chitra wagh and urfi javed

तुम्हालाच काय हिंदी चित्रपटसृष्टीच्या फ्लॅशबॅकमध्ये डोकावणारे/त्यातच रमणारे/ त्या दिवसांच्या आठवणीत सुखावणाऱ्यांना सत्तरच्या दशकातील श्यामली, शीतल, पद्मिनी कपिला, के. टी. मिर्झा, रिंकू जैस्वाल, जाहीरा, प्रेमा नारायण, जाहिदा, अनिता अयूब, फातिमा शेख या नावाच्या चित्रपट अभिनेत्री होत्या हे पटकन आठवतेय का? खरं तर कशाला आठवेल? आणि माहीत असून त्यांना आणि आपल्याला काय फायदा? तेच उर्फी जावेदचे होईल हे वेगळे सांगायलाच नको. त्यासाठी चित्रपटसृष्टीची कुंडली मांडायची गरज नाही...

  सत्तरच्या दशकातील पटकन आठवणार त्या हेमा मालिनी, जया भादुरी, रेखा, राखी, शबाना आझमी, स्मिता पाटील, मौशमी चटर्जी, रिना राॅय, झीनत अमान, परवीन बाबी, नीतू सिंग, टीना मुनिम, सुलक्षणा पंडित, झरिना वहाब…. पण किम, कोमिला विर्क, फरियाल, नाझनीन वगैरे आठवाव्यात असे अजिबात वाटणार नाही. त्यांची आठवण यावी अशा त्यांनी भूमिका व अभिनयही केला नाही. आशा सचदेवने बासू चटर्जी दिग्दर्शित ‘प्रियतमा’मध्ये अनपेक्षित चांगली अदाकारी करीत वाहव्वा मिळवली. किम म्हणजे ती डिंपल कापडियासारखी दिसायची म्हणून तिला ‘फिर वही रात ‘ या चित्रपटात राजेश खन्नाची नायिका केली, त्यात आणखीन एक “क्राॅस कनेक्शन” होते, अभिनेता आणि याच चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी डेन्झोपाची ती अगदी खास मैत्रिण होती, त्यामुळे ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असे चुकूनही म्हणता येणार नाही.

  ऐंशीच्या दशकातील श्रीदेवी, माधुरी दीक्षित, जयाप्रदा, मीनाक्षी शेषाद्री, अमृता सिंग, ‘बाॅबी’नंतर बारा वर्षांनी पुनरागमन केलेली डिंपल कापडिया, सोनम, नीलम अगदी मंदाकिनीही आठवेल, पण सोनिका गिल नावाची कोणी अभिनेत्री होती का, असा तुम्हालाच प्रश्न पडेल. ते माहित असल्याने चित्रपटविषयक तुमच्या ज्ञानात साॅलीड भर वगैरे पडणार नाही. कोणत्याही चित्रपट कोड्यात अशा ‘विसरल्या गेलेल्या’ अभिनेत्रीवर प्रश्न नसतोच.

  झाहीरा, सोनिका गिल अशा तारकांना नेमक्या सत्तरच्याच दशकापासून हिंदी चित्रपटात स्थान मिळत गेले असे का, असा एक रोखठोक प्रश्न आहेच म्हणा. तत्पूर्वी अशा शो पीस अभिनेत्री नव्हत्या का? एखादी सोनिया सहानी, अंबिका जोहर असेल पण तिने इतकं आणि असे ताळतंत्र सोडले नव्हते. किमान काही मर्यादा असे. एखादी प्रतिमा बेदी अपवाद. तिने जुहू किनार्‍यावर चक्क टाॅपलेस फोटो सेशन करीत खळबळ उडवली. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपासून काही गोष्टी घडल्या. बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना’ (१९७१) पासून धाडसी थीम आणि त्यानुसार दृश्ये असा ट्रेण्ड आला. या चित्रपटातील रेहाना सुल्तानची काही धाडसी दृश्यांची बरीच चर्चा झाल्याने अशा पठडीतील काही चित्रपट व दृश्ये येऊ लागली. सेन्सॉर अशा चित्रपटांवर हमखास कात्री लावून त्यांना फक्त प्रौढांसाठी अर्थात ए प्रमाणपत्र देत असे. काॅल गर्ल, बाजार बंद करो या नावावरुनच या चित्रपटाचे कल्चर स्पष्ट होतेय आणि आता पोस्टरही भडक येऊ लागली. हे आक्रमण वेळीच थांबवा असे तात्कालिक संस्कृतीरक्षक विविध माध्यमातून मागणी करीत होते. दुसरीकडे याच काळात गाॅसिप्स मॅगझिनचा उदय झाला आणि गाॅसिप्स व ग्लॅमरस फोटोंनी ती चक्क लोकप्रिय झाली. याच मॅगझिनमधून बेडरुम स्टोरी, सेन्ट्रल स्प्रेड यात अशाच अभिनेत्रींच्या धाडसी फोटो पोझना सातत्याने एक्स्पोजर मिळू लागला. अशा मॅगझिनपासून मध्यमवर्गीय कुटुंबे शक्य तितके दूरच राहत होती आणि ते अगदी योग्यही होतेच. कदाचित तुम्हाला ‘जोर का धक्का धीरेसे लगे’ असा कायापालट रेखाचा आहे. अगदी सुरुवातीच्या दिवसांतील रेखा अगदी अशीच होती. त्या दिवसांतील तिचे बरखा बहार, प्राण जाए पर वचन न जाए, डबल क्राॅस, मेहमान हे चित्रपट पाहिलेत तर तुम्हाला ते नक्कीच दिसेल. पण अमिताभ बच्चनच्या सहवासात तिच्या एकूणच आंतर्बाह्य व्यक्तीमत्वात बदल झाला आणि ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खुबसूरत’पासून तिचा अभिनय गुण पडद्यावर येऊ लागला आणि रेखाने जणू कात टाकली ती कायमचीच. पण या कल्चरमधील सगळ्यानाच रेखा बनणे शक्य नसते. खरं तर त्यातील अनेक जणी ‘ढ’ वर्गातील म्हणून ओळखल्या जातात. त्यावर त्यांना स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करण्याचा मार्ग सुचतो अथवा सुचवला जातो हे त्यांचे दुर्दैव.

