गौ. गाव : सर्वसुखप्रदा

देशातील ग्रामीण भागात धार्मिकतेत उत्पन्नाचे साधन म्हणून मूळ ओळख असलेला गोवंश आता शहरीकरणाच्या नावाखाली नामशेष होतोय, ही बीब चिंताजनक आहे. गायीचे धार्मिक महत्व हा मुद्दा वेगळा मानला तरी वैज्ञानिकदृष्ट्या गायीच्या दुधापासून ते गोमुत्रापर्यंतच्या विविध वस्तुंना ज्यांना आपण पंचगव्य संबोधतो, त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या गोवंशाचे रक्षण करण्याची महत्वाची चळवळ पुढे नेण्यासाठी आता इस्कॉनसारख्या संघटनांनी वेदिक व्हिलेजच्या माध्यमातून हाती घेतली आहे.

  आपल्या हिंदू धर्मात वेदिक काळापासून गाईला महत्त्व आहे. आपण गाईला मांगल्य, संपन्नता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले आहे. ‘ऋग्वेद’ हा जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथात आपल्या मानवी जीवनात गाईचे स्थान किती महत्वाचे आहे, हे सांगणारा मंत्र आहे. ‘माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः। प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट ।।’ गोमुत्राला आपल्या धार्मिक विधींमध्ये महत्वाचे मानले जाते. त्याचे वैद्यकीय महत्त्वही आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य संबोधले जाते, जे विविध रूपात आपल्याला उपयोगी पडते. गाईला आपण माता, बहिण, कन्या अशा अनेक रूपात सांभाळतो. पण गेल्या काही वर्षात गाईंची हत्या होण्याचे प्रमाण देशभरात वाढले. यासंदर्भातील विविध कारणांमध्ये मतमतांतरे असली तरी आपण गाईंचे रक्षण करणे अनिवार्य असल्याचे आता वैज्ञानिकांचेही म्हणणे आहे.

  शेतकऱ्याकडे असलेले पशूधन वयस्थ झाल्यावर त्यांचा सांभाळ करण्याची त्याची तेवढी ऐपत नसल्याने हे पशूधन कसायाच्या हाती जाते, हे सत्य नाकारून चालणार नाही. अशा गाई-गुरांचे रक्षण करण्यासाठी काही धार्मिक आणि सेवाभावी संस्था गेल्या काही वर्षात पुढाकार घेवू लागल्या आहेत. त्यापैकीच एक नाव आहे ‘इस्कॉन’. याचे संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी जगभरात ‘हरे कृष्ण हरे राम’ ही चळवळ उभी केली. त्यांच्या शिकवणीतून जगभरात इस्कॉनची जवळपास ७५० मंदिरे उभी राहिली आहेत. राम-कृष्णांच्या भक्तिसह या संस्थेच्या माध्यमातून भुकेलेल्या अन्नदान ही चळवळ जशी चालवली जाते. तशीच महत्त्वाची चळवळ गोरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर चालवली जाते. याच चळवळीचा एक छोटासा भाग म्हणून इस्कॉनच्या वतीने पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि गुजरातमधील उमरगाव येथे गाईंचा सांभाळ करण्यासाठी निलाचल वेदिक व्हिलेजची स्थापना करण्यात आली. या परिसरात पाचशेहून अधिक गाईंचा व्यवस्थित सांभाळ केला जातो. या संपूर्ण परिसराची जबाबदारी राधिका कन्हाई दास यांच्यावर आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कृष्णसेवेसाठी अर्पण केलं आहे. राधिका कन्हाई दास यांच्या म्हणण्यानुसार आपल्या संस्कृतीत आपले माता-पिता वयोवृध्द झाल्यावर त्यांना सांभाळण्याचे नैतिक कर्तव्य जसे आपले आहे. तसेच, आपण गाय आणि बैलांचा शेवटपर्यंत सांभाळ करण्याची आवश्यकता आहे. याच निकषावर त्यांनी गोरक्षणाची जबाबदारी आजवर लिलया पेलली आहे.

  वेळप्रसंगी स्वतःच्या जीवावर उदार होवून कसाईखान्यात जाणाऱ्या गायी-गुरांना त्यांनी वाचवले आहे. या ठिकाणी दुभत्या गाईंसह जवळपास १५० गाय आणि बैल वृध्दावस्थेत आहेत. त्यांच्या उपचारासह संपूर्ण जबाबदारी येथे घेतली जाते. आजही कोणी गाई कत्तलीसाठी जात असल्याचे त्यांना कळवले तर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ते गाईंच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतात. शेकडो गायींचे संगोपन करताना त्यांच्याप्रती असलेली भक्तिभावना त्यासंदर्भातील श्रमाचे ओझे कमी करते, असे दास यांनी सांगितले. येथील गोशाळेचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून गायींचे पालन- रक्षण करण्याचा दृढ संकल्प करावा, गाईंच्या श्रेष्ठत्वाला सर्व थरातून मान्यता प्राप्त आहे.

