जहां यार नहीं, वहा प्यार नहीं…

मित्राची रंगतसंगत अनेक चित्रपटांत. दोस्त ते स्टुन्डन्स ऑफ द इयर, याराना ते काय पो छे, दोस्ताना ते छीछोरे अशी बरीच बदलली. काळानुसार त्यात बरेच बदलही झाले. 'दिल चाहता है' आणि 'जिंदगी मिलेगी ना दोबारा' हे तीन मित्रांची गोष्ट सांगणारे चित्रपट. पण बदलत्या काळाची भाषा व मानसिकता घेऊन आले. 'थ्री इडियट्स' या सगळ्यात पूर्ण वेगळाच. मैत्री कशीही असू शकते हे या चित्रपटातून अधोरेखित होतेय.

  मैत्रीची गोष्ट आणि चित्रपट यांचे नाते अतिशय घट्ट आणि विविध पध्दतीचे. समाजातही मैत्रीला खूप महत्व. एक वेगळेच नातेसंबंध. पिक्चरच्या नावातून असो (दो यार, दोस्ताना, यार मेरा), थीममधून असो (दोस्ती, संगम, सागर , दिल चाहता है , वगैरे अनेक), संवादातून असो (सिगारेट और दोस्त दोनों फिल्टर होना चाहिए. चित्रपट एक चालीस की आखरी लोकल), गाण्यातून असो (तेरी दोस्ती मेरा प्यार, यह दोस्ती हम नहीं तोडेंगे, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी)… यात एक हुकमी फंडा दोन मित्र एकाच युवतीच्या प्रेमात पडतात. मग ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’ (संगम) अथवा बस मेरे यार है, बाकी बेकार है जिसके बदलेमे कोई तो प्यार दे (सागर). रसिकांना हे प्रेम त्रिकोण आवडले.

  मित्राची रंगतसंगत अनेक चित्रपटांत. दोस्त ते स्टुन्डन्स ऑफ द इयर, याराना ते काय पो छे, दोस्ताना ते छीछोरे अशी बरीच बदलली. काळानुसार त्यात बरेच बदलही झाले. ‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ हे तीन मित्रांची गोष्ट सांगणारे चित्रपट. पण बदलत्या काळाची भाषा व मानसिकता घेऊन आले. ‘थ्री इडियट्स’ या सगळ्यात पूर्ण वेगळाच. मैत्री कशीही असू शकते हे या चित्रपटातून अधोरेखित होतेय.

  या सगळ्या प्रवासात ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ (रिलीज २३ नोव्हेंबर १९७३. पन्नास वर्ष पूर्ण. म्हणूनच आज हा विषय) मधील मैत्री पूर्णपणे वेगळी. आपल्या वडिलांच्या (ओम शिवपुरी) आजारात विकी (अमिताभ बच्चन) कारखाना सांभाळत असताना कामगार नेते बिपीन लाल (ए. के. हनगल) यांची त्याला एका प्रकरणात माफी मागावी लागते याचा बदला घेण्याच्या विकीच्या वृत्तीत त्याचा अतिशय जिवलग मित्र सोमू (राजेश खन्ना) मदत करण्यासाठीच चंदर नाव धारण करुन त्याच ठिकाणी नोकरीला लागतो. पण कामगारांची सुख, दु:ख, तणाव पाहून चंदरमधील माणुसकी जागी राहते आणि तो विकीची समजून घालण्याचा प्रयत्न करतो. ते विकीच्या पित्याला आवडत नाहीत म्हणून ते कूटनीतीने चंदरचे बिंग कामगारांसमोरच फोडतात. त्यामुळेच खवळलेले कामगार चिडून जाऊन चंदरला बेदम मारहाण करतात. हे प्रकरण इतके आणि असे वाढते की मालकच चंदरचा अपघाती मृत्यू घडवून आणणात आणि आपल्यामुळेच आपल्या मित्राचे निधन झाले असे मानत विकी शिक्षा भोगतो…

  मैत्रीतील त्याग असा नि:स्वार्थी वृत्तीचा. अशातच सोमू विकीला उद्देशून गाणे गातो, दिये जलते है फूल खिलते है, बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है… अनेकांचे तरी हे अतिशय आवडते गाणे आहे. एका प्रसंगात सोमू विकीला म्हणतो, जहा यार नहीं वहा प्यार नही, जहा प्यार नही वहा यार नहीं.

  दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी आशयघन स्वच्छ मनोरंजक चित्रपटासाठी ओळखले गेले. मुसाफिर, अनाडी, असली नकली, सत्यकाम, आशीर्वाद, आनंद, गुड्डी,  अभिमान,  मिली, अर्जुन पंडित, गोलमाल, जुर्माना, नौकरी, आलाप, खुबसुरत, झूठ बोले कव्वा कांटे इत्यादी चित्रपटातून त्यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल जपली. त्यांचा स्वतःचा आपला हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. ते स्वत: संकलकही असल्याने त्यांच्या दिग्दर्शनीय मांडणीत एक विशिष्ट लय असे. अमिताभ व जया बच्चन यांच्यावर त्यांचे खास प्रेम. ‘नमक हराम’मध्ये विकीची भूमिका साकारताना अमिताभने त्यांचा आपल्यावरचा विश्वास साध्य केल्याचे दिसले. हा चित्रपट प्रदर्शित होताच यातील अभिनयावरुन राजेश खन्ना श्रेष्ठ की अमिताभ यावरुन चित्रपट साप्ताहिके, मासिकांतून भरपूर लिहिले गेले आणि या दोघांच्या फॅन्समध्येही जुंपायची हे विशेष.
  ‘बेकेट’ या विदेशी चित्रपटावरुन ‘नमक हराम’ बेतला होता. मराठी रंगभूमीवरही याच थीमवर आधारित ‘बेकेट’ नाटक आले. काळ बदललाय. सोशल मीडियाच्या युगात ‘फेसबुक फ्रेन्ड’ ही गोष्ट जन्माला आली. फोन अ फ्रेन्ड हीदेखील एक संकल्पना आहे. प्रत्यक्षात भेटायचे नाही. फोनवरची मैत्री असा प्रकार. या प्रवासात ‘मैत्रीची गोष्ट सांगणारे’ चित्रपट वेगळाच ठसा उमटवणारे.

  – दिलीप ठाकूर