  नव्वदच्या दशकात याच गाॅसिप्स मॅगझिनचा घसरलेला खप (दर्जा अगोदरच उतरला होता हे वेगळे सांगायलाच हवे काय?) वाचवण्यासाठी ममता कुलकर्णीचे टाॅपलेस फोटो सेशन, पूजा भट्टचे बाॅडी कलर असे पराक्रम केले. अशातच मिलिंद सोमण व मधु सप्रे यांची बूटाची जाहिरात अजगराच्या विळख्याने गाजली. ही अमेरिका नाही, हे आपलं कल्चर नाही असे म्हणणारे चक्क अग्रलेख लिहिले गेले. सगळाच प्रकार किळसवाणा होता. पण झटपट पैसा आणि प्रसिद्धी खुणावत होती. एव्हाना आपल्याकडे जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यांचे वारे रुजत होते. जगत सुंदरी व विश्व सुंदरी यात भारतीय युवती सातत्याने बाजी मारत होत्या. जगभरातील सौंदर्य प्रसाधने आणि नवीन फॅशनच्या वस्त्रांनी भारतीय ‘मार्केट’मध्ये प्रवेश करीत जम बसवला. सोशल मीडियाच्या युगात ग्लॅमरस रुपातील फोटो सेशनमध्ये अधूनमधून बोल्ड फोटो सेशनचा ‘तडका’ दिसू लागला. मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनीही आपल्याच फोटोना भरभरुन लाईक्स मिळावेत म्हणून विदेशातील समुद्रात फोटो सेशन केले. वेबसिरिजला सेन्सॉर नसल्याने तर भाषा, कपडे, प्रणय दृश्य यांचा अतिरेक होऊ लागला. सगळ्यातून निर्माण झालेल्या वातावरणातून उर्फी जावेद बिनधास्त रुपात आणि भाषेत कॅमेर्‍यासमोर वावरु लागली. पण तिचे समर्थन होऊच शकत नाही.
  एकूणच काय तर सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम या सगळ्यात घसरण झाली आहे. अशा अनेक बेताल आणि सवंग युवती आज आहेत, पण उद्या अजिबात नाहीत. अथवा त्या आजच आहेत. खुद्द त्यांनाही आपल्या मर्यादांची जाणीव असतेच, जर तसे नसेल तर त्यांनी स्वतःलाच ओळखले नाही असे म्हणता येईल.

  तात्पर्य, ही गोष्ट तशी जुनीच. पण त्यामागची कारणे काळासोबत बदलली आहेत. आज प्रसार माध्यमांना सतत खुराक हवा आहे, तेव्हा त्यांचे लक्ष अशा सवंगतेकडे जाते. ते काहीही असले तरी या सवंगतेला मनोरंजन क्षेत्रात मुख्य प्रवाहात अजिबात स्थान नाही आणि लोकमान्यता तर अजिबात नाही. तेच तेच महत्वाचे आहे.
  – दिलीप ठाकूर
  glam.thakurdilip@gmail.com