  गोमातेची सेवा व तिच्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांचा सदैव उध्दार- कल्याण होते, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे रस्त्यावर गोमाता फिरू नये आणि तिला सन्मान मिळावा यासाठी, आपण काम केले पाहिजे, अशी विनम्र विनंती करायला राधिका कन्हाई दास विसरत नाहीत. या व्हिलेजमध्ये आणखी काही विशेष गोष्टी आहेत. या संपूर्ण ६९ एकरांच्या परिसरात सर्व प्रकारची शेती केली जाते. येथे राहणारे सर्व अनुयायांसाठी लागणाऱ्या अन्नधान्यापासून फळ-फळावळ येथेच पिकवले जातात. गोशाळेमुळे येथे दुध-दुभत्याची कमी नाही. शेकडो लिटर दूध आणि दुग्धजन्य, ताजा भाजीपाला इत्यादी पदार्थ इस्कॉन जूहू येथे विक्रीसाठी पाठवला जातो. त्यातून आवश्यक असलेल्या अन्य वस्तूंची आणि सुविधा उपलब्ध केल्या जातात. विशेष म्हणजे येथे पिकणारी सर्व पिके ही सेंद्रीय खतांचा वापर करून पिकवली जातात. त्यामुळे आरोग्यासाठी ते हितावह आहे. या जागेत अधिकाधिक बांधकाम करण्याचे टाळून त्यांनी नैसर्गिक वातावरण राखले आहे. येथे जगन्नाथाचे मंदिर असून त्याचे स्वरूप एखाद्या गावात असावे असेच आहे. मंदिर असो वा प्रसादालय; शेणाने सारवलेली जमीन, बांबूपासून तयार केलेली आसन व्यवस्था अशा कितीतरी गोष्टी आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात सहवास घडवतात. त्यामुळे येथे भेट देणाऱ्याला जुन्या पध्दतीच्या गावांची आठवण आवर्जून येते.

  येणाऱ्या प्रत्येकाला संस्थेच्या वतीने मोफत जेवण देवून अन्नदानाची सेवा केली जाते. याठिकाणी पिकणाऱ्या भुईमुगापासून तेल काढणे आणि उसाच्या रसापासून गूळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया अशा अनेक गोष्टींसाठी पारंपरिक पध्दतीचाच वापर केला जातो. आजच्या यांत्रिक युगात अशी आवश्यक साधने येथे जपली आहेत, हे वैशिष्ट्य मानावे लागेल. उपलब्ध जमीन आणि मनुष्यबळ लक्षात घेत वर्षाकाठी दोन-तीन विविध प्रकारची पिके घेतली जातात. या पिकांची बी-बियाणे बाजारातून आणण्याऐवजी ही आता त्यांनी स्वतःच विकसित केली आहेत. ही कौतुकाची बाब आहे. ‘हरे राम हरे कृष्ण’ ही अध्यात्मिक भक्तिची चळवळ पुढे नेताना त्यांनी भावी पिढीपुढे अनेक आदर्श ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहराच्या लगत असूनही या इंटरनेटच्या युगात येथील मंडळी वेदीक आयुष्याचा अनुभव घेतात. तरी देखील येथे सध्याच्या गरजांसाठी लागणारी अत्याधुनिक साधनेही उपलब्ध आहेत. येथे वेदाभ्यास करणाऱ्या भाविकाला मोबाईल, इंटरनेट अशा सुविधा वापरण्याची मुभा आहे. तेथे शिकण्याऱ्या मुलांना खेळण्यासाठी मैदान-पोहण्यासाठी तलाव अशा सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीवनाचे सार प्रत्यक्षात सार्थ ठरवण्याचा प्रयत्न आणि जनमानसात भक्तिची, अध्यात्मिकतेची, उपासनेची ओढ निर्माण करत सभोवतालच्या निसर्गाचे रक्षण करण्याचा यशस्वी प्रयत्न येथे केला जातो. त्यांच्यामते आध्यात्मिक जीवन जगताना कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करण्याची प्रेरणा निसर्गातूनच मिळत असल्याने निसर्गाच्या सानिध्यातच जीवनाचे सार दडल्याची अनुभूती याठिकाणी भेट दिल्यावर नक्की येते.

  – नरेंद्र कोठेकर
  nkothekar@gmail.com