
विधु विनोद चोप्रा हा 'एक चित्रपट झाला लगेच दुसरा करुया' अशा पद्धतीने याच विश्वामध्ये रमणारा, वावरणारा असा दिग्दर्शक नाही. एक चित्रपट झाल्यानंतर देश-विदेशातील चित्रपट पाहणे, भरपूर पुस्तके वाचणे, आजूबाजूच्या जगामध्ये काय सुरु आहे याचा मागोवा घेणे आणि स्वतःला कशा पद्धतीने विकसित करणं अपडेट ठेवणं याकडे त्याचं विशेष लक्ष. नवीन चित्रपटासाठी अधिकाधिक नवीन कल्पनांवर तो विचार करणार नि एक निवडल्यावर त्यावर खोलवर काम करणार.
आपल्या देशामध्ये चित्रपट म्हणजे एक प्रकारचा उत्सव. आणि चित्रपटाच्या महोत्सवांना सतत कोणते ना कोणते निमित्त असतेच. नसेल तर ते अतिशय हुशारीने काढले जाते. बरं उत्सव म्हणजे तरी काय अनेकांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सुखद असो… काय असेल ते असो, अशा महोत्सवाच्या निमित्ताने जुने चित्रपट रसिकांसमोर येतात आणि त्या महोत्सवामध्ये जुन्या आणि आजच्या पिढीचे चित्रपट रसिक एकत्रपणे त्या कलाकृतीचा आनंद घेतात. हा फील, हा योग काही वेगळाच असतो. यानिमित्ताने त्या जुन्या चित्रपटाची चर्चा होते. त्या काळामध्ये दिग्दर्शकांने नेमका काय विचार केला असेल, ते चित्रपट का यशस्वी ठरले, त्या काळामध्ये त्या चित्रपटाबद्दल समीक्षकांची प्रेक्षकांची मते काय होती, तेव्हाचे सामाजिक सांस्कृतिक वातावरण कसे होते अशा अनेक गोष्टींवर या निमित्ताने फोकस पडतो….
असाच एक दिग्दर्शक आहे विधु विनोद चोप्रा.
याची जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ओळख करुन द्यायची झाली तर तुम्हाला रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ (१९९५) या चित्रपटांमध्ये गुलशन ग्रोवरने साकारलेली चष्मीश दिग्दर्शकाची व्यक्तिरेखा आठवते का बघा. तो ‘या चित्रपटातील चित्रपटात’ काही प्रसंगाचं दिग्दर्शन करत असताना सतत वैतागलेला असतो आणि तो सतत म्हणत असतो, माझी जागा हॉलिवूडमध्ये आहे. मला भारतात राहण्यामध्ये फारसा रस वाटत नाही वगैरे वगैरे. हे कॅरेक्टर म्हणजे एक प्रकारे दिग्दर्शक विधु विनोद चोप्राची घेतलेली फिरकी आहे. म्हणजे चोप्रा हा पाश्चात तंत्राने आणि चित्रपट शैलीने भारावलेला असा दिग्दर्शक असाच ओळखला जातो. असं असलं तरी त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत अतिशय चांगल्या पद्धतीने ठसा उमटलाय. त्याच्या कारकीर्दीला पंचेचाळीस वर्षे होत असल्याच्या निमित्ताने फिल्म हेरिटेज फाऊंडेशनच्यावतीने १३ ते १९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पीव्हीआर आयनॉक्सच्यावतीने देशातील २८ शहरांमध्ये त्याच्या चित्रपटाचा महोत्सव आयोजित केला आहे.
विधु विनोद चोप्राचे चित्रपट हे प्रामुख्याने ऐंशी आणि नव्वदच्या दशकातले. त्याच्यावर फोकस टाकताना आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते ते विविधता. विधु विनोद चोप्रा एकसूरी झाला नाही. सतत पहिल्यापेक्षा वेगळे करत राहिला ही त्याची जमेची बाजू. त्याचा दिग्दर्शनीय पहिला चित्रपट “सजा ए मौत” (१९८१) हा एक न्यायाधीश थ्रिलर अर्थात पाश्चात्य ढंगाचा स्टाईलचा चित्रपट. विधु विनोद चोप्राने त्याचे हिंदीकरण करताना त्या काळातील हायफाय कल्चरचा युवक आपला प्रेक्षक ठरवला..असा फोकस स्पष्ट हवा. चित्रपटांत नसरुद्दीन शाह, दिलीप धवन, राधा सलुजा यांच्या भूमिका. मला आठवते चर्चगेट विभागातील आकाशवाणी थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्या चित्रपटांत विधु विनोद चोप्राने आपण कलात्मकता आणि व्यावसायिकता यांची सांगड घालणारे दिग्दर्शक आहोत यावरचा फोकस स्पष्ट केला. म्हणजे आपल्या चित्रपटाची समीक्षकांनी दखल घ्यावी, त्याचं कौतुक करावं पण त्याच वेळेला त्या चित्रपटांना रसिकांनी देखील स्वीकारावं असा ताळमेळ त्याने ठेवला. त्याने एक मध्यम मार्ग काढला असं म्हणता येईल. त्यानंतरचा त्याचा रहस्यरंजक चित्रपट ‘खामोश’ (१९८५) मध्ये अमोल पालेकर, नसिरुद्दीन शहा, शबाना आजमी, पंकज कपूर, सोनी राझधान, सुषमा सेठ, सदाशिव अमरापुरकर इत्यादींच्या भूमिका.. काश्मीरमधील पहेलगांव येथील एका हॉटेलमध्ये शूटिंगच्या निमित्ताने जमलेल्या युनिटमध्ये खून होतो आणि एक गडद रहस्य निर्माण होते. तो खुनी कोण आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रवास म्हणजे हा.
