पांना त्यांनी मोठी मदत केली होती, हे विसरता येणार नाही.

  जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ॲबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी असण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. ॲबे यांच्यावर ८ जुलै रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.

  एका निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. माजी पंतप्रधानांना असलेली सुरक्षा व्यवस्था भेदण्यात हल्लेखोरांना यश आलं. राजकारणातून किंवा जागतिक संदर्भातून ॲबे यांची हत्या झाली नाही, असं सांगितलं जात असलं, तरी तिथल्या सुरक्षा यंत्रणा आता सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

  ॲबे यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण जपानला धक्का बसला आहे. पोलिसांनी सांगितलं की, हल्लेखोर तेत्सुया यामागामी यांचा ‘विशेष संस्थेवर’ रोष होता. यामागामी यांचं म्हणणं आहे की, एका धार्मिक गटानं त्यांच्या आईचं आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान केलं आहे. शिंजो ॲबे या धार्मिक गटाशी संबंधित आहेत, असा या संशयिताचा दावा आहे. त्यामुळं वैयक्तिक सूड भावनेतून ही हत्या केली असल्याचा संशय आहे.

  ॲबे यांच्या हत्येनंतर झालेल्या संसदेच्या निवडणुकीच्या मतदानात त्यांच्या पक्षाला तिथं दोन तृतियांश बहुमत मिळालं. जपानमध्ये गोळीबाराची घटना अत्यंत दुर्मीळ मानली जाते. जपानमध्ये हँडगनवर बंदी आहे.

  ॲबे यांचं टोपणनाव ‘द प्रिंस’ होतं. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ते नातू होत. १९९३ला ते पहिल्यांदा जपानच्या संसदेचे सदस्य म्हणून विजयी झाले. २००५ साली त्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला. त्यावेळी जुनिचिरो कोइझुमी हे पंतप्रधान होते.

  २००६ मध्ये ॲबे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. महायुद्धानंतर जपानमध्ये झालेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. २००६ ते २००७ असा एक वर्ष, नंतर २०१२ ते २०२०पर्यंत ते पंतप्रधान झाले. ॲबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. २०२०मध्ये आरोग्याच्या कारणावरून त्यांनी पंतप्रधानपद सोडलं. त्यांच्यानंतर योशिहिदे सुगा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली.

  ॲबे यांच्या काळात त्यांना चीनचा फार त्रास झाला. व्हिएतनाम, जपान, फिनलंडमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत होता. ॲबे यांच्याच काळात जपाननं चीनमधील गुंतवणूक काढून घेतली आणि भारतात गुंतवणूक करण्यावर भर दिला. मोदी यांच्यांशी त्यांचं चांगलंच सूत जमलं होतं. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ते दोनदा भारत भेटीवर आले.

  वाराणसीचा विकास, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, सुपे औद्योगिक वसाहतीत जपानचा विशेष आर्थिक विभाग तसंच अन्य प्रकल्पांत गुंतवणूक करण्यावर त्यांनी भर दिला. मध्यंतरी काही काळ रखडलेल्या ‘क्वाड’ परिषदेचं पुनरुज्जीवन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. चीनला शह देण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान एकत्र आले. केवळ सामरिकदृष्ट्याच ही परिषद उपयुक्त ठरणार नाही, तर आरोग्यासह अन्य मूलभूत प्रश्नावरही ती काम करते आहे.

  जपान मध्यंतरी अडचणीत होता. आर्थिकदृष्ट्या जपानची मोठी पिछेहाट व्हायला लागली होती. त्यावेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी ॲबेनॉमिक्सच जपानच्या उपयोगात आलं. संरक्षण धोरणाबाबत ॲबे यांच्या टप्प्याटप्प्यानं काम करण्याच्या दृष्टिकोनाचे परिणाम अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये दिसून आले.

  ॲबे यांनी आपल्या कार्यकाळात ‘ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीप’ (टीटीपी ११) मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी २०१९ साली युरोपीय महासंघासोबत एक यशस्वी व्यापारी करार केला, तर २०१८ साली चीनसोबत अनेक आर्थिक आणि विकास करारांवर चर्चा केली. दोन बेटांच्या मालकीवरून चीन आणि जपान यांच्यात वाद आहे.

  शिवाय, चीनकडून असणाऱ्या धोक्याचीही जपानला पूरेपूर कल्पना आहे. असं असूनही ॲबे यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत जपानचे व्यापारी सहयोगाचे मार्ग बंद होऊ दिले नाहीत. ॲबे यांच्या विकासवादानंच देशांतर्गत आर्थिक व्यवस्थापनासाठी वित्तीय, मौद्रिक आणि रचनात्मक धोरणांमध्ये नवबदलाची परवानगी देणाऱ्या ‘ॲबेनॉमिक्स’ दृष्टिकोन अधोरेखित केला. सर्वांत सुरक्षित देशाचे पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या होते, त्यातून त्या देशाच्या नेत्यांची सुरक्षितता कशी वाऱ्यावर आहे, हे स्पष्ट झालं.

  जपानमध्ये फक्त एअर रायफल आणि शॉटगन विकण्याची परवानगी आहे. त्यांचा परवाना मिळविण्यासाठीही लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि परवाना मिळाल्यानंतरही दर तीन वर्षांनी ही परीक्षा द्यावी लागते. शूटिंग रेंजमध्ये ९५ टक्के अचूकतेसह शूटिंग चाचणी उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. या सर्व गोष्टींबरोबरच परवाना घेणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती, ड्रग्ज टेस्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीही ही तपासली जाते.

  पोलीस पडताळणी दरवर्षी केली जाते. परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागते. जपानमध्ये खासगी बंदुकांची संख्या फारच कमी आहे. संघटित गुन्ह्यात बंदूक वापरल्याबद्दल १५ वर्षे तुरुंगवास होतो. एकापेक्षा जास्त बंदूक बाळगणंही बेकायदेशीर आहे. सार्वजनिक ठिकाणी बंदूक चालवल्यास जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होते. या पार्श्वभूमीवर ॲबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं जगाला धक्का बसला.

  ॲबे यांना जगात होत असलेल्या गुंतागुंतीच्या आणि विविध बदलांचं सखोल ज्ञान होतं. त्याच्या दूरगामी धोरणांनी (ॲबेनॉमिक्स) जपानी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केलं आणि त्याच्या लोकांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेची भावना पुन्हा प्रज्वलित केली.

  भागा वरखडे

  warkhade.bhaga@gmail.com