घेवाले गेला ‘लस’ अन् दबली भाऊची ‘नस’

ओ..भाऊ लस घ्यायची असेल तर रांगेत लागा. साऱ्यांनाच घाई आहे. सर्वांची वेळ येते. लहान काय, मोठा काय? उगीच नसनस करून का फायदा? लस तर सर्वांनाच घ्यायची आहे.

    कोरोना ऊर्फ कोविड 19 ने नाकात दम करून टाकलय. अन भल्या भल्याच्या डोक्याची नस फाटण्याची वेळ आली. आपल्याला कोरोना होवू नये, म्हणून तिकडे कोरोनाची तपासणी अन लस घेण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग मोडून विनामास्क वावरणारे गावनेते साऱ्यांच्या पुढेपुढे करत आहेत. त्यांची ही बत्तमीजी पाहून ‘मै तरे नस नससे वाकीब हू’ असे एकाने म्हणून दिले. आणि लस घ्यायच्या पहिलेच भाऊची नस दबली.

    सुई टोचायच्या पहिलेच मोंदरा आल्यागत त्याच्या नसानसात धावणारा राजकीय बाणा तिथेच उफाळून आला. गोलमाल आणि झोलझाल करण्यात एक्सपर्ट असलेल्या या भाऊचा पारा चढला.

    आपल्या देशात शिस्त नावाची काही वस्तूच नाही. लोक जिथे तिथे झोल करून समोर जाण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी त्यांचा हा प्रयत्न सफल ठरत नाही. चिरीमिरी देऊन कानामागे येऊन तिखट होणाऱ्या या प्रवृत्तीला खतपाणी देण्यापेक्षा वेळीच आवर घालण्याची गरज आहे. आणि नेमकी ही संधी त्याच्यावर टपून असलेल्या लोकांनी साधली. हा काय प्रकार आहे? ‘रांग लागली आहे ना. रांगेत उभे राहा.. बाकीचे लोकही त्याच कामासाठी उभे आहेत. आम्ही रांगेत असणाऱ्या लोकांनाच प्रथम प्राधान्य देऊ. थोडं समजून घ्या.  अस उत्तर आतून लसीकरण करणाऱ्या वैद्यकीय चमूकडून आले. अन असल्या वागणुकीने  झोल्याभाऊंच्या हार्टचा  इगो हर्ट झाला. अन ते अगदम तरातरा मी कोण? आपण ओळखत नाही?  या पावित्र्यात आले. पण समोरची व्यक्तीही पुढे सरसावली. कोण गा तू झोल्याभाऊ? मी कोणाला ओळखत नाही? नियम तो नियम. सर्वांना सारखाच. मग मोठा असो की लहान. हा प्रसंग काही आपली ओळख पटवून देण्याचा नव्हताच. उलट लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी शिस्त पाळलीच पाहिजे. परंतु, नाकात नस गेल्याने ठसका लागल्यागत भाऊचे झाले होते. भरल्या घरात नसनस करणाऱ्याप्रमाणे हे बोल जिव्हारी लागलेल्या भाऊने मग

    मी वरिष्ठांकडे तुमची तक्रार करतो, अशी नेहमीच्या स्टाईलने बतावणी केली. आयुष्यभर मी शिस्त  व नियम पाळले आहेत. (हे त्यांनाच ठावूक). ज्यांनी माझे ऐकले नाही मग तो माझ्यात झगडा लावणारा गुरू असो की चाटूकार चेला. मी अनेकदा त्यांनाही धारेवर धरून धोबीपछाड दिली आहे. मी समोरून आलो तर ते रस्ता बदलतात. तेवढी माझी दहशत आहे. वाटल्यास त्यांना विचारा. असं म्हणून झोल्याभाऊ पेटलेल्या बल्बच्या तारेगत चांगलेच लालबुंद झाले. पॅन्टच्या खिशातून  मोबाईल काढला व हातात धरला. ‘तुम्हाला कोण घाबरतो आणि कोण नाही त्याचे मी काय करू? नियम सर्वांना सारखाच आहे. समोरचा बोलला. ‘लोकांनी विचारले की सांगतील तुम्हाला. कळेल की, तुम्ही कोणाशी पंगा घेत आहे तो..’ झोल्याभाऊंचा राग अजून धुसमत होता. ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब असे उगाच म्हणत नाही हं..! रांगेतील एका नागरिकाने सुरात सूर मिसळले.  म्हणजे..? लसीसाठी आम्ही रांगेत लागायचे काय? आम्हाला काही व्हल्यू बील्यू आहे की नाही? पुटपुटणाऱ्या माणसाकडे डोळे वटारून झोल्याभाऊ घशाला कोरड पडल्यासारखे खेकसले.

    ओ..भाऊ लस घ्यायची असेल तर रांगेत लागा. साऱ्यांनाच घाई आहे. सर्वांची वेळ येते. लहान काय, मोठा काय? उगीच नसनस करून का फायदा? लस तर सर्वांनाच घ्यायची आहे. इतके होवूनही भाऊचा पारा काही शांत झाला नाही. त्यामुळे तिथे असलेल्या लोकांना एकदाची भेदरलेली म्हस बरी पण लस नको अस झाल होत. लसीसाठी महाभारत करणारा भाऊ मग समोरच्या बदलीवर आला. ही अदली बदली मला सांगू नका. आजवर मी अशा चांगल्या चांगल्यांना अद्दली घडविल्यात हे म्हणताच गुगलीवर भाऊची विकेट केव्हा गेली हे कळलेच नाही. आता बस्स करा, रांगेत व्हा. अन तुमची वेळ आली की लस घ्या. अजून बरेच जण लायनीत उभे होते. पण लसीची सुई टोचण्यापूर्वी भाऊच्या डोक्याले आलेला मोंदरा काही केल्या जात नव्हता.