आता विधु विनोद चोप्राने आपला कॅनव्हास वाढवला. मुंबईच्या गॅंगस्टरवरचा अतिशय दाहक ‘परिंदा’ (१९८९) रुपेरी पडद्यावर आणला आणि त्याची अतिशय प्रभावी मांडणी पाहून सगळेच स्तब्ध. अतिशय शांतपणे याची पटकथा व संवाद गुंफलेत हे प्रत्येक फ्रेममध्ये दिसत होते. अंडरवर्ल्डबद्दलची अधिकाधिक माहिती, तपशील, संदर्भ त्यातील बारकावे मिळवून त्यात एक रोमँटिक कथा पेरली. कशा पद्धतीने युवक या अंडरवर्ल्डमध्ये गुंतला, गुरफटला जातो आणि त्या विश्वामध्ये कसं अतिशय थंड डोक्याने डावपेच लढवली जातात आणि क्रूरतेने एकेकाचा काटा काढला जातो, ते कसं एक प्रकारचं एक वेगळं जग आहे याच्यावरचा जबरदस्त फोकस असा हा चित्रपट. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, अनुपम खेर इत्यादींच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची समीक्षक आणि प्रेक्षक आणि मोठ्या प्रमाणावर दखल घेतली. विशेषत: कलादिग्दर्शक नीतीश रॉय याच्याकडे या चित्रपटासाठी नितीन चंद्रकांत देसाई सहायक म्हणून काम करत असताना त्यांनी उभारलेल्या अंधारातील समुद्रातील लाॅन्चच्या सेटची बरीच चर्चा झाली. अंडरवर्ल्डवरील सर्वोत्कृष्ट पाच चित्रपटात ‘परिंदा’चे नाव आवर्जून घेतले जाते हे दिग्दर्शकाचे यश. विधु विनोद चोप्राला संगीताचा कान व दृष्टी हे आता अधोरेखित होत गेले. विधु विनोद चोप्राने आपल्या प्रत्येक चित्रपटासह असं पुढचचं पाऊल टाकले…
विधु विनोद चोप्रा हा ‘एक चित्रपट झाला लगेच दुसरा करुया’ अशा पद्धतीने याच विश्वामध्ये रमणारा, वावरणारा असा दिग्दर्शक नाही. एक चित्रपट झाल्यानंतर देश-विदेशातील चित्रपट पाहणे, भरपूर पुस्तके वाचणे, आजूबाजूच्या जगामध्ये काय सुरु आहे याचा मागोवा घेणे आणि स्वतःला कशा पद्धतीने विकसित करणं अपडेट ठेवणं याकडे त्याचं विशेष लक्ष. नवीन चित्रपटासाठी अधिकाधिक नवीन कल्पनांवर तो विचार करणार नि एक निवडल्यावर त्यावर खोलवर काम करणार. अंधेरीतील नटराज स्टुडिओत त्याचं ऑफिस होते. त्या ऑफिसची मांडणी, बांधणी, शैली वेगळीच होती हे ते पाहताच लक्षात येई.
‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ (१९४४) मध्ये त्याने इंग्रजांविरुद्धच्या चले जाव या चळवळीच्या पाश्र्वभूमीवर एका प्रेमकथा साकारली. हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे याचे चित्रीकरण करण्याचं त्यांनी पाऊल टाकलं ते विशेष कौतुकास्पद ठरले. या चित्रपटाच्या कला दिग्दर्शनामुळे नितीन चंद्रकांत देसाई नावाला ग्लॅमर आले. काही चित्रीकरण राहिलं असता त्या पद्धतीची घरं आणि वातावरण नितीन चंद्रकांत देसाईनी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत उभारलं आणि त्याची खूप चर्चा झाली. चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मनीषा कोइराला, अनुपम खेर इत्यादींच्या भूमिका आहेत. खरं तर या चित्रपटांत माधुरी दीक्षित प्रेयसी साकारणार होती. माधुरी दीक्षितचे या चित्रपटातील व्यक्तीरेखेनुसार फोटोसेशन देखील झालं. तो फोटो आपल्याला सोशल मीडियात पाहायला मिळतो. परंतु त्याच सुमारास माधुरी दीक्षित इतर अनेक चित्रपटांमध्ये बिझी असल्याने तिला हा चित्रपट सोडावा लागला; अन्यथा ‘परिंदा’नंतर पुन्हा एकदा विधु विनोद चोप्राच्या दिग्दर्शनामध्ये माधुरी दीक्षित पहायला मिळाली असती.
विधु विनोद चोप्राने काश्मीरमधील दहशतवादावरचा “मिशन कश्मीर” (२०००) साकारला. त्यात संजय दत्त, हृतिक रोशन, प्रीती झिंटा, सोनाली कुलकर्णी इत्यादींच्या भूमिका. काश्मीर दडपणाखाली कशा पद्धतीने श्रीनगर वगैरे ठिकाणी वातावरण आहे. जनसामान्यांची कशी घुसमट झालीय यातलं नाट्य, रोमांचकता आणि त्यात एक प्रेमकथा अशी एकूण मांडणी.
‘करीब’ (१९९८. प्रमुख भूमिकेत बॉबी देवल व नेहा) ही एक वेगळी तरल प्रेमकथा विधु विनोद चोप्राने आपल्यासमोर आणली.
आपला दिग्दर्शनीय वारसदार म्हणून त्याने राजकुमार हीरानीला तयार केलं. हे फार कमी जणांना जमतं. आपल्या वीस-बावीस वर्षाच्या वाटचालीनंतर आपण ‘निर्मात्याच्या भूमिकेत रहावे, एकादा चित्रपट लिहावा’ पण दिग्दर्शक आता पुढील पिढीचा असावा हे स्वीकारायला वेगळी मानसिक ताकद लागते. ती विधु विनोद चोप्राने दाखवली. राजकुमार हिरानी विधु विनोद चोप्राकडे सहायक दिग्दर्शक होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाची विधु विनोद चोप्राने घोषणा केली त्यावेळेला तोच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होता. शाहरुख खान प्रमुख भूमिका आणि संजय दत्त त्याच्या त्याचा सहाय्यक भूमिकेत असा सेटअप होता. परंतु काही कारणास्तव विधु या चित्रपटातून बाजूला झाला आणि राजू हीरानीने “मुन्नाभाई…” ची सूत्रे हाती घेतल्यावर शाहरुख खान सिनेमातून बाहेर पडला. त्याच्या जागी संजय दत्त आला आणि मूळ संजय दत्तच्या जागी जिमी शेरगिल आला. ग्रेसी सिंग नायिका भूमिका होती. जगण्याचा आनंद घ्या आणि इतरांनाही द्या. आयुष्याचे तत्वज्ञान हसत खेळत मांडणारा मुन्नाभाई लोकप्रिय झाला. निर्माता म्हणूनही विधु विनोद चोप्राची जी कारकीर्द लक्षवेधक आहे. त्याने परिणीता, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स इत्यादी चित्रपटाची निर्मिती केली. म्हणजे लेखक विधु विनोद चोप्रा, दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा आणि निर्माता विधु विनोद चोप्रा अशी त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.
आता “विधु विनोद चोप्राच्या चित्रपटांचा महोत्सव” एक विशेष मेजवानीच. त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटांनी त्या काळात चित्रपट रसिकांना अतिशय आनंद तर दिलेलाच आहे आता उपग्रह वाहिन्या, यू ट्यूब चॅनेल, ओटीपी या प्लॅटफॉर्मवर जरी हे चित्रपट उपलब्ध असले तरीसुद्धा मल्टिप्लेक्समध्ये पुन्हा एकदा च्या या चित्रपटाचा आस्वाद, आनंद, घेण्यातही एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. देव आनंदच्या चित्रपट महोत्सवाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मला असं वाटतं की आता अशा पद्धतीचे जुन्या चित्रपटांचे महोत्सव मुंबईसह देशातील पंचवीस तीस शहरांमध्ये आयोजित केले गेले तर त्यात आश्चर्य वाटायला नको… म्हटलं ना आपल्या देशामध्ये चित्रपट एक उत्सव असतो. फक्त त्यासाठी एखादं चांगलं निमित्त असावे लागतं आणि त्याचे आपल्या देशातील चित्रपट रसिक नक्कीच स्वागत करतात.
– दिलीप ठाकूर